म्हातारी, मी आणि वर कुठेतरी घेतलेला निर्णय

Submitted by abhishekraut on 9 May, 2020 - 14:08

आमच्या बिल्डिंगमधून खाली उतरलात कि लगेच चौक लागतो. नेहमी गजबजलेला. अगदी प्रातिनिधिक असा. चार रस्ते चार बाजूंनी अस्ताव्यस्तपणे एकत्र येतात तिथे. एका कोपऱ्यातलं वाण्याचं दुकान फूटभर रस्त्यावर आलेलं असतंय. तिकडे तो भाज्या मांडतो. वरती लावलेल्या हिरव्या रंगाच्या दिव्याने त्या दिवसभर ताज्या दिसत राहतात. दुसऱ्या कोपऱ्यात चहावाल्याने त्याचा संसार थाटलाय. त्याने दुकानासमोर टाकलेल्या बाकड्यांवर दिवसभर गर्दी असते. एखादे टोपीवाले आजोबा, रोजंदारीवरचे मजूर, समोरच्या स्टॅन्डवरचे रिक्षावाले, काळ्या काचांच्या गाडीतून उतरणारे "गुंठामंत्री" आणि असे कित्येक जण. त्याबाजूलाच पोहे, मेदुवडा, इडली मिळते. संध्याकाळी तोच डोसे विकतो. दिवसभर माणसांच्या, गाड्यांच्या गर्दीत ओथंबणाऱ्या चौकाच्या मध्यभागी, येणाऱ्या जाणाऱ्यांना त्रास होईल अशा योग्य ठिकाणी चौकाच्या नावाचा बोर्ड असतो. ती त्या चौकाची ओळख असते.

ती त्या चौकात रोज सकाळी येते. ठरलेल्या वेळेला. तिच्या हातात एक झाडू असतो आणि पाठीला मोठ्ठालं गोणपाट. चार रस्त्यांच्या कडेकडेने झाडते आणि गोळा होणार कचरा गोणपाटात भरत जाते. एका कोपऱ्यातल्या टपरीपासून सुरुवात करत. ती झाडत जाते आणि उडणाऱ्या धुळीसोबत गोळा होत जातात असंख्य गुटख्याची पाकीटं, सिगारेटींची थोटकं आणि चुरगाळून टाकलेले कागद. ती सारं काही पाठीवरच्या गोणपाटात भारत जाते आणि पुढे सरकते. पुढे सरकण्याआधी टपरीवाला तिच्या हातात एक विडी टेकवतो. वाण्याच्या दुकानासमोर ती थोडं जास्तवेळ थांबून नीटपणे झाडते. तिने रस्ता झाडल्याशिवाय तो त्याच्या ताज्या हिरव्या भाज्या मांडून ठेवत नाही. दुकानासमोरचा सगळा कचरा गोणपाटात भरल्यावर काही वेळ त्याच्या पायरीवर रेंगाळते. गल्ल्यावर बसलेला शेठ ते पाहून उठतो. एका हाताने नाकाला लावलेला रुमाल तसाच ठेवून दुसऱ्या हाताने दहा-वीसची एखादी नोट काढून तिच्या हातात टेकवतो. ती पुढे सरकत राहते झाडू आणि गोणपाट घेऊन. काय काय पडलेलं असतं रस्त्यांच्या कडेला. प्लास्टिकच्या पिशव्या, रात्री भर चौकात दारू पिऊन फेकून दिलेल्या बाटल्या, चुरगाळून फेकलेली जुनी बिलं,तिकिटं, वापरून फेकलेल्या असंख्य गोष्टी ज्यात टूथपेस्टच्या संपलेल्या ट्यूबपासून ते कॉन्डोमच्या रिकाम्या पाकिटापर्यंत सगळं काही असतं. ती सगळ्यांवर आपला झाडू फिरवत जाते आणि गोणपाट भारत जाते. चौकाच्या एका कोपऱ्यात पोहे, मेदुवडे विकणारा असतो. त्याच्या आजूबाजूला नेहमी गर्दी असते. गर्दी सहजपणे तिला वाट करून देते. लोक तोंड फिरवतात, काही तोंड वाकडं करतात, काही एका हाताने आपली खाण्याची प्लेट झाकून घ्यायचा प्रयत्न करतात. ती सहजपणे पुढे जाते, कोपऱ्यात ठेवलेला कचऱ्याचा डब्बा ज्यात लोकांच्या खरकट्या प्लेट्स, प्लास्टिकचे चमचे, अर्धवट उरलेला सांबार, फेकून दिलेली चटणी असं सारं काही असतं. ते ती उचलते आणि आपल्या गोणपाटात रिकामं करते आणि पुढे जात राहते. त्याच शेजारी फुलवली आजी दुकान मांडत असते. शिळी फुलं गोणपाटात टाकून ती पुढे सरकते. कधी कधी आजी तिच्या हातात एखादा गजरा ठेवते तेव्हा ती खुश होते. एका कोपऱ्यात उभं राहून ती स्वच्छ झालेल्या चौकाचा अंदाज घेते. निघताना तिला कधी कधी एखाद प्लेट मेदुवडा किंवा पोहे मिळतात किंवा गरमागरम चहा करणाऱ्या पोराच्या हातून एखाद कप चहा. त्याने चहा दिला कि खूपशा प्रेमाने ती त्याच्याकडे पाहते. चहा पिऊन झाल्यावर कप ठेवताना सहजपणे ती त्या पोराच्या डोक्यावर हात ठेवून जाते. कदाचित तिला तिचा नातू आठवत असावा. चहा आटोपला कि चौकाच्या एका कोपऱ्यात काळी छत्री उघडून चाम्भाराचं सामान घेऊन बसलेल्या आजोबांच्या शेजारी बसून टपरीवाल्याने दिलेली विडी ओढते. रोज सकाळी तीन चार चौक झाडून पन्नासेक रुपये कमावणारी म्हातारी आमच्या चौकाचं अविभाज्य अंग झालेली असते. मला वाटत असतं कचरा गोळा करणाऱ्या त्या आज्जीला आणि चौकाला एकमेकांशिवाय करमत नसेल.

