कुसुम 1

Submitted by अमृताक्षर on 19 April, 2020 - 06:57

'हे सगळ कसं घडल..?'
दिनेश च्या या प्रश्नाने उषाला गहिवरून आल. रडत रडतच तिने सगळा वृत्तांत आपल्या भावाला सांगितला..
'भाऊ, त्याले लय आभ्यास कराच भूत लागलं हाय. वावरात जाऊन दिवसरात काईबाई वाचत रायत पोरगं, काल लय वावटूळ आलंत याले म्हणलं आज नग जाऊस पण ऐकन कोण म्हाय..सांच्याले लवकर घरला यीतो सांगून ह्यो गेलाच वावरात..पावसा पाण्याचं रात्री स्तोवर कोणच वावराकड गेलं नाय..दिस डूबला तरी बी पोरगं घरी आल नाय म्हणून म्या गेलती वावराकड त ह्यो असा गपगार पडला व्हूता बांधावर..पायावर सर्पाचा डुक होता म्या भीतीनं तिथच बसून राह्यली दवाखान्या मंदी न्यायले बी कुनि नव्हत पाणी लय मरणाचं पडत व्हत अन् याचा बाप बी दारू ढोसून कुट पडला व्हता माईत नाय.. देवाले कुटून मायी दया आली अन् घराकड जाणारा पाटलाचा सुल्या दिसला त्याले थांबिवल अन् तुले फोन केला..तू नस्ता आला त आमी माय लेक तीतच मेलो अस्तो तूनच ह्याची जिंदगी वाचवली हाय..म्हाया पोरगा तुयाच हाय आता..'
आपल्या मनातल सगळ भावाजवळ बोलून उषाने पोट भरून रडून घेतलं..आज तिचा सोन्यासारखा पोरगा मरता मरता वाचला होता..बारा वर्षाच्या फाटक्या संसारात तिला चार पोर झाली होती पण छगन वर तिचा जीव काकणभर जास्तच होता..त्याला कारण ही तसच होत..छगन सगळ्या भावंडात मोठा आणि समजूतदार होता. घरची आणि शेतातली जमेल तेवढी सगळी कामं करून तो उरलेल्या वेळात अभ्यास करायचा..सदा न कदा पिऊन पडलेल्या आपल्या बापाकडे पाहून, खूप शिकून मामासारख मोठं व्हायचा त्याचा निर्धार अजून पक्का व्हायचा..त्याच्या लहान भावंडावर तो बापाची माया करायचा..उषा ला त्याच अपार कौतुक वाटायचं.
रमेश आणि सुमन च्या लग्नात आपल्या पोरीचा थाट पाहून गोपिबाई चे डोळे दिपले होते..नुकतीच लग्न झालेली, अंगावर सोन नान घातलेली ही काळी सावळी पोर आपलीच उषा आहे यावर तिचा विश्र्वासच बसत नव्हता आपल्या पोरीला आपलीच नजर लागेल म्हणून चार पाच वेळा तिने उषा अन् संजयची नजर काढली होती पण लागायची ती नजर त्यांच्या संसाराला लागूनच गेली आणि त्यांचे सुखाचे दिवस पालटले..
किसण्यान उषाच लग्न लाऊन दिलं तेव्हा तिच्या सासरची परिस्थिती चांगली होती. घरी पाच एकर शेती होती. गुर ढोर होती..डोक्यावर छप्पर आणि दोन टाइम वेळेवर खायला भेटत होत..संजयला हळूहळू दारूचा नाद लागला आणि त्यातच सगळी शेतीवाडी गेली. गरिबी दिवसेंदिवस वाढत होती आणि सोबतच खाणारी तोंड सुद्धा..उषा गरीब असली तरी स्वाभिमानी होती तिने कधीच माहेरची मदत मागितली नाही.. दुसऱ्यांच्या शेतात मजुरी करून आपला संसार ती सांभाळत होती.. आपल्या बहिणीच दुःख पाहून दिनेशच मन द्रवायच त्याने खूप वेळा संजयला व्यसनमुक्ती केंद्रात दाखल केलं त्याला समजावून सांगितलं पण प्रत्येक वेळी उलट्या घड्यावर पाणी वाहायच आणि परिस्थिती आहे तशीच राहायची.
आदल्या रात्री उषाचा फोन आला तेव्हा दिनेश त्या दोघांना रातोरात तालुक्याला घेऊन आला..छगनला दवाखान्यात भरती करून सकाळपर्यंत तो तिथेच थांबला होता. उषा रात्रभर एकही शब्द बोलली नव्हती तिचे डोळे मात्र निरंतर वाहत होते..
सकाळी छगन शुद्धीवर आला तेव्हाच तिने धीर करून कालची सगळी कहाणी दिनेशला सांगितली होती..ते सगळ ऐकून आपल्या बहिणीला त्या नरकात वापस पाठवायची दिनेशची अजिबात इच्छा नव्हती. बाहेर बाकड्यावर खूप वेळ विचार करत तो बसला होता चहाच्या वाफे बरोबर एक नवा विचार त्याच्या डोक्यात यायचा आणि तसाच हवेत विरून जायचा..
चहा संपला तसा स्वतःशीच काहीतरी निर्धार करून तो उठला..दवाखान्याच्या जनरल वॉर्डात आला..एक वेळ छगन जवळ बसलेल्या उषावर नजर टाकून त्याने अस्मिताचा नंबर डायल केला..
'मी ताई आणि छगन ला घेऊन घरी येतोय..आजपासून ते आपल्या सोबतच राहतील..चालेल ना तुला?'
अस्मिताच उत्तर त्याला माहीतच होत..त्याच्याशिवाय जास्त चांगलं तिला कोण ओळखणार होत..शेवटी त्याची लाडकी बायको होती ती..
(क्रमशः)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users