दारुवरील प्रेम , निष्ठा वगैरे

Submitted by अतुल ठाकुर on 15 May, 2020 - 20:55

glass-of-beer-3444480_640.jpg

मध्यंतरी एकदोन दिवस दारुची दुकाने उघडल्यावर मद्यप्रेमी मंडळींनी किलोमीटरच्या रांगा लावून आपली दारुवरील निष्ठा प्रकट केली. माणसाची एखाद्या गोष्टीवर भक्ती असावी तर अशी. प्रेम असावे तर असे. माझ्या मित्रमंडळींमध्ये जी मद्याची भोक्ती मंडळी आहेत ती माझ्या व्यसनमुक्तीच्या कामाची मनसोक्त थट्टा करीत असतात. आणि आजवर मला त्या गोष्टीचा कधीही राग आलेला नाही. याचं कारण व्यसनामुळे उध्वस्त झालेली इतकी आयुष्यं पाहिलीत की आता या कामाच्या महत्त्वाविषयी माझ्या मनात तिळमात्रही शंका उरलेली नाही. त्यामुळे कुणी थट्टा केली किंवा वाद घालु लागलं तर त्यावर काही बोलण्याचीही मला गरज वाटत नाही. तर एकजण थट्टेने म्हणाला की या दारुसाठी लागलेल्या रांगामध्ये मी जाऊन समुपदेशन करीत असेन. मी ही थट्टेतच उत्तर दिलं की माझं काम दारु पिऊन झोकांड्या देत माणूस रस्त्यावर पडू लागला की सुरु होतं. तोपर्यंत मी कुणाच्या सुखाआड येत नाही.

या सार्‍यातील थट्टेचा भाग सोडला तर व्यसनमुक्ती केंद्रात दाखल झालेल्या बहुसंख्य माणसांना अगदी सुरुवातीला पूर्णपणे दारु सोडायची नसतेच असे माझे निरिक्षण आहे. व्यसनमुक्तीपथावर चालणार्‍यांची असंख्य मनोगतं ऐकल्यावर अतिशय जबाबदारीने मी हे विधान करीत आहे. थोडा भाबडेपणा बाजूला करून या समस्येकडे पाहिले तर काय दिसते? बहुतेकजण हे खालावलेल्या प्रकृतीमुळे दाखल झालेले असतात. बहुतेकजणांना स्वतःहून दाखल व्हायचं नसतं. अनेकांच्या संसाराचा खेळखंडोबा झालेला असतो. बायको सोडून जाण्याच्या मार्गावर असते. बरेचसे आर्थिकदृष्ट्या डबघाईला आलेले असतात. अनेकांना पिणे झेपतच नसते. शरीराला सोसत नाही. खिशाला परवडत नाही. कामावरून काढून टाकले जाते. घरातून आईवडील हकलून देण्याची भाषा सुरु करतात. या आणि अशा कारणांमुळे दाखल होणारेच खुप जण असतात. आपण व्यसनाच्या आधीन गेलोआहोत, त्याचे गुलाम झालो आहोत, त्यामुळे आपल्या आयुष्याची वाट लागली आहे. त्यामुळे निरपराध अशा आपल्या बायकामुलांचा, घरच्यांचा आपण छळ करीत आहोत. हे सारे अन्यायाचे आहे. हे सारे थांबले पाहिले म्हणून, मला दारु पूर्णपणे सोडायची आहे असा विचार करून स्वतःहून दाखल होणारा क्वचितच कुणी आढळेल.

या दाखल झालेल्या मंडळीमधल्या अनेकांना असे वाटत असते की जरा ही बिघडलेली तब्येत ठीक होऊ देत. मग आपण "लिमिट" मध्ये पिऊ. सर्व खेळखंडोबा झाल्यावरदेखिल अजूनही पहिले प्रेम हे दारुच असते. मग काही महिने व्यवस्थित राहिल्यावर मनात येतं इतके दिवस राहिलो मग एक पेग घ्यायला काय हरकत आहे? यानंतर मग प्रयोगशीलतेचे दिवस येतात. आणि त्याचा शेवट अर्थातच घमेलेभर दारु रिचवून पुन्हा उपचार केंद्रात जाण्यात होतो. दारुवरील प्रेम या विषयाचे पुरेसे गांभीर्य लोकांच्या लक्षात आलेआहे की नाही ठावूक नाही. त्यामुळे अनेक वर्षे सोबर राहिलेली भली भली मंडळी घसरत असतात.

कधीतरी असे वाटते समजा एखादी अशी मॅजिकल गोळी निघाली की ज्यामुळे भरपूर दारु पिऊनदेखिल शरीराला काहीही त्रास होणार नाही. तर बहुसंख्य व्यसनमुक्ती केंद्रे ओस पडतील असा माझा नम्र दावा आहे. कारण आपल्या व्यसनामुळे दुसर्‍या निरपराध माणसांना होणारा त्रास ही मुळी बेवड्यांची प्रायोरिटी नसतेच. व्यसनी माणूस हा इतका टोकाचा स्वार्थी असतो. व्यसनमुक्ती साधायची असेल तर हा दारुबरोबर सातत्याने चाललेला रोमान्स नाहीसा झाला पाहिजे असे मला वाटते.

अतुल ठाकुर

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दारूमध्ये काहीतरी असणार जे असा रोमान्स करायला माणसाला खेचून नेते. ते काहीतरी दारुतून काढून टाकता आले तर पाण्यावर जितके प्रेम तितकेच दारूवर राहू शकते.

