पडघमेट्स~५

Submitted by ज्येष्ठागौरी on 22 May, 2020 - 22:05

पडघमेट्स~४
मध्यंतरानंतर पडदा उघडताना डाव्या आणि उजव्या विचारसरणीचे गट नायकाला आपल्याकडे ओढायचा प्रयत्न करत असतात, हा प्रसंग अतुल पेठे आणि कल्याण किंकर फार भारी करायचे.अतुल शाखेचा दंड घेऊन बहारदार संचलन करायचा आणि कॉम्रेड कल्याणच्या तोंडची वाक्य माझ्यातरी डोक्यावरून जायची ,लुम्पेन बूरज्वा वगैरे शब्दांची बेरीज डोक्यात व्हायची नाही अजूनही नाही.यात मला म्हणजे नायकाच्या कम्युनिस्ट प्रेयसीला एक गाणंही होतं त्यात शब्द होते "आणखी शपथ घेऊ कशा कशाची ,लेनिन माओ आणि प्रोलेतारीयतेची, की कामगारक्रांतीच्या दृढ निष्ठेची" आणि अतुल शाखेच्या संचलनानंतर म्हणतो 'कोणाला काही शंका? असणं शक्यच नाही!" डाव्या उजव्या विचारसरणीतला संघर्ष फार खुसखुशीत पध्दतीने मांडला होता.डॉक्टरांची नाटक बसवण्याची पद्धत फार छान आहे. डॉक्टर दौंडला जाऊन येऊन नाटक बसवायचे ही गोष्ट थक्क करणारी होती.डॉक्टर स्वतः फार हुशार आहेतच ,उत्तम अभिनेते, दिग्दर्शक आहेतच पण त्याहीपेक्षा ते आपल्या अभिनेत्याकडून त्यांना हवा तसा अभिनय नेमका काढून घेतात पण अभिनेत्याला वाव खूप असतो,भूमिकेचा विचार करायचा आणि साकारण्याचा.त्यामुळे अतुल, रंगा, प्रसाद, राहुल यांनी खूप विचार करून, अभ्यास करून एकदम पटतील अशा व्यक्तिरेखा उभ्या केल्या. नाटकात रंगमंचावर जसं हे संचलन व्हायचं ,तशी एक पोलीस परेडही व्हायची ती राहुल सोलापूरकर घ्यायचा,राहुल हा साहित्यिक शुभाताई सोलापूरकरांचा मुलगा ,तो ह्या नाटकात विविध भूमिका करायचा. मी त्याच्याबरोबर घोंटुल केलं होतं त्यामुळे राहुलचा अभिनय ,त्याची आवाजाची फेक, भाषेवरचं प्रभुत्व आणि पाठांतर हे जवळून पाह्यलं होतं. त्याला खरंतर माईकची आवश्यकताच नाहीये इतकं आवाजाचं projection छान आहे.टकलू हैवान आणि राजर्षी शाहू या त्यानं केलेल्या काही लोकप्रिय भूमिका आणि आता तो करत असलेली निवेदनांची अप्रतिम कामं याचं मला कौतुक वाटतं .अफाट आहे तो.राहुलला छळणं हा एक चांगला उद्योग होता तेंव्हा, पण त्याच्या शरीरयष्टीमुळे जरा लांबूनच छळलं जायचं आणि त्यात आघाडीवर त्याचा जवळचा मित्र काक्या,तसा राहुलची खूप छळायचा खूप पिळायचा एकदम कष्ट जोक्स सांगून.तसंच आम्ही ज्यांना छळू शकू अशी मेघना कुलकर्णी, संगीता गरुड आणि सुबोध राजगुरु ही तीन अमराठी माणसं होतीच.म्हणजे तिघेही इंग्लिश मीडियममधून शिकलेले होते आणि बाकी सगळे शुद्ध मराठी होते त्यामुळे त्या तिघांना पिडता यायचं. मेघना कुलकर्णी ही एस एन डी टी तून Diet and Nutrition विषय घेऊन B Sc ला सुवर्णपदक घेऊन पहिली आली होती, ती आहारतज्ज्ञ आहेच ,पण तिच्या आवडत्या क्षेत्रात खूप नाव कमावती आहे.पण तिचे वडिल आर्मीमध्ये असल्यानं खूप वेगवेगळ्या ठिकाणी शिक्षण झाल्यानं बोली मराठी तितकं चांगली नव्हती. ती ,तो पहा " कीडा" असं चुकून जरी म्हणाली तरी तीन पैशाचा तमाशात जसं चंद्रकांत काळे भीकारी नाही रे भिकारी, -हस्व भि ,या चालीवर" कीडा नाही किडा" असं तिच्याकडून घोकून घ्यायचं.मेघनासाठी "येरे घना येरे घना " या चालीवर" ये मेघना ये मेघना मार उडया टणाटणा" हे गाणंही बसवलं होतं. संगीताही ह्या कचाट्यात सापडायची ,पण सुबोध वरताण होता ,तो काय म्हणतोय कधीच समजून यायचं नाही त्याला सुबोध ,तू बोललास ते मराठीत डब कर असं सांगितलं जायचं.
