तरही - तिला माहीत नाही की मला माहीत आहे ती

Submitted by सुप्रिया जाधव. on 29 April, 2020 - 18:08

ओळीसाठी बेफिकीरजी ह्यांचे आभार मानून..

तिच्या नकळत जडवलेली तुझ्यावर प्रीत आहे ती
तिला माहीत नाही की मला माहीत आहे ती

कितीदा प्रश्न पडला जायचे का मीच नांदाया ?
सदा उत्तर मिळाले फक्त की, जनरीत आहे ती

तिच्यावाचून घरपण लाभणे नाही घरा-दारा !
तरी म्हणतात की दोन्ही घरी आश्रीत आहे ती

तिला शिकवाल तर येत्या पिढ्या होतीलही साक्षर
तुम्ही पेराल जे जे, तेच तर उगवीत आहे ती

जरासे पिंजऱ्याचे दार हे उघडाल का कोणी ?
उडू बघतेय स्वच्छंदी जरी भयभीत आहे ती

अहिल्या, जानकी, मंदोदरी, कुंती कुणी कृष्णा
तिला उ:शाप द्या, जन्मांतरी शापीत आहे ती

तुला जर वाटते आहे तिने व्हावे तुझे कायम
तिलाही सांग आवर्जून की मनमीत आहे ती

सुप्रिया मिलिंद जाधव

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाह