'दिवस असे की, कोणी माझा नाही, अन मी कोणाचा नाही' संदीप खऱ्यांच्या कवितेतल्या ह्या ओळी 'समक्ष'पणे भेटायला याव्यात तसा एकेक दिवस उंबऱ्यातून आत येतो. एकटेपणाशिवाय कुणाचीच सोबत नसते. शेजार धर्म म्हणून आपल्या बरोबर राहायला आलेलं हे एकाकी पण सुद्धा आपल्याला कंटाळून एकदिवस घरातून निघून जाईल की काय अशी भीती वाटत राहते. मोबाईलच्या बटणांचा आणि टी व्ही च्या पॅनल चा तिटकारा यावा, घर आवरायला घ्यावं तर कुणीच येणार नाहीये 'अरे वा: छान लागलं आहे तुमचं घर!' असे सुखावणारे शब्द भिंतीना सुद्धा नाही ऐकू येणार. एरवी नको वाटणाऱ्या गर्दी चाही मनाला 'शोष' पडावा अशी विचित्र मानसिक अवस्था. मनातल्या श्वापदाला आता अरण्यातल्या एकलकोंडे पणाचा वीट यावा आणि त्याने 'गिधाडे'ही चालतील सोबतीला पण 'जाग' असण्यापुरतं तरी भेटू दे कुणी तरी आप्त, रोज नाही चार दिवसातून एकदा सुद्धा चालेल. पण त्यानं चेहऱ्यावर 'खोटं नाटं' का होईना आणि उसनं आणि का असेना पण ‘हसू’ घेऊन यावं उंबऱ्यावर, असं सारखं वाटत राहावं.
पण ही अशी अचानक एक दिवस पृथ्वीची ही अशी खिन्न अवस्था का झाली? मी लहान असताना शेजारी वाड्यात एका खोलीत राहणारी, चेहऱ्यावर सुरकुत्या बाळगून कशी बशी जगणारी अशिक्षित एक वृद्ध जर्जर आजी राहायची. असं काही संकट आलं की ती नेहमी म्हणायची - 'पापं फार झाली पृथ्वीवर’. कधी कधी वाटतं ती सुरकुतलेली म्हातारी म्हणायची त्या प्रमाणे खरंच जड व्हायला लागला, तीन लाख वर्षांच्या ह्या कधीच न वृद्ध होत असलेल्या होमो सेपियन्स चा हा अश्वथामा ह्या पृथ्वीला आता. पृथ्वीला सुद्धा सहनशक्तीची एक सीमा असू शकते हे विसरून, ह्या पाठीचा कणा सरळ असलेल्या माणसाने ह्या निसर्गाचाच कणा मोडायला सुरुवात केली. आणि छोट्या श्याच पण अत्यंत कपटी आणि स्वार्थी मेंदू असलेल्या ह्या तिच्याच वास्तूत राहणाऱ्या ह्या सस्तन प्राण्याने चक्क तिच्याच अब्रू वर हात टाकायला सुरुवात केली. 'कौरवांच्या भर सभेतील रज:स्वला' पांचाली सारखी तिची अवस्था असहाय्य करून टाकली. आणि मग सर्वच गोष्टींचा एक दिवस कहर व्हावा आणि ती धरा सुद्धा अचानक विद्युलते प्रमाणे ह्या असुरांना जाळून टाकायला उठवी. 'माणूस' नावाच्या प्रजातीची गेल्या काही आठवड्यात झालेली ही अशी अस्वस्थ करणारी गतप्राण अवस्था.
