दिलेस तू जे..

Submitted by मनोजकुमार देशमुख on 20 May, 2020 - 07:34

दिलेस तू जे गृहितच धरले
उणीवांचे मी पर्वत केले
अमृत जणू हे मनुष्य जीवन
माझ्या मतीने मी नासवले

आत्मस्तुती ती जागोजागी
इतरांचे ते दोषच दिसले
धूळ माखली चेहऱ्यावरती
वेळोवेळी आरसे पुसले

रांग मोठी ती समोर दिसली
मागे गर्दी कुठे पाहिली?
अपेक्षांची ती चढती यादी
कृतज्ञता ना मनी राहिली

दिलेस तू जे अगणित देणे
माझे मलाच जेव्हा कळले
डोळ्या मध्ये अश्रू दाटले
अलगत दोन्हीं कर हे जुळले

Group content visibility: 
Use group defaults