प्राक्तन

Submitted by Theurbannomad on 16 May, 2020 - 19:33

रशीद आपल्या बाजल्यावर आरामात पहुडलेला होता. थंडी सुरु झाली, की त्याला आपल्या घराबाहेरच्या खजुराच्या झाडांखाली बाजूला टाकून आकाशातले तारे न्याहाळत झोपायला अतिशय आवडत असे. त्याच्या आजोबांनी लहान असताना त्याला सांगितलं होतं, की आकाशातला प्रत्येक तारा म्हणजे भूतलावरचा पैगंबरवासी झालेला पुण्यात्मा आहे. रसूल पैगंबरांनी ज्यांना ज्यांना आकाशात ताऱ्यांचे स्थान दिले आहे, ते ते पुण्यवान लोक पृथ्वीतलावर असताना समस्त मानवजातीच्या उद्धारासाठी प्रयत्नरत होते अशी कहाणी त्यांनी राशीदला सांगितली होती. त्यामुळे त्या ताऱ्यांमध्ये रशीद कधी आपल्या आजोबांना आणि आजीला शोधत बसे. त्याच्या बाजूलाच जमिनीवर त्याचा दोन-अडीच वर्षाचा कुत्रा मालकाच्या रखवालदारीसाठी रात्रभर जागत बसे.

गावात रशीदच्या कुटुंबाला मोठा मान होता.वडील गावाच्या 'जिरगा'चे ( पंचायतीचे ) सन्माननीय सदस्य होते. शिवाय गावच्या लोकांना दुखण्या-खुपण्यावर औषध देण्याचं काम त्यांच्या घरात पिढ्यानपिढ्या चालत आलेलं होतं. 'हकीम भाईजान'अशा नावानेच ते सगळ्यांना सुपरिचित होते. रशीद त्यांच्या तालमीत हळू हळू औषधोपचारांचे बारकावे शिकत होता. साधे रुग्ण स्वतः तपासण्याइतकी त्याची प्रगती झालेली होती. त्यांच्या कुटुंबात अनेक पिढ्यांपासून चालत आलेला पितळेचा एक लोटा होता. त्या लोट्यातून मशिदीतलं पाणी रोज सकाळी रशीद वडिलांना आणून देत असे. वडील कोणत्याही मरणासन्न रोग्याला आधी आतल्या एका खास खोलीत नेत, ते चार थेंब पाणी पाजत , दार लावून घेत आणि मग त्याचा इलाज करत. पाण्यातून आपल्या परवरदिगारचा आशीर्वाद रोग्याला मिळालेला आहे, आता आपल्या औषधांचा त्याच्यावर चांगला परिणाम होईल असं ते सतत सगळ्यांना सांगत असत. त्यांच्या या उपचारांचा इतका गुण होता, की त्यांच्याकडे आलेल्या रोग्याचा कसलाही आजार बरा होई. अगदी जुन्या मुरलेल्या आजारांवरही त्यांच्या औषधांचा चांगला परिणाम होई. त्या खोलीत मात्र रुग्ण आणि अब्बा यांच्याशिवाय अगदी रशीदलाही प्रवेश नसे.

त्या रात्री रशीद नेहेमीप्रमाणे आपल्या पूर्वजांच्या अस्तित्वाच्या खुणा ताऱ्यांच्या रूपात शोधत लोळत पडला होता. थंडी तशी बोचरी असल्यामुळे त्याने अंगावर जाड रजई घेतली होती. आपल्या लाडक्या कुत्र्याला - 'साद'ला - त्याने तशाच एका रजईमध्ये गुंडाळलं होतं. आपल्या धन्याच्या पायाशी डोळे उघडे ठेवून साद सावधपणे पहुडलेला होता. दूरवर वटवाघुळांच्या आकृत्या रात्रीच्या चांदण्यात एका झाडाच्या फांद्यांना लटकलेल्या दिसत होत्या. गाव निपचित पडलेलं होतं. कडाक्याच्या थंडीत लोकांनी गावात कुठे कुठे पेटवलेल्या शेकोट्या विझत आलेल्या होत्या आणि अधून मधून वारा वाहायला सुरुवात झाल्यावर एकदा निखारा काही क्षणासाठी अचानक लालबुंद होताना दिसत होता.

रशीदला आता हळू हळू पेंग येऊ लागली होती. बाजूच्याच एका झाडाखाली एक काळ्या रंगाची मांजर अंग चोरून बसली होती. अंधारात तिचे डोळे भयाण वाटत होते. ती मांजर रोज रात्री तशीच रशीद आणि सादकडे एकटक बघत रात्र घालवायची आणि दिवस कुठेतरी निघून जायची.विचारात गढलेल्या रशीदला कधी झोप लागली ते काही कळलं नाही, पण सादच्या खुडबुडीने जाग आल्यावर त्याने डोळे उघडले तेव्हा क्षितिजावर नुकतंच तांबडं फुटायची चाहूल लागलेली होती. अरबस्तानातल्या गावांमध्ये पक्ष्यांचा चिवचिवाट दुर्मिळ, त्यामुळे पहाटेची जाणीव प्रकाशाच्या रूपानेच होत असे. रशीद आळोखे पिळोखे देत उभा राहिला आणि त्याने आजूबाजूला नजर टाकली. मशिदीतून फजरची बांग कशी आली नाही, याचं त्याला आश्चर्य वाटत होतं. मशिदीच्या दिशेने त्याने नजर टाकली तेव्हा त्याला त्या बाजूने घाईघाईत गावाच्या वेशीच्या दिशेने जाणाऱ्या दोन धूसर आकृत्या दिसल्या.

राशीदने पटकन आपल्या डोक्यावर मुंडासं बांधलं आणि कमरेला खोचलेल्या खंजिराची मूठ हाताने पकडून त्याने त्या आकृत्यांचा पाठलाग करायला सुरुवात केली. गावात चोर शिरले असल्याची त्याची खात्री झालेली होती, त्यामुळे त्यांचा मागोवा काढून दिवसास उजाडल्यावर गावातल्या लोकांना वर्दी द्यावी आणि चोरांच्या मुसक्या आवळाव्या असा त्याचा कयास होता. धन्याच्या मागून इमानी 'साद' दबक्या पावलाने निघाला होता. त्या आकृत्या वेगाने पुढे सरकत असल्यामुळे रशीदला वाकलेल्या अवस्थेत पाठलाग करताना जवळ जवळ धावायलाच लागत होतं. स्वतःला शक्य तितकं झाडांच्या, घरांच्या आणि कुंपणाच्या आडोशाला ठेवत तो पाठलाग करत होता. शेवटी त्या आकृत्या वेशीपाशी आल्यावर त्यांचा वेग मंदावला आणि त्यांनी वेस ओलांडल्यावर समोरच्या वाळूच्या टेकडीवर चढायला सुरुवात केली. रशीदला वेशीबाहेर अंधारात स्पष्ट दिसणं शक्य नसल्यामुळे त्याने शक्य होईल तितक्या वेगाने आकृत्यांच्या जवळ जायचा प्रयत्न सुरु केला. आता त्याला लपायला आडोसासुद्धा मिळणं शक्य नव्हतं. त्या आकृत्या टेकडीच्या टोकावर जाऊन मागच्या बाजूच्या उतारावर दिसेनाशा झाल्यावर काही सेकंद रशीद थबकला. नक्की पुढे जावं की गावातून लोकांना बोलावून आणावं असा त्याने विचार केला खरं, पण त्या आकृत्या नक्की कुठवर गेल्या आहेत, ते बघून परत गावाकडे जायची खूणगाठ मनाशी बांधून त्याने पुढे जायला सुरुवात केली. टेकडीच्या माथ्याशी पोचल्यावर त्याने जमिनीवर पडून सरपटत वर जायला सुरुवात केली आणि माथ्याशी पोचल्यावर त्याने हळूच पलीकडे नजर टाकली.

पलीकडे काही कसब्यांवर ( अंतर मोजायचे अरबी मोजमाप - १ कसबा = १२ फूट ) त्याला एक विचित्र दृश्य दिसलं आणि त्याच्या अंगातून एक शहारा सरसरून गेला. दगड रचून तयार केलेल्या एका रिंगणात काही आकृत्या मध्यभागी एका निर्वस्त्र अवस्थेतल्या प्रेताभोवती वर्तुळ करून जमलेल्या त्याला दिसल्या. त्या आकृत्यांचे पाय उलटे होते. मध्यभागी निपचित पडलेलं प्रेत नक्की कोणाचं आहे, याचा काही उलगडा रशीदला झाला नाही. अतिशय काळजीपूर्वक आपण कोणाला दिसणार नाही अशा बेताने तो जमेल तितकं बघायचा आटापिटा करत होता. साद धन्याच्या बाजूला पोटावर पडून चारी दिशांना बघत पहारा देत होता.

