फक्त स्त्रियांसाठी - तुम्हाला मूल हवं होतं / आहे का ?

Submitted by राधानिशा on 17 April, 2020 - 13:21

ह्या धाग्यातले प्रश्न फक्त स्त्रियांचे या विषयावरचे विचार जाणून घेण्यासाठी आहेत . आई , बहीण , पत्नी , नातेवाईक स्त्रिया किंवा एकूण जग पाहून आलेल्या अनुभवातून स्त्रियांच्या विचारभूमिकेचे एक्सपर्ट समजणाऱ्या किंवा खरोखरच एक्सपर्ट असलेल्या पुरुष सदस्यांनी प्रतिसाद नाही दिलेत तर मी आभारी राहीन .. फक्त मायबोलीवर सक्रिय असलेल्या स्त्री सदस्यांचे विचार जाणून घेण्याची इच्छा आहे .

भारतात अजूनही बहुतेक स्त्रियांना नवरा निवडण्याचं स्वातंत्र्य नाही ... मूल हवं आहे की नाही असा प्रश्न स्वतःला विचारण्याचं स्वातंत्र्य / परिस्थिती नाही असं कंडिशनिंग आहे अशी सामाजिक परिस्थिती आहे ... सुशिक्षित स्त्रियाच याबाबत थोडाफार विचार करू शकतील अशी परिस्थिती आहे ..

१ - तुम्ही विवाहित असाल तर विवाहापूर्वी आपल्याला मूल हवं आहे का , असा प्रश्न स्वतःला विचारला होता का की 10 वी नंतर 11 वीला जाणं ह्याशिवाय बहुतेक मुलांसमोर दुसरा ऑप्शन नसतो , त्याप्रमाणे ती गोष्ट अपरिहार्यच आहे असा विचार तुम्ही केला होता ? किंवा त्यात काय विचार करायचा , लग्नानंतर मूल होणारच / व्हायलाच पाहिजे अशी अपेक्षा इतरांची तुमच्याकडून असणार , तेव्हा याबाबतीत आपल्याला चॉईस नाहीच ... अशी परिस्थिती होती ?

अविवाहित असाल तरी हाच प्रश्न आहे .. तुम्ही " मला मूल हवं आहे का ? " ह्या गोष्टीचा विचार केला आहे का की परिस्थितीमुळे हा प्रश्न उपस्थित करण्याचं स्वातंत्र्य तुम्हाला नाही ?

२ - विवाहित , मूल असलेल्या स्त्रियांना - मातृत्वाची भूक / माझं स्वतःचं मूल असावं ही इच्छा तुमच्या मनात नक्की कधी निर्माण झाली ?

वैवाहिक आयुष्याची स्वप्नं रंगवताना प्रेग्नन्सी आणि बाळाचा विचार सुरू केला होतात का ?

की त्याहीपुर्वी लहानपणी किंवा साधारण 12 - 13 व्या वर्षीपासून असल्यापासून कुटुंबातील / शेजारच्या / दुसऱ्या कुणाच्यातरी लहान मुलांना खेळवताना मातृसुलभ भावना तुमच्या मनात निर्माण झाल्या होत्या का ? बाळाची काळजी घ्यावी ; त्याला जपावं वगैरे .. आणि भविष्यात एक दिवस
माझंही असंच छान बाळ असणार हा विचार करून बरं वाटलं होतं का ? कि प्रत्यक्ष तुमचं मूल जन्मल्यानंतरच मातृसुलभ भावना निर्माण झाल्या ? त्यापूर्वी मुलांची विशेष आवड नव्हती पण स्वतःच्या मुलावर मात्र लगेच प्रेम उत्पन्न झालं असं कोणाच्या बाबतीत झालं का ?

अविवाहित स्त्रियांना - तुम्ही याबाबत काय विचार केला आहे ?

