काच कांगरी

Submitted by उमाग्रज on 14 May, 2020 - 08:37

काच कांग-यांचा खेळ
खेळायचो आपण
तेव्हा बघायचीस..
कवड्या फेकून डाव
टाकतांना सरळ अनिमिष नेत्रांनी
गुपचूप....ती मूक
नजर सांगून जायची
सर्व काही....
चौकोनी घरांच्या
पटावर फुलीच्या घरात
तुझी कांगरी आली
की, तू व्हायचीस
त्यावेळेपुरती निर्धास्त..
पण आतील घरात
प्रवेश मिळण्यासाठी तोडी होणे असायचे
आवश्यक ...
त्यासाठी डोळे मिटून
तू करायचीस प्रार्थना..
लगेच व्हायचीही तुझी तोडी..
पण नंतर कळूलागले की,
तोडी झाल्यावरही या व्यवस्थेने कधीच नाही राहू दिले तुला
काच कांग-यांच्या जगपटावरील फुली
असलेल्या सुरक्षित,निर्धास्त घरात..
बांगड्याही तुझ्या
कांग-याही तुझ्या
बांगडीची कांगरी होण्याचे संदर्भ मात्र
आजही मूक, अव्यक्त...

बापू दासरी,
नांदेड..

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults