#नाैका

Submitted by Pooja sarkale on 17 May, 2020 - 00:51

#नाैका
अंजली आज पुन्हा घरातून नेहमीप्रमाणे रडत बाहेर पडली. दुपारच्या मध्यानउन्हात तिच्या डोळ्यातून घरंगळत जाणारी आसवे शुभ्र मोत्याहुन जास्त लकाकत होती. चालता-चालता कपाळावर जमा झालेला घाम आपल्या ओढणीने टीपत झपा-झपा पावलं टाकीत ती नाक्यावरून पुढे गेली .आज जरी ती रडत असली तरी तिचं रडणं मात्र नेहमीसारखं नव्हतं .एरव्ही कोणी जरा कठोर होऊन बोललं की मनाला लावून घेणारी अंजली पाणावल्या डोळ्यांनी मध्यवस्तीतल्या गणपती मंदिरात जाऊन बसायची .आपल्या मनातल दुःख ती देवासमोर कमी पण तिथल्या परिसरासोबत जास्त कथन करायची. षटकोनी, भव्य असा मंदिराचा सभामंडप, नक्षीदार दगडी खांब, देवतेची कोरीव मूर्ती, मंदिराचा परिसर आणी मंदिराशेजारी असणारी दोन मोठी वडाची झाड, हे सगळं बघून अंजलीचं मन शांत व्हायचं आणी मग पुन्हा सावरून घराकडे परतायची.

अंजली कॉलेजमध्ये शिकणारी बावीस-तेवीस वर्षांची समजदार मुलगी. गोरीपान, किंचित वर उचललेलं नाक, रेखीव देहयष्टीची अशी ती सगळ्यांनाच लळा लावायची. कॉलेजमध्ये देखील तीची वागणूक आदर्श वाटावी अशीच होती.

पण अंजलीच्या घरात मात्र सतत वादळ उठायचं. नेहमीची भांडण आणी कटकारस्थानं ह्याला ती खुप कंटाळालेली .पण सांगायचं कोणाला आणी करायच काय ??अशी तिची अवस्था. दुःखं अपार असतं .त्याची व्याख्या करत येत नाही .सुख अलगद मनाच्या कोपऱ्यात जाऊन बसत .पण दुःख प्रवेश करतानाच मनाला कापून, छिद्र पाडून आतमध्ये शिरतं .सतत झोबत राहतं. पण इलाज ह्या दुःखापुढे कोणाचाच नसतो .वाट पाहत रहावं लागत. रक्तस्त्राव थांबण्याचा, त्यावर खपली धरण्याचा आणी जखम बरी होण्याचा .पण तोपर्यंतचा काळ असतो तो असह्य वेदनांचा. अशाच अमर्याद कळा सोसत तो दिवस ढकलत होती.

आज ती नेहमीप्रमाणे गणपती मंदिरासमोर वडाच्या सावलीत बसली. रडल्यामुळे गोरे-गोरे गाल बदामी झाले आणी दुपारच्या उन्हाळी नाकाचा शेंडा लालबुंद झाला होता . हुंदके आणी अश्रूधारा थांबल्या नसल्या तरी त्यांचा वेग मंदावला होता. मंदिराभोवती 'चणे-फुटाणे' विकणारे कष्टकरी आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी शिदोरी उघडून भाकरीचे तुकडे गिळत होती.

तिथंल्याच एका आवळा-बोर' विकणाऱ्या म्हाताऱ्या आजीबाईला अंजलीची अवस्था बघून दया आली .तीनं बाटलीला गोणपाटाचा तुकडा ओला करुन गुंडाळलेलं थंड पाणी अंजलीसमोर धरलं. ते पाणी ती गटागटा प्याली. तृप्तीनं तिच अंग जरा तरारल .मायेच्या स्पर्शानं घोटभर पाणी पाजणाऱ्या म्हातारीला बघून ती जरा स्वस्थ झाली. आपल्या दुःखाच्या रोगावर आजीच्या अनुभवांची मात्रा ईलाज करेल, असं तिला वाटलं.

