अनन्या

Submitted by Charudutt Ramti... on 19 May, 2020 - 13:38

‘अनन्या’ रात्री बराच वेळ उशीवर निपचित डोकं ठेवून आणि छताकडे शून्यात नजर लावून निश्चल पणे अंथरुणावर पडली होती. अविरत पणे फिरत असलेल्या पंख्याच्या अस्थिर पात्यांच्या पारदर्शी वर्तुळाकडे एक…टक…पहात. निर्विकार भावनेने. नक्की कितीवेळ? ते तिलाच माहिती नव्हतं. कदाचित तासभर तरी सहज झाला असेल. तासभर कसला? चांगले दीडेक तास सुद्धा उलटून गेले असतील. मानेला आणि खांद्याला मुंग्या याव्यात असं काहीतरी झालं अनन्याला. बराच वेळ एकाच स्थितीत अवघडल्या सारखी पडून राहिल्यामुळे. दीड तास शरीर जराही न विचलित करता, शवासनात पडून राहिल्या सारखी, कधी ‘मंद’ तर कधी मध्येच थोडीशी ‘जलद’ अशी काहीशी विचित्र अशी हालचाल सुरु होती तिच्या श्वासांची.

तीन चार आठवडे उलटून गेले अनन्याला पद्मसागर आश्रमातून परत घरी येऊन. एरवी आश्रमात रेंगाळणारा आणि मनाजोगता घालवता येणारा दिवस इथे घरी कसा झर झर सरतो मुठीत धराता न येणाऱ्या वाळू प्रमाणे. रोजची मोनूची शाळा, त्याचं शाळेचं दप्तर, विनय चं ऑफिस आणि त्याची रोजची धांदल. अनन्या आश्रमातल्या तिच्या संथ निरामय आयुष्यातून विनयच्या गृहस्थाश्रमात पुन्हा गुरफटून गेली.

परवा मंगळवारी विनय ऑफिसच्या कामासाठी परगावी गेला आठवड्याभरा साठी. उद्या चौथ्या शनिवारची सुट्टी मोनूच्या शाळेला. त्यामुळे मोनू आणि अनन्या दोघेंच्या दोघे घरीच ह्या शनिवार रविवारी. मग लहानगा मोनू ‘विनयबाबा’ घरी नसला की कंटाळतो एकट्याने. नाहीतर मग विनय आणि मोनू शनिवार रविवार कॅरम खेळ वगैरे असले उद्योग करतात. पण ह्या शनिवार रविवारी विनय घरी नाही म्हणून अनन्यानं मोनूला नंदामावशीकडे पाठवलं दोन दिवस, तिथे रमतो तो मावस भावंडांच्यात म्हणून.

पण अनन्या घरी एकटीच थांबली, तिला एकटंच राहायचं होतं. एकदोन दिवस तरी. स्वतः साठी वेळ काढत. एकांताच्या शोधात.

ओट्या वरची कामं उरकून अनन्या अंथरुणात पडली, आणि अचानक तिला कसली तरी आठवण आली आणि त्या आठवणीनं ती व्याकुळ झाली.

“पण अशी कितीवेळ पडून राहणार मी? एकटीच?” पंख्याचं पातं सुद्धा स्वतः भोवती फिरून फिरून दमून थांबेल की काय असं तिला वाटलं आणि ती कोणत्यातरी अनामिक भीतीनं अंथरुणातून चटकन उठून बसली. आता हा निर्जीव पंखा स्वतःहुनंच थांबण्या आधी बंद करावा, अश्या विचारानं ती चटकन उठली आणि तिनं पटदिशी पंख्याचं बटन बंद केलं.

तिचा गाऊन चुरगळला होता, केस अंथरुणात पडून पडून विस्कटले होते. ती उठली आणि तोंडावर पाण्याचा हबका मारण्यासाठी ती बेसिन कडे गेली. बेसिन समोर उभी असताना तिची नजर आरश्यात स्वतः च्या प्रतिबिंबा कडे गेली.

तिनं बेसिनच्या वरचा दिवा लावला तेंव्हा शुभ्र दिव्याचा प्रकाश, अनन्याच्या अवतीभवतीच्या घुटमळू लागला. बेसिन समोर उभी राहून एक टक स्वतःकडे ती तशीच पाहत राहिली…आरश्यात…एखाद्या पूर्वी कधीच न भेटलेल्या तिऱ्हाईत स्त्री कडे पाहत राहावं तश्या नजरेने ती स्वतः च्या प्रतिबिंबाकडे पाहत राहिली. निर्जीव प्रकाशालाही वेड लावेल असं तिचं शरीर होतं. बांधेसूद आणि नाजूक. पस्तिशी ओलांडून अनन्याला दोन अडीच वर्षं उलटून गेली होती. तरीही अनन्या अजूनही तिशीत असल्यासारखी वाटेल एखादया अनोळखी व्यक्तीनं पहिल्यांदा पाहिल्यावर.

किंचित अरुंद तरी आकर्षक कपाळ, सरळ चाफेकळी का कसलं ते म्हणतात तसं नाक. लाल चुटुक ओठ आणि नाजूक जिव्हणी. बरोबर हनुवटीवर मधोमध गोऱ्या कांतीवर उठून दिसणारा नीटस असा एक काळसर तांबूस तीळ. केसांच्या तिची बट अन बट मोहक , भुरळ पाडणारी. डोळ्यांत तर तिच्या सबंध आभाळ मावेल इतके भाव!

स्वतःच्या सौंदर्याकडे लक्ष नसल्यासारखी अनन्या आरश्यात दुसऱ्याच कुणालातरी निरखत बसावं तशी निरखत बसली. रात्रीचे साडेअकरा पावणे बारा वाजले तरी तिच्या मनाची अस्वस्थता काही कमी होईना. शेवटी मनाची अस्वस्थता कमी करण्यासाठी दुसरा काहीच उपाय नसल्यासारखी ती बाथरूम मध्ये गेली आणि तिनं शॉवर सुरु केला. जसं थंड पाणी माथ्यावर पडलं तसं, एखादा धगीवरचा गरम ‘तवा’ नळाखाली धरावा आणि चर्रर्र आवाज करत पाण्याच्या वाफा नळावरून वर छता कडे निघून जाव्यात तश्या च तऱ्हेनं अनन्याने स्वतः च्या तापलेल्या माथ्यावर गार पाण्याच्या शॉवरची धार धरल्यावर तिला आत कुठेतरी आपल्या शरीरातून गरम वाफा बाहेर पडत आहेत की काय असं वाटू लागलं. बरेच वेळ शॉवर मध्ये तशीच गाऊन वरंच ओली उभी राहून ती स्वतः ला शांत करत राहिली, आणि विझवत राहिली स्वतः च्या आतला दाह…आतून बाहेरून...दोन्ही कडून. मग वीसेक मिनिटांनी अनन्या बाहेर आली… शॉवर घेतल्यावर तिला किंचित का असेना थोडंसं फ्रेश वाटू लागलं पण तेव्हड्यात तिला अचानक ‘एका’ पुस्तकाची आठवण आली आणि ती सैरभर अवस्थेत दुसऱ्या खोलीत जाऊन अस्ताव्यस्त तिची ती आश्रमातून परतल्यावर अर्धवट रिकामी केलेली बॅग धुंडाळू लागली.

