प्रवास

Submitted by ज्येष्ठागौरी on 13 May, 2020 - 04:01

तो प्रवास सुंदर होता....

आकाशतळी फुललेली
मातीतिल एक कहाणी
क्षण मावळतीचा येता
डोळ्यांत कशाला पाणी ?

तो प्रवास सुंदर होता
आधार गतीला धरती
तेजोमय नक्षत्रांचे
आश्वासन माथ्यावरती

सुख आम्रासम मोहरले
भवताल सुगंधित झाले
नि:शब्द वेदनांमधुनी
गीतांचे गेंद उदेले

पथ कुसुमित होते काही
रिमझिमत चांदणे होते
वणव्याच्या ओटीवरती
केधवा नांदणे होते
कुसुमाग्रज

कुसुमाग्रजांच्या कवितांमधली ही कविता काही वर्षांपूर्वी वाचली,भावली.कळली असं नाही म्हणता येणार .पण जेंव्हा जेंव्हा ही कविता वाचते मी तेंव्हा तेंव्हा आत काहीतरी नवीन सापडतं हे निश्चित.काहीतरी वेगळं आणि कधी अनवट . दिवाळीनंतर नुकतीच शाळेतल्या मैत्रिणींबरोबर गोव्याला जाताना, ठरलेल्या वेळेच्या अपेक्षेपेक्षा उशीर झाला आणि संध्याकाळी अंधार पडत असताना गोव्याच्या हद्दीत शिरलो,मोठ्ठा प्रवास झाला होता, कंटाळा आला होता, अंग अवघडलं होतं.गर्द अंधार पसरला होता,दिवाळी नुकतीच संपली होती,तरी गोव्याच्या हद्दीतल्या त्या छोट्याश्या गावात प्रत्येक घराबाहेर लावलेले आकाशकंदिल आणि लुकलूकणारे दिवे होते.ते बघून आतून गहिवरलं, एका अनामिक भावनेनं डोळे गच्च भरुन आले.तो अनुभव मला शब्दात सांगता येत नाहीये पण मी एकटीच बाहेर बघत होते, खिडकीतून त्या लुकलुकणाऱ्या दिव्यांमधून काहीतरी शब्दांच्या पलीकडलं जाणवलं..
आयुष्याचा प्रवास हा खरंतर माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीसाठी फार मोठा शब्द आहे ,तरीही वयाचा निकष आणि आपल्या आयुष्याचा कॅनव्हास बघता पण तो वापरायलाच लागणार.तर असा प्रवास सुरु झाला तो अगदी सगळ्यांचा होतो तसाच झाला असणार, सुजाण आईवडील आणि संजय मोहनसारख्या दोन दादा लोकांच्या साथीनं. आजोबा,आजी, काका काकू ,येणारे पाहुणेरावळे , शाळा, मैत्रिणी मग लग्नानंतर नवरा, मुलं, नातेवाईक ऑफिसमधले सहकारी हे सगळे सहप्रवासी.सगळ्यांनी प्रवास सुखकर करायला मदत केली.हे मात्र खरं की प्रत्येकाबरोबर आपण एक वेगळाच वैयक्तिक प्रवास करत असतो आणि सामूहिकही.सामूहिक आणि वैयक्तिक हे प्रवास समांतर असले तरी त्यांच्यात जोडलं जाणारं एक सूत्र असतं.एक पूल असतो त्यांना साधणारा.
खरंतर मी लहान असताना , शाळेत असताना खूप हिंडले नाही.एकतर आईचं माहेर , म्हणजे मामा पुण्यातच आल्यानं ती तशी राहायला जायची नाही पण त्याआधी दौंडला मामाकडे जाण्यासाठी केलेला प्रवास आठवतोय. पण आता जसं अख्ख कुटुंब प्रवासाला जातं तसं आम्ही काही हिंडलो नाही.पण बापू निवृत्त झाल्यानंतर मात्र माझ्या काकांकडे, आत्याकडे गेलो असताना ओरिसा,तामिळनाडू विदर्भ बघितला आणि तोही बापूंबरोबर.त्यांना प्रवासाची खूप आवड.