"माणूस येताना रडं घेवून येतोया , जाताना पण रड ठेवून जातोया आन् आयुष्यभर रडत आणी रडवतं असतोया. परतेकाला हा शाप हाय बग. पर तू का इथं येवून रडतीयास? नाय म्हणजी...तूझ्यासारखी देखणी, तरणीबांड पोरं अशी आडयेळेला इथं येवून बसली.रडू नगं सांग काय आलया ते-तंर. "म्हतारबाईंनी बाटलीचं झाकण लावून तिच्यावरचा गोणपाटाचा गुंडाळलेला तुकडा पाण्याने भिजवत-भिजवत हळूवारपणे अंजलीला विचारलं. तशी ती मागं सरून वडाच्या जाड बुंध्याला टेकली. लांबलचक केस सावरून स्थिर बसली.मनाचा बांध फोडला आणी अव्यक्त भावनांना शब्दाचं रूप देऊन मोकळं करु लागली.

" आई, आई शब्दाला किती अर्थ तिची महंती शब्दात सांगवी तेवढी कमीच .माझीही आई अशीच,. सुदंर शांत आणी प्रेमळ. माझे वडील ते कपड्याच दुकान चालवायचे. आमचं मध्यमवर्गीय सुखी कुटुंब होतं. असंच एका पावसाळ्याच्या रात्री बाबा भिजत घरी आले .मी लहान होते. पहिली दुसरीत असेन. गरम-गरम जेवण जेवून ऊबदार अंथरूणात झोपी गेलेले. 'आई-बाबा' काहीतरी महत्वाचं बोलत होते तेव्हाच मी बाबाना शेवटच पहिलं असेल .नीटसं आठवतही नाही मला".

" त्या रात्री....... शॉर्टसर्किट होऊन आमचं कपड्याचं दुकान पूर्ण जळालं होतं. खुप मोठ नुकसान झालं होतं. प्रचंड किंमतीचा माल एका रात्रीत कवडीमोल झाला .बाबांचं सगळं संपल होतं. खूप पैसे व्यापारांना द्यायचे बाकी होते. दान वेळाच्या अन्नाची सोय हाेत नव्हती. एका रात्री ह्याच टेन्शनमध्ये माझ्या वडिलांनी आत्महत्या केली." काहीवेळेसाठी अंजली शांत झाली. मग तिला जे-जे आठवत होतं ते ते ती मोकळ्या मनाने सांगू लागली.

" मी आणी माझी आई एकट्या पडलो .पैश्याची चणचण होतीच .माझ्या आईने बाहेर जाऊन काम शोधायचा प्रयत्न केला , पण घर फिरले की घराचे वासेसुद्धा फिरतात, हें खरं आहे. आईच्या प्रयत्नांना यश येत नव्हतं. त्यावेळची माझी आई पदवीधर होती. त्यामुळे तिला अजूनही नोकरींची आशा होतीच. तोपर्यंत संध्या मावशीकडे रहायला गेले मी. तिने मला तिकडच्याच शाळेत घातलं. आईला इकडे एका वकीलाच्या हाताखाली नोकरी मिळाली. सगळं स्थिर होईपर्यंत वर्ष सरलं.

गुढीपडाव्याला माझी परीक्षा संपल्यावर आई मला न्यायला आली होती ते ,चारचाकी गाडीतच! तीच रूप बघून मला आश्चर्याचा धक्काच बसला. वकीलाकडील सध्या नोकरीमधून अशी ऐश्वर्यसंपन्नता येणं, हें काही शक्य नव्हतं. संध्या मावशीही आईकडे डोळे विस्फारून पाहत राहिली. सगळ्याचा खुलासा झाल्यावर कळालं की, आईने नोकरीनंतर सहाच महिन्यांनी त्याच वकीलाशी लग्न करुन संसार थाटला होता. मला तेव्हा काही कळत नव्हतं .छान घर, गाडी, सुदंर खेळणी, वेगळ-वेगळं खायला प्यायला, असं सगळं मिळत असल्यान माझं बालपण आनंदात चाललं होतं. माझा आणी वकील बाबाचा फारसा संबंध यायचा नाही.