अनन्या शिबीर संपवून आश्रमातुन घरी परत आली त्याला एक महिना ओलांडून गेला आणि हे असं अनन्याला प्रथमच झालं!

… साधारण दोन महिन्यांपूर्वी अनन्या पद्मसागर आश्रमात राहायला आली, एकोणतीस दिवसांच्या शिबिरा करीता. ती शिबिरात पोचली तेव्हा संध्याकाळी साडे आठ नऊ वाजले असावेत. तो दिवस होता त्रिपुरारी पौर्णिमेचा. ती आश्रमात पोचली तेंव्हा संबंध आश्रमात सुंदर ठिपूर चांदणं पसरलं होतं आणि एखाद्या कस्तुरी मृगाच्या पाठीवरचे ठिपके दिसावेत तशी नक्षत्रं आकाशात सांडली होती.

पद्मसागर आश्रमाचा परिसर अगदी सुंदर आणि रमणीय. आश्रमाच्या जवळूनच वाहणाऱ्या कौशांबी नदीच्या पात्राइतकाच अवतीभवतीचा परिसरही नितळ! वर्षांतून एकदा अनन्या पद्मसागर आश्रमात यायची एकोणतीस दिवसांचं हे शिबीर करायला. तीन वर्षांपूर्वी पहिल्यांदा आली तेंव्हाच तिला इथल्या परमोच्च सुखाची अनुभूती देणाऱ्या वातावरणानं अक्षरश: तिला वेड लावलं.

एखाद्या पौराणिक महाकाव्यात वर्णन केलेलं असावं असावं तसं दृश्य सगळी कडे.

सर्वत्र एक प्रकारची शांतता अचपळ मनाच्या गतीस स्थिरता आणणारी. ते शुभ्र बर्फाळ कौशांबी नदीचं संथ तरीही खळाळतं निर्झर पाणी, ते चिनार सदृश कोणत्यातरी वृक्षांचे गळून खाली पड्लेल्या पानांचे, त्यांवरुन अनवाणी चालत जाताना, पावले पडून चरचर असा जमिनीवरून कानापर्यंत उमटत जाणारा कोमल ‘पदरव’. आश्रमातील शांततेचा परमावधी असलेलं ते सुंदर कोरीव कृष्ण मंदिर. किंवा ते घुमटासारखं आकाशाच्या पायऱ्या चढत जाणारं ध्यान मंदिर. गुरुजींचे कलश किंवा उपरणे वगैरे राहिलेली काहीतरी गोष्ट सत्संग सुरु होण्यापूर्वी आसनाच्या जागी ठेवण्यासाठी अनन्या लगबगीने जायची तेंव्हा मधेच कुठूनतरी झाडांच्या फांद्यावरून सुरेल गाणारा एखादा कोणतातरी रंगबेरंगी, दिसता दिसता नजरे आड होत जाणारा आकर्षक पक्षी. ह्या सगळ्या पवित्र आणि तरीही मनास कोणतातरी अनामिक उन्माद आणणाऱ्या वातावरणानं अनन्याच्या मनावर अक्षरश: गारुड करायला सुरवात केली.

ज्याला कविता सुचते त्याला झरझर यमकं आठवावीत आणि पुढची कडवी आपसूकच सुचत जावीत, ज्याला चित्रकला येते त्याचा कुंचला एखाद्या जगद्विख्यात चित्रकारा प्रमाणे कॅनव्हास वरती झर झर फिरावा आणि एखादं नितांत सुंदर चित्रं जन्माला यावं , आणि ज्याला रागदारी येते त्याला कोणतातरी अनोखा सूर गवसांवा, अश्या सगळ्या त्या जादूई परिसरात अनन्या गेले दोन वर्षांपासून सलग येत असलेल्या एकोणतीस दिवसांच्या शिबिरात अक्षरश: वेड्यासारखी हरपून जाई.

अनन्या च्या ह्या अध्यात्मिक जीवनाला विनयचा म्हणजे तिच्या नवऱ्याचा विरोध नसे , पण तो तिने ध्यान सुरु केलं की, तिच्याकडे एखादी तिऱ्हाईत व्यक्ती असावी तसं तो दुर्लक्ष करीत असे. कधी तिच्या अध्यात्मा विषयी त्याचा केवळ कोरडेपणा तर कधी तरी थोडासा चेष्टेचा आणि खिल्लीचा सूरही. विनय, अनन्याच्या चौदा वर्षांपूर्वी सुरु झालेल्या व्यवहारिक आणि सांसारिक आयुष्याचा जोडीदार झाला पण ह्या तिच्या अध्यात्मिक प्रवासाचा तो कधीच जोडीदार झाला नाही. नऊ वर्षांपूर्वी मोनू झाला आणि अनन्याच्या अध्यात्मिक, मानसिक आणि भावनिक गरजांची चांगलीच कुतरओढ सुरु झाली. तिला विनय आणि मोनूसाठीच वेळ पुरायचा नाही तर ती स्वतःला आणि स्वतःच्या साधनेला ध्यानाला , आणि अध्यात्माला काय वेळ देणार? विनय पुढे तिनं ही खंत व्यक्त केली एकदोनदा…

"हो मग काढ नं वेळ स्वतः साठी"… ह्याच्या पुढे त्याचं उत्तर कधी गेलंच नाही. ह्या विनयच्या कोरड्या उत्तरा पुढे अनन्या सुद्धा निरुत्तर होऊन जाई.

मग अडीच तीन वर्षांपूर्वी रेणूनं, अनन्याच्या अगदी जुन्या जिवलग मैत्रिणीनं कुठुन तरी शोधून ह्या ‘पद्मसागर’ आश्रमात होणाऱ्या शिबिरा बद्दलची माहिती तिला आणून दिली. पण शिबीर सलग एकोणतीस दिवसांचं आणि ते ही एवढ्या लांब. भीत भितंच तिनं विनयला शिबिरास जाण्याबद्दल विचारलं. विनयनं मात्र जराही आढे वेढे न घेता लगेचच होकार दिला. विनय चा हा लगेचंच मिळालेला होकार अनन्याला अपेक्षित होता की अनपेक्षित ते अनन्याला सुद्धा माहिती नव्हतं.