एकेकाळी साता समुद्रा पार त्यांच्या साम्राज्याचे मुजोर शंख फुंकणाऱ्या इटली रोम आणि फ्रांस च्या दिमाखदार राजवाड्यांचे खांब पाहता पाहता भग्न झाले आणि एखादा जुनाट वटवृक्ष त्याचं अडीचशे तीनशे वर्षांचं दीर्घ असं आयुष्य संपवून तो एखाद्या पामराच्या डोळ्यासमोर उन्मळून पडावा तसे हे रोमन अंक कोरलेलं उन्मत्त प्रासाद उन्मळून पडले. अगदी त्यांच्या स्वाभिमाना आणि दूराभिमा सकट. समुद्रावरच्या फेसाळ वाळूत अर्धनग्न अवस्थेत सौरस्नान करत उतशृंखल आयुष्य जगणारे देह पाहता पाहता पंधरवडा संपायच्या आत गौतम बुद्धाच्या ऐकलेल्या कोणत्यातरी गोष्टीतल्या वृद्धाची व्हावी तशी अवस्था होत व्हेंटिलेटरच्या भिक्षेवर आणि दयेवर एकेक क्षण मोजत धापा टाकत अंथरुणावर खिळलेले इंग्रजी बातम्यांच्या वाहिन्यांवर दिसू लागले. आणि मग प्रगत आणि समृद्ध राष्ट्रे ही संकल्पना किती भ्रामक असू शकते असं वाटत, खिन्न मनाने टीव्ही च्या रिमोट चे स्विचऑफ चे बटन दाबले जाऊ लागले. राजवाड्यात आणि प्रसादात फुलझाडात खेळणाऱ्या लक्ष्मीपुत्र आणि राजकुमारांची ही अशी महिन्या पंधरवड्यात इतकी विपन्नावस्था व्हावी तर मग आपल्या देशातील अजूनही पाण्यासाठी ओंजळ धराव्या लागणाऱ्या असंख्य जीवांची काय अवस्था होईल जर 'अवनी'चा कोप शमला नाही लवकरात लवकर ह्या विचाराने मग मन कातर होतं जातं आणि न कळत रामरक्षा म्हणायला सुरुवात करतं.
सद्यपरिस्थितीत हजारो मैलांच्या प्रवासाला निघालेले हाताला काम नसलेल्या बेघरांचे घशाला शोष पडलेले तांडे खरे? की पहाटे पासून नायट्रोजन डाय आणि कार्बन मोनॉक्साईड चे अभद्र विष हवेत ओकायला सुरु करणारी मानवी घरघर थांबल्या मुळे वसंत ऋतूतील कधी नव्हे ती खिडकीतून ऐकू येणाऱ्या प्रणयातूर आणि मिलनातूर अश्या 'कोकीळ' चे मधुर स्वर खरे? कुपोषणाने छातीचा पिंजरा झालेला आणि सूर्याच्या लाहीने रापून निघालेल्या त्वचेच्या अस्तराच्या आत राहणारा, कुणी समाज सेवी संस्थेनं उघडलेल्या अन्नछत्रा च्या पुढे तासंतास रांग लावून आयुष्याची किंमत मोजणारा भुकेजला माणूस खरा? की मनुष्यप्राण्याच्या केवळ पदरवाने सुद्धा दचकून भयव्याकूळ होणारा मोर आता मात्र 'संपली वाटतं ही दुष्ट मानव जमात' असं मनातल्या मनात स्वतःशीच काहीतरी स्वगत असल्यासारखे पुटपुटत दाट जंगलातील पहाटे पहाटेच्या थंड स्त्यावर पसरलेल्या उन्हेरी अश्या उबदार दुलईत आळस देत मुक्त संचार करणारा नीळकंठ सजल आणि चंचल असा मोर खरा?
दुसऱ्याला 'स्पेस द्या' असं शहाणपणानं सांगण्याच्या नादात किती स्वार्थी आपण? ह्या निरागस अश्या 'निसर्गाची' सुद्धा आपण 'स्पेस' हिरावून घेऊ लागलो. ज्या पृथ्वी वर आपण वास करतो त्या पृथ्वीचाच तोल गेला तर आपण आणि आपली पुढची पिढी आणि पर्यायानं आपली लेकरं आणि बाळं कसे कशी काय जगतील? ह्या सध्या गोष्टीचाही सोयीस्कर पणे विसर पाडून घेतला. प्रगतीच्या व्यसनाने बेफाम झालेली ही प्रजाती आता मात्र कदाचित भानावर येईल. आली तर ठीक , नाहीतर अनादी काळा पर्यन्त गुहे मध्ये राहणाऱ्या, आणि नंतर इजिप्तच्या आकाशाला गवसणी घालणाऱ्या उंचच उंच अश्या खुफूच्या पिरॅमिड्स मध्ये प्रेतांत मसाले भरून सहा हजार वर्ष त्या ममीज जपणाऱ्या आणि सिंधू नदीच्या काठी हडप्पा मोहेजोदडो मध्ये शेती करणाऱ्या मानव जातीचा इतिहास वाचायला सुद्धा कुणी उरणार नाही.