त्या आकृत्यांपैकी दोन आकृत्यांनी एक छोटा पाण्याचा गडू त्या प्रेतावर रिकामा केला. थोडे पाण्याचे थेंब त्या प्रेताच्या तोंडात टाकले. अचानक त्या प्रेताच्या शरीरात चेतना जागृत झाली. हळू हळू ते प्रेत धडपडत उठून उभं राहिलं. त्या आकृत्यांपैकी एक आकृती त्या सचेतन झालेल्या शरीराजवळ गेली आणि तिने त्या शरीराला स्पर्श केला. अचानक त्या शरीरावरच्या सगळ्या जखमा नाहीशा झाल्या, कातडी तुकतुकीत झाली आणि ते प्रेत आता एका जिवंत मनुष्यासारखं दिसायला लागलं. त्या 'मनुष्याने' मग दोन्ही हात वर करून आकाशाकडे बघितलं आणि आजूबाजूच्या त्या आकृत्या हळू हळू नाहीशा व्हायला लागल्या. शेवटच्या आकृतीने नाहीशी होण्याआधी त्याला काही कपडे, बकऱ्याच्या कातडीची पखाल आणि एक छोटी थैली दिली. त्या मनुष्याने आपला वेष परिधान केला, खांद्याला पखाल टांगली आणि ती थैली उघडून त्यातून सोन्याच्या आठ-दहा मोहोरा काढून कमरपट्ट्यात खोचल्या. वाळूतून त्याने एक निळसर हिरवा चकचकीत मणी उचलून दोऱ्यात ओवून आपल्या गळ्यात टांगला आणि क्षितिजाकडे नजर टाकली. लालेलाल झालेल्या क्षितिजावर काही वेळातच सूर्य उगवणार होता.

मागून मशिदीची प्रार्थनेची बांग ऐकू आल्यावर रशीद भानावर आला. आपल्या डोळ्यासमोर जे जे काही घडलंय, त्याचा अर्थ त्याला उमजत नव्हता. काहीतरी अकल्पित, गूढ असं काहीतरी आपण बघितलंय, इतका स्वतःच्या मनाला समजावत तो हळू हळू टेकडी उतरायला लागला. गावात आता हळूहळू वर्दळ वाढायला लागली होती. रशीद नेहेमीप्रमाणे मशिदीत जाऊन नमाज पढून तिथलं पवित्र पाणी घेऊन घरी आला. त्याचे वडील आपल्या दवाखान्याच्या कामात गुंतले. घरची कामं करून रशीद दुपारी आपल्या वडिलांच्या बरोबर एकीकडे किरकोळ रुग्ण तपासणे आणि दुसरीकडे जास्त आजारी असलेल्या रुग्णांचा उपचार वडील कसा करतायत, ते बघून स्वतःला प्रशिक्षित करणे या दुहेरी जबाबदाऱ्या पार पाडायला लागला.

अचानक संध्याकाळी पाच-सव्वापाच वाजता दवाखान्याच्या दारात एक मध्यम उंचीचा, तरणाताठा आणि मजबूत बांध्याचा मनुष्य उभं असलेला राशीदने पाहिला. त्याला 'हाकिमचाचा' ना भेटायचं होतं.

"वडील एका रुग्णाला तपासात आहेत. मी त्यांचा मुलगा आहे. मी सुद्धा हकीम आहे, तेव्हा मला आपण माझ्याशी बोलू शकता..." रशीद त्या मनुष्याला बसायला खुर्ची देत बोलला.

" आम्ही हकीम चाचा सोडून कोणाला आमची तपासणी करू देत नाही..." त्याने उत्तर दिलं.

" घंटा - दोन घंटे जातील...अब्बा तसं सांगूनच आत गेलेत. त्यांनी दरवाजा आतून लावलाय. मरीज खूप बिमार होता. बूढा होता. ते तिथे त्याचे रिश्तेदार आहेत...त्यांना पण बाहेर बसवलंय. " रशीदने त्या माणसाला समजावलं.