असंच वर्ष उलटून गेलं. मला एक भाऊ झाला.त्याचं नाव आम्ही विक्रम ठेवलं. जसा-जसा विक्रम मोठा होऊ लागला तसं-तसं' घरातलं चित्र बदलू लागलं. आता विक्रम सगळ्यांना हवाहवासा वाटू लागला. माझा सगळेजण राग-राग' करु लागले. आईच असं नव्हतं कदाचित पण तीही मला विसरूनच गेली होती. तीतरी काय करणार मजबुर होती दुसऱ्या नवऱ्यासमोर .मला आईचा खूप लळा होता पण वकील मात्र तिला जास्त माझ्याकडे फिरकुन द्यायचे नाहीत. आईच्या अशा दुसऱ्या लग्नाच्या निर्णयानंतर सगळ्या नातेवाईकानीही आम्हाला वाळीत टाकलं होतं.

हळूहळू काळ बदलत गेला विक्रम हट्टी झाला आणी बिघडत गेला...... अतिलाडाने. वकील बाबांचं माझ्या आईवर आणी विक्रमवर खूप प्रेम होतं. त्यामुळेच त्यांच्या मनात माझ्याबद्दल घृणा होती आणी तीच घृणा त्यांनी विक्रममध्येही पेरली होती.

खोडकर आणी मवाली अशी विक्रमची ख्याती आहे. नाक्यावर बसून सिगारेटची पाकीट संपवण्यात त्याचा दिवस मावळतो. मी ज्या कॉलेजमध्ये आहे त्याच कॉलेजमध्ये तो सुद्धा शिकतो. तिथेही तो कुप्रसिद्धच आहे, मुलींना त्रास दे, त्यांची छेडाछेड कर, मुलांसोबत भांडण कर, शिक्षकाना धमक्या दे , असं सगळं करण्यात त्याला असुरी आनंद मिळतो. पैसे तर पाण्यासारखा उडवतो तो ". हे सगळं इतका वेळ शांत बसून ऐकणारी म्हतारी जरा आळसावली .दुपारीची वेळ असल्यामुळे तिच्या आवळी-बोरांना गिऱ्हाईकपण नव्हतं. एक मोठी जांभई देऊन, ती पुढे म्हणाली, " बया , बड्या बापाची पार ही अशीच वंगाळ आसत्यात. पर तू का मनाला लावून घेतीयास?त्याचं कर्म त्याच्या संग ".

आता मात्र आजीबाईंनी अंजलीला मुद्दयाला हात घालायला लावला. त्यांच्या प्रश्नानी अंजलीच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले, भूतकाळात रममाण झालेली ती भानावर आली. किनाऱ्यावरून निघताना एखादा नावाडी आत्मविश्वासाने आपली नौका विशाल समुद्रात सरकवतो ते पुन्हा निश्चित किनाऱ्यावर येण्यासाठीच ! पण कधी-कधी मोठी वादळं येतात. आक्राळ-विक्राळ रूप धारण करतात. मोठया-मोठया लाटा उसळतात आणी नौकेला गिळंकृत करण्यासाठी त्या समोर उभ्या ठाकतात. आपल्या जीवन मरणाचा विचार करण्याआधीच तो नावाडी समुद्राच्या पोटात गडप होतो. सगळं संपत क्षणार्धात.नावाड्याची चूक नसताना त्याला जीवाला मुकावं लागतं, अगदी त्या नावाड्यासारखीच अवस्था झाली होती अंजलीची.