बाकी व्यसने ही कुठलीही असोत, ती सोडवत नाहीत. या वेळेस फक्त शेवटचे, परत नाही म्हणून कित्येक शेवटच्या वेळा येतात व जातात... हे असे होण्याचे मेंदूत काहीतरी केंद्र असेल त्यावर ताबा कसा मिळवायचा हे शिकवायचे प्रयत्न व्हायला हवेत. मला मोबाईलचे व्यसन आहे Sad

माझं काम दारु पिऊन झोकांड्या देत माणूस रस्त्यावर पडू लागला की सुरु होतं. तोपर्यंत मी कुणाच्या सुखाआड येत नाही.>>> बेस्ट!

>>>>या दाखल झालेल्या मंडळीमधल्या अनेकांना असे वाटत असते की जरा ही बिघडलेली तब्येत ठीक होऊ देत. मग आपण "लिमिट" मध्ये पिऊ.

+1
मी आणि माझा नवरा ऑक्टोबर 2018 पासून पूर्णपणे सोबर आहोत. त्या आधी आम्ही "सोशल ड्रिंकिंग" खाली येणारे सगळे प्रकार करायचो. विकेंडला दोघेच कधी जेवायला गेलो की ड्रिंकिंग, मित्र मैत्रिणींबरोबर बाहेर गेलो की, घरातही एखादी वाईन बॉटल असायचीच. लग्न होण्याआधी आम्ही आमच्या आमच्या आयुष्यातही व्यवस्थित ड्रिंक करायचो. पण घरातल्या एका भयानक मृत्यूमुळे आम्ही एकदम कोल्ड टर्की पिणे सोडले.
सुरुवातीला फक्त एक वर्षं करून पाहू असा सूर होता जो आता कायमचा झाला आहे. तुम्ही म्हणता त्या प्रमाणे थट्टा होत नसली, तरी आम्हाला अगदी जवळच्या लोकांकडून, "लिमिटमध्ये प्यायल्याने काही होत नाही", याची अनेक उदाहरणे देण्यात येतात. पण ती उदाहरण ते आम्हाला देत नसून स्वतःला देत असतात असं वाटतं.
पण फक्त सोशल आणि नियंत्रणात असलेलं ड्रिंकिंग थांबवूनसुध्दा अनेक फायदे झालेले दिसले आहेत.
बाहेर जेवायला जाताना डोक्यात असलेले निकष बदलले. आणि बाहेर जाणेच बरेच कमी झाले आहे. त्यामुळे त्यावर वाया जाणारे पैसेही.
शनिवारी रात्री कधी मित्रांबरोबर बाहेर गेलो की रविवारची सगळी सकाळ अतिशय जड जायची. आता आम्ही बाहेर जातो पण रविवारी मस्त फ्रेश असतो.
माझ्यासाठी महत्वाचे म्हणजे विकेंडला खाण्याने आणि पिण्याने माझा आता आठवड्याभराचा व्यायाम आणि आणि हेल्दी आहार वाया जात नाही.
तो एक स्विच असतो. एकदा जमलं की पुन्हा मागे जावंसं वाटत नाही. यावर्षी न्यू यर पार्टी आमच्या घरी होती. आणि इतर सगळे जण घेत होते. पण आपणही घ्यावं असं अजिबात वाटलं नाही. किंवा त्यांनी घेऊ नये असं सुध्दा नाही.
तीस-चाळीस मध्ये असलेले बरेच भारतीय भयानक बिंज ड्रिंकिंग करतात. लिमिटमध्ये पिण्यात बिंज ड्रिंकिंग येत नाही याचे सोशल ड्रिंकर्समध्ये सुध्दा समुपदेशन करायला हवे.

धन्यवाद सई केसकर. काही प्रतिसादांमुळे धागा श्रीमंत झाल्यासारखे वाटते त्या तर्‍हेचा आपला प्रतिसाद आहे. तोही अनुभवातून आलेला. आभार.

बाकी तथाकथित सोशल ड्रिंकिंगही सेफ नाही. वीस बावीस वर्षे सोशल ड्रिकिंग करणारी आणि अचानक व्यसन लागलेली माणसे आढळतात. दर दहा सोशल ड्रिंकिंग करणार्‍यांमध्ये व्यसनी होणार्‍यांचं काही एक प्रमाण आहे जे माझ्या आता लक्षात नाही. मात्र कोण व्यसनी होईल हे सांगता येत नाही. काही विशिष्ट स्वभावाच्या माणसांच्या बाबतीत काही संकेत मिळतात. उदाहरणार्थ स्वत:चा बडेजाव करणारे, मी यंव करु शकतो, त्यंव करु शकतो अशी फुशारकी मिरवणारे, समाजात ज्यांना डॅशिंग, डेरींगबाज म्हणून मिरवायला आवडतं अशा माणसांचं प्रमाण व्यसनी लोकांमध्ये जास्त आढळताना दिसतं.

बिंज पॅटर्न तर सर्वात धोकादायक. ही माणसे उपवास केल्यासारखी सहा सहा महिने पीत नाहीत आणि एकदम सगळा बॅकलॉग काढतात. वर आपला स्वतःवर कंट्रोल आहे म्हणून मिरवतात देखिल.

साधन, अजिंक्यराव पाटील प्रतिसादाबद्दल आभार!