" नाही...हकीम चाचांना सांग, अब्दुल्ला आ के गया. उद्या येईन. सकाळी नमाजनंतर लगेच. "

अचानक उठून अब्दुल्ला झपझप पावला टाकत निघून गेला. रशीदने त्याला गावात कधी बघितलं नव्हतं, त्यामुळे तो बाहेरगावाहून आला असावा हे त्याने ओळखलं. तासाभरात त्याचे अब्बा त्या खोलीतून बाहेर आले. त्यांनी मशिदीतल्या पाण्याचे चार थेंब त्या म्हाताऱ्या माणसाच्या तोंडात टाकले आणि त्याला घेऊन जायला सांगितलं.

" रशीद, बेटा कोणी अब्दुल्ला आला होता?"

" हो अब्बा...पण उद्या येतो सांगून गेला. बोला, हकीम चाचा से ही मिलना है..."

" ठीक है...जाऊदे. उद्या भेटू. " दवाखान्याचा दरवाजा बंद करून कडी लावत राशीदच्या अब्बान्नी त्या दिवसाच्या कामाची सांगता केली.

" अब्बा, कोण आहे हा अब्दुल्ला? मरीज तर नाही वाटला...आणि आपल्या गावातलापण नाही वाटला..." रशीदच्या मनात अजूनही शंकेचा किडा वळवळत होता.

" बेटा, माझा पुराना मरीज आहे. सोड, घरी चाल...अम्मी वाट बघत असेल... " अब्बा विषय बदलतायत हे रशीदला दिसलं आणि त्याने पुढे जास्त काही विचारलं नाही.

त्या रात्री त्याच्या डोक्यात आपण गावाबाहेर पाहिलेली घटना आणि अब्दुल्ला हे दोन विषय घोळत होते. झोप काही केल्या लागत नव्हती. शेवटी त्याने आपण आदल्या रात्री बघितलेल्या एका एका गोष्टीचा नीट विचार करून त्यातून काही हाताला लागतंय का, याचा शोध घ्यायला सुरुवात केली. त्या आकृत्या, त्यांनी जिवंत केलेलं ते मृत शरीर, त्या पुन्हा जिवंत झालेल्या माणसाला त्या आकृत्यांनी दिलेला ऐवज असा सगळं त्याच्या डोळ्यासमोर एक एक करत येत होता आणि.......

रशीदच्या अंगातून पुन्हा एकदा तशीच शिरशिरी गेली.

अब्दुल्लाच्या गळ्यात त्याने ' तोच ' निळसर हिरवा मणी बघितला होता...

आपण बघितलेला तो ' पुनर्जीवित ' झालेला मनुष्य म्हणजेच अब्दुल्ला याची त्याला खात्री पटली. अब्दुल्ला अब्बान्नाच का भेटायला आला होता याचा मात्र त्याला उलगडा होत नव्हता. अब्दुल्लाला अब्बा ओळखतात नक्की, कारण त्यांनीच त्याच्याबद्दल विचारलेलं होतं....तो त्यांचा जुना मरीज आहे असंही सांगितलेलं होतं...या सगळ्याचा गुंता रशीदला सोडवता येत नव्हता. अब्बा नक्की काहीतरी लपवतायत, हे त्याला आता स्पष्ट व्हायला लागला होतं.

रशीदची झोप उडाली.अमावस्या असल्यामुळे किर्र रात्र ,लुकलुकणाऱ्या चांदण्या आणि अधून मधून उडणारी वटवाघुळं अशा त्या वेळी रशीदने एक निर्णय घेतला - दवाखाना उघडून ' त्या' खोलीत जायचा. त्याच्याकडे चाव्यांचा अतिरिक्त जुडगा होताच, त्यामुळे त्याला घरी जायची गरज नव्हती. अब्दुल्ला, त्या आकृत्या, ती खोली या सगळ्यात काहीतरी समान दुवा आहे, हे त्याला आतून वाटत होतं. सादला बरोबर घेऊन तो दवाखान्यापाशी आला. हातातला पलिता त्याने भिंतीवर अडकवला आणि कमरेच्या चाव्यांच्या जुडग्यातून दवाखान्याची चावी काढली. आवाज नं करता हळूच त्याने कुलूप उघडलं आणि दरवाजाची आडवी फळी उचलून बाजूला ठेवली. दाराचा आवाज कमीत कमी होईल अशा बेताने त्याने हळूच दार आत ढकललं आणि पलिता काढून साद आणि तो आत आले. दार आतून लावून घेत त्याने ' त्या ' खोलीकडे मोर्चा वळवला.