३ - विवाहित आणि अविवाहित स्त्रियांना प्रश्न - मूल नको असणाऱ्या बाईशी कोण लग्न करणार ... आणि ते बरोबरच आहे तेव्हा मूल हवं की नको ही काही विचार करण्याची गोष्ट नाहीच , असं तुम्हाला वाटत होतं का ? अजूनही तसंच वाटतं का ?

४ - ठराविक वयानंतर जोडीदार हवा , शारीरिक , भावनिक गरजा भागविण्यासाठी... अशी स्पष्ट सूचना शरीर आणि मन देतं असं गृहीत धरलं ... म्हणजे एखादी मुलगी म्हणते मला लग्न , जोडीदार हवा आहेच , मला एकटीला राहायचं नाही हे निश्चित आहे .. त्यासाठी कराव्या लागणाऱ्या ऍडजस्टमेंट्स अगदी क्षुल्लक वाटतात... उदा . दुसऱ्या घरात जाऊन ऍडजस्ट होणे , नवीन माणसांशी जुळवून घेणे वगैरे

तशी स्पष्ट सूचना शरीर आणि मन बाळाबाबत देतात का ? की मला आता माझं मूल हवच आहे .. तो सर्वस्वी माझा स्वतःचा निर्णय आहे ... मला मातृत्व अनुभवायचं आहे म्हणून मी हा निर्णय घेत आहे ... एवढी क्लॅरिटी तुमच्या मनात होती का / ( अविवाहित असाल तर ) आहे का ?

की मूल व्हावं ती एक कुटुंबाच्या , समाजाच्या अपेक्षांमधून निर्माण झालेली इच्छा असते ? प्रत्येकीचा वेगळा अनुभव असणार , तुम्ही फक्त तुमचा स्वतःचा सांगितलात तरी फर्स्ट हँड इन्फर्मेशन मिळेल .

क्षणभर कल्पना करा जर तुम्ही आणि तुमचा जोडीदार कुटुंबापासून , समाजापासून लांब एखाद्या बेटावर राहत असता , कोणाच्याही मतांचा तुमच्यावर दबाव किंवा प्रभाव नसता आणि तुमचा जोडीदार याबाबतीत " तुझी जी काय इच्छा असेल ती मला मान्य आहे " असं म्हणत असेल ... तर तुम्ही काय निवडाल ? मूल होऊ देणं की न होऊ देणं ?

५ - विवाहित स्त्रियांना - जर लग्नापूर्वी " मूल होऊ देणं न देणं हा तुझा निर्णय असेल / हा निर्णय घेण्याचं पूर्ण स्वातंत्र्य तुला असेल असं सांगणारा चांगला मुलगा ( म्हणजे वर म्हणून इतर सर्व दृष्टींनी चांगला मुलगा ) तुम्हाला सांगून आला असता तर त्याच्या निवडीकडे तुमचं झुकतं माप असलं असतं का ?

अविवाहित स्त्रियांना - हाच प्रश्न ... लव्ह मॅरेज नसेल , अरेंज्ड करणार असाल तर असं निर्णयस्वातंत्र्य देणारा मुलगा तुम्ही अधिक पसंत कराल का ? आणि मला मूल नको आहे हा निर्णय घ्याल का ?

६ - दुर्दैवाने सगळेच संसार काही दृष्ट लागण्यासारखे नसतात .. जोडीदाराच्या स्वभावामुळे / सासरच्यांच्या वागण्यामुळे काही स्त्रिया असमाधानी असतात ... अशावेळी मूल नसतं तर आपण या माणसाला सोडून बाहेर पडलो असतो .. माहेरी किंवा दुसरीकडे कुठेतरी गेलो असतो , नव्याने आयुष्याची सुरुवात करण्याचा प्रयत्न केला असता . . पण मुलाला सोडून जाता येत नाही किंवा मुलाची जबाबदारी एकटीने पेलण्याची क्षमता नाही म्हणून किंवा मुलाला आईवडीलांच्या विभक्तीमुळे प्रचंड मनस्ताप होईल म्हणून ... किंवा तत्सम कारणांनी विवाह टिकवून ठेवणे या परिस्थितीतून कोणी गेलं आहे का ... अशावेळी मूल होऊ देण्याची इतकी घाई केली नसती तर बरं झालं असतं असा विचार तुमच्या मनात आला आहे का ?