पण त्यांच्या नोकरीमुळे जमायचं नाही पण त्यांच्या आधीच्या आयुष्यात ते खूप हिंडले होते,रात्रीबेरात्री गाडी चालवून प्रवास केला होता.आम्ही प्रवासाला निघायचो तेंव्हा रात्री दहाची गाडी असेल की ते सातच्या सुमारास बॅग भरायला घ्यायचे.माझा जीव खालीवर व्हायचा की आता वेळेआधी होणार का नाही बॅग भरुन, पण व्हायची आणि इतकी सुंदर की बस!मग रिक्षानी स्टेशनला जायचं,प्लेटफॉर्मवरून गाडीची वाट बघायची.तेवढ्या वेळात बापू कुठे स्टेशन मास्तरशी गप्पा मार,ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत चालत जा असे उद्योग करायचे.गाडी आल्यावर अगदी शेवटपर्यंत वर चढायचे नाहीत,माझा जीव परत एकदा खालीवर! मग वाकून गार्ड हिरवा बावटा कसा दाखवतो ,गाडी कसा वेग घेते ते दाखवत त्याचा आनंद घ्यायचे किंवा प्रत्येक स्टेशनला खाली उतरुन दुसऱ्या दारानी वर चढणे असे मला काळजी वाटणारे उद्योग करायचे पण आईला सवय होती,ती शांत असायची.बरोबर आणलेले पदार्थ सहप्रवाशांबरोबर वाटून खाणे हा त्या प्रवासात एक आनंद विषय असायचा .ह्यात विरजण लावलेला दहीभात, पराठे, तिखट मिठाच्या पुऱ्या लोणचं चिवडा लाडू असं टिकाऊ काही काही असायचं असायचं,आणि सुरईचा माठ असायचा त्यात स्टेशनवरचं पाणी भरायचं ,काही बाधायचं नाही.खिडकीतून लांबवर पाहत बसायचा हा उद्योग प्रवासभर चालायचा. बापूंना भूगोलात फार गती होती ते इतक्या गोष्टी सांगायचे.वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळे प्रदेश खूप बहार दिसतात हे अजून डोक्यात आहे.खूप प्रवास झाल्यानंतर एक विलक्षण कंटाळा येतो तसं झालं की पत्ते खेळायचे किंवा बापूंच्या खांद्यावर रेलून गाणी म्हणायची किंवा गप्पा मारायच्या,त्यांच्या प्रवासाच्या गमतीजमती ऐकायच्या .पूर्वी फार प्रेक्षणीय स्थळ बघायची आवड नव्हती,सुविधाही नव्हती आणि आर्थिक गणितं वेगळी होती.पण म्हणून काही मजा कमी झाली असं नाही.आणि आता मात्र गर्दी , वाहतूकव्यवस्था वैयक्तिक स्वच्छता आणि स्वास्थ्याच्या वेगळ्या कल्पना यामुळे प्रवासाचा कंटाळा यायला लागलाय.त्यात आपलं कुटुंब सोडून असणारे loud लोक सहन करणं हे मान्य नसल्यानं स्वतः सगळं योजायचं आणि जायचं हेही कष्टप्रद व्हायला लागलंय हेही तितकंच खरं.एखाद्या कमी गर्दीच्या,ठिकाणी शांतचित्त ठिकाणी जायला निश्चित आवडतं.
मी आणि संजय जरा प्रवासाची आवड कमी असलेली भावंडं, आम्हाला घरी जास्त आवडायचं, तसा मी नाटकामुळे प्रवास केला आणि संजयने ट्रेकिंगसाठी पण खूप आवड अशी कमीच.पण मोहनला मात्र प्रवास खूप आवडायचा आणि त्याच्या नाटकाच्या दौऱ्याच्या, शूटिंगच्या निमित्तानं तो खूप फिरला,खूप प्रवास केला. आमच्या घरात "मोहनचा प्रवास" ही नेहमी कौतुकाची गोष्ट असायची. त्याला बाहेर चांगलं चुंगलं घरचं मिळत नसेल म्हणून तो येणार त्या सुमारास मला आणि संजयला आजी साय द्यायची नाही.साईचं दही लावायसाठी, तो आल्यावर मग त्यातलं दही मिळायचं.