कोणासाठी?

Submitted by निशिकांत on 14 April, 2020 - 23:15

कोणा साठी ?

अल्लड जगले मी रिमझिमले कोणा साठी ?
ओठावरती गीत उमलले कोणासाठी ?

भ्रमर जरी तू, कैद तुला मी केले नाही,
फुलले, पानामागे लपले कोणा साठी ?

पहिल्या वहिल्या बरसातीची आवड तुजला
गंधित ओली माती बनले कोणासाठी ?

स्वप्ना मागे धाव कशाला? मृगजळ सारे
कल्पतरूच्या खाली बसले कोणासाठी ?

भाव मनीचे समजुन घे तू शब्द हरवले
पैंजण पायीचे रुणझुणले कोणासाठी ?

सटव्या सा-या, दृष्ट न लागो तुला कुणाची
काजळ होउन गाली सजले कोणासाठी ?

दु:ख न व्हावे तुला म्हणोनी यत्न करोनी
दु:ख झाकले, उसने हसले कोणासाठी ?

सोसाट्याचे वादळ येता अंधाराचे
पदराखाली दीप उजळले कोणासाठी ?

राग तुला माझ्या काव्याचा का "निशिकांता" ?
गजलेचे मी शेर जुळवले कोणासाठी ?

निशिकांत देशपांडे मो. नं. ९८९०७ ९९०२३

Group content visibility: 
Public - accessible to all site users