कालौघात ह्या दुर्धर अश्या 'कोविड' वर लस शोधली जाईल, अगदी रामबाण नाही पण किमान मृत्युशय्येवर स्पंदनं मोजणऱ्यांना आशेचा किरण दिसेल अशी औषधं निर्माण होतील...एक दिवस सकाळी हा एकाकी लॉक डाऊन सुद्धा उठेल, पण मानव जातीची ही 'प्रगती' ची भ्रमिष्ट व्याख्या जेंव्हा बदलेल तेंव्हाच खरा ह्या एकाकी पणाचं शापित जीवन संपेल. तो पर्यन्त आपण असेच संध्यकाळच्या वेळी एकट्यानेच गॅलरीतल्या कठड्यावर दोन्ही हातांची कोपरं रोवून खिन्न पणे लवकर अंधार (न) पडण्याची वाट पाहत आयुष्याचं स्तोत्र म्हंटल्या सारखं सारखं ग्रेस च्या ओळी गुणगुणत उभं राहायचं आणि स्वतःच स्वतःला म्हणायचं… "भय इथले संपत नाही...मग तुझी आठवण येते...मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवली गीते !"
चारुदत्त रामतीर्थकर
११ एप्रिल २०२०, पुणे.
ओ! आपण काही नाही केलं जे काय
ओ! आपण काही नाही केलं जे काय केलंय ते चायना नी. उगीच काय स्वतःला थपडा मारुन घ्यायच्या? Please च.
आपल्या आयुष्यातून चायना शब्द कसा हद्दपार होईल ते बघायला पाहिजे, lockdown उठला की.
राजसी , बरोबर आहे. कोविड चा
राजसी , बरोबर आहे. कोविड चा उगम चायना मध्ये आहे, पण सध्याच्या जगातील लॉकडाऊन मुळे मंदावलेल्या 'गती' मुळॆ माणसानं पृथ्वीची किती हानी केलेली आहे , करत आहे आणि ( करणार आहे कदाचित पुढे सुद्धा ) हे प्रकर्षानं दिसू लागलं (( खरं सांगायचं तर माणसाचं वागणं चव्हाट्या वर आलं आहे ) . म्हणजे जालंधर मधून २१३ किमी लांब असलेला हिमालय दिसू लागणं वगैरे , जे अन्यथा प्रदूषणा मुळे पूर्णतः झाकलेले असतात , ह्या अश्या आणि ह्या व्यतिरिक्त असंख्य घटना ज्या घडू शकतील असं कधी वाटलंच नव्हतं . ही हानी थांबली नाही तर होणाऱ्या ह्या अधोगतीला 'करोना' गरज भासणार नाही, आपण करत 'प्रगती' च्या नावाखाली करत असलेला ऱ्हास पुरेसा आहे.
कुठेतरी सर्व गोष्टींचा निसर्ग समतोल राखतोच. म्हणजे कार्बन किंवा तत्सम सायकल्स असतात तश्या. त्या विस्कळीत झाल्या की त्याचे दूरगामी परिणाम इतरत्र पाहायला मिळतात. सध्या माणूस ज्या पद्धतीनं पृथ्वीशी वागतोय ते 'योग्य' नव्हे असा ह्या लेखाचा विषय आहे, सध्याचे करोना आणि लॉकडाऊन हे कदाचित लेखाचे 'stimuli' आहेत पण लेखाचा 'मुख्य' विषय माणसानं पृथ्वीशी केलीली अयोग्य वागणूक हा आहे.
कोरोना कशामुळं झाला? आणि त्याला जवाबदार कोण ह्या विषयी हा लेख अजिबात नाही.