ती चक्क पक्षपात करायची.हे पाहून प्रवास हे एक भारी प्रकरण असावं असं काहीतरी मनात ठसलं. मोहन जिथे जाईल तिथून फार वेगळं काहीतरी माझ्यासाठी आणि घरच्यांसाठी आणायचा.त्यावेळी सगळं सगळीकडे मिळतं असं नव्हतं म्हणून जास्त अप्रूप!त्यानी आणलेल्या वस्तू किंवा त्याचे काही राहिलेले भाग माझ्याकडे अजून आहेत.सगळं अतिशय सौंदर्यपूर्ण कलात्मक आणि अभिरुचीपूर्ण असायचं,कधी कधी अगदी मजेशीर काहीतरी! भोपळहून बटवा, अमेरिकेहून रबराचं खोटं नाक,कुठून वेगवेगळी कुंकू लावायचे साचे, तांब्यापितळ्याच्या डब्या ,माझे केस लांब होते म्हणून अमेरिकेहून सांभाळून आणलेला दोन लिटर बालसम शॅम्पू अशा अनेक गोष्टी.पण तो आणखी काही करायचा .त्यानी श्याम बेनेगलांबरोबर यात्रा नावाची मालिका केली होती, ह्या काळात तो रेल्वेने पूर्ण भारतभर हिंडला. तो जिथे जायचा तिथून त्याच्या वळणदार अक्षरात एक पत्र पाठवायचा, तिथली खासियत,हकीकत कळवायचा. बापू इंग्लंडला गेले होते तेंव्हा तेही जिथे जायचे, तिथून picture पोस्टकार्ड पाठवायचे. आपला प्रवास दुसऱ्याला कळावा हे त्या whatsapp नसलेल्या जमान्यात खूप नवीन होतं आणि फार गोडवा होता त्यात, ख्यालीखुशालीबरोबर त्या प्रवासाची हकीकत होती.मोहननी पोखरणहून मला पत्र पाठवलं होतं त्यात अणुस्फोट आणि त्या वेळची राजकीय परिस्थिती ह्याबद्दल लिहिलं होतं.मोहन गावाहून आल्यानंतर त्याच्या नवीन नवीन गोष्टी अभिनयासकट बघणं ,धमाल असायची. मोहनचा प्रवास हा जसा फार वेगळा असायचा तसा आमच्या घरच्यांसाठी एक त्याची चेष्टा करायचा विषय असायचा, कारण सहसा तो चेष्टेच्या घेऱ्यात सापडायचा नाही पण तो कुठूनही आला प्रवासाहून की आई विचारायची काय बाबा , आज कोणाशी भांडण झालं? की मग एक हकीकत आरामात समजायची.अगदी मुंबई पुणं प्रवास असला तरी त्याचं कमीत कमी एक भांडण व्हायचंच व्हायचं.आता हे भांडण कुठल्या विषयावर असायचं तर दुसऱ्यांचं बेशिस्त किंवा नियमबाह्य वागणं किंवा अन्याय्य वागणूक. स्वतःवर आणि दुसऱ्यावर कुठल्याही प्रकारचा अन्याय तो सहन करायचा नाही .कधी कधी तर ज्याच्यावर अन्याय व्हायचा तोही मोहनला सांगायचा की अहो जाऊ दे पण प्रश्न तत्वाचा असल्यानं साधारण प्रवास संपेपर्यंत ही कथा चालायची. मग त्यातून त्याच्या प्रतिमेला धुमारे फुटायचे.मी संजय आणि आई यांनी मात्र साधेसुधे प्रवास केले.पडघमच्या निमित्तानं मी वेगळाच प्रवास केला आणि दौऱ्याच्या निमित्तानं प्रवास हा कसा धमाल असतो हे कळलं.प्रवासात अजिबात झोपायचं नसतं हा नियम मला इथेच कळला, पत्ते खेळणे,गाणी म्हणणे, गप्पा मारणे आणि खाणे ह्यासाठीच प्रवास असतो हे मनात ठरलं. पुढे ऑफिसच्या एका ट्रीप मध्ये बस पंक्चर झाल्यावर ,बरोबर काम करणाऱ्या मोठ्या अधिकाऱ्यांबरोबर एका ट्रकमध्ये उभं राहून केलेला एक अविस्मरणीय प्रवास.