मुलाला घेऊन विभक्त झाल्यानंतर मूल होऊ देण्याची घाई केली नसती तर बरं झालं असतं असा विचार तुम्ही केला आहे का ?

अरेंज्ड लग्नानंतर 1 - 2 वर्षातच मूल झालं आणि जोडीदार आणि आपण एकमेकांना योग्य नाही , हे लक्षात आलं पण मुलाला घेऊन विभक्त झालेल्या स्त्रीची लग्नाच्या बाजारात किंमत कमी झालेली असणार / कशाला आपल्या स्वार्थासाठी मुलापासून त्याचे वडील तोडायचे / सावत्र बाप नको / एकटीने वाढवणं जमणार नाही / एकटीने मूल सांभाळण्यासाठी आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी नाही ........
अशांपैकी एखाद्या कारणाने नाईलाजाने लग्नबंधन तोडलं नाही असा कोणाचा अनुभव आहे ... अशावेळी मूल नसतं तर बरं झालं असतं , असा विचार अनुभवला आहे का ?

७ - विवाहित आणि मूल असलेल्या स्त्रियांना प्रश्न -

प्रेग्नन्सीचा अनुभव , डिलिव्हरीचा अनुभव , स्तनपानातून आईला मिळणारं सुख , मुलाला मोठं होताना पाहण्याचा अनुभव , त्याचे लाड , हट्ट पुरवणं इत्यादी इत्यादी ... , हा आयुष्यातला सर्वात सुंदर अनुभव होता असं तुम्हाला वाटतं का ? की विशेष काही नाही , शाळा , कॉलेज , लग्न इत्यादी सारखी ती एक अपरिहार्य , चॉईस नसलेली तेव्हा स्वीकारायचीच तर आनंदाने का स्वीकारू नये म्हणून स्वीकारलेली घटना होती ? त्यात तुम्हाला आनंद शोधावा / मानावा लागला ... कर्तव्यपूर्तीचं समाधान किंवा समाज , कुटुंबाच्या नजरेत स्वतःला स्त्री / आई म्हणून सिद्ध केल्याचं समाधान ... नवऱ्याला आपण मूल दिलं आहे , त्यामुळे त्याचं आपल्यावरचं प्रेम वाढलं आहे याचं समाधान .... इत्यादी ...

की एकूण तो अनुभव हा अंगभूत , नॅचरली अत्यंत आनंददायी होता ? बाळाचं हसू , रांगणं , अडखळणं , पडणं , चालणं , खाणं पिणं , इव्हन शी शू ... प्रत्येक गोष्ट करण्यात तुम्हाला आतून एक विलक्षण आनंद मिळत होता ? तुमचा स्वतःचा काय अनुभव होता ?

या प्रश्नांची उत्तरं या धाग्यावर द्यावीशी वाटली नाही तरी काही हरकत नाही काही प्रश्न खूप पर्सनल आहेत , काहींची उत्तरं वेदनादायक / जखम उकरून काढणारी असू शकतात तेव्हा दुर्लक्ष हा एक मार्ग आहे याची मला जाणीव आहे .... थोड्या जरी स्त्रियांनी क्षणभर जरी स्वतःशी या गोष्टींचा विचार केला तरी माझ्या पोस्टचं सार्थक झालं असं मला वाटेल ...

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भारतात एकूणच आयुष्य जगणे हे रूढ पायऱ्यांमध्ये केले जाते. तुम्ही तसेच जगताय का हे लोक पाहात असतात. जन्माला आल्यानंतर शाळा हा पहिला टप्पा... असे टप्पे पार करत लग्न झाले की पुढचा टप्पा मुले होणे. कित्येक जणी फारसा विचार न करता या टप्प्यात येतात आणि त्यातल्या कित्येकांना हा टप्पा किती डीमांडिंग आहे हे या टप्प्यात आल्यावर लक्षात येते. या टप्प्याला परतीचा मार्ग नाही. त्यामुळे मुले गळ्यात पडतात व ती जमतील तशी वाढवली जातात. कित्येक कंटाळलेल्या आया मी बघितलेल्या आहेत आणि त्यातल्या काही दोन मुले जन्माला घातलेल्या बघितल्यात, कारण परत तेच. दोन तरी हवीतच.