एक पद्धत अशी आहे की रोजच्या सर्वसामान्य कामांमध्ये व्यसनामुळे किंवा त्या पदार्थाच्या आठवणीने अडथळा येणे.

आपण व्यसनाच्या सीमारेषेवर आहोत हे कसे ओळखायचे?
किंवा व्यसनी आहोत ते>>>>>

एकदा ती गोष्ट करावीशी वाटली की कितीही ठरवले/ अडथळे आले/आणले तरीही ती गोष्ट करणे म्हणजे त्या गोष्टीच्या पूर्ण आहारी जाणे/त्याचे व्यसन लागणे असे मला वाटते.

सई, प्रतिसाद आवडला. कित्येक स्त्रिया ड्रिंक करत असल्या तरी आपण करतोय हे सांगायला संकोचतात पण तरी व्यसन सुटत नाही. समहाऊ, दारूचे व्यसन फक्त पुरुषांनाच लागते असा समज आहे पण मी अशी काही दुर्दैवी कुटुंबे पाहिलीत जिथे आईवडील दोघेही दिवसभर व्यसनाधीन पडून राहतात... तेवढ्याचपुरते कमावतात.

अद्याप तरी ती वेळ आली नाहीये
लॉक डाऊन च्या काळात दोन महिने मिळाली नाही तरी फार बैचेन व्हायला झाले नाही
तल्लफ आली पण म्हणून काही जाऊन रांगेत जाऊन उभा राहिलो नाही

मला यातली काहीच माहिती नाही. पण असे वाटतं लॉकडाउनचा काळ व्यसनावर ताबा मिळवायला खूप फायद्याचा ठरू शकतो.

माणसाची एखाद्या गोष्टीवर भक्ती असावी तर अशी. प्रेम असावे तर असे.

ठाकूर साहेब ही खरं तर भक्ती किंवा प्रेम नसून अगतिकता आहे.

जरा ही बिघडलेली तब्येत ठीक होऊ देत. मग आपण "लिमिट" मध्ये पिऊ

हे 100 टक्के खरं आहे परंतु यातील एकही माणूस लिमिट मध्ये राहू शकत नाही. बहुसंख्य लोक तब्येत सुधारण्यापूर्वीच एक किंवा दोनच पेग घेतो म्हणून सुरुवात करतात आणि पूर्णपणे त्याच्या कह्यात जातात.

सोशल ड्रिंकिंग म्हणून पिणाऱ्यांपैकी 10 टक्के लोक दारूच्या व्यसनाच्या आहारी (alcoholic) होतात. दुर्दैवाने कोण व्यसनाधीन होईल आणि कोण नाही हे सांगणे अजून तरी शक्य झालेले नाही. (मेंदूच्या fMRI मध्ये संशोधन चालू आहे). पण सोशल ड्रिंकिंग करणारा माणूस एखादे संकट आले म्हणजे (नोकरी धंद्यात अपयश जवळच्या माणसाचं मृत्यू) अतिरिक्त मद्य प्राशन करू लागतो आणि व्यसनाधीन होतो असे बऱ्याच वेळेला दिसते.

कधीतरी असे वाटते समजा एखादी अशी मॅजिकल गोळी निघाली की ज्यामुळे भरपूर दारु पिऊनदेखिल शरीराला काहीही त्रास होणार नाही.

खरं आहे आपलं.
अशा तर्हेची गोळी आहे. डायसल्फीरॅम(Antabuse) ही अशी गोळी आहे पण त्या गोळीनंतर दारू प्यायल्यास पिणाऱ्याला खूप त्रास होतो. त्यामुळे दारूविषयी तिरस्कार निर्माण व्हावा अशींनापेक्षा असते परंतु बरेचसे रुग्ण दारू थांबवण्या ऐवजी ही गोळीच घेणे थांबवतात.

मला यातली काहीच माहिती नाही. पण असे वाटतं लॉकडाउनचा काळ व्यसनावर ताबा मिळवायला खूप फायद्याचा ठरू शकतो.
हा एक विचार आहेच पण जे व्यसनात पूर्णपणे बुडालेले असतात त्यांना विथड्रॉलचे त्रास होऊ लागतात. हा काळ फारच त्रासदायक असु शकतो. अशावेळी उपचारकेंद्रात किंवा इस्पितळात असलेले बरे असते. काहीजण हॅल्युसिनेशनमध्ये जातात. त्यांना तर दोनतीन दिवस काहीच भान नसते.

ज्यांची अवस्था इतकी वाईट नाही त्यांच्यासाठी हा लॉकडाऊन ही संधी असु शकते.

पण व्यसन न मिळाल्याने राग अनावर होऊन वडीलांचा खून केल्याची घटना नागपूरात घडली. शिवाय व्यसन मिळालं नाही म्हणून राग अनावर होऊन आईवडिलांवर हात उगारण्याची आणि बहिणीला खुप मारहाण केल्याची घटना मला त्या त्रास झालेल्या भेदरलेल्या आईनेच फोनवर कळवली. त्यांना मदत हवी होती. मी काही फोन नंबर्स दिले.

व्यसनात माणसे कशी वागतील काही सांगता येत नाही. पण निरपराधा माणसांना होणारा त्रास हा व्यसनाचा सर्वात दु:खद भाग आहे.

मला वाटतं तीस वर्ष वयाच्या आत लागलेली दारूची सवय व्यासनात बदलू शकते.
कमी वयात लागलेल्या सवयीचे व्यासणात रूपांतर होते.
जास्त वयात लागलेली सवय व्यसन मध्ये रुपांतरीत होत नाही .
असं माझे एक निरीक्षण आहे

ठाकूर साहेब,

आपण जे काम करत आहात त्याला फार संयम आणि धीर लागतो.