त्या अंधारातल्या प्रवासात आमच्या एका अमराठी अधिकाऱ्यानी म्हणलेलं गाणं.त्या प्रवासानंतर ऑफिसमध्ये एकमेकांशी वागायची परिणामं पूर्णतः बदलली.प्रवास हा असाच असतो,तुम्हाला अगदी सहजी बदलून टाकतो.गाडी लागणे वगैरे नेहमीच्या किरकोळ अडचणी येतचं राहतात पण प्रवास थांबत नाही.लग्न झाल्यावर नवऱ्याला प्रवासाची प्रचंड आवड आहे आणि तेही पुणे कोल्हापूर अर्थात NH4 वरच्या प्रवासाची हे कळलं.हा रस्ता त्याचा विशेष आवडीचा आणि पायाखालचा, प्रत्येक वळण आणि वळण ओळखीचं. मला मजा वाटायची,असा कुठलाही रस्ता माझ्या ओळखीचा नव्हताच कधी.त्यानी त्याच्या नजरेतून दिसणारा रस्ता असा दाखवला की आता कुठल्याही रस्त्यावर त्या खुणा मी शोधतेच. वाटेतल्या हॉटेलात चुकून थांबलच तर कुठलीतरी अनवट गाण्याची कॅसेट तिथंच त्याला मिळायची मग ती ऐकत पुढे सुटायचं.नवऱ्याचा पहाटे उठून गाडी हाकत जाण्याकडे कल,वाटेत अजिबात थांबायचं नाही आधी मुक्कामी पोचायचं. ज्यांना मागे टाकलं ते पुढं जातात,हे तत्वज्ञान मला अजूनही समजत नाही पण गाडी थांबवायची नसल्यानं मुलं मोठी झाल्यावर एक डायरी घेऊन बसायचो आणि नद्यांची नावं, गावांची नावं लिहिणं असे उद्योग करायचो.पण मुलं मात्र काचेला नाक लावून प्रवासाचा आनंद खूप घ्यायची.प्रवास बराच सुखकर व्हायचा.
गुलजार हे बापूंचे घट्ट मित्र, एकदा बापूंनी त्यांना विचारलं की तुमच्या कवितांमध्ये रास्ता,मुसफ़िर सडक, राह असे शब्द खूप येतात,बात क्या है?गुलजारांची गाणी आठवून बघा
त्यावर ते म्हणाले मुझे सफर बहुत अच्छा लगता है। त्यांचं नमकीन सिनेमातलं राह पे चलते है हे गाणं ऐकलं की आतून एक शांतपण वाटतं.सुंदर साथ हो मंजिलोंकी कमी तो नाही म्हणणारे गुलजार भावतात.
इतक्या लोकांबरोबरच्या प्रवासाच्या इतक्या आठवणी. शारीर, मानसिक, भावनिक, व्यावहारिक प्रवास करत राहतो आपण.आपोआप.प्रवास चालू राहतो एका शून्याकडून दुसऱ्याकडे,किती मोठा आहे,मार्ग काय आहे ,सहप्रवासी कोण आहेत,कोण राहणारेत कोण उतरणारेत,कोण येऊन मिळणारेत काहीच माहिती नाही पण आपल्याला हवा असो नसो प्रवास चालू राहतो.प्रवास कधी अगदी संथ कधी फार वेगवान असतो.कधी सुखात वेगवान कधी दुःखात. त्याचं काही भाकीत करताच येत नाही.पण प्रत्येकाचा प्रवास अगदी वेगळा अगदी विशेष असतोच.सारे प्रवासी घडीचे असं म्हणताना आपल्याही न कळत कोणीतरी पटकन उतरुन जातं.कोणीतरी रुसलेलं असतं, मी कोणावरतरी रुष्ट असते.माझा प्रवास ज्यांच्याबरोबर सुरु झाला त्यातले महत्वाचे सहप्रवासी हळूच उतरुन गेले.निरोप न घेता..मोहनला प्रवासाची आवड होती पण संजयला नसतानाही तो पुढे गेला.siblings may have different paths and life may separate them but they will be forever bonded by having begun their journey in the same boat.असं म्हणून माझा प्रवास चालू आहे.