वो शामे कुछ अजीब थी

Submitted by Mukund Ingale on 8 May, 2020 - 04:27

evening 2.jpg
वो शामे कुछ अजीब थी – हुबळी
मी रोज ज्या थांब्यावर किंवा त्याच्या थोडे पुढे उतरायचो त्याचे नाव होते बैरीदेवारकोप्पा आणि उच्चार भैरी कोप्पा.एक पुरातन साधेसे पण सुंदर मंदिर आहे. रोज त्याच्या पुढच्या “मसजिद” जवळ उतरायचो आणि परतताना मात्र बससाठी या मंदिरासमोरच्या थांब्यावर यावे लागायचे.रोजच्या सकाळच्या घाईत मनात असुन देखिल मंदिरात जाता नव्हते येत. पण तो प्रश्न जणु जातानाच्या साडे सहाच्या आसपासच्या वेळेने सोडवला होता. नेमका संधी प्रकाशाच्या वेळेस मी चालत त्या आमच्या प्रशिक्षण संस्थेपासुन निघायचो आणि भैरी कोप्पाच्या समोरच्या बाजुला बससाठी “म्हणुन” उभा रहायचो. कदाचित तो तिथला उंचीवरचा भाग असावा. मागच्या बाजुला काही लालसर तर मंदिरावर झेपावलेली सोनपिवळी परतणारी किरणे. कधी निरभ्र तर कधी ढगांच्या आडुन. अहाहा काय दृष्य असायचे आणि दिसायचे ते.
रस्त्यावरची रहदारी सुरुच. हुबळी धारवाड एक्स्प्रेस बस वहातुक सुद्धा जोरात. खाजगी गाड्या, ट्रक सगळं काही आपापल्या धुंदीत. माझ्या मागे असलेल्या देशी दारुच्या दुकानातील गिर्‍हाईकांसकट. सर्व काही सुरुच असायचं,
त्याच वेळी कधीतरी मंदिरातले दिवे प्रकाशु लागायचे. प्रकाश तोच.. पण एका ठिकाणी निवणारा तर दुसरीकडे तेवणारा. माझं मन मात्र अडकलेलं असायचं त्या सांजवेळेत. त्या आभेत. असं काही उजळुन निघायचं आकाश. समोर मंदिर आणि त्यामागे उगवलेलं मावळतीच्या रंगांचं गारुड. मला असं वाटायला लागलं की ट्रेनिंग हे तर निमित्त आहे. देवाने त्याचे हे वैभव मला दाखवण्यासाठी तो उपद्व्याप केला असावा.
निवांत निवलेल्या मनाने हा निसर्ग सोहळा पहाण्यात मग्न असतानाच अलगद सुंदर अंधार दाटुन यायचा . रंगमंचावरील दिवे ठरवुन विझवावे तसे एकेक रंग परतु लागायचे. एका अलौकीक सोहळ्याचे सौंदर्यमय झालेले दर्शन अनुभवत मी पण परतायचो ते सगळं मनात साठवत.. पुन्हा पुन्हा आठवत.
मुकुंद इंगळे
9323611034
evening 1.jpg

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

छान लिहीलंय. फोटोंमुळे अजून परिणामकारक वाटतंय.