वैजू दामले , संगीत वाळवेकर,सुचित्रा केरकर ,अनिता पंडित, कांचन गिंडे या सगळ्या फार गोड मुली होत्या आणि गुणीही.रुचिर कुलकर्णी हा स प मधला मित्र आणि गुणी कलाकार , श्रीपादराज आमले आणि दामले आणि ठकार ही एक वेगळीच त्रयी होती पडघमच्या भाषेत bracket, आणि एकदम गोड स्वभावाचा राहुल गोखले होता,नरेंद्र लागू होता आणि संजय केळकर होता.आणखी माधव अभ्यंकर होता. हा तसा माझा शेजारी पण भेटला तिथे.माधव छान कामं करतो, पुढे त्यांनी नाना फडणवीसांची भूमिकाही केली घाशीराममध्ये. अजित भगत हा आमचा मित्र म्हणजे एकदम धमाल काम करायचा छोट्या छोट्या भूमिकेतून सातच्या तालमीला नऊ वाजता यायचा जरा उशीर झाला असा सांगायचा,आमची लीड गायिका होत्या श्रुती धडफळे आणि अनुपमा ढमढेरे आणि नंतर मेघना कुलकर्णी, श्रुती गोड गायची.आणि अनुपमा म्हणजे म्हणजे पमी ढमी(तिला दिलेलं नाव), ती माझी शाळेतली मैत्रीण ,डॉ ज्योती ढमढेरे यांची मुलगी.अप्रतिम सुंदर गायची.तिचा आवाज अजून मनात घुमतोय.अजूनही सुंदर गाते,अमेरिकेत गाण्याच्या क्षेत्रात खूप छान मनापासून काम करते.अनुपमाकडून ऐकलेलं"सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या" हे गाणं अजून मनात रुंजी घालतंय कोणी विसरच शकणार नाही. मेघनाची आई कुमुद कुलकर्णी या गायिका आहेत, त्यामुळे तिला तो वारसा आपोआप आलाय.उज्वला गाडगीळ ही अनुपमाची नंतर झालेली वहिनी पण आधीची स प मधली आमची मैत्रीण, ग्रीप्सच्या नाटकात बहार आणलेली उज्ज्वला आताही "समाजस्वास्थ्य"सारख्या नाटकांमधून कामं करतीये तिचं आव्हानात्मक वेगळंच क्षेत्र सांभाळून.आसावरी कुलकर्णीनी तेंव्हा अमिताभ शबाना आझमी अभिनित "मैं आझाद हूँ"मध्ये काम केलं होतं.आणि याचबरोबर जुनी जाणती टीम होती.चंद्रकांत काळे,रामभाऊ रानडे,कल्पना देवळणकर,सुरेश बसाळे, रमेश मेढेकर, उदय लागू, श्री पेंडसे,भगत गद्रे, उमेश कुलकर्णी ही stalwart मंडळी होतीच. ही मंडळी म्हणजे विशेष भांडार होतं. अभिनयाचं, किस्से आणि धमाल गोष्टींचं.मला तर कधीच हे लोक मोठे परके वाटले नाहीत.चंद्रकांत काळेंची गाणी ऐकणं विशेषतः त्यांचं प्राध्यापकाची नोकरी करणे हे गाणं धमाल करायचं त्यातलं "सदा दिसावे बापुडवाणे" हे म्हणतानाचा त्यांचा अभिनय किंवा उदय लागूचा मंडईतल्या दादाचा अभिनय बघणं हा जसा एक भलताच भारी अनुभव होता. तसाच त्यांचे सगळयांचे किस्से ऐकणं आणि त्यांच्यातला अगदी खणखणीत मैत्रीचा बंध अनुभवणं फार सुखद होतं. पडघमचा सगळ्यात महत्वाचा भाग होता त्याचा कोरस. काही जणांना मोठा role नव्हता , काहींना होता पण त्यात कोणालाही कमीजास्त वाटायचं नाही.सगळे जण या नाटकात काही मेन रोल काही बिन रोल आणि काही क्रीम रोल. म्हणजे रोल लहानमोठा म्हणून कसूर कुठेच नाही.सर्व गाणी सगळ्यांनी म्हणायची, सगळी कामं करायची असं एकदम छान वातावरण.काही मंडळी नंतर जोडली गेली,त्यात रमेश पाटणकर,नीती थत्तेअशी मंडळी होती.स्वाती थत्ते नवीन यायला लागली तेंव्हा काक्यानी तिचं नाव विचारलं,ती नीतीची बहिण आहे हे कळल्यावर" ए घरटी एकेकच या "अशी टिप्पणी करून तो नष्ट झाला. माझ्या पडघमेट्समधील अतुल टेम्बे हा गुणी मुलगा मात्र अकाली गेला, त्याची आठवण यानिमित्तानी झाली.पाहता पाहता बहुतेक सगळ्यांची आठवण झाली. मी कोणाचं नाव घ्यायला विसरलेही असेन कदाचित पण दोष माझ्या स्मरणाचा आहे त्यांच्या गुणवत्तेचा नाही.
पडघम~६मध्ये लगेचच भेटू...

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान वाटतंय तुमच्या आठवणी वाचायला! एखाद्या टिमची भट्टी जमून आली असली की तो अख्खा अनुभव अविस्मरणीय होऊन जातो तसे तुमचे लेख वाचून वाटते.

छान वाटतंय तुमच्या आठवणी वाचायला!
अजून सविस्तर वाचायला आवडेल.

भागांना क्रमांक देताना काहीतरी गडबड उडाल्ये.

वाचते आहे. आपण सगळ्या मेट्स बद्दल किती आपुलकीने लिहिताय. ती आपुलकी आम्हाला वाचताना जाणवते आहे, हे विशेष.