“मला तुझा सहप्रवासी होता नाही आलं तरी मी तुझ्या प्रवासात अडसर नाही होणार... ! फक्त मोनू लहान आहे, त्याची आबाळ न होता त्याची व्यवस्थित सोय होईल ते नीट पहा, ” - एवढंच तुटक पणे बोलला. पण त्यानं दिलेला होकार हा अजिबात वरवर नव्हता , त्यानं अनन्याला शिबिराला जाण्यासाठी अगदी मनापासून मान्यता दिली, तिचं ट्रेन चं यायचं जायचं दोन्ही वेळचं रिझर्वेशन केलं, तिला बॅग भरताना आणि एकट्यानं प्रवास करतानाकाय काय काळजी घ्यायची ते तिला सांगितलं.

मोनू तीन वर्षांपुर्वी फक्त साडे पांच सहा वर्षांचा होता. त्यामुळे अनन्यानं त्याला सरळ तिच्या आईकडे आजोळी ठेवलं, श्रीपूर ला आणि एका बाजूला जड पावलानं माहेरून एकोणतीस दिवसांची बॅग घेऊन सरळ उत्तरकेशी कडे निघाली , पद्मसागर आश्रमाकडे...तिच्या घरा पासून एकोणीस तासांचा ट्रेन चा प्रवास करत. एकी कडे इवल्याश्या मोनू चा विरह तिला माहेरून पाय निघू देत नव्हता तर दुसरी कडे अध्यात्मिक जीवनाची प्रचंड ओढ तिला आश्रमा कडे खेचत होती. विनय मध्ये आणि संसारात ती गुंतली होती की नाही, हे तिचं तीलाच माहिती नव्हतं...संसार मात्र सुरु होता, कुणाच्या तक्रारी विना. पण तक्रार कुणा ची करायची, विनयनी तिला हवा असलेला तिच्या आयुष्यातला अध्यात्माचा अंक जगायला कधी मनाई केली नाही. पण ते दोघं ही एकत्र जगत होते ते एका विशिष्ट ठराविक अंतरावर. ते अंतर सुद्धा असं होतं की जवळीक म्हणावी तर पुरेशी नाही आणि दुरावा म्हणावा तर तो सुद्धा धड नाही. चंद्राने पृथ्वीच्या कक्षेत वर्तुळ आखत फिरावं तशी ती त्याच्या भोवती जगत होती, किंवा तो तिच्या भोवती. नक्की कोण कुणाचा उपग्रह ह्याला अर्थ नव्हता, पण त्या दोघांमधलं अंतर असं होतं की ते त्यांना दूरही फेकत नव्हतं आणि जवळ सुद्धा आणत नव्हतं.

यंदा अनन्या सलग तिसऱ्यांदा हे शिबीर करणार होती आणि आता ती ह्या आश्रमाची पुन्हा एकदा अवर्णनीय अशी अनुभूती घेणार होती.

पहाटे सव्वापाच च्या संधीप्रकाशात सुरु झालेला पंचेचाळीस मिनिटांचा सत्संग नुकताच संपला होता आणि आश्रमाच्या कुंपणावरून सकाळची कोवळी सोनेरी प्रसन्न उन्हे सबंध आश्रमावर सडा रांगोळी घालत होती. शिबिराचा आज दुसराच दिवस. ध्यानमंदिराकडून सत्संग संपवून अनन्या तिच्या कुटीरा कडे चालत निघाली होती. वाटेत पारिजाताका सारख्या दिसणाऱ्या कोणत्यातरी फुलांचा शुभ्र पाकळ्या आणि लालसर केशरी रंगाच्या नाजूक देठ असलेल्या शेकडो फुलांचा सडा पडला होता. एवढ्यात विस्तीर्ण पसरलेल्या आश्रमाच्या नैऋत्येस असलेल्या एका टेकडीच्या पायथ्याशी प्राचीन अश्या देवदार वृक्षाखाली बासरी चे सूर आळवत कुणीतरी एक जण स्वतःचं प्रसन्न आस्तित्व सभोवतालच्या आसमंतात जाणवून देत होतं. ‘तारुण्य’ आणि ‘मध्यमवयीन’ ह्या दोन्हीच्या मधेच कुठल्यातरी आयुष्याच्या एका ठराविक टप्प्यावरती स्वछंदी पणे जगत असल्यासारखी कुणीतरी एक शांत आणि अंतर्मुख पणे बासरी वाजवत बसलेली दूरस्थ व्यक्ती अनन्या च्या नजरेस पडली.

कोणत्यातरी अनवट रागाचे ते सूर असावेत त्या व्यक्तीने बासरीवर धरलेले. अनन्याला पूर्ण उमज नसली रागदारीची तरीही, तिला स्वरांवरून साधारण पणे राग कळतात , पण तिला सकाळच्या ह्या मंद शीतल हवेवर आरूढ होऊन कानी ऐकू येणाऱ्या बासुरीच्या स्वरांचा राग काय साधा ‘थाट’ ही धड ओळखता येईना. पण तरीही ही सुरावट कुठेतरी ओळखीची, खूप आधी कुठेतरी ऐकल्यासारखी. पण साधारण हाकेच्या अंतरावरून ऐकू येणाऱ्या आणि नजरेच्या टप्प्यात बसलेल्या अनोळखी व्यक्तीने वाजवलेल्या बासरीचे ओळखीचे सूर तिला न कळत त्या देवदार वृक्षापाशी ओढत घेऊन गेले. सकाळच्या सात साडेसात च्या कोवळ्या उन्हात त्या कोणत्यातरी ओळखीच्या तरीही अनवट अश्या त्या सुरांनी तिला व्यापून टाकले आणि ती तशीच बराच वेळ त्या अनोळख्या व्यक्ती पाशी जणूकाही पूर्व जन्मीची ओळख असल्यासारखी साधारण आठ दहा फूट अंतरावर जाऊन भान हरपून बसून राहिली.

बऱ्याच वेळानंतर त्या सुरावटी मुळे असेल आणि त्या अवतीभवतीच्या शांत शीतल वाऱ्या मुळं असेल, पण अनन्याचं मन आणि शरीर एकत्र करणारं तद्रूप असं ध्यान लागलं. दर रोज सकाळी आश्रमातील पहाटेच्या सत्संगाच्या वेळी लागतं तसं पण त्यापेक्षा कितीतरी जास्त तन्मय आणि कितीतरी जास्त सखोल. तिच्या मनाची अवस्था गाढ झोपेत असल्यावर एक कोणतं तरी अज्ञात अर्थ न समजणारं स्वप्न पडावं तशी झाली. काहीतरी हवं हवंसं पण तरीही अर्हत. उमज आणि अंतर्क्यतेच्या सीमारेषेवर उभं राहून कुणीतरी शरीर हरवून फक्त मानसीच्या निर्वीकारावस्थेत उरावं तशी तिची अवस्था झाली.