खोली उघडल्यावर त्याला समोर पलित्याच्या प्रकाशात दोन धूसर आकृत्या दिसल्या. या त्याच आकृत्या होत्या, ज्या आदल्या रात्री त्याने पाहिल्या होत्या. रशीद घामाने डबडबला. मनात अल्लाहचा धावा करत त्याने त्या आकृत्यांना प्रश्न केला -

" आपण कोण? इथे काय करताय?"

एक आकृती मनुष्यरूपी आकार धारण करत रशीदच्या समोर उभी राहिली. पांढऱ्या धुक्यासारख्या त्या आकृतीच्या पुसटश्या तोंडातून उत्तर बाहेत आलं...

" आम्ही जीन आहोत. तुझ्या आजोबांनी आम्हाला वश केलं होतं, त्यानंतर तुझ्या वडिलांनी आमचा उपयोग करून घेतला. आम्ही तुझ्या वडिलांना मदत करतो. "

" मदत? कसली? "

" आम्ही खूप बिमार असलेल्या मरीजला ठीक करतो. त्याची रूह त्याच्या शरीरातून काढतो आणि आमच्या जीनांच्या लोकातली रूह त्या शरीरात पाठवतो. आमच्या लोकात अशा भटकणाऱ्या रूह आहेत, ज्यांची कोणतीतरी इच्छा पूर्ण झालेली नसते. मरीज कोण आहे, कसा आहे, त्याच्याकडे काय काय आहे हे बघून आम्ही योग्य ती रूह त्याच्या शरीरात पाठवतो. "

" म्हणजे?" रशीदची भीती आता चेपली होती.

" काल तू ज्या माणसाला जिंदा झालेला बघितला ना - अब्दुल्ला - तो दोन दिवसांपूर्वी तुझ्या दवाखान्यात आला होता. बाजूच्या गावात राहतो तो. खूप बिमार होता. जिंदा राहिल का माहित नव्हतं. आमच्या दुनियेत एक आत्मा होता - तरुण असताना त्याचा खून झाला. त्याला औलाद नव्हती, पण शादी करावी, बेटा-बेटी असावी अशी त्याला खूप इच्छा होती. त्याची रूह आम्ही अब्दुल्लाच्या शरीरात पाठवली आणि अब्दुल्लाची रूह काढून घेतली. अब वो अब्दुल्ला के बीवी और बच्चों के साथ खुश है....अब्दुल्ला की रूह जन्नत में चली गई..."

" पण शरीर मेल्यावर आत्म्याला त्याच शरीरात..." राशीदचा प्रश्न चाचरत चाचरत बाहेर पडला, पण पूर्ण व्हायच्या आत त्या आकृतीने त्याला थांबवलं.

" बेटा, जीन आहोत आम्ही. आम्ही शरीर मरू देत नाही आणि त्यात जुनी रूह राहू देत नाही. नवी रूह शरीरात गेली की आम्ही शरीराची सगळी बिमारी ठीक करतो. आम्ही दुसऱ्या रूहसाठी हे करू शकतो, पण त्याच रूहसाठी त्या शरीराची बिमारी ठीक नाही करू शकत. आम्ही जीन आहोत, परवरदिगार नाही. "

" पण हा धोका आहे..." रशीदने इतका बोलून घाबरून जीभ चावली.

" बेटा, धोका है...पण आम्हाला आदेश देतात तुझे अब्बा. त्यांच्यासाठी मरीज ठीक होतो, आमच्यासाठी आमच्या 'आका' चा हुक्म पूर्ण होतो. दवाखान्यात तुला जे जे लोक गळ्यात मण्याचा तावीज घालून आलेले दिसतील, ते सगळे आमच्या लोकातले आत्मे आहेत."