मीही विचार करून ह्या टप्प्यात आले असते तर कदाचित मूल मोठे करण्यासाठी योग्य वातावरण मिळायची वाट पाहिली असती आणि त्या भानगडीत कदाचित मूल जन्माला घातलेच नसते. पण मीही इतरांसारखे फारसा विचार न करता यात आले व मूल झाले. मुलाच्या बाबतीत करणे शक्य असलेल्या पण परिस्थितीमुळे करता न आलेल्या काही गोष्टी आजही मनाला गिल्ट देतात.

मुलांचे बालपण मनापासून अनुभवायचे म्हणून मी ही माझे करियर सोडून दिले..
एका मुलानंतर माझ्या आईचा दुसर्या मुलाला विरोध होता.. तीचे म्हणने होते एक मुल पुरे स्वतः चे आयुष्य एन्जॉय कर..कशाला अडकायचे परत दुसर्या मुलात...
पण मला , आम्हाला हवे होते..
लग्नानंतर 3-4 वर्षानंतर पूर्ण विचार करून पहिले मुल आणि त्यानंतर पाच वर्षांनी दुसरे मुल..
आम्ही दोघांनीही माझ्या प्रेग्नन्सीज आणि मुलांचे बालपण एन्जॉय केले आणि करतोय..
वर काहिंनी लिहिल्याप्रमाणे प्रॉब्लेम्स पण आले..बाळाला दुध न पुरने वगैरे पण त्याच्यावर मार्गही आहेतच..

साधना मस्त प्रतिसाद. मी जेव्हा मुलं का जन्माला घातले किंवा मुल जन्माला घालण्याचे फायदे तोटे याचा विचार करते तेव्हा खालील मुद्दे प्रकर्षाने पुढे येतात.
१) वयाच्या १४ व्या वर्षापासून periods चा त्रास सहन करतेय त्याचा काहीतरी उपयोग. In general, pregnancy मानवली. माझ्या तब्येतीच्या बर्‍याच किरकोळ तक्रारी pregnancy काळात गायब झाल्या आणि त्यांनी पुढे बरीच वर्ष डोक वर काढलं नाही.
२) मुलं झाल्याने व्यक्तिमत्वात काही चांगले बदल नक्कीच होतात. Patience वाढतो. दुसर्‍याचा विचार करायची सवय लागते. जबाबदार्‍या पाड पाडणं जास्त efficiently जमू लागतं. संसारातल्या अनेक option ला टाकलेल्या विषयात (जसं की स्वयंपाक करणे) काठावर का होईना पास झाल्याच समाधान मिळू शकतं. मुलगी होईपर्यंत मी अगदी basic स्वयंपाक करू शकत होते. पण ती जशी जशी मोठी होत गेली तसतस तिच्यासाठी म्हणून अनेक कठीण पदार्थ करून बघू लागले.
३) तुमचे तुमच्या partner बरोबरचे नाते अधिक प्रगल्भ होते. याची २ कारणे आहेत. तुमच्या सारखेच तुमच्या partner च्या व्यक्तिमत्वातही बदल घडतात. आणि मुलं वाढवणे हा एक अवघड project दोघांनी मिळून नीट पार पाडला की नकळत तुमची छान team बनते. Happy
जर मुलगी झाली नसती तर नवर्‍याला आणि मला असा teamwork केल्याचा आनंद कदाचित मिळालाच नसता.
जाणवलेले काही तोटे: १) वर लिहिलेल्या फायद्यांपैकीच काही तोट्यांमधे बदलू शकतात. जसे की काहीतरी शारिरीक व्याधी pregnancy काळात मागे लागणे. नवरा-बायकोचे म्हणावे तसे team work न घडणे.
२) आयुष्यात बरीच वर्ष मुलं हीच तुमची priority रहाते आणि इतर goals ( जसं की career goals, काही छंद, समाजकार्य इ.) काही काळ तरी low priority वर जातात.
पण मुले मोठी झाल्यावर पुन्हा त्या goals साठी वेळ देता येतो. आणि मुलांनाही त्या कामांमधे सहभागी करून घेता येते.
काही couples असा दावा करतात की मुलांना उत्तमपणे सांभाळून आम्ही आमचे करीअर, छंद ह्यांनाही तितकाच वेळ देऊ शकतो. पण अश्या लोकांची जरा सखोल चौकशी केल्यावर समजते की एकतर त्यांनी मुलाला सांभाळण्यासाठी कोणतीतरी भक्कम सपोर्ट सिस्टीम शोधली आहे आणि बालसंगोपनाचे बरेचसे काम त्या सपोर्ट सिस्टीमने केले आहे. किंवा त्या जोडप्याने मुलांकडे नीट लक्ष दिलेले नाहीये. अनेकदा मुलांकडे दुर्लक्ष झाल्याचे लगेच कळत/जाणवत नाही.
३) मुलांची काळजी/ त्यांचा विचार मात्र तुमचे आयुष्य व्यापून रहातो. काही काळानी मुले स्वतंत्र झाली तरी त्यांची काळजी करणे सुटत नाही. career, छंद, समाजकार्य यातून मन बाहेर काढणे एकवेळ जमू शकेल पण मुलांमधे गुंतलेले मन इतक्या सहजी बाहेर निघत नाही.