बराच वेळ ध्यान आणि निद्रावस्था ह्यांच्या मधेच कुठेतरी अडकून पडलेली अनन्या भानावर आली. पण ती भानावर आली त्या अनोळखी व्यक्तीने कदाचित एकदोन हाका मारून झाल्यावर. पण केवळ हाक मारून ती भानावर आली नसावी. अनन्यास भानावर आणण्या करिता तिच्या खांद्यावर स्पर्श करून कदाचित त्याला तिला हलवून जागं करावं लागलं. आणि ज्या करांगुलीने ती मनास भुरळ पडणारी बासरी तो वाजवत होता, त्याच करांगुलीने त्याने तिच्या खांद्यावर स्पर्श केला, पण तो ही फक्त काही निमिषार्धच. पण त्या व्यक्तीचा तिला स्पर्श घडला आणि अनन्या तिच्या सुप्तावस्थेतून भानावर आली, तो स्पर्श तिला नक्की झाला की झालाच नाही हे तिला काही समजलं नाही. ती भानावर आली ती, त्या परक्या पण जुनी कोणतीतरी ओळख असल्यासारख्या वाटणाऱ्या व्यक्तीचा स्पर्श झाल्यामुळे की केवळ आता आपल्याला कुणातरी अनोळखी व्यक्तीचा आणि परपुरुषाचा स्पर्श ह्या देहाला होणार ह्या अंतर्मनाच्या जाणिवेने ती भानावर आली, हे तिचं तीलाच उमगलं नाही.

अनन्या भानावर आली तेंव्हा फक्त तिच्या ओठातून फक्त "फार सुंदर वाजवता बासरी तुम्ही...!" एवढेच शब्द उमटले आणि ती कोणत्यातरी विभिन्न अश्या मानसिक अवस्थेत पायवाटेवरून प्राजक्ता सारखी ती निरागस फुलं पायांच्या खाली कुस्करत मंद गतीने चालत तिच्या कुटिरा कडे निघाली.

दोन तीन दिवस ती अशीच त्या बासरीच्या सुरावटी मध्ये आणि त्या परक्या व्यक्तीच्या स्पर्शा मध्ये हरवून राहिली. नंतर शिबिराच्या तिसऱ्या चौथ्या दिवशी अनन्याला आश्रमातील वाचनालयात तोच तरुण काही पुस्तकं चाळताना नजरेस आला. अनन्या दुपारी ४ ते संध्याकाळी साडे सात पर्यंत आश्रमाच्या वाचनालयाचे काम पाहायची. आश्रमात तुम्हाला जे आवडतं ते कामं करण्याची साधकांना मुभा होती. कुणी बागकाम घेतलं, कुणी आयुर्वेदिक औषध शाळेत जाई, पण अनन्याला पहिल्यापासून पुस्तकांची आवड, म्हणून तिनं लायब्ररीयनची जवाबदारी स्वीकारली. अनन्याच्या नजरेस वाचनालयात ती व्यक्ती पडल्यावर उत्सुकतेपोटी त्या व्यक्तीजवळ जाऊन उभी राहिली…खरंतर ओळख करून घेण्याच्या हेतूने. अनन्याच्या झालेल्या जुजबी बातचितीनंतर 'पलाश अग्निहोत्री' ह्या पूर्वी कधीच न भेटलेल्या पण तरीही खोल कुठेतरी पूर्वजन्मीचे नातेसंबंध असल्यासारख्या कुण्यातरी एका व्यक्ती शी ओळख झाली. पलाशचे काळेभोर पाणीदार डोळे, उंचापुरा बांधा, किंचित गव्हाळ आणि किंचित कृष्ण वर्ण पण बोलका चेहरा आणि सहजच कुणाचं ही लक्ष जाईल असा भारदस्त पण खर्ज आवाज. अनन्याच्या मनात पलाश च्या चेहऱ्याची छवी एखाद्या ऑइलपेंटिंग ने रेखाटलेल्या ग्रीक देवतांचं चित्रं उमटावं तसं उमटलं.

त्या दिवशी, रात्रीच्या प्रहराची साडेनऊ वाजताची ध्यान धारणा संपवून अनन्या तिच्या अंथरुणावर लवंडली आणि तिच्या डोळ्यासमोरून पलाश चा चेहेराच सरेना. पलाश च्या चेहेऱ्या च्या पाठीमागून गूढ पार्शवसंगीत उमटावं तसे त्याच्या दोन दिवसांपूर्वी देवदार वृक्षाखाली बसून ऐकलेल्या बासरीचा खयाल...! त्या वृक्षाला तिनं मनोमन 'औदुंबर' असं तिच्या आवडीच्या वृक्षाचं नावं दिलं आणि त्या अनवट कोणत्यातरी गतजन्मी ऐकलेल्या रागाचं तिनं राग'पलाश' असं नामकरण केलं. ते ही अगदी मनोमन, स्वतः पुरतं.

दोन दिवस असेच मंतरलेल्या अवस्थते गेले तिचे. गुरुवारी सकाळच्या सत्रातील गुरुजींच्या प्रवचनानंतर, आश्रमातील शिबिरास आलेल्या पस्तीस एक साधकांपैकी एका साधकाला गुरुजी 'श्रुतीप्रज्ञा' करायची संधी देत. श्रुतीप्रज्ञा म्हणजे शिबिरात गुरुजी, इतर जमलेल्या सर्व साधकांपैकी कुणा एकाला ( गुरुजींचं दृष्टीने एखाद्या व्यासंगात जरा अधिक उंची गाठलेल्या साधकाला ) तो एखादा जणू काही होऊ घातलेला एक गुरूच आहे अश्या प्रकारे एखाद्या अध्यात्मिक विषयावर प्रवचन देण्याची संधी देत. त्या दिवशी पलाश ला श्रुतीप्रज्ञा करायची संधी मिळाली आणि पुढील पंचिवस मिनिटं 'पलाश' एखाद्या उंचच उंच कड्यावरून कोसळणाऱ्या मुक्त जलाशयासारखा अमोघ वाणीने नुसता बरसत राहिला. त्याच्या रसाळ वाणीचे आणि त्याची एकंदर अध्यात्मिक जाण पाहून इतर साधकांनाच काय स्वतः गुरुजींना सुद्धा पलाश चे कौतुक वाटले.

