शोखियोंमें घोला जाये फूलों का शबाब...

Submitted by अतुल ठाकुर on 24 April, 2020 - 21:45

download_2.jpg

देव साहेब गोल्डीच्या दिग्दर्शनाखाली काम करायचे तेव्हा त्या चित्रपटांचा आणि गाण्यांचा दर्जा फार वेगळा होता असे मला प्रामाणिकपणे वाटते. त्यानंतर सबकुछ देव आनंद होऊ लागले. १९७० साली आलेल्या "प्रेम पुजारी" चित्रपटात तर देवसाहेब नायक, लेखक, निर्माता आणि दिग्दर्शकही आहेत. अशावेळी जेव्हा संगीताची बाजु एसडी सारखा कसलेला संगीत दिग्दर्शक सांभाळतो आणि गीतं ही गोपालदास सक्सेना "नीरज" कवीकडून लिहून घेतली जातात तेव्हा एक तर्‍हेचे असंतूलन निर्माण होते. गीत, संगीत अत्युच्च प्रतीचे आणि त्यामानाने दिग्दर्शन त्या पातळीवर न पोहोचणारे. "प्रेम पुजारी" पाहताना हे वारंवार जाणवते. यातील काही गाणी ही त्या गायकाच्या कार्किर्दीतील मैलाचा दगड ठरलेली आहेत. किशोरच्या गाण्यांमध्ये "फूलों के रंग से" टाळता येईल का? खुद्द एस्डी ने गायलेल्या गाण्यांत " प्रेम के पुजारी हम है रस के भिखारी" याचा उल्लेख करावाच लागेल. लताचे "रंगीला रे" तर ग्रेटच आहे. पण हे सर्व डोक्यात ठेवून आपण गाणं जर पाहायला घेतलं तर फारसं काही पदरी पडत नाही.

वहिदा आणि देव आनंद एका ठिकाणी शंभर मीटर धावण्याच्या शर्यतीत भाग घेतल्यासारखे धावताना दिसतात. या दृष्यात एका ठिकाणी चक्क वहिदा धडपडताना दिसते तरीही हा सीन तसाच ठेवलेला आहे. इतकं धावूनही कुणाला धाप लागलेली नाही. गाणे सुरेल आवाजात सुरुच आहे. इतक्या तरल गाण्याच्या सुरुवातीलाच चमकिल्या मजबूत दातांची जाहिरात केल्याच्या थाटात वहिदा उसाचे कांडे काडकन फोडून खाताना दाखवली आहे. कशासाठी? ठावूक नाही. कपड्याच्या दुकानात जाऊन एकाच तागाने दोघांचे ड्रेस शिवले असावेत इतके ते एकाच लालजर्द भडक रंगाचे आहेत. त्या रंगाचाही डोळ्यांना त्रासच होतो. गवताच्या पेंढ्या असलेले लोकेशनही वायाच घालवले आहे. त्यातून चमकदार असे काही केलेले नाही. एका ठिकाणी मात्र सुरेख संधी होती. अलिकडे काय चूंबन सरळ सरळ दाखवले जाते. पण या गाण्यात ती एक जागा आहे. पण तेथेही देवसाहेब फारसे काही करु शकलेले नाहीत. सरधोपट, आग आणि खळाळते पाणी दाखवले आहे. पण येथे एसडी आणि किशोरने मात्र कमाल केली आहे.

आणि नेमके याचसाठी हे गाणे जबरदस्त झाले आहे.

चुंबन घेण्याच्या क्षणी "वो प्यार..." असे म्हणून किशोरने सार्‍या उत्कट भावना आवाजात आणून ती ओळ अर्धवट सोडली आहे. आणि पुढे एसडीने कमाल करीत सूचक म्युझिक पीसचा वापर केला आहे. ही एकच जागा काही क्षणांसाठी पाहण्याजोगी. कारण वहिदा मचाणावरून खाली वाकलेली असते आणि नायक खालून येतो.....

