लोडशेडींग (द्विशतशब्दकथा)

Submitted by A M I T on 23 May, 2020 - 12:52

तिन्हीसांजेची वेळ.

लेक अजून कामावरून यायचा होता.
सून स्वयंपाक आटोपून टीव्हीवरच्या मालिका पाहत बसली होती. नातू मोबाईलवर गेम खेळण्यात दंग होता. नात कानात बोंडे टाकून गाणी ऐकत बसली होती. मी आपली ओटीवर कोपऱ्यात बसले होते.

अचानक लाईट माहेरी गेली. टीव्ही बंद झाला. सगळीकडे अंधार पसरला.

"जळली मेली ती लोडशेडींग !" आतून सुनेचा वैतागलेला आवाज आला.

मी बत्ती पेटवली. उजेड पाहून काही पाखरं बत्तीभोवती भिरभिरु लागली.

खालच्या आळीत कुठेतरी अंताक्षरी सुरु झाली होती.

आमची नातवंडं काही मोबाईल बाजूला ठेवायला तयार होईनात. त्यांचं आपलं सुरूच.

त्यांच्या मोबाईलच्या बॅटरी ढुस्स झाल्या तेव्हा कुठे ती माझ्या शेजारी येऊन बसली. खरं सांगते, बरं वाटलं.
गप्पांच्या ओघात जुन्या आठवणी जाग्या झाल्या. ते हालाखीचे दिवस, तो जगण्याचा संघर्ष आणि ते छोट्या छोट्या क्षणांमधलं इवलं सुख. सगळं लख्ख आठवत होतं. पोरंही सारं मन लावून ऐकत होती. हळहळत होती.

आजोबांच्या मृत्यूची गोष्ट सुरु असताना लाईट परतली. पोरं लगेच आत धावली. मोबाईल चार्जरला लागले. टीव्ही सुरु झाला. मालिकांनी पुन्हा सुनेचा ताबा घेतला.
पोरांचा लोडशेडींगदरम्यानचा कंटाळवाणा वेळ माझी म्हातारीची बडबड ऐकून बरा निघून गेला असावा.

आजोबांच्या मृत्यूची कथा आवंढ्यावाटे परत आत ढकलली तसे एकाएकी डोळ्यांत जमा झालेले अश्रू दाटीने बाहेर पडले. गालावरच्या सुरकूत्यांतून वाट काढू लागले.

बत्तीभोवतीची पाखरं कधीचीच पांगली होती.

मग बत्ती फुंकून मी मागच्या पडवीतल्या अंधाऱ्या विश्वात गुडूप झाले.

* * *

http://kolaantudya.blogspot.com/

Group content visibility: 
Use group defaults

२ प्रतिक्रिया झाल्या -
(१) नव्या पीढीच्या callous पणाचा राग आला.
(२) आजींनी 'आमच्या काळी किनई ...." असा सूर लावण्यापेक्षा रिकाम्या वेळेत, वाती वळाव्या, पुस्तके वाचावी, गव्हले वळावे, आपला आपला फेरफटकादि दिनक्रम ठेवावा असे प्रकर्षाने वाटले.

Sad

सामो, कथेत जाणवले की आजीशी बोलायला कोणालाच वेळ, इच्छा नसते. आतापण गप्पाच्या ओघात जुना विषय निघाला म्हणुन आजी जुन्या घटना बोलत आहे. वय झालं तरी संवाद साधावा असं वाटत नसेल? हां, 'आमच्या काळी...' हे सारखे बोलण्यात येऊ नये हे बरोबर आहे कारण पुढच्या पिढीला कंटाळा येऊ शकतो. पण म्हातारं झालं की तोंडाला कुलुप घालुन फक्त यांत्रिक कामे करत रहायचे ही शिक्षाच झाली की.

हे असं होते.. आणि होत राहणार.. आपल्या म्हातारपणाची आर्थिक तरतूद जसे आपण करत आहोत तसेच भावनिक तरतूद आणि वेळ कसा घालवावा हे सुद्धा यापुढे लक्षात ठेवावे लागणार

कथा फार आवडली

आपल्या म्हातारपणाची आर्थिक तरतूद जसे आपण करत आहोत तसेच भावनिक तरतूद आणि वेळ कसा घालवावा हे सुद्धा यापुढे लक्षात ठेवावे लागणार >>+111

ऋन्मेष >>+1
कथा आवडली. विचार करायला लावणारी कथा आहे.

हे असं होते.. आणि होत राहणार.. आपल्या म्हातारपणाची आर्थिक तरतूद जसे आपण करत आहोत तसेच भावनिक तरतूद आणि वेळ कसा घालवावा हे सुद्धा यापुढे लक्षात ठेवावे लागणार >>>> +१

आवडली कथा!

जोपर्यंत तुम्ही आजीसोबत बोलणं सुरू करत नाही तोवरच ते बोअरिंग, एकदा का बोलणं सुरू झालं तर त्याला थांबा नाही.. आजी तिच्या काळात पोचल्यावर अनेक सुरस गोष्टी कळतात..

अमित तुझ्या कथेतला गर्भित भयार्थ मला जाणवला, आजवर तुझ खो खो हसायला लावणार अप्रतिम विनोदी लेखन वाचलं आज अस गूढ आर्त अस काही, तू कुठलाही प्रकार लीलया लिहू शकतोस
लिहीत रहा यार