अनन्याला पुढचे दोन तीन दिवस आपल्याला नक्की काय होतंय हे जवळ जवळ समजायचंच थांबलं. ती भान हरपल्यासारखी सारखा पलाशचाच विचार करू लागली. अनन्याला आता हळू हळू स्वतः ची भीती वाटू लागली. नुकतीच नव्हाळी आलेल्या षोडशीच्या तरुण आणि अल्लड मुलीसारखी तिची अवस्था झाली. पाहता पाहता आश्रमातल्या ह्या अत्यंत अध्यात्मिक आणि पारमार्थिक वातावरणाचा सुद्धा तिला आता भान उरलं नाही.

ती स्वतः ला दिवसातून वारंवार बजावू लागली...प्रत्येक वेळेस , जेंव्हा जेंव्हा तिच्या मनात पलाश चा विचार उमटू लागलायचा तेंव्हा तेंव्हा ती स्वतः ला बजावायची

"नाही अनन्या, नाही... तू असं नाही करू शकत, तू अशी कुणा तिऱ्हाईत व्यक्तीच्या प्रेमात अशी अल्लड मुली सारखी नाही पडू शकत."

पण मग पस्तिशी मधल्या अनन्या च्या आत लपलेली षोडशी हळूच खुद कन हसायची आणि तिला म्हणायची...

“पण तो अनोळखी कुठे आहे? मी त्याला ओळखते, कधी पासून ते महत्वाचं नाही, आमची ओळख कशी आणि कुठे झाली तेही महत्वाचं नाही...पण आमची ओळख आहे, ओळख ह्या 'आश्रमा'ची की 'पूर्वाश्रमी'ची...ओळख ह्या जन्माची की पूर्व जन्मीची... ते मला माहिती नाहीये अनन्या , पण पलाश अनोळखी नाहीये, माझी आणि त्याची ओळख आहे... खूप जुनी... प्राचीन.... कदाचित ह्या आश्रमाजवळून वाहणाऱ्या कौशांबी नदीहून सुद्धा प्राचीन....”

“अनन्या, जागी हो... तुझं हे वेडसर पण काढून टाक. तुझा केवळ एकंच जन्म झाला आहे आणि तो तू जगत आहेस, आणि तुझा केवळ एकंच आश्रम आहे आणि तो म्हणजे तुझ्या बरोबर 'विनयने चौदा वर्षांपूर्वी थाटलेला संसार! विनय ने तुझ्याबरोबर सुरु केला तो गृहस्थाश्रम. बाकी तुझा दुसरा कोणताही जन्म झालेला नाही की बाकी तुझा दुसरा कोणताही आश्रम नाही अगदी हा पद्मसागर आश्रम सुद्धा तुझा नाही, तू फक्त इथे एकोणतीस दिवसांच्या शिबिरा साठी आलेली आहेस... हे शिबीर संपलं की तू फक्त एक गृहिणी असणार आहेस... तुला एक देवा ब्राम्हणांच्या साक्षीने मिळालेला पती आहे आणि त्या संसारात तुला एका नऊ वर्षांचा मुलगा आहे...जो फक्त रोज तू हे शिबीर संपवून कधी एकदा घरी परत येते हे डोळ्यात तुझ्या आठवणींच्या पाण्याचे मोती बनवून तुझी वाट पाहतो आहे रोज खिडकीत बसून संद्याकाळी... भानावर ये अनन्या भानावर ये...! “

पस्तिशीतल्या अनन्या चं आणि तिच्यातल्या नुकत्याच नव्हाळी आलेल्या षोडषीचं हे असं द्वंद्व बरेच वेळ आणि बऱ्याच वेळेला सुरु झालं.

मनातल्या ह्या द्विधा स्थितीत अडकून पडलेली अनन्या कित्येक तास अशी आश्रमात बसून कधी मनातल्या मनात तर कधी स्वतःशीच पुट्पुल्यासारखी बोलत राहू लागली. तिला फक्त आता पलाश चा सहवास हवा असे. त्याच्या बासरीचे सूर ऐकण्यासाठी ती रोज सकाळी धावत धावत औदुंबराच्या वृक्षाखाली जाऊन बसू लागली, कधी पहाटेचा सत्संग उरकून तर कधी पहाटेचा सत्संग चुकवून.

तिला पलाश लायब्ररीत येऊन खाली जमिनीवर बसून एकेका बैठकीत कित्येक पानंच्या पानं वाचून काढतो हे रोज दिसायचं. हळू हळू तिची आणि पलाश ची ओळख जशी वाढू लागली तसा तिला पलाश आता तिच्याशी अध्यात्म, मनःशक्ती, अंतरात्म्याशी संवाद अश्या वेगवेगळ्या विषयांवर लायब्ररीत कधी क्षणिक तर कधी तासंतास बोलत बसलेला आवडू लागला. ती त्याच्या कडून स्वामी विवेकानंद समजून घेऊ लागली , ती त्याच्याकडून गुरु अरबिंदो शिकू लागली, तो कधी तरी मधेच रवींद्र संगीताबद्दल बोलायचा तर कधी मध्येच पाश्चात्यांच्या बीथोवन विषयी.

पलाश ची तिला अध्यात्मिक ओळख झाली आणि त्याची ह्या विषयातली खोली तिला समजू लागली. तिला पलाश चा व्यासंग आवडू लागला, तिला पलाश चा संगीत आणि अध्यात्म ह्या विषयीचा त्याने बनवलेला अधिभौतिकाचा प्रमेय आवडू लागला... तिला पलाश चा पैलू अन पैलू आवडू लागला... खरंतर तिला संबंध पलाश चं आवडू लागला. अगदी अंतर्बाह्य.

नऊ दहा दिवस झाले, पलाश च्या बरोबर सहवास आणि सुखनैव अध्यात्मिक प्रवास सुरु होऊन अनन्याचा. ती पलाश नावाच्या सरोवरात आकंठ बुडून जाऊ लागली. अलीकडे अलीकडॆ तर ती तिच्या कुटीरात एकटी असताना ती मनानेच पलाश ला जवळ घेऊन त्याच्या मांडीवर डोकं ठेऊन रात्र भर झोपू लागली. तिच्या मनाने व्यापून टाकलेली पलाशच्या सहवासाच्या भुकेची जागा आता हळू हळू तिला पलाश च्या हव्या हव्याश्या वाटणाऱ्या स्पर्शाच्या तहानेने घेतली.