बाकी वहीदासारखे सौंदर्य असले म्हणजे बर्‍याच गोष्टी सुसह्य होतात हे देखिल तितकेच खरे. पडद्यावर वहीदा म्हणजे निव्वळ नेत्रसूख. देवसाहेबांची मान हलण्यास सुरुवात झालेला तो काळ. त्यांनी फार काही केलेलं नाही. येथे विजय आनंद असता तर बहार आली असती असं वाटत राहतं. त्याने देव आनंदकडून काहीतरी वेगळं करून घेतलं असतं. गाण्यात खरी केमिस्ट्री रंगलेली आहे ती लता आणि किशोर यांचीच.

पडद्यामागील गायक गायिकांची केमिस्ट्री ही पडद्यावरील नायक नायिकांच्या केमिस्ट्रीइतकीच महत्त्वाची गोष्ट असते ही बाब हे गाणं अगदी अधोरेखित करतं. लताचा प्रेयसीचा, प्रीतीने भरलेला, तरल, कोवळा आवाज. काहीसा अवखळ आणि खेळकरही. लता म्हटल्यावर किती लिहू आणि किती नको असं होऊन जातं. स्त्रीच्या या बारीक सारीक भावना लताच आवाजात पकडू जाणे. आणि किशोरने देवाअनंद बनूनच गायिलेलं गीत याच या गाण्याच्या भरभक्कम बाजु. सुरुवातीलाच नीरजजी प्रेमाची रेसिपी सांगतात. प्रेम काय आहे?

शोखियों में घोला जाये, फूलों का शबाब
उसमें फिर मिलाई जाये, थोड़ी सी शराब
होगा यूं नशा जो तैयार, वो प्यार है

बस हेच खरं. काव्याचा आस्वाद घ्या, गाण्यातील संगीताचा आस्वाद घ्या. आणि गायक गायिकेतील सुरेख केमिस्ट्री अनुभवा. काही एका जागेसाठी गाणे पाहायलाही हरकत नाही. कारण गाण्यात वहीदा असली कि आपले लक्ष तिच्याकडेच असते. निदान माझे तरी...

अतुल ठाकुर

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझे पण फेवरिट गाणे. अत्तर शास्त्रा मध्ये फ्लोरल बुके नावाचा एक प्रकार असतो अत्तरांचा म्हणजे वास घेतला की अनेक सुवासिक फुलांचा घमघमाट येतो. व मन प्रसन्न प्रसन्न होउन जाते. तसे एस डी ने ह्या गाण्यात सर्व प्रस्न्न करणारे सुर एक जब्रदस्त कंपोझिशन मध्ये एकत्र आणले आहेत. त्यात लता व किशोर. किशोर असल्याने एक प्रकारचा अवखळ व बेदरकार पणा आहे. तुम्ही बघा रिलेशन शिप सुरुवातीची मस्ती खोर गाणी किशोरची छान असतात. कमिट मेंट झाली की जो गोड्वा आहे त्या फेज मधली रफीची बेस्ट गाणी आहेत. वियोग किंवा ब्रेक अप झाला कि अनुक्रमे तलत. ( जेन्युइन ग्री फ तरल दु:ख ) मन्ना डे( कमिंग टु टर्म्स विथ लाइफ) मुकेश ( अगदी कलेजा फाडु दु:ख व कायमचा वियोग. अशी गाण्यांची रचना बेस्ट उतरते. स्त्रियेची मनःस्थिती दाखवायला लता एकटीच समर्थ आहे.

ह्या गाण्यात वाद्य वृन्द पण मस्त वापरला आहे. हसता हु वा मौसमहो लाइनच्या नंतर एक बारका सतार चा पीस एक दम सुरेख आहे. वहिदा एकदम सुंदर हैद्राबादी ब्यु टी. मचाणाव र एका अंगावर पहुडलेली असताना तिचे नाक जरुर बघा. आताचा कोण ताही प्लास्टिक सर्जन असे ना क देउ शकणार नाही.

अहो आणी लाल रंग हे पॅशन चे प्रतीक आहे. जीवने च्छेचे, प्रेमाचे. फक्त तो ड्रेस खूपच टाइट आहे. व हील्स!!! घालुन शेतात पळायचे काम आपल्य हिंदी हिरविणीच करु जाणे.