व्यसनी माणूस कोणत्याही थराला जाऊ शकतो. त्यावर उपचार करणाऱ्याला शिवीगाळी पासून मारहाण करण्यापर्यंत आणि हातापाया पडण्यापासून इमोशनल ब्लॅक मेल करण्यापर्यंत.

दारू मिळेपर्यंत/ मिळवण्यासाठी माणूस काहीही करतो आणि समुपदेशन करणाऱ्या माणसाला अगदी डोळ्यात पाणी आणून आईची आणि बायको मुलांची शपथ घेऊन आजपासून दारू सोडली म्हणणारा माणूस दुसऱ्या दिवशी झोकांड्या खाताना दिसतो.

दोन दोन वर्षे दारू पासून दूर राहिलेला माणूस एका संध्याकाळी परत व्यसनाधीन होऊ शकतो आणि हे उपचार करणाऱ्याला फार निराशादायक असते.

असे असूनही त्यात काम करत रहायला फार संयम लागतो.

( एके काळी नौदलाच्या व्यसनमुक्ती केंद्रात काम करून मिळवलेला प्रत्यक्ष अनुभव आहे) ज्यांना अनुभव नाही त्यांना या कामाची खोली समजणारच नाही.

आपल्याला साष्टांग अभिवादन.

बहुतेकजणांना स्वतःहून दाखल व्हायचं नसतं. अनेकांच्या संसाराचा खेळखंडोबा झालेला असतो. बायको सोडून जाण्याच्या मार्गावर असते. बरेचसे आर्थिकदृष्ट्या डबघाईला आलेले असतात. अनेकांना पिणे झेपतच नसते. शरीराला सोसत नाही. खिशाला परवडत नाही. कामावरून काढून टाकले जाते. घरातून आईवडील हकलून देण्याची भाषा सुरु करतात. >>>>>> हे सगळे होताना एक गिल्ट असेल ना मनात !! माझा कझीन पूर्ण आहारी गेला आहे. College मध्ये असल्यापासून प्यायचा म्हणे. घरात कुणाला माहिती नव्हती. आता परिस्थिती हाताबाहेर गेली. एकदा तर दारूच्या नशेत त्याच्या "मित्रांनी" त्याला लुटले. अंगावरची साखळी अंगठी पैसे घेऊन मार मारून परगावी नेऊन फेकून दिले. कसाबसा वाचला Sad ! आता प्रयत्न करायला तयार झाला. त्याच्या वडिलांची अवस्था बघवत नाही. त्याची मुलगी पण घरात भेदरलेल्या अवस्थेत वावरते. बायको कूल आहे तिचे वडील असेच होते म्हणे ( हे सगळे बघून माझ्याच आईला कित्येक रात्र झोप आली नाही. ) मी फोनवरून कळवळून सांगितले rehab ला जा. ( ते गंडेदोरे करत होते Angry ) तो मुलगा तसा खूप शांत व प्रेमळ होता. त्याचे हे बदलेले रूप मलाही पचनी पडले नाही.
मैत्रिणीचा दीरही एक अशीच केस आहे. ती सांगत होती की It could be genetic too. पिणे नाही पण आहारी जाणे.
खरं आहे का ते . तो तर rehab मधून पळून आला दोनदा. आईला फोनवरून गयावया करायचा ने म्हणून ! हतबल झाले होते आई-वडील. रोज कुठेतरी पिऊन पडायचा. आणि वयस्क आई-वडील उचलून आणायचे. दोघांना आणावे लागायचे. एकाला आवरायचं/उचलायचे नाही. पण हळूहळू परिस्थिती सुधारली . नंतर एका गोड मुलीच्या प्रेमात पडला. नोकरी लागली. आता लग्न झाले वर्षभरापूर्वी. आता चांगले आहे सगळे . सकारात्मक गोष्टीही आहेत. कुटूंबीयांचा मात्र कस लागतो.
धन्यवाद !