सगळ्यांचेच किती छान अनुभव आणि प्रतिसाद. मी पण तुमच्यातली एक. माझे एक वैयक्तिक मत, ज्या मुलीना आपला जोडीदार मुळीच पसंत नसतो पण जबरदस्ती लग्न केले असते त्या शक्यतो मुले नकोत अशी कटकट करतात. विषय वेगळा आहे पण खरेतर स्त्री एक मादी आहे ,आई होण्याची भावना नैसर्गिक असते. जोडीदार आवडीचा असेल तर त्याच्यासारखी मुले जन्माला घालताना मनापासून आनंद असतो. तेच जर लग्न कुठे जमत नाही म्हणून मिळेल त्याच्याशी लग्न करावे लागते किंवा पालकांनी प्रेम प्रकरणाला
विरोध म्हणून मिळेल त्याच्याशी लग्न लावून दिले असेल तर अशा मुली ना आयुष्यात खुश असतात ना मुलांबरोबर. त्यानाच हे प्रश्न पडतात.

छान धागा आहे.

@सियोना, विनाकारण जजमेंटल प्रतिसाद.
"खरेतर स्त्री एक मादी आहे ,आई होण्याची भावना नैसर्गिक असते. " वगैरेंमुळेच स्त्रियांना मोकळेपणी व्यक्त होता येत नाही. निर्णयही घेता येत नाही.

तुम्ही म्हणताय त्याच्या अगदी विरुद्ध असलेली जोडपी माहिती आहेत.
नवरा बायको एकमेकांच्या इतके प्रेमात, स्वतः च आयुष्य इतकं एन्जॉय करतात (जवळच्या, लांबच्या ट्रिप्स, रोज जीम, सेल्फ ग्रूमिंग, पार्ट्या, ट्रेकिंग, adventures वगैरे) की त्यांना मुलाची जबाबदारी अगदी नको वाटते. जेंव्हा अचानक रात्री ९ ला ठरवून दुसऱ्या दिवशी पहाटे दोन तीन दिवसांच्या ट्रेकला जातात तेंव्हा त्यांना आपल्यावर बाळाची जबाबदारी नाही या विचाराने खूप हायसे वाटते.
याउलट नवराबायको मध्ये सूर फारसे जुळलेले नव्हते, तरी मूल झाल्यावर थोडा फरक पडलेला , जबाबदारीची जाणीव होऊन वागणे, पार्टनरप्रति थोड्या भावना वाढणे असे झालेलेही पाहिले आहे.

