आग पोटाची

Submitted by निशिकांत on 12 May, 2020 - 23:23

मरावे व्हायरसने पण नको ती आग पोटाची
कसा पाहू भुकेला चेहरा अन् भूक पोराची

भुकेला खाउनी कोंडा निजेला घेतसे धोंडा
तरी का दृष्ट लागावी अभाग्याला करोनाची?

लसीला शोधण्या लागेल अवधी कैक वर्षांचा
निघूनी बैल गेल्यावर व्यवस्था खास झोप्याची

मला नातू म्हणे पाहून टीव्ही मास्क बांधावा
सदा ऐकून चर्चा फक्त कोविदच्याच प्रश्नाची

धुणी, भांडी अता कर्फ्यूत झाले काम पुरुषांचे
कुणाचे काम कुठले ही नसे चर्चा विवादाची

रहा एकत्र सारे शिकविले आम्हा जरी होते
करोना हारवाया औषधी अलगाववादाची

विषाणू खूप बलशाली असावा वाटते आहे
कवाडे बंद झाली सर्वधर्मी कर्मकांडाची

असावा जास्त शिक्षित व्हायरस हा माणसापेक्षा
न त्याला जात कुठलीही, न कुठल्या कैद धर्माची

म्हणे येताच संकट या धरेवर जन्म घेतो मी
अता " निशिकांत " कर तू विनवणी दररोज कृष्णाची.

निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३

Group content visibility: 
Public - accessible to all site users