दिवेलागण, कविवर्य आरती प्रभू, कवितेचे रसग्रहण

Submitted by मुक्ता.... on 7 April, 2020 - 10:04

ही कविता समजून घेतली तर मनाला एक निराळी शांतता मिळते...
आरती प्रभू अर्थात चि. त्र्यं. खानोलकर यांच्या या गूढरम्य तरीही एक सूक्ष्म शांततेचा प्रत्यय देणाऱ्या कवितेचा अर्थ समजून घेण्याचा एक छोटा प्रयत्न केलाय.

दिवेलागण

खाली एक फोटो आहे.आजच सकाळी झाडांना पाणी देताना काढलाय. जरा जरा आता गोकर्ण भरू भरू लागलंय. या फोटोत एकच रेषेत एक कळी, नुकतंच उमललेलं फुल आणि एक आदल्या दिवशी न काढलेलं असं मलूल झालेलं फुल आहे. त्या फुलात बीजधारनेची प्रक्रिया पुरी झालेली आहे. त्यामुळे ते आपले आयुष्याचे कर्तव्य फलित करून गोकर्णाच्या वेलिसाठी पुनर्जन्म म्हणजे त्याच्या पुढच्या पिढीची व्यवस्था करून गेले. हे दृश्य पाहताना मला आरती प्रभू यांनी लिहिलेली दिवेलागण ही कविता आठवली.

उत्पत्ती, स्थिती आणि लय हा या सृष्टीचा नियम आहे. पुनरुत्पत्ती ही एक जैव प्रक्रिया या द्वारे सृष्टी पुढे प्रयाण करते. दोन जीवांचे शारीर मिलन होते. या मिलनाच्या उच्च क्षणी एक अधीर आणि नन्तर परमानंद ते जीव मिळवतात. आणि त्याच बरोबर त्या दोन जीवांच्या या सानिध्यातुन महान अशी सूक्ष्म प्रक्रिया घडते. दोन पेशींचे मिलन होऊन नवीन जीव आकार घेतो. दोन्ही जन्मदात्यांकडून गुणसूत्रीय ठेवा मिळतो. म्हणजेच हा पुनर्जन्म असावा. हा जीव मातेच्या उदरातून बाहेर आल्यानंतर आपल्या स्वतंत्र जीवनाला सुरुवात करतो. आणि तीच साखळी पुढे चालू राहते.

प्राणांचा प्रणय त्यातून जन्मोदय...
या खालच्या चार ओळींत आरती प्रभू काय म्हणत असतील?

एखाद्या प्राणाचे सनईसूर
एखाद्या मनाचे कोवळे ऊन
निर्जन प्राणाचा व्रतस्थ दिवा
एखाद्या सरणा अहेवपण

कदाचित असं....
जन्म मृत्यूचा उदयास्त होत असतो. एकाच वेळेस त्याच क्षणी कुठे दोन जीवांचे मिलन होऊन नवे जीवन अंकुरत असते,त्याच वेळेस कुणी जन्म घेत असते, त्याच क्षणाला कुणी मरण पावत असते.

या पाच ओळीं आणि काही बरच सांगतात...

एखाद्या प्राणांत बुडून पूर्ण
एखाद्या प्राणाच्या दर्पणीं खोल
विलग पंखांचे मिटत मन
एखाद्या प्राणाचे विजनपण
च एखाद्या फुलाचे फेडीत ऋण

पाऊस पडून गेल्यानन्तर ओसाड माळरान हिरव्या गवताने आणि फुलांनी भरून जाते. पण पाऊस सरून बाकीच्या ऋतूनकडे प्रयाण झाल्यानंतर हेच माळरान अपल्यादेखी पुन्हा ओसाड होते, जर असं आहे तर ओसाड माळरानात हे हिरवे आयुष्य येते कुठून? याचे उत्तर असे आहे की फुले सुकल्यानंतर त्यांच्यात निर्मित बीज मातीत कुठेतरी तग धरून राहते. पाऊसपाणी मिळाल्यावर पुन्हा ते अंकुरत नवीन आयुष्यास सुरुवात करते.

सरणाऱ्या आयुष्याचे अंकुरणाऱ्या आयुष्यास एक दान! ऋतूंचे बंध आणि ऋणानुबंध!
खाली दिलेला फोटो घेताना नेमक्या या ओळी आठवल्याच!

निर्जन प्राणाचा व्रतस्थ दिवा
एखाद्या सरणा अहेवपण

पूर्ण कविता खाली देतेय आणि गाणंही

दिवेलागण

विश्रब्ध मनाच्या कातरवेळी
एखाद्या प्राणाची दिवेलागण
सरत्या नभाची सूर्यास्तछाया
एखाद्या प्राणांत बुडून पूर्ण
एखाद्या प्राणाच्या दर्पणीं खोल
विलग पंखांचे मिटत मन
एखाद्या प्राणाचे विजनपण
च एखाद्या फुलाचे फेडीत ऋण
गीतांत न्हालेल्या निर्मळ ओठां
प्राजक्तचुंबन एखादा प्राण
तुडुंब जन्मांचे सावळेपण
एखाद्या प्राणाची मल्हारधून
एखाद्या प्राणाचे सनईसूर
एखाद्या मनाचे कोवळे ऊन
निर्जन प्राणाचा व्रतस्थ दिवा
एखाद्या सरणा अहेवपण

आरती प्रभू

ही कविता जसराज जोशी यांच्या आवाजात नव्याकोऱ्या चालित ऐकली आणि मनात घर करून गेली! गेलं एक वर्ष मनात घोळतेय.एवढ्या दिवसांनी अर्थ उमगला.

जसराज जोशींच्या गाण्याची लिंक देतेय ,जरून ऐका.
https://youtu.be/JtdI1B0b2og

आर्टिकल शेअर झाल्यास त्याच्या इतका दुसरा आनंद नाही. नावसाहित झालां तर आनंद द्विगुणित होईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कविता फारशी समजली नाही पण रसग्रहण छान वाटलं वाचून. आरती प्रभूंच्या कवितेत उदास भाव असतो बरेचदा त्यामुळे वाचल्या जात नाहीत. लेख आवडला...फोटो दिसत नाही आहे....

माझा मला, अर्थ कळलाच नसता. फार सुरेख अर्थ लावला आहे. वेगळाच आयाम दिलात कवितेला.
________________________
आपल्याला विनंती पुढील कवितेचेही जमल्यास रसग्रहण करावे. नो फोर्स जस्ट रिक्वेस्ट.

दिवे लागले रे, दिवे लागले रे,
तमाच्या तळाशी दिवे लागले;
दिठीच्या दिशा खोल तेजाळतांना
कुणी जागले रे? कुणी जागले?

रित्या ओंजळी दाटली पुष्पवृष्टी
असे झाड पैलाड पान्हावले;
तिथे मोकळा मी मला हुंगितांना
उरी गंध कल्लोळुनी फाकले...

उभ्या रोमरोमांतुनी चैत्रवाटा
कुणी देहयात्रेत या गुंतले?
आरक्त त्याच्या कृपेच्या कडा अन
उष:सूक्त ओठात ओथंबले...

- शंकर रामाणी

खर सांगायला गेल तर कविता मला कळालीच नाही. पण तुम्ही केलेल रसग्रहण आवडल.. Happy
लिंक बघितली जसरास च्या आवाजात कविता अजुनच गुढ-गंभीर वाटतीये..

ती लिंक ऐकली...मस्त गाणं आहे...गूढ आणि उदास करणारं...वर दिलेली कविता पण नादमय आहे..वाचायला आवडली पण अर्थ नाही कळला.