मूल नको असणे, किंवा त्या जबाबदारीचा कंटाळा येणे, नको वाटणे अगदी नॉर्मल आहे, त्या गोष्टीला मादी, स्त्रीत्वाची भावना वगैरे लेबल लावू नये.

आमच्या बाबतीत मला बाळ उशिरा झाले. मूल झाले नसते तरी मला खूप त्रास झाला नसता, फक्त आयुष्यात गाठायच्या चेकलिस्ट पैकी एक गोष्ट राहिली याची थोडी रुखरुख राहिली असती. पण माझ्या नवऱ्याला बाळाची प्रचंड ओढ होती आणि आपल्याला बाळ होणारच या बाबतीत तो प्रचंड पोझीटिव्ह होता. खरंतर त्याच्या आशावादी सकारात्मकतेमुळेच मूल झाले, असे मला वाटते.
बाळ अजून लहान आहे, त्यामुळे कंटाळा किंवा नको वाटणे या फेज आल्या नाहीत. तरीही नवरा कधी बाळाची किंवा कुठलीही कामं करताना टाळाटाळ करत असेल तर "तुलाच हवं होतं बाळ, आता कामं कर" हे ऐकवत राहते.

Submitted by soha on 19 October, 2020 - 14:10

Submitted by सियोना on 19 October, 2020 - 13:20

दोन्ही प्रतिसाद मनापासून आवडले आणि पटले.

>>>>पण खरेतर स्त्री एक मादी आहे ,आई होण्याची भावना नैसर्गिक असते. >>> हे ब्रेनवॉशिंग आहे. अनेक स्त्रियांना नवी क्षितीजे खुणावु शकतात आणि त्यात मुले हा अडसर वाटू शकतो. काहींना व्यक्तीस्वातंत्र्य अधिक महत्वाचे वाटू शकते तर अनेकांना - या 'अशा' जगात परत आणखी एका जीवाची भर कशाला घाला असा निराशावादी दॄष्टीकोन येउ शकतो.
तेव्हा नैसर्गिक उर्मी वगैरे एका ठराविक मर्यादेपर्यंत ठिक आहे पण व्यक्ती तितक्या प्रकॄती.

सियोना सहमत आहे. मी तुमच्या मुद्द्यावर फक्त प्रतिवाद केला. कृपया वैयक्तिक घेउ नये. वाद-प्रतिवाद नसतील तर संवाद होणार कसा?

Submitted by सामो on 19 October, 2020 - 17:16 >>> सामो, या पोस्टशी 100% सहमत

सामो आणि पीनी,
+1000
अतिशय महत्वाचा मुद्दा तुम्ही चांगल्या पद्धतीने मांडला.

अनेक जोडपी/महिला असेही आहेत ज्यांना शक्य असूनही मूल होऊ देत नाहीत कारण हे जग वाईट होत चाललं आहे..It's not good enough for my child असंही डोक्यात असतं. मग त्यांना ती सो कॉल्ड आदिम नॅचरल प्रेरणा नाही असं कसं म्हणणार...उलट ते पालकत्वाच्या जबाबदारीचा कितीतरी विचार करत आहेत.
काही सिंगल स्त्रीपुरुष सरोगसी, स्पर्म /एग डोनर वापरून लाखो रुपये खर्च करून स्वतःचं मूल जन्माला घालतात. पण अमेरिकेत अशाही सिंगल बायका पाहिल्या आहेत ज्यांना त्या देशात असं स्पर्म डोनर वापरून मूल जन्माला घालणं अगदी सहजशक्य असूनही करत नाहीत कारण मुलाला डॅडी नसणार, ते रिलेशन नसणार, डॅडीच्या साईडची पूर्ण फ़ॅमिली नसणार. असं आयुष्य त्या मुलावर लादणे- केवळ स्वतःला मातृत्व हवं म्हणून - हे त्या महिलांना योग्य वाटत नाही. आदिम प्रेरणा वाल्या आयांपेक्षा या महिला/पुरुष पालकत्वाचा जास्त जबाबदारी व प्रगल्भतेने विचार करतात, त्यांना पेरेटिंग जास्त समजलं आहे असं मला वाटतं.

