कुसुम

Submitted by अमृताक्षर on 18 April, 2020 - 10:27

'काका, तुमाले लवकर घराकड बोलवत हाये, सुमन काकीच्या पोटामधी लय दुकतय..'
मागच्या गल्लीतला लहानगा शेंडी धापा टाकत सांगत होता. त्याच बोलणं संपायच्या आधीच रमेश ने हातातला विळा बाजूला टाकला, खांद्यावरच्या उपरण्याने कपाळावरचा घाम टिपला आणि लगबगीनं अनवाणीच घराची वाट चालू लागला..सुमन त्याची पहिली बायको होती. 'यावेळी काय असेल आपल्या नशिबात' या काळजीने कधी एकदा घरी पोहचतो अस त्याला झालं होत आणि तो झपाझप पावलं टाकत निघाला होता. त्याच्या मागून एका हाताने चड्डी सावरत शेंडी धावत होता..
चालता चालता त्याचा भूतकाळ चित्रपटासारखा त्याच्या डोळ्यासमोरून तरळून जात होता..
मोखी या हजारेक लोकसंख्या असणाऱ्या लहानशा गावात त्याच कुटुंब कित्येक पिढ्यांपासून राहत होत. सगळ गाव म्हणजे एकच परिवारासारखा एक समूह होता..आपला पूर्वज एकच या भावनेने कुणाचं दुःखल खुपल की गावातील लोक एकमेकांच्या मदतीला धाऊन येत..कुणाच्या घरी लग्न वा तत्सम काही कार्य असेल तर सगळ गाव मिळून ती जबाबदारी आपणहून घेत आणि आनंदाने तो सोहळा पार पाडत..
रमेशच्या घरची परिस्थिती अत्यंत बेताची व खाणारी तोंडे जास्त असल्याने बुद्धीने तल्लख असून सुद्धा जेमतेम बारावी शिकून रमेश ने शाळा सोडली होती. त्याचा मोठा भाऊ दिनेश तालुक्याच्या ठिकाणी राहून पडेल ते काम करून, सरकारी स्कॉलरशिप मिळवून जमेल तस स्वतःच मास्तर होण्याचं स्वप्न पूर्ण करत होता.
मागे कधीतरी दिवाळीला दिनेश घरी आला तेव्हा कीसण्यान त्याच्या मागे लग्नाचा धसासा लावला होता.
'तूही माय आता थकून गेली हाय, तीले काम होत नाय, तूय लगन झालं का आमाले काही घोर नाय मंग तू शिखत बस किती बी..'
पण दिनेश कशालाच बधला नाही त्याला शिकून मास्तर व्हायचं होत आणि एकदा का लग्नाच्या बेड्यात अडकलो तर बाप आपल शिक्षण बंद करून शेती करायला लावेल याची त्याला पुरेपूर खात्री होती म्हणून त्याने रात्री जेवण उरकल्यावर हळूच आईजवळ शेवटचं सांगून दिलं होत की इतक्यात माझा लग्नाचा काही विचार नाही तुम्ही रमेशच उरकून टाका आणि दुसऱ्याच दिवशी आपला गाशा गुंडाळून तो तालुक्याला परत गेला सुद्धा होता.
किसण्यान समजायचं ते समजून रमेश साठी पोरी पाहायला चालू केलं. 'एक बी इयत्ता शिकली नाय तरी बी चाललं पण मले बायको सुंदरच पायजे' या एका अटीवर तो पोरगी पाहायला तयार झाला होता. कितीतरी पोरी पाहिल्या पण हवी तशी सुंदर पोरगी भेटत नाही म्हणून सगळी स्थळ त्याने नाकारून दिली होती..
ओळखतील्या कुणीतरी सुमन च स्थळ आणलं तेव्हा दिसायला अत्यंत नाजूक आणि सुंदर असलेल्या सुमनला पाहून लागलीच रमेशने तिला पसंद केलं होत. पोरी पाहून घरचे देखील वैतागले होतेच त्यामुळे जास्त चौकशी न करताच घरच्यांनी होकार भरला अन् तीन वर्षा पूर्वी मोठ्या थाटामाटात त्याच लग्न पार पडलं होत..
विचारांच्या तंद्रीतच रमेश घराच्या आवारात पोचला होता
अर्ध गाव त्याच्या घरासमोर लोटलं होत. बाहेरच्या टाक्यातल पाणी घाई घाई ने पायावर ओतून तो ओसरीत आला आणि गोपीबाई न त्याच्या जवळ येऊन बसत डोळ्याला पदर लावला..
'लय येळाची कळा सोसू राईली पोरगी तूले निरोप धाडाच्या घंटा भर पयलेपासून पोटाले पकडुन बसली हाय..माईच गावात नोहती न तिले फटफटी वर आणुस्तोवर लय उशीर जाला'
आईचं बोलणं ऐकून रमेश ची धडपड अजून वाढली.
मागच्या वेळी मृत जन्माला आलेलं अर्भक त्याच्या डोळ्यासमोरून जाता जात नव्हत. उगाच आईला खोटा धीर देत तो मनोमन कुलदेवतेचा धावा करत आतून कुठली चाहूल लागते का याची वाट पाहत बसला..
आतल्या कोंदट अंधाऱ्या खोलीत बायकांचा गलका झाला होता. सगळ्या गावाची प्रसूती करणारी वयस्कर माई आपले कौशल्य पणाला लावत होती पण बाळाची काहीच हालचाल जाणवत नसल्यामुळे ती काय ते समजून गेली होती..
एक तास शर्थीचे प्रयत्न केल्यानंतर सुमन प्रसूत झाली होती..
पण..पण..
बाहेर रडण्याचा आवाज पोहचलाच नव्हता कारण बाळ रडतच नव्हत..आणि रडणार तरी कस होत..त्या निरागस अर्भकाने तर कधीच आपला प्राण त्याच्या आईच्या गर्भातच सोडून दिला होता..
परत एकदा सुमन ने एका मृत अर्भकाला जन्म दिला होता..यावेळी मात्र तो मुलगा होता..
(क्रमशः)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरेरे Sad

नेमकं लिहाताय.. आवडलं!!
पुभाप्र.