तुम्ही बघा रिलेशन शिप सुरुवातीची मस्ती खोर गाणी किशोरची छान असतात. कमिट मेंट झाली की जो गोड्वा आहे त्या फेज मधली रफीची बेस्ट गाणी आहेत. वियोग किंवा ब्रेक अप झाला कि अनुक्रमे तलत. ( जेन्युइन ग्री फ तरल दु:ख ) मन्ना डे( कमिंग टु टर्म्स विथ लाइफ) मुकेश ( अगदी कलेजा फाडु दु:ख व कायमचा वियोग. अशी गाण्यांची रचना बेस्ट उतरते. स्त्रियेची मनःस्थिती दाखवायला लता एकटीच समर्थ आहे.
क्या बात है अमा Happy फार फार सुरेख लिहिलेत !

लेख आवडला.

अमांचे निरिक्षण रोचक आणि अचूक

हे वाचून आज यू ट्युब वर बघितले.
सध्या टीव्ही चॅनेल वर काही ही नवीन नसल्याने यू ट्युब टीव्ही स्क्रीन वर दिसण्याच्या सुविधेचा खूपच मोठा फायदा होत आहे.
वर लिहिलेलं अक्षरन अक्षर पटलं. हे माझं पण खूप आवडतं गाण आहे.

छान लेख! गाणं आवडतं आहेच. बरीचशी जुनी गाणी ऐकूनच माहिती असतात त्यातलच हे एक.
अमा, लाजवाब प्रतिसाद!

मस्त नेहमीप्रमाणे!
अमा, तुमचाही प्रतिसाद आवडला.
यातली सगळीच गाणी सुंदर आहेत. फूलों के रंग से हे गाणं तर मला प्रचंड आवडतं. पण ते बघितल्यावर अक्षरशः पश्चात्ताप झाला होता. शोखियों में ची ओळख थोडी उशिरा झाली. इतकं गोड गाणं आहे हे! काव्यही सुंदर आहे दोन्ही गाण्यांचं.

हे माझेही आवडते गाणे , तिचा तो लाल ड्रेस काय सुंदर दिसायची आणि हावभाव मस्तच. तिच्या चेहऱ्यावर हुशारीची आणि आत्मविश्वासाची एक झाक आहे त्यामुळे ती अधिकच आकर्षक वाटायची.
गाणे अत्यंत रोमँटिक गाण्यापैकी एक...अवीट गोडवा असलेले आणि रिफ्रेशींग.
लेख आवडला .
असेच
तेरे मेरे सपने अब एक रंग है
जहां भी ले जाये रांहे हम संग है
-गाईड यावरही लेख येऊ द्या. Happy

वाचायला सुरवात केल्यावर पहिले वाक्यच इतके आवडले की पुढचा लेख अगदी अक्षर न अक्षर पटला.... प्रेमपूजारीची गाणी फक्त परत परत ऐकायची.. एकदा पाहिली तरी मानसिक शीण येतो. त्यामुळे हे गाणे पाहिल्याचे आठवतच नव्हते. आता बघितले आणि लाल रंगाचा तागा बहुतेक नको म्हणून टाकून दिला व याने उचलला असेच वाटले तो रंग बघून....

रंगीला रे..... गाण्यात वहिदाला इतक्या विचित्र स्टेप्स दिल्यात की आपल्यालाच बघून अवघडल्यासारखे वाटते... खरेच गोल्डी मायनस देव म्हणजे खड्ड्यात घातलेल्या अनेकोनेक उत्तम संधी. प्रेमपुजारीची गाण्यातील एसडीचा अफलातून ऑर्केस्ट्रा ऐकताना माझ्या डोळ्यासमोर 'पिया तोसे...' ची भव्यता दिसत राहते.... आणि ती जादू परत परत बघायला मिळायची संधी देवने आपल्यापासून हिरावली याचे वाईट वाटत राहते.

अमा, तुमचे निरीक्षण आवडले. लता ती लताच... कितीही टीका केली तरी त्या तोडीची गुणवत्ता कोणाच्याही अंगी कधीही नव्हती.

साधना, अमासारखेच तुमचेही निरिक्षण अचूक.
प्रेमपूजारीची गाणी फक्त परत परत ऐकायची.. एकदा पाहिली तरी मानसिक शीण येतो.
अक्षरशः खरे आहे.

