२ चाकं, पेडल आणि नर्मदा परिक्रमा - भाग ६

Submitted by वेदांग on 12 May, 2020 - 08:30

२ चाकं, पेडल आणि नर्मदा परिक्रमा - पुर्वार्ध
http://www.maayboli.com/node/58713

२ चाकं, पेडल आणि नर्मदा परिक्रमा - भाग १
http://www.maayboli.com/node/58938

२ चाकं, पेडल आणि नर्मदा परिक्रमा - भाग २
http://www.maayboli.com/node/59092

२ चाकं, पेडल आणि नर्मदा परिक्रमा - भाग ३
https://www.maayboli.com/node/59199

२ चाकं, पेडल आणि नर्मदा परिक्रमा - भाग ४
https://www.maayboli.com/node/74279

२ चाकं, पेडल आणि नर्मदा परिक्रमा - भाग ५
https://www.maayboli.com/node/74374
=====================================

नर्मदे हर

सकाळी ६. ३० वाजता सर्व आवरून तयार झालो आणि पुढे जायच्या तयारीला लागलो. कालची खिचडी उरली होती. वाया जाऊ नये म्हणून आम्ही आमच्या सोबत घेणार होतो पण आश्रमातले पुजारी म्हणले ‘खिचडी इकडेच ठेवा, कोणी आलं तर त्याला बालभोगला होईल.’ म्हणून खिचडीचं पातेलं त्यांच्याकडे सुपूर्त करून आम्ही सायकलला टांग मारली.

साधारण ३ किमी झाल्यावर भडोच - दहेज हायवेला लागलो आणि उजवीकडे वळून भडोचच्या दिशेने मार्गस्थ झालो. थोडे पुढे गेल्यावर पोटातल्या कावळ्यांनी आरोळी द्यायला सुरुवात केली. एके ठिकाणी टपरी दिसली तिकडे चहा घेतला. बाकी काही खायला दिसेना म्हणून चणे-फुटाणे घेतले. सायकल काढून निघत असताना तिकडेच चहा पीत असणाऱ्या एकांनी अर्धा किलो शेवेचे पाकीट दिले. खरेतर ते घेण्याची इच्छा अजिबात नव्हती. कारण, अर्थातच अर्धा किलो जास्तीचे सामान कोण कॅरी करणार. पण अर्धा संसार सायकलवर घेऊन फिरणारे नंदू काका पुढाकाराने म्हणले "मी घेतो. माझ्याकडे द्या ते पाकीट." नंदू काका सोडून बाकी सगळ्यांना आनंद गगनात मावेनासा झाला. नंदू काकांनी अक्षरशः अर्धा संसार आणला होता. काय म्हणाल ते त्यांच्या पॅनिअरमध्ये सापडायचं. मागितलं असतं तर कदाचित शेगडी आणि सिलेंडरसुद्धा निघाला असता.

शेवेचं पाकीट घेऊन आम्ही पुढे निघालो आणि थेट मंगलेश्वरला (३६ किमी) जाऊन थांबलो. तिकडे कोणतीच सोय नसल्याने ढोकळा खाऊन आम्ही पुढे निघालो. धर्मशाला नावाचे गाव ओलांडून बाहेर पडलो आणि सायकल चालवत असतानाच "रुकीये प्रभू.... नर्मदे हर!!" असा आवाज आला. आवाजाच्या दिशेने बघितले तर रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला साक्षात साई बाबा!! मी उडालोच. डोळे चोळून परत बघितलं तरी तेच चित्र दिसत होतं. परिक्रमा करताना नशिबात असेल तर नर्मदा मैय्या, अश्वत्थामा, दत्तगुरु दर्शन देतात हे ऐकलं होतं पण साई बाबा सुद्धा दर्शन देतात हे माहित नव्हतं. मी जरा गोंधळात पडलो. सीरियलमध्ये बघितल्याप्रमाणे देव अथवा संत पुरुष दर्शन देत असताना सोसाट्याचा वारा सुटतो, झाडे हलु लागतात, आजूबाजूचा परिसर निर्मनुष्य होतो इत्यादी इत्यादी. यातले काहीच घडत नव्हते. जवळच्या घरांमधली लहान मुलं पकडा-पकडी खेळत होते. रस्त्यावरून तुरळक प्रमाणात का होईना पण गाड्या जात होत्या. आणि माझ्या सोबत असलेले सायकल परिक्रमावासीसुद्धा दिसत होते. मला काहीच टोटल लागेना. शेवटी भानावर आलो आणि पळत जाऊन साईबाबांना नमस्कार केला. त्यांनीपण माझ्या पाठीवर हात ठेवून आशीर्वाद वगैरे दिला. मी अजूनही हँग. माझ्या मागोमाग इटी काका आणि बाबांनी सुद्धा नमस्कार केला. तेवढ्यात साईबाबांनी विचारलं "आप परकम्मा मे हो? आपने भोजन किया?" यांत्रिकरीत्या आधी हो आणि आणि नंतर नाही म्हणून मी मान वळवली. त्यावर साईबाबा म्हणाले "यहांसे आगे २ किलोमीटर मेरा आश्रम है, उधार रुक जाईये. मै अभी आया." असे म्हणत ते आश्रमाच्या दिशेने चालायला लागले. आम्ही परत सायकलपाशी येऊन पुढे निघालो. सांगितल्याप्रमाणे अंदाजे २ किमीनंतर डाव्या हाताला 'मिनी शिर्डी तीर्थधाम, साई प्रेम समय आश्रम' अशी पाटी दिसली. पाटीवर आम्हाला भेटलेल्या साईबाबांचा फोटो. मग टोटल लागली. हे साईबाबा सदृश दिसणारे गृहस्थ साईबाबांचे भक्त आणि त्यांच्या नावाने ते परिक्रमावासींची सेवा करतात. त्यांचे नाव 'सतगुरू स्वयं साई गुरुजी'. आश्रमात जाऊन सायकली लावल्या आणि सामान सोडवायला लागलो. तेवढ्यात आतून एक माताजी आल्या आणि नर्मदे हर केलं. त्यांना आम्ही साईबाबा भेटल्याचा संदर्भ दिला. त्यांनी लगेच आत बोलावले आणि बसण्यासाठी आसन दिले. बोलण्याच्या ओघात कळले कि आम्हाला भेटलेले साईबाबा त्या माताजींचे पती. या भागातील सर्वजण त्यांना साईबाबाच म्हणतात. चहा करण्यासाठी माताजी आत गेल्या. तोपर्यंत आम्ही आम्ही आंघोळीचे सामान काढले. आश्रमापासून २ किमीवर मैय्या आहे असेल कळले. त्याशिवाय मैयाचा एक छोटा कालवा आश्रमाच्या मागून जात होता. आम्ही मैय्यावरच स्नान करायचे ठरवले आणि निघालो. बऱ्यापैकी ऊन असल्याने मैय्याच्या थंड पाण्यात डुंबायचा अनुभव फारच सुखावह होता. स्नान करून आम्ही आश्रमात परत आलो. तोपर्यंत साईबाबा आले होतेच. आम्ही येताच "भोजन कि तयारी हो रही है... आप तबतक यहा बैठिये." असे सांगून आम्हाला बसायला सांगितले. कपडे वाळत घालून आम्ही त्यांनी नेमून दिलेल्या जागी बसलो. जुजबी चौकशी नंतर त्यांनी सत्संग करायची इच्छा दर्शविली. आम्ही ऐकण्यात रस दाखवताच त्यांनी 'आत्मा आणि परमात्मा' या विषयावर सत्संग केला.

थोड्याच वेळात भोजनासाठी बोलावणे आले. वांग - बटाटा रस्सा भाजी, रोटी आणि भात असा फक्कड बेत होता. जेवताना साईबाबांनी सांगितले कि त्यांची पत्नी मूळ भुसावळची आहे. आम्हाला महाराष्ट्रात जेवल्यासारखे वाटले. जेवण झाल्यावर मागून वाहत असलेल्या मैय्याच्या कालव्याजवळ हात धुतले. खूप छोटा पण अत्यंत स्वच्छ असा मैयाचा कालवा आहे. जेवण करून थोडावेळ विश्रांती घेऊनच पुढे निघालो.

पुढे झनोर नावाच्या गावाजवळ (गूळ बनवायचे) गुऱ्हाळ दिसले. आत जाऊन मालकांना गूळ कसा बनवतात हे बघायची इच्छा दर्शवली. त्यांनी सुद्धा उत्साहाने सर्व गुऱ्हाळ दाखवले व ताजा गूळ आणि गरम उसाचा रस प्यायला दिला. जास्तीची माहिती म्हणून १ टन उसापासून साधारण १६० किलो गूळ बनतो असे सांगण्यात आले. आभार मानून पुढे निघालो.

नारेश्वरच्या अलीकडे ७ किमीवर नंदू काकांच्या सायकलचे चाक आउट झाले. बऱ्यापैकी स्पोक तुटले होते आणि दुरुस्त करण्यास बराच वेळ गेला असता म्हणून नंदू काका सायकल हातात घेऊन चालत निघाले आणि आम्ही हळू हळू पुढे निघालो. नारेश्वरला श्री रंगावधूत महाराजांची समाधी आहे. वसंतपंचमी असल्याने प्रचंड गर्दी होती. चौकशी केल्यावर कळले की वसंतपंचमीच्या दिवशी मंदिरातील ध्वज बदलण्याचा कार्यक्रम असतो. गर्दी असल्याने अर्थातच झोपण्यासाठी भक्त निवासमध्ये झोपायला जागा मिळाली नाही. शेवटी संस्थानाच्या कचेरीबाहेरील ओसरीवर आसन लावले. तोपर्यंत नंदू काका सायकल घेऊन आले. सायकलची तपासणी केल्यावर कळले कि सायकल दुरुस्ती होण्यापलीकडे गेली आहे आणि चाक (रिम) बदलल्याशिवाय पर्याय नाही. सायकल तपासणी व चर्चा करत असताना एक गृहस्थ आमच्यासोबत उभे होते. आमच्या सायकली आणि वेश बघून सर्व ठिकाणी लोकं आम्हाला बघायला यायचे. सुरुवातीला अगदी प्राणिसंग्रहालयात असल्याचा फील यायचा. पण नंतर सवय झाली. म्हणून त्या गहृस्थांकडे दुर्लक्ष करून आम्ही आमची चर्चा करत होतो. शेवटी असे ठरले की चाक बदलण्याशिवाय पर्याय नाही त्यामुळे बडोद्याला (११० किमी) जाऊन चाक बदलून येणे. या ठरावावर शिक्कामोर्तब करून आम्ही प्रसाद घ्यायला गेलो. मस्त झणझणीत मटकीची उसळ आणि भात. तुडुंब जेवलो आणि परत आमच्या झोपायच्या जागेवर आलो.

दिवसभराच्या गप्पा चालू असतानाच, नंदू काकांच्या सायकलबद्दल चर्चा करत असताना जे गृहस्थ आमच्यासोबत उभे होते त्यांनी आमच्याजवळ येऊन विचारले " नर्मदे हर... मेरा नाम वालाभाई है... आपकी सायकल ठीक नही लग रही.. मै आपको कुछ मदद कर सकता हूं?" आम्ही आमची अडचण सांगितली आणि उद्या नंदू काका बडोद्याला जाणार असल्याचे सांगितले. त्यावर वालाभाई म्हणले "मै बडोदामे रेहेत हूं ... मै भी कल बडोदा जा राहा हूं ... मै आपके साथ चलता हूं और आपको सायकल ठीक करवाके देता हूं" त्यांचे बोलणे ऐकून आम्हाला आश्चर्य वाटले. संकटाच्या काळात मैय्या मदत करते आणि काही अडचण आली तरी ती सोडवण्याचा उपाय दाखवते याचा पुरेपूर अनुभव आला. त्यांना कोणता त्रास अथवा अडचण होणार नसल्याची खात्री करून नंदू काका वालाभाईंसोबत जाण्यास तयार झाले. आम्ही सुद्धा खुश होऊन वालाभाईंचे परत परत आभार मानले आणि त्याच आनंदात निद्रादेवीच्या अधीन गेलो.

क्रमशः

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

वेदांगजी पुढचे भाग कुठे आहेत?
मैय्याजीचे अनेक भक्त पुढच्या भागांची वाट बघताहेत हे लक्षात ठेवा म्हणजे आळस पळून जाईल व कर्तव्य जागे होईल.
या भागातले फोटो पण प्रतिसादात टाका.

त्यानंतर आम्ही पायी परिक्रमेच्या लेखाची वाट पाहाणार आहोत. Happy