आवडते का बदाम राणी?

Submitted by निशिकांत on 1 May, 2020 - 00:08

फ्यूजन होता परक्या स्त्रीशी
भावतात का ओंगळ गाणी?
स्त्रीलंपट चौकट राजाला
आवडते का बदाम राणी?

संकटातही देत साथ ती
प्रपंचामधे राबराबते
प्रेम एवढे ! वटपूजेला
सातजन्म ती साथ मागते
घरकी मुर्गी दाल बराबर
म्हणून का तिजशी बेमानी
स्त्रीलंपट चौकट राजाला
आवडते का बदाम राणी?

नका विचारू कोणाच्या तो
वळणावरती चालत आहे?
शोध सावजांचा घेण्याची
जुनी पुरानी आदत आहे
फुले हुंगणे, वडिलोपार्जित
गूण उतरलाय खानदानी
स्त्रीलंपट चौकट राजाला
आवडते का बदाम राणी?

मुलगी किंवा नात वयाने
मनी नांदतो चंचल पारा
विकृतीच ही ! कुठे मिळावा?
सावजास या जगी सहारा
धोका टाळुन जगावयाची
ससेहोलपट केविलवाणी
स्त्रीलंपट चौकट राजाला
आवडते का बदाम राणी?

आरक्षित हे क्षेत्र नसावे
पुरषांसाठी असे वाटते
स्त्रीही आता मागे नाही
चित्र भयावह उरी दाटते
मादक राणी, गुलाम दिसता
शिंपित असते गुलाबपाणी
स्त्रीलंपट चौकट राजाला
आवडते का बदाम राणी?

निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३

Group content visibility: 
Public - accessible to all site users