रंगीला रे..... गाण्यात वहिदाला इतक्या विचित्र स्टेप्स दिल्यात की आपल्यालाच बघून अवघडल्यासारखे वाटते... खरेच गोल्डी मायनस देव म्हणजे खड्ड्यात घातलेल्या अनेकोनेक उत्तम संधी. प्रेमपुजारीची गाण्यातील एसडीचा अफलातून ऑर्केस्ट्रा ऐकताना माझ्या डोळ्यासमोर 'पिया तोसे...' ची भव्यता दिसत राहते.... आणि ती जादू परत परत बघायला मिळायची संधी देवने आपल्यापासून हिरावली याचे वाईट वाटत राहते.

शब्दनशब्द पटला.

आदिश्री , मन्या ऽ , वावे , जिज्ञासा , मनीमोहोर , हर्पेन, Filmy
प्रतिसादाबद्दल खुप खुप आभार Happy

प्रेमपूजारीची गाणी फक्त परत परत ऐकायची.. एकदा पाहिली तरी मानसिक शीण येतो.
>>> अरे पण का? शोखियों चे पिक्चरायझेशन मस्तय की ... लाल लाल मस्त वाटतेय..
आणि वहिदा ऊस खातेय... अल्लड तरुणी ...

ते असं अस्तंय. की दोन लोक प्रेमी असतात. त्यांच्या मनात शरीरात पॅशन प्रेम धडाडुन असते पण बाहेरची परिस्थिती एकदम बेकार कोरडी असते. तुम्ही केव्हाबी बघा प्रेमगीता मध्ये कधी कधीच बहार हिरवळ असते. व तेव्हा साधारण प्रेमी जोडप्याला फार त्रास भोगावा लागत नाही. अर्थात ह्याला अपवाद असतातच. पण उदा हरणार्थ सुरज हुवा मध्यम हे कभी खुशी कभी गम मघले गाणे बघा. किंवा गजनीतले आमिर व प्रेयसीचे गाणे. बाकीचा सराउंडिं ग एकदम कोरडे सुके रणरणती उन्हे, मिठाचे डोंगर हे प्रेम सफल व्हायला फार त्रास होतो किंवा होतच नही.

तुम्ही देखो ना हे पण गाणे बघा कभी अलविदा ना कहना मधले. अफेअर अस णा रे दोघे जण आहेत त्यांचे विश्व एकदम रंगीत पण बाकीचे ब्लॅक एंड व्हाइट दाखवले आहे. जोडपे प्रेमात असल्याने त्यांना बाहेरचे सर्व सुहाने वाटते. पन प्रेम असफल झाले की बहार, पैशांच्या राशी पण अर्थ
हीन वाटतात. उदा दिन ढल जाये हाये रात न जाये. गाइड.

गाइडच्या गाण्यांवर एक मालिका लिहा अतुलजी.

छान लिहीले आहे. पहिल्या वाक्याशी तर एकदम सहमत. देव आनंदची गाणी पाहताना काही गाणी अत्यंत चांगली सादर केलेली, तर काही एकदम कॉमेडी असे का असायचे ते त्याचे दिग्दर्शन कोणाचे आहे हे कळू लागल्यावर समजले.

माझे ऑटाफे गाणे आहे हे. हे बघायलाही तितके वाईट नाही. पण या जोडीचे 'गाता रहे मेरा दिल' पाहिले की दिग्दर्शनातील फरक लक्षात येतो. जरी त्यातली कॅरेक्टर प्रगल्भ असल्याने त्यांचे वागणे अतिशय डिग्निफाइड असले, तरी असे वाटते की शोखियोंमे घोला जाये गाणे जर विजय आनंदने केले असते तर आणखी सुरेख असले असते. अर्थात गाइड ५ वर्षे आधीचा असल्याने हे दोघेही आणखी तरूण होते.

'फेसलेस' गोरे चेहरे आपल्या गाण्यांत घ्यायची खोड देव आनंदला या चित्रपटापासूनच लागली असावी. नंतर अनेक गाण्यांत आहे असले पब्लिक.