एक दिवशी नाश्ता करताना मला लक्षात येतं, एका कोपऱ्यात ती एकटीच बसलीये, रस्त्याकडे पाहत. निरपेक्ष नजरेने. मी आधी तिच्याकडे पाहतो आणि मग रस्त्याकडे. मला दिसतं रोड स्वीपिंग मशीन. दहा मिनिटात ते मशीन चारी रस्ते झाडून काढतं. धुळीचा एक कणसुद्धा उडत नाही. सगळा रस्ता स्वच्छ होत जातो. टपरीवाल्याला एक विडी द्यावी लागत नाही, शेठला उठून दहा रुपये द्यावे लागत नाहीत, चहावाल्याचा रोजचा एक फुकटचा चहा वाचतो. मला आठवतं पेपरमध्ये स्वीपिंग मशीनबद्दल वाचलेलं. वर कुठेतरी सरकारी पातळीवर निर्णय झालेला असतो आणि स्थायी समितीने असे १० मशिन्स मागवलेले असतात. सिंगापूरच्या धर्तीवर. शहरातले चाळीस चौक स्वच्छ करायला. निवांतपणे ते मशीन अक्खा चौक स्वच्छ करत पुढे जात राहतं आणि ती म्हातारी कुठल्याश्या अस्वस्थतेने कोपऱ्यात बसून राहते. मशीन दूर निघून जातं. चौक स्वच्छ झालेला असतो. म्हातारीचं गोणपाट आज रिकामं असतं. ती पूर्ण चौकात एक फेरी मारते. तिच्याकडे कुणाचंच लक्ष जात नाही. नेहमीच्या लोकांचंही नाही. ती शांतपणे चालू लागते, दूर दूर जाऊ लागते. मला जाणवतं कि अरे आपल्याला उगाचंच असं वाटत होतं कि कचरा गोळा करणारी ती म्हातारी आणि तो चौक यांना एकमेकांशिवाय करमणार नाही.

त्यानंतर ती म्हातारी मला पुन्हा दिसली नाही. बाकी सगळं तसंच आहे. म्हातारी कुठे तरी नामशेष झाली. शहराला सिंगापूर बनवायचं तर तेवढी काळ सोसायलाच हवी. कधी कधी असं वाटतं , उतरंडीच्या वर कुठेतरी असणाऱ्या चार डोक्यांनी मिळून घेतलेला एखादा निर्णय फार खाली राहिलेल्या कुणाला बघता बघता कसा नामशेष करेल सांगता येत नाही.

-अभिषेक राऊत

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हृदयस्पर्शी लिहीलेले आहे. 'नया दौर' सिनेमाची आठवण झाली. रिक्षावाल्यांच्या येण्यामुळे, गावातील, टंगेवाल्यांच्या पोटावरती पाय येतो.

निव्वळ भावनात्मक गोष्ट लिहायची असेल तर ठीक आहे. पण केवळ मशीन आणले म्हणजे कुणाच्या पोटावर पाय आला, असे नसते. इतर वेगळ्या प्रकाराने नोकरीची निर्मिती होते. मशीन तयार करायला कारखाना लागतो, तिथे कामगार लागणार. जो सफाई मुकादम मशीन विकत घेईल, तो बँकेतून कर्ज घेणार, मशीन चालवायला ड्रायव्हर ठेवणार, इश्युरन्स घेणार, मशीनमध्ये पेट्रोल आणि वंगण टाकणार, मशीन ची दुरुस्ती करून घेणार. त्यासाठी जे पूरक उद्योग लागतात त्यातून जॉब क्रियेशन होतच असते, म्हातारीचे काम गेले तरीही.

छान लिहिलंय
शहराला सिंगापूर बनवायचं तर तेवढी काळ सोसायलाच हवी. >>> काळ च्या ऐवजी कळ करा Happy

थोड्याफार फरकाने आयटी नोकरदार वर्ग हा म्हातारी सारखाच आहे. तो जे काम काल करत होता ते काम आज मशिन्स करत आहेत आणि त्याला सतत नवीन काहीतरी शिकावं लागतंय दुसऱ्या कामाला लायक होण्यासाठी... ही सायकल चालूच रहाते अनंत काळासाठी...

रच्याकने, सिंगापूर मध्ये रिटायरमेंट नावाचा प्रकार नसतो... आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत ती कमवत असतात (किंवा कमवावं लागतं).