छान प्रतिसाद आहेत सर्वांचे.
माझ्या बाबतीत असे झाले, की एवढी काही खूप बाळाची ओढ वगैरे आधीपासून नव्हती. वैद्यकीय शिक्षण घेताना नॉर्मल डिलिव्हरी चा त्रास पाहून आम्ही सगळ्याजणी खूप घाबरलेल्या होतो. एवढा त्रास असेल, तर मूल नकोच, किमान नॉर्मल डिलिव्हरी तरी नको.. असाच साऱ्याजणींचा सूर असायचा चर्चेचा. एवढा त्रास भोगला, तरीही या बायका पुन्हा चान्स कशा काय घेऊ शकतात, असा प्रश्न पडायचा तेव्हा.

कालांतराने लग्नाचा विचार चालू केला, शोधण्यात वेळ गेला, तोवर मनातली भीती गेली होती. इतर गोष्टींप्रमाणे हाही अनुभव घेऊन पाहूया, इथपर्यंत बदल झालेला होता माझ्यात.

यथावकाश ठरवून लग्न झाले. शिक्षण - घरच्या जबाबदाऱ्या यामुळे उशिरा लग्न झाले. लग्नानंतर आम्ही ठरवले, 6 महिन्यानंतर चान्स घेऊ. आणि नैसर्गिकरित्या झाले तर झाले. नाही झाले, तर वैद्यकीय उपचार वगैरे करायचे नाहीत.

पण हायपोथायरॉयडिझम मुळे प्रेग्नन्सी राहिल्याचे समजलेच नाही. प्लॅनिंग च्या आतच ही जबाबदारी पडली. सुरुवातीला धास्तावले. भांबावले. पण मग स्वीकारले . आणि प्रेग्नन्सी चे सर्व टप्पे डोळसपणे अनुभवले. माझी हाय रिस्क प्रेग्नन्सी होती. बाळ किंवा आई दोघांपैकी एकच वाचू शकेल, अशी. पण सुदैवाने दोघेही वाचलो. पण बाळ हातात घेतले आणि कुणाला कविकल्पना वाटेल, पण माझ्या आतून काहीतरी उफाळून आले. शब्दांत सांगणे अवघड आहे, पण खूप सुंदर असे काहीतरी..

बाळ झाल्यानंतर तिसऱ्या कुणाची साथ नसताना आम्ही दोघांनीही आपापल्या कॅरियर्स ना दुय्यम महत्त्व देऊन बाळावर लक्ष केंद्रित केले. आनंदाने, मनापासून, खूप विचारपूर्वक पालकत्व एन्जॉय केले, करतो आहोत. हा सगळाच प्रवास सुंदर आहे. माझ्यात कळत -नकळत जे बदल झाले बाळाला वाढवताना, ते मलाही अनपेक्षित होते. बाळाबरोबर आम्ही दोघेही वाढतो आहोत, असे वाटते आम्हाला.

बाळ झाल्यानंतर तिसऱ्या कुणाची साथ नसताना आम्ही दोघांनीही आपापल्या कॅरियर्स ना दुय्यम महत्त्व देऊन बाळावर लक्ष केंद्रित केले. आनंदाने, मनापासून पालकत्व एन्जॉय केले, करतो आहोत......................
+ 1111 नादिशा..

>>>> आदिम प्रेरणा वाल्या आयांपेक्षा या महिला/पुरुष पालकत्वाचा जास्त जबाबदारी व प्रगल्भतेने विचार करतात, त्यांना पेरेटिंग जास्त समजलं आहे असं मला वाटतं.>>>> जबरी मुद्दा आहे. हे लक्षात आले नव्हते.

Pages