अमा - तुमचे गायकांचे निरीक्षण इन्टरेस्टिंग आहे. ते सगळे पटले असे नाही - पण वाचल्यापासून अनेक गाणी डोक्यात येउन ते "व्हॅलिडेट" करतोय Happy पूर्वी गायकांच्या आवाजात 'दर्द' असणे सक्तीचे असावे. किशोरची अनेक आनंदी गाणी अशी आहेत की ती निखळ हॅपी आहेत. त्यात दर्द बिर्द उगाचच आणलेला नाही. हे तसेच. यात किशोर "जैसे बजे धुन कोई" मधला धुन शब्द जसा म्हणतो ती अस्सल किशोर स्टाइल आहे. ती ओळ, पहिल्या कडव्यात लताने 'हसता हुआ बचपन वो' म्हणण्याच्या आधीचे व नंतरचे संगीत व एकूणच तो पूर्ण गाणे ऐकू येणारा ठेका - सगळेच अप्रतिम आहे.

बाय द वे वहिदाचे नाक बघायला आवर्जून तो सीन चेक केला Happy आणि अमांच्या वाक्याला 'टोटली'!

तुमचे गायकांचे निरीक्षण इन्टरेस्टिंग आहे. >> त्या सर्व गायकांनी सर्व प्रकारची गाणी गायली आहेतच. पण त्या मी सांगितलेल्या कॅटेगरीतली गाणी ते जास्त खुलुन गातात.
प्रेम हळू हळू बसत जाते. थोडा प्यार थोडी शरारत.
किशोरः कोरा कागज था ये मन मेरा, मेरे सपनों की रानी, झाल्यावर गुन गुना रहे है भवर रफी. पण मग पुढे रुप तेरा मस्ताना हे रफी च्या आवाजात ऐकणे अवघ ड गेले असते.

माना जनाब ने पुकारा नही , दाग सिनेमातील गाणी. आप की कसम मधील सुरवाती ची गाणी, करवटे बदल ते रहें सारी रात हम. दुर नही जाना पास नही आना. वगैरे. ( पण ह्यात जिंदगी के सफर में पण आहे. वन ऑफ द ग्रेटेस्ट किशोर सॉन्ग्ज. ) छुकर मेरे मन को.

रिले शन शिप सेट झाली आहे.
रफी:
अजि किबला मोह तरमा. * ह्यात ती रागवलेली आहे मात्र
गाता रहे मेरा दिल
तेरे मेरे सपने अब एक रंग है
अजहु न आये बालमा सावन बीता जाये.
जीवन में पिया तेरा साथ रहे.
तेरा जलवा जिसने देख वो तेरा हो गया.
द ट्रेन सिनेमा मधील गाणी.

हम किसीसे कम नही सिनेमात जी काँ पिटीशन आहे त्यातही किशोर रफी आर डी , तीन आवाज आहेत. पण हम को तो यारा तेरी यारी ला किशोर आहे व हम किसीसे कम नही कव्वालीत रफी आहे.
अनेकानेक गोड युगल गीते.

तरल पण गहिरे दु:खः सीने मे सुलगते है अरमां आय रेस्ट माय केस. तलत.

मन्ना डे, हेमंत कुमार, एस्डी खुद्द हे एक स्पेसिफिक मेलन्कोली मूड एकटेपणा खूप स्पेक्ट्रम आहे हो इथे

मुकेश म्हणजे खरेतर दु:ख व एकटे पणाचा:

सबकुछ सीखा हमने न सीखी दुनियादारी,
मुबारक हो तुमको समा ये सुहाना मै तो दीवाना दीवाना
चल अकेला चल अकेला.
जिस गली मे तेरा घर न हो बालमा
मै ना भूलुंगा सॅड व्हर्जन. ह्याची हॅपी व्हर्जन इतकी मस्त आहे की ये तो टुटेगा जी ये तो टु टे गा असे सारखे वाटत राहते.
अल्टिमेट एकटे पणाचाआ गाभा म्हणजे जीना यहां मरना यहा. आणि व जाने कहां गये वो दिन. मी पण ही दोन गाणी फार ऐकू शकत नाही.

या गाण्यातल्या 'याद अगर वो आये' या ओळीतल्या किशोरकुमारच्या आवाजात कसला हळुवारपणा आहे! आणि फूलों के रंग से मधल्या 'याद तू आये मन हो जाये भीड के बीच अकेला' यातल्या 'याद' मधे विरहाची वेदना आहे!