जेनेटिक मुद्दा मलाही विचारायचा होता . माझे आजोबा अधूनमधून घेत असतात . जवानीत त्यांनी खूप दारू पिली आहे . लोखंडी कपाट भरून दारूच्या बाटल्या .
त्यांच्या नंतरच्या पिढीने दारूला स्पर्श नाही केला त्यांचे प्रताप बघून . आजीने मुलांना लांब ठेवले दारूपासून .
आता आमची पिढी - मी जॉब सुरु झाला तोपर्यंत दारूच्या थेंबाला सुद्धा हात नाही लावला .
नंतर एकदा अन्युअल पार्टी मध्ये खूप आग्रह केला म्हणून व्हिस्की पिली चाळीस ml . मला बिलकुल चढली नाही . काहीच फरक जाणवला नाही . त्यानंतर पुढच्या वेळेस नव्वद पिला तेंव्हा थोडासा फील आला . हे जेनेटिक असेल का कि मला कमी दारू चढली नाही ?
मुद्द्यावर येतो . नंतर मी वीकएंड प्यायला लागलो . एकशेवीस ml व्हिस्की किंवा रम . फक्त मित्रांबरोबर .
नंतर घरी बाटली आणून ठेवायला लागलो . दर विकेंड व्हिस्की .
मग लक्षात आले कि याचा त्रास नको व्हायला मग हार्ड ड्रिंक सोडली आणि शुक्रवारी चार बियर प्यायला लागलो .
वाट बघू लागलो कधी विकेंड येतोय . मला व्यसन लागले आहे अजूनही मला वाटत नव्हते . मग शुक्रवारची वाट बघणे त्रासदायक होऊ लागले मग मी बुधवारी एक बियर आणि शुक्रवारी तीन बियर पिऊ लागलो .एके दिवशी साक्षात्कार झाला कि बियर मुळे वजन वाढत आहे मग टकिला शॉट्स फक्त मारू लागलो .
अचानक एक दिवस मित्रांची कॉन्फेरेंस चालु असताना आणखी एक मित्र जो त्या कॉल मध्ये नव्हता त्याचा विषय निघाला . एक म्हणाला वो ना वो बेवडा हैं साला . सो रहा होगा . मी बोललो बेवडा क्यूँ बोलता है रे उसको . इतना भी नही पिता . तो उत्तरला अबे इन्सान जब अकेला पिणे लगे ना . समझ ले उसे लत लग गयी है . बेवडा हो गया वो
हीच ती मोमेन्ट . ठरवलं आता दारू सोडायची .
पण मला फुल प्रूफ प्लॅन हवा होता .उगाच सोडली मग परत धरली असा प्रकार नको होता . एका झटक्यात कोणतीही गोष्ट सुटणे अवघड असते मग मी फक्त शुक्रवारी तीन बियर पिणे सुरु केले . नंतर दोन बियर वर आलो . नंतर दीड बियर वर - अर्ध्या बिअर ने केस धुणे सुरु केले .
नंतर मुख्य स्टेप अल्टरनेट शुक्रवार दीड बियर .
असे करता करता महिन्यातून एकदा फक्त एक बियर - मंथ एन्ड ला .
नंतर ती देखील घ्यायची इच्छा मरून गेली .
आता पूर्ण सोबर आहे .

एक पद्धत अशी आहे की रोजच्या सर्वसामान्य कामांमध्ये व्यसनामुळे किंवा त्या पदार्थाच्या आठवणीने अडथळा येणे.>>>>

माझे असे स्मोकिंगबाबत झाले होते. दिवसभर एक पण ओढली नाही तर हुरहुर लागायची. काहीतरी चुकल्यासारखे वाटायचे.

एकदा वैद्यकीय तपासणी मधे हिमोग्लोबीन जास्त आले. ते स्मोकिंगमुळे होते आणि त्याने रक्त घट्ट होऊन स्ट्रोकचा धोका वाढतो असे डाॅक्टरांनी सांगितलं.

तेव्हा पासून एका महिन्यात सिगरेट सोडली.

याला आता काही वर्षं झाली.
मित्र, कलिग्स वगैरे माझ्या समोर ओढतात तरी मला कधीच तल्लफ होत नाही.

There isn’t a single gene responsible for alcoholism. There are hundreds of genes in a person’s DNA that may amplify the risk of developing an alcohol use disorder. Identifying these genes is difficult because each plays a small role in a much larger picture. Yet, studies have shown that certain combinations of genes have a strong relationship to alcoholism.

Genetic makeup only accounts for half of the alcoholic equation. There are also countless environmental factors (work, stress, relationships) that may lead to alcoholism.

Risk factors include:

Aggressive behavior in childhood
Lack of parental supervision
Poor social skills
Alcohol and drug experimentation
Poverty
Availability of alcohol
Protective factors include:

Good self-control
Parental monitoring and support
Good grades
Anti-alcohol policies
Neighborhood resources

Some environmental factors that are particularly risky for those who are genetically inclined towards alcoholism include:

Drug accessibility
Physical or sexual abuse
Peer pressure
Witnessing violence

छान धागा आणि चर्चा.
मी कधी व्यसनाच्या आहारी गेलेल्या माणसाला उपदेशाचे बोल सुनवायला गेलो नाही. ते अनुभवी तज्ञ समुपदेशकांचे काम समजतो.
पण जे थोडीथोडकी दारू पितात त्या लोकांना भले अनोळखी का असेना नेहमी याची आठवण करून देत राहतो की हि नागीण आहे, कधीही तुम्हाला आपल्या कवेत घेऊ शकते.
किंबहुना तुम्हाला स्वत:वर कितीही विश्वास असला की आपल्याला व्यसन लागणार नाही, आपण लिमिटमध्येच पितो, तरीही ते थोडथोडक पितानाही हे शरीराला अपायकारकच पेय आहे याची प्रत्येक पिणारयाला जाणीव असलीच पाहिजे.
सोशलसाईटवरही दारू पिणारयांच्या ग्लासात मिठाचा खडा टाकत फिरतो कारण आमच्या घरात आणि शेजारीपाजारी दारूमुळे उद्ध्वस्त झालेली कुटुंबे पाहिली आहेत. हो, यात माणसे नाही तर कुटुंब उद्ध्वस्त होतात..

ऋन्मेष तुम्ही पुढे व्हा .मी आहे तुमच्याबरोबर . आपण मिळून लोकांना दारूपासून परावृत्त करू . एक जण जरी दारूपासून दूर झाला मी सफल झालो . माझा मोटिव्ह लोकांमध्ये फिटनेस वाढवणे हा देखील आहे .

अरे बापरे खरे साहेब तुम्ही डॉक्टर आहात. तुम्हालाच साष्टांग अभिवादन !