मोहन गेल्यावर शुभांगीनं त्याची आठवण म्हणून त्याची आवडती आणि तो नेहमी वापरत असलेली प्रवासाची बॅग मला दिली ,खरंतर ही तिच्या माझ्यातली फार वैयक्तिक आणि हृद्य गोष्ट आहे पण तरीही मला ती सांगावी असं वाटतंय.काय आहे त्या बॅगेत, मोहनचा एक खादीचा कुडता पायजमा आणि जॅकेट त्याचा हा विशेष आवडीचा पोशाख,स्वच्छ मोठा रुमाल,त्याचा चष्मा, औषधं ठेवायची डबी,आणि प्रवासात लागणाऱ्या गोष्टीचं पाऊच ,सगळं अतिशय उच्च दर्जाचं अभिरुचीपूर्ण आणि सुंदर ,त्याच्या ठायी असणाऱ्या कलात्मकतेची ग्वाही देणारं आणि त्याबरोबर तिचं एक छोटं पत्र सांगणारं की मोहनच्या ह्या सगळ्या गोष्टी ती असोशीनं सांभाळशील ह्याची खात्री आहे आणि त्याचं प्रवासाला निघालेलं व्यक्तिमत्व सतत तुझ्याबरोबर राहिल हे सांगणारं. माझ्या जवळच्या समृद्धीच्या गोष्टींपैकी ती एक बॅग आहे.एक अतिशय गुणी आणि हुशार व्यक्तिमत्व फार लवकर त्या प्रवासाला निघून गेलं, आणि त्यानंतरचा बापूंचा प्रवास फार दुःखद झाला.ज्यांना प्रवासाचा इतका आनंद व्हायचा त्यांना मोहन शिवाय आयुष्याचा प्रवास केवळ असह्य झाला.
मला आत्ताच्या प्रवासात त्यांच्याबरोबरच्या क्षणांची खूप सुंदर आठवण येते आहे ही किती गोड गोष्ट आहे, विचारातून, कृतीतून, आठवणीतून हा प्रवास चालू असतोच.हा खरंतर न संपणारा प्रवास आहे..पण मग गोव्याच्या वेशीवर माझे डोळे ज्या अनामिक भावनेनं भरून आले.ती काय होती! आपला एकटा प्रवास चालू असतानाही कोणीतरी आपलं आपल्याबरोबर असतं बरोबर हे सहजी समजून आलं आणि आपण ज्याला एकटं म्हणतो ते तसं एकटं नाहीये हे कळलं.तो परमेश्वर आहे की आणि कोणी माहिती नाही पण अचानक जाणवलं की कोणीतरी आपल्यावर अपार माया करणारं आपल्याबरोबर आहे, आपल्याबरोबर प्रवास करतंय.सदैव..अविरत..निरंतर.
©मृण्मयी सहस्रबुद्धे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहिलंय. तुमचे इतर लेखही शोधून वाचते आता.
कुठल्याश्या मराठी वर्तमानपत्रात काही वर्षांपूर्वी शुभांगीताई एक साप्ताहिक सदर लिहित असत. त्यातला त्यांचाही या विषयावरचा लेख अतिशय हृद्य होता .

फार हृद्य लिहीलं आहे.
माझ्या पन्नाशीच्या टप्प्यावर कुठला प्रवासी आपल्याला सोडून जाईल, ही भीती मनाच्या एका कोपऱ्यात वाटतं असते. त्याच भावना वाचताना डोळ्यात पाणी आले.
तुम्ही फार छान लिहीता.

फारच सुंदर! अकाली सोडून गेलेली आपली माणसं फार चटका लावून जातात.
शेवटच्या वाक्याला डोळे भरून आले!
तो परमेश्वर आहे की आणि कोणी माहिती नाही पण अचानक जाणवलं की कोणीतरी आपल्यावर अपार माया करणारं आपल्याबरोबर आहे, आपल्याबरोबर प्रवास करतंय.सदैव..अविरत..निरंतर. >> काय माहीत पण असंच असू दे!

आपले सर्व लेख आवडतातच. आज आपल्या ब्लॉगवरही जाउन आले. हुजूरपागेचे, शालेयजीवनाचे वर्णन काय सुरेख केले आहेत.