व्यथेची गाथा

Submitted by निशिकांत on 24 May, 2020 - 10:37

( मी करम या समूहाशी जुडलेला आहे. आधी हा ग्रूप व्हाट्सअ‍ॅप वर कार्यरत होता. काव्य संमेलने, गझल मुशायरे या व्यतिरिक्त हा समूह सामाजिक उपक्रम पण घेत आहे. असे विषय ज्यांना इतर संस्था हात पण लावत नाहीत ते पण श्री भूषण कटककर, समूहाचे अ‍ॅडमिन यांच्या पुढाकाराने समूहाच्या कार्यक्रमात चर्चिले जातात. असे खूप कार्यक्रम समूहाने महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे येथे घेतलेले आहेत. पैकी एक कार्यक्रम वेश्यांचे प्रश्न उजागर करण्यासाठी घेतला होता. या कर्यक्रमात दोन वेश्यांना व्यासपीठावर बोलावून त्यांच्या मुलाखती घेतल्या होत्या. त्या वेश्यांचे स्पष्ट बोलणे माझ्या मनाला भिडले होते. एका वेश्येने आपल्या मुलीला सोबत आणले होते जिचे वय १२/१३ वर्षे असावे. तिच्याबद्दल प्रश्न विचारले असता ती म्हणाली की मी जे आयुष्यात भोगते आहे ते माझ्या मुलीच्या वाट्याला येऊ नये म्हणून मी प्रयत्नशील आहे. ही मुलाखात ऐकून सर्व श्रोते गंभीर झाले होते. हे वैचारिक वादळ घोंघावत असताना लिहिलेली कविता पेश करतोय. या कवितेचा मी समारोप केलेला नाही, ही रचना अर्धवट वाटते. याचे कारण म्हणजे वेश्यांच्या प्रश्नांना देवाजवळही उत्तर नाही असे माझे मत आहे. )

माझी ही अवस्था
कळेना त्रयस्था
अनाथाच्या नाथा
जीवघेण्या व्यथा
वाचली कधी का देवा
वेश्येची ही गाथा? ||१||

गवाक्षी बैसणे
सावज हेरणे
अंग हे देखणे
बाजारी विकणे
देवा हेच का रे
जीवन जगणे? ||२||

रिती झाली खाट
दुसऱ्याची वाट
मांडलाय पाट
मी उष्टावलेलं ताट
देवा मला देशील का रे
उगवती पहाट? ||३||

अंगाची चुरगळ
मनाची मरगळ
ऋतु पानगळ
अश्रूंची घळघळ
देवा कळते तुला का रे
मनाची भळभळ? ||४||

देहाचा देव्हारा
पावित्र्य पोबारा
ज्वानीचा पेटारा
अब्रूचा डोलारा
देवा दिला का रे मज
अग्नीचा फुलोरा? ||५||

गिधाडांची भीड
समाजाची कीड
अंतरीची पीड
संस्कृतीची चीड
नावेला दे दिशा देवा
भरकटणारे शीड ||६||

देह हा झिजला
श्वासही थिजला
अश्रूंनी भिजला
श्रावण भाजला
अंधारही माझा देवा
कसा रे विझला? ||७||

निशिकांत देशपांडे मो. नं. ९८९०७ ९९०२३

Group content visibility: 
Public - accessible to all site users