धागा मस्त, आणि प्रतिसादही मस्त..
कालच यावर वडिलांचं आणि माझं थोडं डिस्कशन चालू होतं. त्यातील काही पॉईंट असे.
१) किशोर कुमारला कायम तडकते फडकतेचगाणे सूट झाले. शांत लयीत गाणे हा त्याचा प्रांत नव्हे, तो तिथे असहज होतो.
२) रफी किशोरपेक्षा संपूर्ण विरुद्ध. अतिशय शांत, दर्दभरे, रोमँटिक आणि चरित्रात्मक गाणे चांगले गाऊ शकतात.
३) मुकेश बारश्याचाही कार्यक्रमाला प्रेतकळा आणू शकतो.
४) मन्ना डे यांची रेंज लिमिटेड होती, मात्र त्यातही त्यांनी छान काम केलं.
५) लताबाईंचा आवाज गोड होता, पण नंतर चिरकत गेला. याउप्पर आशाबाईनी वाटेल ते गाणं गायलं, आणि कायम पट्टटीत राहिल्या.

किशोर फक्त तडकती फडकती नाही- सर्व गाणी उत्तम गायचे...
काही शांत गाणी मला आठवतात ती -
दिल ऐसा किसिने मेरा तोडा...
जिंदगी के सफर मे गुजर जाते हैं जो मकाम ...
कोई होता जिसको अपना ...
मेरे मेहबूब कयामत होगी...
मंझिले अपनी jagah है
मै शायर बदनाम...

श्री गोपालदास 'नीरज' याना प्रत्यक्ष ऐकण्याची व पहाण्याची सुवर्णसंधी मला चार वर्षांपूर्वी भारतीय प्रॉउद्योगिकी संस्थान रुरकी मध्ये मिळाली होती. फार थोर माणूस. तेव्हा ते 85 च्या पुढे होते.

Submitted by च्रप्स on 27 April, 2020 - 00:17>> +१
अजून म्हणजे फिर वही रात है,
वो शाम कुछ अजीब थी,
तुम बिन जाउं कहाँँ
बरीच आहेत.

मला वाटते आपण गायकांना जरा जास्तच श्रेय देतो. खरे श्रेय संगीतकाराचे असायला हवे. एखादी चाल सुचणे, ती योग्य त्या गायकाकडून गाऊन घेणे, योग्य ती वाद्ये वाजवून तो इफेक्ट निर्माण करणे, त्याकरता प्रतिभावान अरेन्जर नेमणे हे सगळे संगीतकार करतो. एका प्रसिद्ध संगीतकाराचे असे विधान प्रसिद्ध आहे की गायक हा संगीतकाराकरता एका वाद्यासारखाच असतो. सगळ्या गाण्यावर प्रभाव पाडेल असे प्रमुख वाद्य पण वाद्यच.

त्यामुळे एखादे गाणे किशोरकुमारने असे गायले आहे ते रफीला जमले असते का हा प्रश्न चुकीचा आहे. जाणकार संगीतकाराने चाल लावतानाच
प्रसंग काय, गायक कुठला असावा ह्याचा विचार करूनच चाल बनवलेली असते असे मला वाटते.

(सत्तरीच्या दशकात एस डी बर्मन आजारी असायचे आणि अनेकदा त्यांचे नाव असले तरी चाल आर डी बर्मनची असायची. ह्या सिनेमातही तसे झाले असेल का?)

मस्तच. माझं आवडतं गाणं.

प्रतिसाद वाचते सावकाश. वाचनीय दिसतायेत.

किशोर कुमारला कायम तडकते फडकतेचगाणे सूट झाले. शांत लयीत गाणे हा त्याचा प्रांत नव्हे, तो तिथे असहज होतो.
असहमत. गुलजार, आरडी आणि किशोर हे काँबिनेशन या विधानाला सणसणीत अपवाद आहे.
शिवाय त्या आधीही...
१. कोई हमदम न रहा
२. हवाओंपे लिख दो हवाओं के नाम
३. थंडी हवा ये चांदनी सुहानी
४. सवेरे का सूरज तुम्हारे लिये है
५. दिल आज शायर है
६. अजनबी तुम जाने पहचाने से लगते हो
७. कोई होता जिसको अपना
अशी खुप खुप आहेत. ही फक्त वानगीदाखल दिलीत.

Pages