लॉकडाऊनच्या काळात सतत त्याच त्याच बातम्या ऐकून वाचून येणार्‍या ताणतणावावर उपाय काय? - भाग ५ - समुपदेशन

Submitted by अतुल ठाकुर on 8 April, 2020 - 10:56

sulabhatai_4.jpg

लॉकडाऊनच्या काळात आपल्यावर बातम्याचा मारा होत असतो. अनेक बाजूंनी निरनिराळ्या साधनांच्याद्वारे खर्‍या खोट्या बातम्या आपल्यापर्यंत पोहोचत असतात. आणि त्या ऐकून वाचून मनावर ताण येत असतो. आज सुलभाताई त्याबद्दल काय करता येईल याचे मार्गदर्शन करत होत्या. सर्वप्रथम त्या म्हणाल्या की मोबाईल, टिव्ही या सारख्या साधनांचा कंट्रोल आपल्याकडे असतोच. ते बटण जेव्हा आपण ऑन करतो तेव्हाच त्या बातम्या आपण ऐकतो किंवा वाचतो. त्यामुळे आपल्या हातात असणार्‍या कंट्रोलचा यावेळी वापर करून या बातम्या ऐकण्या वाचण्याचे प्रमाण आपल्याला कमी करता येईल.

आपल्याला आता काय चाललं आहे याची लगेच माहिती हवी असते म्हणून आपण सतत बातम्यांकडे धाव घेतो. या बातम्या आपली अनिश्चितता आणखी वाढवत असतात. आणि मग आपल्याला ह्या बातम्यांकडे धाव घेण्याचा चाळाच लागल्यासारखा होतो. प्रत्येक वेळी बातमी वाचल्यानंतर "अरे बापरे" हीच आपली प्रतिक्रिया असते. आणि त्यामुळे आपल्याला तणाव येऊ लागतो. माहिती करून घेणे चुकीचे नाही. पण त्याचे प्रमाण काय, किती हे आपल्याला ठरवावे लागेल. आपण सतत बातम्या वाचल्याने आजारी माणसांचे प्रमाण कमीही होणार नाही आणि जास्तही होणार नाही हे लक्षात घ्यायला हवे. त्यापेक्षा आपण दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. जनसंपर्क टाळावा, बाहेर जाऊ नये, हात साबणाने धुवावेत. या करण्यासारख्या गोष्टी आपल्या हातात आहेत. या गोष्टी केल्यानंतर कुठल्यातरी सकारात्मक गोष्टींमध्ये आपले मन गुंतवावे. म्हणजे तणाव कमी होण्यास मदत होईल.

योग्य रिलॅक्सेशन ही सुद्धा शिकण्यासारखी गोष्ट आहे. ते ही आता वेळ मिळाला आहे तर करता येईल. सुलभाताई सांगत होत्या की परिस्थिती अनिश्चित असली म्हणजे आपल्याला तणाव येतो. त्यामुळे आता आणि या क्षणी आपल्या हातात काय आहे याचा विचार केला पाहिजे. जे आपल्या हातात नाही त्याचा विचार करून त्याचेच चित्र सतत मनात घोळवले की ताण येतो. स्वत: आरोग्याचे नियम पाळून, सुरक्षित राहून इतरांना मदत करणे हा एक तणाव दूर करण्याचा मार्ग असु शकतो. तणावाने माणसाची रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊ नये यासाठी हे सारे उपाय करता येतील.

शेवटी सुलभाताईंनी शारिरीक व्यायाम करण्यावरही भर दिला. त्या आवर्जून म्हणाल्या की यासाठी बाहेर जाण्याची गरज नसते. घरातल्या घरात तुम्ही स्ट्रेचींगसारखे व्यायाम करु शकता. पण दिवसभर टीव्ही पाहात असाल, मोबाईलवर असाल किंवा नुसतेच पलंगावर लोळत असाल तर तणाव कमी होणार नाही. त्यापेक्षा आता आपल्या हातात काय आहे याचा विचार करून दिनक्रमाचे नियोजन केले तर तणाव कमी होण्यास मदत होईल.

सुलभाताई स्वतः मैत्र हेल्पलाईनच्या फेसबुकपेजवर लिहित असतात. त्याची लिंक देत आहे.

https://www.facebook.com/Maitra-Emotional-Distress-Helpline-229722830395368

(क्रमशः)

अतुल ठाकुर

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अतुलजी छान लेख!
तुमच्या वेस्टर्नपटांवरचा दुसरा लेख आला तर ताणतणाव सुसह्य होईल असं वाटत.
Happy