अतरंगी, कटप्पा अभिनंदन पण स्वतःहून असे सोडू शकणारे थोडेच असतात. बहुतेकांच्या बाबतीत परिस्थिती हाताबाहेर गेलेली असते. त्यामुळे उपचारकेंद्राची मदत घ्यावी लागते.

आदिश्री , अनुवंशिकतेचं नक्की सांगता येत नाही. अनेकदा वडिलांच्या दारु पिण्यामुळे मुलाच्या मनात दारुबद्दल तिरस्कार निर्माण झालेलाही आढळतो. तुम्ही सांगितलेल्य घटनेतील मुलगा उपचारांना तयार झाला असेल तर ते फार चांगले लक्षण आहे. खरं सांगायच्म तर तो स्वतःहून तयार झाला तर अर्धे युद्ध जिंकलेच समजा. कारण व्यसनमुक्तीचे मूळ दुखणे हेच असते की माणसे डिनायलमध्ये असतात, आपल्याला व्यसन आहे हेच आधी मान्य करीत नाहीत. मग उपचारांना तयार होण्याचा प्रश्नच येत नाही. स्वतःहून तयार होणार्‍यांच्या बाबतीत यशाचे शक्यता जास्त असते.

prashant255 , मुक्तांगणला वय झालेली व्यसनी माणसे पाहिली आहेत. त्यामुळे वयाबद्दल ठामपणे सांगता येईल असे वाटत नाही. आपण बरेचदा व्यसन म्हणजे दारु असे गृहीत धरतो. अनेक वयस्कांना तंबाखूचे व्यसन लागलेले दिसते. ते वरवर दिसते तितके निरुपद्रवी नाही. उलट आमच्या व्यसनमुक्तीच्या क्षेत्रात तंबाखुला मदर ऑफ ऑल अ‍ॅडिक्शन म्हणतात. सर्व व्यसनं सुटतील पण तंबाखुचे व्यसन फार चिवट असते, वेळ लागतो ते सुटायला.

साधना, मुक्तांगणमध्ये निशिगंध म्हणून व्यसनी स्त्रियांसाठी खास वॉर्ड आहे, तेथे पुरुषांना प्रवेश नसतो. संशोधनाच्या दरम्यान मलाही तेथे जाता आले नाही. माझे संशोधन स्वमदत गटांच्या संदर्भात असल्याने मीही फारसा आग्रह धरला नाही. पण फार विदारक हकिकती ऐकल्या. व्यसनी स्त्रियांच्या बाबतीत एक महत्वाची गोष्ट म्हणजे मुलांच्या संगोपनाचा प्रश्न त्यांच्यासमोर मांडला की त्यांचे व्यसन ताळ्यावर येऊ लागते. असा एक अनुभव आहे. बहुधा मातृत्व हे इतकं नैसर्गिक आहे की त्याला साद दिली आणि आपल्या व्यसनामुळे आपल्या मुलाबाळांना त्रास होईल असे दिसले की स्त्रिया सावरु लागतात. हे पुरुषांच्या बाबतीत कदाचित होत नसावं.

व्यसनाच्या बाबतीत बायोलॉजिकल मॉडेल मला फारसं मान्य नाही. एकदा तुमच्या शरीरातच ते आहे म्हटले म्हणजे काही उपायच उरत नाही आणि माणसे पिण्याचं लायसन्स मिळाल्यासारखी वागु लागतात. तीन वर्षे पिएचडी साठी मुक्तांगण मध्ये जात होतो. एकही माणुस भेटला नाही ज्याने दु:ख होतं म्हणून दारु प्यायलो असं म्हटलं असेल.सर्वांनी मौजमजेसाठीच पहिला प्याला हातात घेतला होता. एक असा भेटला होता जो म्हणाला बडिलांच्या आजापणार सेवा करताना रात्री जागावं लागायचं तेव्हा पिणं वाढलं. खरं तर याचं पिणं वाढल्याने कदाचित वडिलांचं आजारपणही जास्त वाढलं असेल.

सर्वात कंटाळवाणं कारण अगदी अलिकडे कॉलेजातील एका तरुणाले दिलं. आयुष्यात पोकळी निर्माण झाल्याने माणूस व्यसनाकडे वळतो असे त्याचे म्हणणे होते. आनंदासाठी दारु पितो म्हणणारी माणसे मला यांच्यापेक्षा जास्त प्रामाणिक वाटतात.

विथड्रॉल भयानक असतात. हातात धड वस्तूही पकडता येत नाहीत. सतत ट्रेमर्स. त्यात जर लिव्हर खराब झालं असेल तर काहीही खाता येत नाही. भूकसुद्धा लागत नाही. शेवटी शेवटी दारू हेच अन्न आणि पाणी होऊन जातं.
विथड्रॉल आणि रिकव्हरी इतकं ट्रिकी आहे की कित्येक वेळा घरचे l, "जाऊदेत आत्तापुरती देऊया त्याला", या निष्कर्षावर येतात. काहीच करता येत नाही शेवटी. भयानक स्थिती असते. पेशंट आणि नातेवाईक दोन्हींची. आणि त्यात दारू पिऊन लिव्हर खराब केलेल्या माणसाला शून्य सहानुभूती असते. जवळच्या व्यक्ती त्यांच्यावर प्रेम करायचं की त्यांचा तिरस्कार या दोन टोकांमध्ये सतत झुलत असतात. त्यामुळे घरातले वातावरण पण खूप volatile असते.

अतरंगी, कटप्पा अभिनंदन>>>>

माझे अभिनंदन नको. ता पात्रता नाही.

मी अजूनही दारूवर प्रेम करणाऱ्या क्लबमधे आहे.

कामा निमित्त कधी कधी तीन ते सहा महिने फिरणं होतं तेव्हा घेत नाही (ठरवली तर मिळू शकते, पण आणत नाही). घरी आल्यावर तीन चार महीने प्यायलो नाही म्हणून बेदम किंवा ऊठसुठ पित नाही.

स्मोकिंगचं व्यसन होतं. ते सुटलं/ सोडलं.

पण असे वाटतं लॉकडाउनचा काळ व्यसनावर ताबा मिळवायला खूप फायद्याचा ठरू शकतो. >>>>>. हो अगदी अगदी. स्वानुभव.

गेली कित्येक वर्षे आम्ही मित्रमैत्रिणी रोज रात्री एका कॅफेमध्ये जातो. फक्त प्रवास आणि आजारपण हे अपवाद वगळता रोज. अगदी तुफान पावसाळ्यात सुद्धा खंड नाही. नवरा कॅमोमाईल टी पितो आणि मी कोरियन माईल्ड सिगरेट स्मोक करते. दिवसात फक्त एक, पण रोज. लॉक डाऊन पिरियडमध्ये कॅफेमध्ये जाणं बंद झालं आणि घरी मुलाला आई स्मोक करते माहीत नसल्यामुळे स्मोकिंग शक्य नाही. पण अगदी प्रामाणिकपणे सांगते की मला कधीही अस्वस्थ वाटलं नाही किंवा गुपचूप टेरेसमध्ये बसून स्मोक करावंसं वाटलं नाही. सगळं रुटीन, बिहेवीअर पॅटर्न नॉर्मल आहे. स्मोकिंग मिस करते आहे असं एकही दिवस वाटलं नाही. आता मी लॉक डाउन सम्पल्यावर कॅफे मध्ये जाईन, पण नो स्मोकिंग. घरी नवऱ्याबरोबर रोज कॅमोमाईल टी पिते आहे तेच चालू ठेवणार आहे. हे इथे सांगते आहे कारण मी इथे 2-3 महिन्यानी प्रामाणिक अपडेट देईन. फ्रेंड्सच्या ग्रुपमध्ये पण जहिरात केली आहे, म्हणजे लाजेकजेस्तव आपला निश्चय पाळला जातो. असं म्हणतात की डाएटिंग आणि व्यसन सोडवणं याची जाहिरात करून ठेवावी म्हणजे लोकलज्जेस्तव तरी आपला निश्चय आपण मोडत नाही आणि मित्रमंडळी (सच्चे असतील तरच) तुम्हाला निश्चय मोडू देत नाहीत. Happy

मुख्य ते लिहिलं नाही.

अतुल, तुमचा लेख अतिशय आवडला. मित्रमंडळीना तुमच्या नावासकट फॉरवर्ड करेन. अल्कोहोलीक कोणी ओळखीत नाही, पण आयुष्य वाया गेलेले कलीगज माहीत आहेत. त्यामुळे तुमचे मुद्दे पटकन समजले.
तुम्ही खूप छान काम करता आहात. धन्यवाद Happy

सैनिक 18 व्या वर्षी भरती होतात आणि 15 वर्षे नोकरी केल्यावर त्यांना निवृत्त केले जाते.(लष्कर तरुण आणि सुदृढ असायला हवे म्हणून)
15 वर्षे सन्मानाने नोकरी केलेला तरुण बाहेरच्या नागरी जगात आला की त्याच्या उत्तम नेमबाज असण्याची काहीही किंमत नसते. जर पोलिसात भरती होऊ शकला तर आयुष्य सुसह्य असते अन्यथा ते कुठेतरी सिक्युरिटी गार्ड म्हणून नोकरी करतात. अशांना नागरी जीवनात बायका पोरं सुद्धा फार हडत हुडूत करतात. यामुळे विद्ध होऊन असे सैनिक नियमित रित्या दारू प्यायला लागतात आणि मग व्यसनाधीन होतात. असे अनेक सैनिक मी माझ्या कारकिर्दीत पाहत आलो आहे.
दारूमुळे लिव्हर खराब होऊन लष्करी रुग्णालयात अशा कित्येक लोकांचा दुःखद अंत होताना पाहिलेला आहे. ते फार हृदयद्रावक असते.
आता माझ्याकडे सोनोग्राफीसाठी आलेल्या रुग्णांना मी लिव्हर ला सूज असेल तर दवाखान्याच्या भिंतीवर असलेली सुंदर श्री गणपतीची दीड फूट उंचीची तसबीर दाखवून स्वच्छ शब्दात सांगतो की असा फोटो काढून ठेवा. दारू आतापासून सोडली नाही तर दोन ते तीन वर्षात अशी तसबीर भिंतीवर लटकलेली दिसेल.
आश्चर्याची आणि आनंदाची गोष्ट म्हणजे तीन रुग्णांनी आपली दारू पूर्णपणे सोडली आहे. याला काकतालिय न्याय समजा किंवा त्या रुग्णांना परमेश्वराने सुबुद्धी दिली म्हणा.
एक रुग्ण तर गेली 7 वर्षे इमाने इतबारे दर सहा महिन्यांनी कोकणातील आपल्या गावाहून येऊन तपासून जातो. हा इसम अबकारी खात्यातून निवृत्त झाला आहे आणि फुकट मिळणाऱ्या दारूमुळे व्यसनी होऊन त्याला लिव्हर सिरहोसीस झाले आहे.परंतु पथ्यपाणी करून तो चांगला चालता फिरता आहे.
बाकी असे काही रुग्ण आहेत ते मधून मधून तपासून घ्यायला येतात. परंतु व्यसन चालू आहे आणि आल्यावर उद्यापासून सोडतो असे आश्वासन देतात.
तोच फोटो आणि तीच खबरदारी ची सूचना
पण पालथ्या घड्यावर पाणी.
ईश्वरेच्छा बलियसी