ती पलाश ची पहिल्या दिवसाची त्याची बासरी ऐकल्या नंतर च्या विरघळून गेलेल्या ध्यानानंतर च्या त्याच्या तिच्या खांद्यांना झालेल्या/न झालेल्या स्पर्शाविषयी आणि त्या स्पर्शाच्या तिच्या शरीरातील आर्तते विषयी सतत विचार करू लागली. पण तिला एक गोष्ट सारखी सारखी त्रास द्यायची, आपल्याला पलाशचा सहवास मिळाला, पण त्याचा स्पर्श कदाचित एकदा सुद्धा मिळाला नाही. आणि जो कदाचित मिळाला तो आपण भानावर नसताना, गाढ आणि गूढ ध्यानात असताना. मनाच्या कोणत्यातरी अज्ञात आणि अस्वस्थ अवस्थेनं अनन्याला घेरून टाकलं.

एकीकडे, पूर्व जन्मीचा आपला प्रियकर समजून गेले पंधरा वीस दिवस भान हरपून पद्मसागर आश्रमात एखाद्या रजोमग्न साध्वीचं आयुष्य जगणारी अनन्या. आणि दुसरीकडे, पण फक्त कोरडे पणाने का असेना, अगदी प्रामाणिक पणे गृहस्थश्रमाची जवाबदारी पूर्ण करणारा नवरा. आणि सर्वात महत्वाचं , हे शिबीर संपल्यावर परत घरी गेल्यावर घट्ट मिठी मारून "किती दिवस गेली होतीस ग आई?" अशी आर्त हाक देत हंबरणारा आणि तिच्या पोटाला घट्ट बिलंगणारा मोनू !

मनाच्या ह्या द्विधा किंवा त्रेधा अवस्थेशी झगडा करता करता अनन्या अगदी थकून जाऊ लागली, त्या आल्हाद दायक वातावरण असलेल्या आश्रमात सुद्धा.

पाहता पाहता उन्मादावस्थेतील उरलेले पंधरा सोळा दिवस कुपीतल्या अत्तरानं हवेत उडून जावं तसे उडून गेले.

आणि रोजच्या प्रमाणे अनन्या कुटिरा बाहेर सकाळी अंगणातली तुळस तोडून ती उकळून काढा करत होती. आज आश्रमातील शिबिराचा शेवटचा दिवस. अनन्याला खूप उदास वाटंत होतं आज. ती आणि बाकी साधक आज गुरुजींचा शेवटचा सत्संग ऐकून आणि ध्यान करून आपापल्या 'विश्वात' आणि आयुष्यात परतणार होते. काल रात्र भर अनन्या झोपू शकली नव्हती. उद्यापासून पलाश चा सहवास नाही. उद्यापासून पलाश ची बासरी नाही , त्याची रागदारी नाही, त्याने अरबिंदोंची वाचलेल्या चिंतनाची आणि पुस्तकांची टिप्पणी नाही, उद्यापासून पलाशने शोधून काढलेली हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातली आणि वेस्टर्न क्लासिकल संगीताची साम्य स्थळं नाहीत...एव्हढंच काय उद्या पासून पलाश नाही..आयुष्यात आता उद्यापासून अनन्या आणि तिचा पुर्वाश्रम..परत पलाश कधी भेटणार माहिती नाही.

ह्या विचाराने तिनं आक्खी रात्रं जागून काढली. पूर्व जन्मीचा पलाश ह्या जन्मी का भेटला? नसता भेटला तर चाललं नसतं का? ह्या विचाराने तिला प्रचंड अस्वस्थ वाटू लागलं. आधीच अस्वस्थ असलेल्या अनन्याने तुळशीचा काढा तांब्याच्या पात्रात गाळून परत त्याच तुळशीमध्ये ओतून टाकला. आणि कोणत्यातरी विचित्र अश्या अवस्थेत ती आश्रमातून परती च्या प्रवासाची बॅग भरू लागली.

पण पहाटे बॅग भरताना मात्र च्या मनानं ठरवलं आज. आज सत्संग संपल्यावर पलाश ला देवदाराच्या त्या वृक्षाखाली घेऊन जायचं त्याच्या करंगळी ला धरून. आणि त्याला तीच अनवट रागदारी वाजवायला सांगायची बासरीवर. त्यानं पहिल्या दिवशी वाजली तीच सुरावट. आणि मग औदुंबराच्या पायाशी आणि त्या प्राचीन वृक्षाच्या मुळ्यांवर बसून राहायचं आणि काही वेळानं पलाशच्या मांडीवर डोकं ठेऊन झोपी जायचं. ध्यान लागल्या सारखं किंवा एखादी लहान मूलगी आपल्या वडीलांच्या माडीवर झोपी जाते तशी. आणि पलाश ला सांगायचं…

"पलाश मला एक स्पर्श कर..तू पहिल्यांदा मला भेटलास आणि मी तुझी बासरी ह्या औदुंबराखाली बसून ऐकली तेंव्हा माझी जी अवस्था झाली त्या अवस्थेतून बाहेर येण्यासाठी तू केलास/न केलास तो स्पर्श...अगदी तसाच स्पर्श तू मला पुन्हा एकदा कर... पण मी जागी असताना.. मला त्या स्पर्शातून वेदना होतील, पण ती वेदना मला हवी आहे... मला त्या स्पर्शातून जाणिवांचे काटेरी पाश बोचतील, पण तरीही तो तुझा स्पर्श मला हवा आहे. ज्या करांगुलीनं तू बासरीच्या सच्छिद्र शरीराला आच्छादतोस आणि त्या आच्छादीत छिद्रांतून स्वर्गीय स्वरांची निर्मिती करतोस त्या करांगुलीचा स्पर्श मला हवा आहे आणि त्या ही पेक्षा, तू तुझ्या बासरीस जादूची जी फुंकर देतोस, त्या तुझ्या अधरांचा स्पर्श मला हवा आहे. ती तुझ्या उष्ण हवेची फुंकर मला तू घातलेली हवी आहे, मी डोळे मिटून घेतले असताना , माझ्या दोन्ही पापण्यांवर."

अशी पलाश जवळ बोलायची कवितेच्या ओळींसारखी लांब लचक वाक्यच्या वाक्यचं जवळ जवळ ठरवून ती आज ध्यानमंदिराकडे निघाली. संबंध सत्संग भर ती शरीराने गुरुजींच्या समोर आश्रमातील तीस पस्तीस साधकांच्या मध्ये बसली होती. पण तीचं मन मात्र पलाशला शोधंत होतं. संबंध सत्संग संपत आला पण तिला पलाश चं अस्तित्व अवती भवती जाणवेना. सत्संग संपला तशी ती गुरुजींच्या चरणाला स्पर्श करून धावतंच औदुंबराच्या वृक्षाकडे निघाली. पलाश ला शोधायला. पण औदूंबराचा वृक्ष एकाकी होता. अवतीभवती कुणीचं नव्हतं. ती पलाशच्या पाऊलखुणा शोधू लागली, तो पहिल्या दिवशी बसला होता बासरी वजावत आणि नंतर ही अधे मध्ये बसायचा, त्या जागेवर आपण येण्या आधी बासरीचे सूर धरलेत का ह्याचा अंदाज ती घेऊ लागली. पण गर्द हिरव्या पानांच्या सळसळी व्यतिरिक्त तिथल्या हवेत कोणतेच सूर नव्हते आणि पलाशच्या सुद्धा कोणत्याच पाऊलखुणा देवदार वृक्षाखाली उरल्या नव्हत्या.