इतका वेळ तिच्या डोक्यात विचारलं जे तांडव चाललेल होतं ते अजूनही शांत झालं नव्हतं. पण त्यातूनही तिनं तिच्या आयुष्यातल्या वादळला आव्हान द्यायच ठरवलं, ते तिच्या नव्या निर्णयानं ! तिच्या आवाजाला चांगलीच धार आली.

" विक्रम खूप वाईट वागला.सावत्रापणा त्याच्या 'रक्ता-रक्तात' भिनलेला होता. त्याने मला कधीच बहीण मानलं नाही. सतत त्याच्या देहबोलीमधून, नजरेतून, शिवीगाळीमधूनच सगळ्यातूनच जाणवत राहिला तो दुय्यमपणा. प्रचंड छळ केला त्याने .मी सगळं सहन केलं ते फक्त माझ्या, नव्हे माझ्याच नाहीतर त्याच्यासुद्धा आईसाठी. पण आता नाही मी........ ". अंजलीचे पुढचे शब्द ओठातच राहिले तिला काहीच सुचेना.

पुढच्याच क्षणी म्हातारीला काही कळायच्या आत ती उठली आणी 'तडा-तडा' चालत तिथून निघाली. म्हातारीने थांबवयचा प्रयत्न केला पण तिचा आवाज अंजलीच्या कानापर्यंत पोहचला नव्हता .तिचे पाय जाऊन थांबले ते पोलीस स्टेशनच्या दारातच. अंजली अजूनही भानातच होती. तिच्या हालचाली मात्र शांत होत्या, शिकलेल्या, सवरलेल्या, समंजस मुलीप्रमाणे. तिला खुप काही सांगायचं होतं, पण ती एवढंच बोलली,

"तो मेला असेल तडफडून एव्हाना".*

*"कोण"....???*

" विक्रम...विक्रम " ति जोरात किंचाळली. " विक्रम माझा सावत्र भाऊ. संपवलं मी त्याला आज. त्याचे सगळे आत्त्याचार सहन केले. त्याने खूप मानसिक त्रास दिला पण आज त्याने हद्द पार केली. घरात कोणीही नसताना त्यानं दारुच्या नशेत माझ्या शरीरावर आत्याचार केले. माझी अब्रू लुटली. मला नाही सहन झालं हें .तसाच त्याचा कोयत्याने गळा चिरला. मला फाशी द्या मी खून केला. मला कैद करा, कायमचं मुक्त करण्यासाठी..".तिचा आक्रोश मन हेलावून टाकणारा होता.

© *-पूजा. अ. सरकाळे.*

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान कथा.. तुमची लिखाणशैली खुप आवडली.

सुख अलगद मनाच्या कोपऱ्यात जाऊन बसत पण दुःख प्रवेश करतानाच मनाला कापून, छिद्र पाडून आतमध्ये शिरतं .सतत झोंबत राहतं>>>>>>

ह्या वरच्या दोन ओळी तर खुपच आवडल्या.

Thanks

अर्रर...
सुरूवातीला एकदम फ्रेश वाटत होती कथा.. मध्ये थोडेफार खटकले, पण म्हटलं चलता है. पण शेवट फारंच फुसका निघाला कि हो!!
राग मानू नका पण वाचता वाचता अपेक्षा फार उंचावल्या होत्या. असो,

तुमची पहिलीच कथा दिसतेय. आणि पहिलीच असेल तर फार सुबक मांडली आहे, लिहिली आहे.
पुलेशु!!!

आणि पहिलीच असेल तर फार सुबक मांडली आहे, लिहिली आहे.
+७८६
लिहीत राहा
पुलेशु

म्हातारीऐवजी हा संवाद आईसोबत घेतला असता तर आईची यावर प्रतिक्रिया. स्पष्टीकरण, परिस्थितीसमोर तिचा नाईलाज, पश्चाताप, चुकीची कबूली असा तिच्या दृष्टीकोणातून नवीन पैलू समोर आला असता..