आपण व्यसनाच्या सीमारेषेवर आहोत हे कसे ओळखायचे?
किंवा व्यसनी आहोत ते

Submitted by आशुचँप on 16 May, 2020 - 03:26
एक पद्धत अशी आहे की रोजच्या सर्वसामान्य कामांमध्ये व्यसनामुळे किंवा त्या पदार्थाच्या आठवणीने अडथळा येणे.

Submitted by अतुल ठाकुर on 16 May, 2020 - 03:33

समजा असा काही प्रॉब्लेम नसेल तरीही दारू पिणे वाईट / दारू सोडावी का?

दारू पिणे आणि लेखात वर्णन केलेल्या अवस्थे पर्यंत पोचणे ह्या दोन्ही वेग वेगळ्या गोष्टी आहेत.
माज म्हणाल तर 23 वर्ष वय असताना रम च एक पेग घेतला होत .
आमच्या खास चार मित्र पैकी एक आर्मी मध्ये गेला होता आणि सुट्टीवर आला तेव्हा राम घेवून आला होता.
तेव्हा उन्हाळ्यात घरच्या पाठी मागे परड होते तिथे झोपायला जायचो.
आणि सर्व मित्रांचा एकत्र झोपण्याचा प्रोग्राम असायचा.
तेव्हा एक एक पेग राम मारली आणि तिकडेच झोपायच होत त्या मुळे बाकी टेन्शन नव्हत.
पण खूप नशा आली होती.
त्या. नंतर परत दारू पिण्याची इच्छा झाली नाही.
मध्ये चार पाच वर्ष निघून गेली .
आणि परत मुंबई मध्ये आल्यावर बिअर प्यायला लागलो तेव्हा 28 वय असेल.
बिअर ,ची whisky kadhi झाली हे समजलाच नाही .
पण मी माझे लिमिट ठरवले होते फक्त 90 ती पण पंथरा दिवसातून एकदा.
असे दोन तीन वर्ष निघून गेली आणि 90 ची 180 ml झाली .
पण ती सुद्धा कधी तरी पण .
व्यसन लागेल असं वाटायला लागलं .
आणि डॉक्टर च्या सल्ल्याने एक आयुर्वेदिक औषध घ्याच ठरवले .
Dr khare ह्यांनी उल्लेख केलेली गोळी असावी पण मी जे घेतलं होत ती powder hoti.
पण औषध घेतल्या नंतर मित्र बरोबर दारू पिली गेली .
आणि काय वर्णन करावे काय झाले ते.
श्वास मंद झाला ,अस्वस्थ वाटू लागले,श्वास घेण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागत होते.
ती क्रिया सहज होत नव्हती.
Heart attack chi sarv lakshan दिसायला लागली .
मग डॉक्टर ना घरी बोलावले.
त्यांनी चेक केले रक्त दाब नॉर्मल होता,puls normal hoti.
त्यांनी सल्ला दिला आराम करा काही ही झाले नाही.
पण भीती मुळे मी डॉक्टर ला ओरडलो आणि हॉस्पिटल साठी चिठ्ठी देण्यास सांगितली.
मग काय वरात हॉस्पिटल मध्ये.
नर्स,डॉक्टर ह्यांची धावपळ.
Bp check परत केला नॉर्मल,ecg घेतला तो पण नॉर्मल,अजुन एक टेस्ट केली जी अटॅक येवून गेला आहे का ते कन्फर्म करते ती पण नॉर्मल.
डॉक्टर गोंधळून गेले.
मी आपला लांब श्वास घेतच होतो.
सर्व रिपोर्ट बघून डॉक्टर पण परत फिरकले नाहीत.
तो पर्यंत मी दारू सोडण्याचे औषध घेतले होत आणि दारू पिलो हे सांगितलच नाही.
आणि बराच वेळानी दोन ते तीन तासाने डॉक्टर आले.
एक तर त्यांना काय करावे तेच त्यांना कळतू नसावे.( हा माझ्या डोक्यात त्या वेळी आलेला विचार)
मी पण नॉर्मल झालो होतो तो पर्यंत.
आणि तेव्हा मी दारू सोडण्याचे औषध घेतल्या नंतर दारू पिली हे सांगितले.
असले वैतागले ना माझ्यावर.
आणि लगेच डिस्चार्ज देवून टाकला.
हे पाहिले सांगितले असते तर एवढ्या टेस्ट करायला लागल्या नसत्या आणि पाच हजार रुपये पण वाचले असते .

हे सर्व ह्या साठी सांगितलं दारू सोडण्याचे औषध घेतल्या नंतर दारू पिली तर अस घडत.
नंतर ते दारू सोडण्याचे औषध फेकून दिले.
आणि स्वतःच मनावर नियंत्रण ठेवून व्यसन पण सोडून दिले.

Pages