" तो मणी काय आहे? "

" बेटा, त्या मण्यात जीन लोकाची शक्ती असते. मस्जिदच्या पाक पाण्यामुळे शरीर पवित्र होतं आणि नवी रूह त्या शरीरात गेली की त्या मण्यामुळे त्या शरीरात राहते. "

आपल्या आजोबांनी आणि वडिलांनी कशाच्या जोरावर आपलं इतकं नाव केलंय, हे समजल्यावर रशीदला मनापासून वाईट वाटलं. कितीही झालं, तरी ते सगळं चूक होतं. अल्लाहवर विश्वास ठेवणाऱ्या लोकांची ही फसवणूक होती. आपला मरीज बरा होऊन घरी आला अशा भ्रमात राहून त्या भोळ्या भाबड्या लोकांनी आपल्या आजोबांना आणि वडिलांना डोक्यावर घेतलं होतं आणि त्यांनी त्याच प्रसिद्धी आणि पैशाच्या हव्यासापायी अनेकांची फसवणूक केली होती.

" आम्हाला इथून बाहेर घेऊन चल..." त्या आकृतीने विनंती केली. रशीदने गोंधळलेल्या अवस्थेत त्या विनंतीकडे दुर्लक्ष केलं आणि खोलीबाहेर येऊन दार लावलं. नंतर त्याने पलित्याच्या प्रकाशात मुख्य दार उघडून बाहेर पाऊल ठेवलं. विचारात गढलेल्या अवस्थेत दार लावून त्याने आडवी फळी दाराच्या खोबण्यांमध्ये अडकवली आणि कुलूप लावून भिंतीवरचा पलिता काढून घेतला. पलिता काढताना चुकून त्यातली एक पेटती चिंधी निसटून खाली पडली आणि वाऱ्याबरोबर उडत बाजूच्या गवताच्या पेंडीवर विसावली.

रशीद आपल्या विचारात गुंग होऊन जड पावलांनी आपल्या खजुराच्या बागेकडे निघाला. पाच मिनिटांनी त्याला अचानक मागच्या बाजूला प्रकाश झालेला जाणवला आणि त्याने वळून बघितलं. दवाखान्याच्या बाजूने आगीच्या ज्वाळा भडकलेल्या होत्या. भांबावून जाऊन रशीदने तशीच दवाखान्याकडे धूम ठोकली.

दवाखाना आगीच्या तांडवात भस्मसात होत होता. रशीदच्या आरडाओरड्यामुळे आजूबाजूचे लोक जमा झाले. त्यांनी वाळू आणि पाणी टाकून आग विझवायचा प्रयत्न केला, पण काही वेळातच दवाखाना पूर्णपणे जाळून खाक झाला. तितक्यात रशीदची अम्मी मागून हंबरडा फोडत आली. अब्बा अल्लाहला प्यारे झाले होते. रशीद धावत धावत घरी आला, तेव्हा त्याला त्याच्या अब्बाचं सुरकुत्या पडलेलं, आक्रसलेलं आणि काळं ठिक्कर पडलेलं शरीर दिसलं. डोक्याला हात लावत रशीद मटकन खाली कोसळला. काही क्षणात होत्याचं नव्हतं झालं होतं. साद सुद्धा त्या सगळ्या मृत्यूच्या तांडवात गायब झाला होता. दुसऱ्या दिवशी कळलं, की त्या आणि आजूबाजूच्या गावात अनेक मनुष्य त्या एकाच रात्री अल्लाहच्या वाटेवर निघून गेले होते.

आठ-दहा दिवसांनी सावरल्यावर रशीदने रात्री त्या टेकडीच्या मागे जाऊन त्या आकृत्यांना शोधायचं ठरवलं. रात्री अम्मीची नजर चुकवून तो बाहेर पडला आणि चंद्राच्या मंद प्रकाशातच वाट काढत तो त्या टेकडीमागे गेला. तिथे त्या जागी काहीही नव्हतं. पाच मिनिटांनी अचानक त्याच्या समोर त्या आकृत्या हळू हळू प्रकट झाल्या. त्यातली एक आकृती रशीदसमोर उभी राहिली आणि तिने मनुष्याचा आकार घेतला.

" बेटा रशीद, अफसोस की तुझे अब्बा तुला सोडून गेले...पण तुझ्या आजोबांनी आणि अब्बान्नी आम्हाला कैद करून आमच्याकडून खूप चुकीच्या गोष्टी करून घेतल्या होत्या. त्यामुळे जेव्हा तुझ्या अब्बान्नी तुला हकीम बनवायची तालीम द्यायला सुरु केली, तेव्हा आमच्या जीन लोकातला एक जीन आम्ही तुझ्या घरी पाठवला होता. तुझ्या अब्बाना त्याचा संशय यायला नको म्हणून त्याला आम्ही मनुष्य रूपात पाठवलं नाही....."