सैरभैर अवस्थेत अनन्या तशीच धावत आश्रमाच्या वाचनालयाकडे निघाली. धापा टाकत. आश्रमातील पाय वाटांवर भान हरपून पळत सुटल्यामुळे तिच्या अनवाणी पायांना इतस्ततः पडलेले फुलझाडांचे काटे आणि रात्र भर गारठ्यात थिजून गेलेले बारीक बारीक छऱ्यांच्या आकाराचे गोलाकार खडे सुद्धा तिला बोचू लागले. आणि त्या बोचलेल्या अणुकुचीदार काट्यांमुळे तिच्या टाचांना आणि गोऱ्या तळपायांना झालेल्या जखमांच्या छिद्रातून रक्त वाहू लागले. तळपायाची वेदना तिला जाणवत होती पण ती पायात बोचणारे काटे तशीच पायांवर वागवत वाचनालयाच्या दिशेने धावत सुटली...ती वाचनालयाचं दार अक्षरश: होत्या नव्हत्या शक्तीनिशी दोन्ही हातानी ढकलून अधीर पणे आंत आली. आणि पुस्तकांच्या कपाटांच्या रांगेतील पोकळी मध्ये पलाश ला शोधू लागली. काचेच्या तावदानांवर आणि फ्रेंच पॉलिश ने चकाकणाऱ्या पुस्तकांच्या कपाटाच्या लाकडी दरवाज्यांच्या काचांवर तिला पलाश चं प्रतिबिंब दिसे, पण पलाश मात्र दिसायचा नाही. ती झरझर पुस्तकांच्या कपाटाच्या एका रांगेतून दुसऱ्या रांगेत आणि दुसऱ्या रांगेतून तिसऱ्या, असं तिच्या डोळ्यां समोर धावणाऱ्या पलाशच्या प्रतिबिंबाचा मागोवा घेत आणि त्यांचा पाठलाग करत सैरभैर पणे पुस्तकांच्या रांगांतून पलाशला शोधत राहिली. आणि पुढच्या पांचच मिनिटांत तिला समजून चुकलं. आज पलाश नाहीये...कुठंच नाहीये...तो 'नं' सत्संगात आहे , तो नं देवदार वृक्षाच्या खाली आहे, न तो आज वाचनालयात आहे... तो संबंध पद्मसागर आश्रमातच नाहीये. आहेत ते फक्त अनन्याच्या श्रुती पटलावर उरलेले त्याच्या बासरीचे सूर , आणि उरल्यात त्या फक्त त्याच्या ह्या अध्यात्माची शेकडो पुस्तके रचलेल्या सागवानी आणि शिसवी कपाटांच्या काचेची तावदानांवर उमटलेल्या प्रतिमा, त्या ही फक्त आभासी आणि अमुर्त, अव्यक्त. आणि त्या सुद्धा फक्त एकट्या अनन्याला दिसणाऱ्या.

रिकाम्या ओक्याबोक्या वाचनालयात अनन्या एकटीच उभी राहिली. तिच्या नाजूक टाचां मधून अजूनही लाल भडक रंगाचे माणिक असावेत त्या आकाराचे रक्ताचे थेंब स्त्रवत होते. आणि पुढच्याच क्षणार्धात पायातले त्राण गळून गेल्यामुळे धाप लागलेल्या अवस्थेत लाकडी खुर्चीत मटकन बसली, गेले अठावीस एकोणतीस दिवस रोज येऊन बसायची तिथे. ती रोज तिथेच बसून पलाश चा एकेक शब्द न शब्द ऐकायची. आध्यत्मिक जीवनाच्या खोल महासागरात सापडणाऱ्या एखाद्या आरक्त प्रवाळा सारखे पलाश चे अस्फुट शब्द. ती ते दुर्मिळ शब्दप्रवाळ कानात साठवून घ्यायची इथेच ह्या बसून ह्याच खुर्चीत. ती तिथे बसली पुढील काही क्षण आणि नंतर बराच वेळ टेबलावर डोकं टेकून हमसा हमशी रडत बसली. टेबलावरील काचेवर तिच्या अश्रुंचे थेंब घरंगळू लागले आणि त्यातील एक थेंब घरंगळत जाऊन टेबलावरच असलेल्या एका पुस्तकापाशी जाऊन अधांतरी पणे थबकला. बऱ्याच वेळानंतर अनन्या भानावर आली. रडून रडून सुजलेल्या नेत्रांनी आणि थकलेल्या गात्रांनी तिनं पुस्तकापाशी घरंगळत गेलेल्या स्वतःच्या अश्रूंच्या थेंबाकडे पाहिलं. तिचं त्या पुस्तकाकडे लक्ष गेलं. ते पुस्तक अरबिंदोंच्या प्रवचनांचं होतं. पलाश रोज ‘ह्या’च प्रवचनांचं त्याच्या रसाळ शब्दांत तिला विशलेषण करून ते क्लिष्ट विचार अनन्याला उलगडून सांगे. एखादी कळी पहाटे उमलावी आणि त्यात अडकून पडलेला छोटासा भ्रमर मुक्त आकाशात उडून जावा तसं तिला होई, पलाश ने तिच्या एखाद्या त्या पुस्तकातील न समजलेल्या संकल्पनेची उकल करून सांगितल्यावर. अनन्या खुर्चीतून उठली. अगदी यांत्रिक पणे. एखाद्या शल्यचिकित्से नंतर शरीरातून बरंच रक्त वाहून जावं आणि शरीरातील त्राण गळून पडलेला रुग्ण उठावा तसं काहीतरी तिला झालं खुर्चीतून उठताना. उठता उठता तीनं ते योगी अरबींदोंचं पुस्तक दोन्ही हातात एखादं नुकताच जन्मलेलं तान्हुलं आई नं घ्यावं त्या पद्धतीने तिनं ते पुस्तक कवेत घेतलं आणि ती वाचनालयातून तिच्या कुटिरा कडे चालत निघाली, अनवाणी पायातून काट्यांच्या झालेल्या जखमा तिच्या आरक्त पाऊलखुणा वाचनालयाच्या पायऱ्यांवर ठसे उमटवू लागल्या.

