करो ना!! - १

Submitted by सामो on 19 May, 2020 - 21:16

कुरंगनयना, सरोज कारखानिस ने व्यायामशाळा म्हणजे उच्चभ्रु भाषेत, जिम जॉइन करुन उणापुरा एक महीना झालाही नव्हता की जिममध्ये मेंबरांची संख्या एक्स्पोनेन्शिअली वाढू लागली. बाय द वे, सरोजनेदेखील जिम काही मेंबर म्हणुन जॉइन केलेले नव्हते. ती तिथे लागली होती जिम इन्स्ट्रक्टर म्हणुन. तसे तिथे आधीपासूनच ३ इन्स्ट्रक्टर्स होते. पण त्यांना फार मेंबर खेचता आलेले नव्हते. पैकी पहील्याला रेडा म्हणु यात, दुसऱ्याला गेंडा तर तीसरीला कैदाशीण म्हणु यात ना.रेड्याने प्रोटीन शेक्स पीउन पिउन शरीर कमावलेले होते. गेंडा बोलण्यात अघळपघळ व चतुर असला तरी त्याने फारसे दिवे लावलेले नव्हते. कैदाशिणीची मात्र बरीच वट होती कारण बहुसंख्य स्त्रियांना जिम इन्स्ट्रक्टरम्हणुन स्त्रीच लागे. त्यामुळे तिला बराच भाव होता. चवथे पात्र होते आपला दिनू टिपणीस. डाएट स्पेशिअलिस्ट कम मॅनेजर कम 'हॅन्डी मॅन'. डाएटचं काम तसं फार नसे, एकदा मेंबरसची आवडनिवड, सवयी, आरोग्यविषयक समस्या आणि गरजा कळल्या की , मग दिनूचे काम सोप्पे असे. एक विशिष्ठ व अतिक्लिष्ट असा डाएट प्लॅन बनवुन द्यायचा जो की आकाशातून ब्रह्मदेव जरी जमिनीवर आला आणि अनंतकाळ प्रयत्न करत राहीला, तरी तो प्लॅन तंतोतंत पाळणे त्यालाही शक्य होणार नाही. आणि मग वजन कमी झाले नाही तरी मेंबर कोणत्या तोंडाने तक्रार करणार बरोबर!

गद्धे पंचविशीतील दिनू आजकाल कंटाळु लागला होता. त्याच्या आयुष्यात नवीन काही, सनसनाटी नाही तरी दिलखेचक असे काहीच घडत नव्हते. जिम एके जिम, जिम दुणे घर. घरातही तेच जेवण, पुस्तके, फेसबुक, व्हॉट्सॅप .... कंटाळा कंटाळा आला होता. पण ज्या दिवसापासुन सरोज कामावर येउ लागली होती, त्या दिवसापासुन त्या रुक्ष जिममध्ये जरा तरी हिरवळ फुलली होती. टाईट ॲक्टिव्ह वेअर मध्ये सरोज रोज तिच्या टीमबरोबर कधी योगासने तर कधी पिलाटेज् ( pilates), कधी सूर्यनमस्कार तर कधी वेट-लिफ्टिंग करत असे. त्यामध्ये तिचे अकार, उकार, वेलांट्या ..... असो!! दिनू काही सन्यासी नव्हता त्याला भुरळ न पडती तरच नवल. पण त्याच्या मनाचा बेत, सरोजला कसा कळावा? असेच दिसामागुनी दिस व ऋतूमागुनी ऋतु चालले होते आणि ....... अचानक ते संकट येउन ठेपले. कोणते? अहो महामारी, पॅनडेमिक,जगबुडी, कोव्हिड -१९ चे. जिम बंद करण्याचे आदेश निघाले व त्याची अंमलबजावणीही झाली. मात्र उत्तम सेवा देणाऱ्या कोणत्याही सेवादात्याला, क्लायंटची कमी भासत नाही, तद्वत काही स्त्रिया मात्र त्या महामारीतही ,सरोजच्या अशील(कस्टमर) म्हणुन टिकल्या. सरोजने फेसबुकवरती लाईव्ह येउन, आठवड्यातले ३ दिवस त्यांचा व्यायाम करुन घ्यावा अशी टुम त्यांनी काढली. बरं व्यायामाइतकाच डायेटचाही सहभाग महत्वाचा म्हणुन दिनूलाही त्या टिममध्ये सामिल व्हावेच लागले. अर्थात फेसबुक आय डीज ची देवघेव अपरिहार्यपणे, आलीच. जर कोव्हीडचे संकट नसते तर कशाला फेसबुक अन कशाला व्हॉट्सॲप दिनूचे व सरोजचे संबंध फक्त सहकारी म्हणुन वरवरचे व रुक्ष राहीले असते मात्र आता करोना देवदूतासारखा मदतीला आलेला होता.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users