सादच्या अचानक गायब व्हायचं कोडं रशीदला आता उलगडलं.

" साद अनेक रात्री तुला सावध करायचा, तुला जागं करायचा पण शेवटी त्या दिवशी तुला आम्ही गावाच्या वेशीबाहेर जाताना दिसलो. तुझ्यासमोर सगळ्या गोष्टी उघड केल्यावर कदाचित आम्हाला तू मुक्त करशील ही आमची आशा होती, पण जे झालं त्यामुळे खूप जीव गेले. तुमच्या दवाखान्याची ती खोली तुझ्या आजोबांनी मंतरलेले होती. तू आम्हाला फक्त तिथून बाहेर काढायची गरज होती...आम्ही तुझ्या आजोबांच्या आणि वडिलांच्या ताब्यातून मुक्त झालो असतो. ती जागा जळल्यामुळे आम्ही मुक्त झालो, पण त्या जागेशी बांधल्या गेलेल्या सगळ्या माणसांचा मृत्यू झाला."

त्या सगळ्या घटनेनंतर रशीदला आणि त्याच्या अम्मीला सावरायला जवळ जवळ वर्ष लागलं. हळू हळू सगळं काही विसरत रशीदने पुन्हा एकदा दवाखाना उभा केला. आपल्या कुवतीनुसार तो लोकांचा इलाज करत होता. लोकांना त्याच्यात 'बडे हकीम' जरी दिसत नसले, तरी रशीदला त्याचं सोयरसुतक नव्हतं.

अशाच एका सकाळी नमाझानंतर त्याच्या दवाखान्यात एक तरुण, गोरागोमटा आणि भारदस्त माणूस आला. त्याने रशीदला सलाम केला आणि त्याच्या समोर खुर्चीत आपलं बूड टेकवलं. रशीदकडे तो प्रेमाने एकटक बघत होता. रशीद काही वेळ त्याच्या बोलण्याची प्रतीक्षा करत राहिला आणि शेवटी त्याने प्रश्न केला...

" कहिये भाईजान, क्या तक्लीफ है?"

" भाईजान नाही बेटे...अब्बाजान..." त्या तरुणाच्या तोंडून शब्द आले आणि रशीद जागच्या जागी थिजला. त्याच्या गळ्यातल्या निळसर हिरव्या मण्याची चमक राशीदचे डोळे पांढरे फटक करून गेली. रशीदने डोकं धरून नजर वळवली....

बाजूला खिडकीत रात्री झोपताना झाडाखाली सादबरोबर त्याच्या आजूबाजूला नेहेमी दिसणारी काळी मांजर त्याच्याकडे एकटक बघत जिभल्या चाटत होती....

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जबरदस्त, उर्दू शब्द अजून मजा आणतात. अब्बाला दुसऱ्या कोणी जिन्नच्या मदतीने जिवंत केले हा अर्थ मी काढला. So the black magic continued !
धन्यवाद

मला ही गोष्ट सांगणाऱ्या अरबी आजोबांनी मतितार्थ असा सांगितला की प्रसिद्धीचा हव्यास असलेले आणि त्यापायी काळ्या जादूच्या मागे गेलेले अनेक असतात....त्यामुळे एक मार्ग बंद झाला तरी दुसरा कुठेतती मिळतोच. राशीदच्या अब्बानी तोच दुसरा मार्ग शोधून पुनर्जीवित होऊन दाखवलं.

सगळ्या गोष्टी मस्त आहेत.

मला ही गोष्ट सांगणाऱ्या अरबी आजोबांनी मतितार्थ असा सांगितला की प्रसिद्धीचा हव्यास असलेले आणि त्यापायी काळ्या जादूच्या मागे गेलेले अनेक असतात....त्यामुळे एक मार्ग बंद झाला तरी दुसरा कुठेतती मिळतोच.

मानवी हव्यासाला मर्यादा नाहीच...

धन्यवाद !
माझ्या ब्लॉग्सना भेट द्या आणि आपल्या प्रतिक्रिया कळवा. शक्य असल्यास आपल्या मित्रमैत्रिणींना ब्लॉग वाचण्याची माझ्यातर्फे विनंती करा.

https://humansinthecrowd.blogspot.com/
https://demonsinthecrowd.blogspot.com/