त्यांनतर अनन्या आश्रमातून शिबीर संपवून घरी परत आली. आली ती सुद्धा कोणत्यातरी एका अनामिक अश्या मानसिक दुःखाचं आणि त्यापेक्षाही विरहाचं सावट घेऊनच. एक महिन्यानंतर आई भेटल्यावर इवलासा मोनू तिच्या पोटाला चिकटला. ती आणि विनय सुद्धा एकमेकांना कित्येक दिवसानंतर भेटले. महिन्याभराच्या झालेल्या अनन्याच्या विरहानं आणि ओढीनं विनय ने तिला मिठीत घेतलं. अनन्या सुद्धा विनय च्या मिठीत गेली, पण फक्त शरीरानं!

----------------------------------------

आज बरोबर अनन्याला एक महिना पूर्ण झाला घरी येऊन आश्रमातून, आणि पलाश ला भेटून दोन महिने पूर्ण झाले, आणि त्याला हरपून सुद्धा महिना पूर्ण झाला.

तिने शॉवर घेतला आणि आता तिला थोडं फ्रेश वाटू लागलं , पण एवढयात अचानक तिला ते अरबिंदोंचं पद्मसागर आश्रमातल्या वाचनालयात टेबलावरून बरोबर घेतलेलं पुस्तक आठवलं आणि ती लगबगीने दुसऱ्या रूम मधून तिची अर्धवट रिकामी केलेली बॅग धुंडाळू लागली...ती पटकन उठली आणि तिनं महिन्याभरा पूर्वी आश्रमातून परतल्यावर अर्धवटचं रिकामी केलेली बॅग उचकायला सुरु केली. आणि मात्र तिला ते अरबिंदोंचं पुस्तकच सापडेना. मग ती अधिकच अस्वस्थ झाली आणि तिने बॅग उलटी सुलटी करून इकडे तिकडे चेन च्या मागील, पुढील कप्प्यात शोधाशोध सुरु केली. शेवटी ते पुस्तक तिला बॅगच्या मागील एका चेन च्या कप्प्यात सापडलं. तिनंच ठेवलं होतं जपून आश्रमातून निघताना. पण विसरली होती.

पुस्तक घेऊन ती अंथरुणावर आली. आणि पलाशच्या आठवणींचा तिच्या मनावरील दाह जरा कमी होण्यासाठी तिनें पुस्तकाचं पान वाचण्यासाठी उघडलं.

पुस्तकाचं पान उघडता क्षणीच तिच्या जलद गतीने होणाऱ्या हृदयातील स्पंदनांची आंदोलनं तिला तिच्या अंतरंगात जाणवू लागली.

पुस्तकाच्या पहिल्याच कोऱ्या करकरीत पानावर सुवाच्य हस्ताक्षरात लिहिलं होतं, एखादी मुक्त छंदातली कविता लिहावी तशी…

"अनन्या... तुझी तगमग थांबव,
कारण…आपणच आपल्या ‘गात्रांना’
आपल्या मनाच्या अंकित ठेवायचं...
आपल्या मनाला ह्या शूद्र ,‘गात्रांच्या’वर आरूढ नाही
होऊ द्यायचं… बोटांच्या स्पर्शाची गरज…
फक्त निर्जीव वेताच्या आणि बांबूच्या वस्तूतून
ओळखीचे सूर येण्यासाठी लागते,
मनाला मात्र ‘मनाचा’ स्पर्श पुरतो…
कारण मनं आणि जाणिवा दोन्हीसुद्धा ‘सजीव’ असतात...!
कारण त्यांच्यातच फक्त…
आंतरिक ओढीचा अंश उतरलेला असतो…
……………….
………………
………………

एवढंच लिहिलेलं होतं. खाली काही ओळी रिकाम्याच सोडल्या होत्या. कदाचित पलाश ला अनन्या साठी अजूनही काही लिहायचं होतं पण ऐन वेळी सुचलं नसावं. किंवा त्याला रिक्त पण सांगायचं असावं, त्याचं तिच्या विना. कुणास ठाऊक? ह्या पाचसात मुक्त छंदातील ओळींच्या खाली “पलाश अग्निहोत्री” असं त्यानं त्याचं नाव रेखाटलं होतं. आणि त्याखाली बासरीचं एक सुंदर रेखा चित्र काढलं होतं. प्रस्तावनेच्या पानाच्या मागील पानावर एक मोरपीस खोचलं होतं "खूण" म्हणून.

आणि तिथे आणखी फक्त एकच ओळ लिहिलेली होती...

“तुला माझी फारंच आठवण आली, तर ह्या 'मोरपिसाचा' स्पर्श तुला पुरेल... माझ्या प्रत्यक्ष अस्तित्वाची गरज तुला तिथे भासणार नाही….”

त्या दिवसा नंतर मात्र अनन्याच्या मनाला पलाश च्या आठवणींनी पुन्हा कधीच दाह झाला नाही, पलाश च्या आठवणींनी झालाच असेल तर फक्त एक मोरपिसांचा हळुवार आणि मनाला शांतात देणार कळत न कळत तिच्या शरीराला झालेला/न झालेला स्पर्श आणि त्या स्पर्शातून तिला मिळालेली एक अवर्णनीय अशी अनुभूती. तिला कुणालाच न सांगता येण्या जोगी...!

चारुदत्त रामतीर्थकर
२० मे २०२०, (पुणे)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चारूदत्तजी छान गुंफली आहे कथा. मला एक प्रश्र्न आहे, पलाश चा प्रसंग आश्रमाच्या पहील्या भेटीत होतो की दुसर्या? कारण कथेत, पहिल्या भेटीची माहीती देता देता, पलाश च्या भेटीचा प्रसंग सुरू होतो.

पाथफाईंडर जी , धन्यवाद...

अनन्या ची पलाश शी ओळख पहिल्या शिबिरात नव्हे तर , नंतर च्या म्हणजे ती पुन्हा पुढच्या वेळेस शिबिराला जाते तेंव्हाची आहे.

तसा खुलासा करणारी एक ओळ आता मी ऍड केली आहे. म्हणजे बाकीच्या वाचकांना कदाचित हा प्रश्न पडणार नाही. धन्यवाद. _/\_

फारच सुंदर
मला वाटलं पलाश आणि अनन्या यांचं प्रकरण पुढे जाईल, पण पलाशने फारच सुंदर आणि सहजसोप्या भाषेत तिला प्रेमाची व्याख्या समजावून सांगितली केवळ अप्रतिम

आधिभौतिक आणि आध्यात्मिक , अंतरात्म्यातून स्त्रावलेलं बंधनहीन प्रेम आणि लौकिकार्थाने स्वीकारलेलं व्यावहारिक प्रेम ह्यांच्यातला पेच नेमका पकडलात. रसाळ भाषेतली निसर्गावर्णने अप्रतीम!