माझी शोभा ताई

Submitted by डी मृणालिनी on 5 April, 2020 - 13:10

सचिन ,ममा , विश्वास दादा ,मोहम्मद दादा सर्वांची व्यक्तिरेखा रेखाटून झाली. एका व्यक्तीची राहिली होती. तिची व्यक्तिरेखा रेखाटणं म्हणजे माझ्यासारख्या धसमुसळ्या मुलीने पट्टीशिवाय सरळ रेषा आखणं ! साक्षात ब्रह्मदेवालाही जी गोष्ट शक्य नाही ,ती मी करण्याचं धाडस करते आहे. आमची शोभाताई . श्रवणयंत्राला कुलूप लावून अखंडपणे वाक् यंत्र चालू ठेवणारी ,क्षणात हसून क्षणात गंभीर होणारी , आपल्या हट्टपणाने सर्वांचं पित्त असंतुलित करणारी मात्र तरीही आम्हा सर्वांच्या हृदयाची अधिकारिणी असलेली अशी ही ताई. काळेभोर टपोरे दाक्षिणी ललनेसारखे डोळे तिने ज्याच्यावर रोखले ,त्याच्या पापाची रांजणे भरलीच समजा . तिचं एक मजेदार वैशिष्ट्य ज्याचं मला आजपर्यंत राहून राहून आश्चर्य वाटतं ,ते म्हणजे तिची भांडण्याची पद्धत .
भांडणाच्या सुरुवातीला तिचे टपोरे डोळे आणखीनच मोठं रूप धारण करून थेट अस्मानाशी भिडतात , नुकत्याच धार करून आणलेल्या खंजिरासारख्या धारदार आवाजात ती शब्दांचे भाले फेकत असते. या क्षणी बघणाऱ्याला असं वाटतं कि या भांडणाची विजेता शोभाताईच असेल. पण छे !! अगदी दुसऱ्याच क्षणी तिचे अस्मानाला भीडणारे डोळे लगेच जमीनीला खिळतात. शब्दच सुचत नसल्यासारखी ती शांत उभी असते. तिच्या या मौनाने तिने जणू आपली चूक मान्यच केलेली असते. कधीकधी ती चुकलेली नसते , मात्र अशावेळी काही न बोलता ती सरळ आपल्या कामात गुंतते . भांडणाचा शेवट आपल्याच शब्दाने व्हावा, असा तिचा कधीच हट्ट नसतो. अपवाद विश्वास दादाचा. का कोणास ठाऊक पण शोभाताई आणि विश्वास दादा हे equation आजपर्यंत कधी जुळूनच आलं नाही. हे रहस्य उलगडेपर्यंत तुम्हाला वाट पाहावी लागेल .
मला सर्वात जास्त आवडतं ,ते शोभाताईच हसणं . शोभाताई वाहणाऱ्या उथळ पाण्यासारखी निखळपणे हसते . हसताना तिचे मोतियांसारखे छोटे दात सुंदर दिसतात. तिला जेव्हा ही आनंद होतो ,तेव्हा तिचा चेहरा नकळतच उजळून येतो. हा परमोच्च आनंद तिला तीन गोष्टीत मिळतो. चित्रपट बघताना ,पाहुणे आल्यावर आणि विश्वास दादाची फजिती झाल्यावर . तिला चित्रपट बघायला तर खूपच आवडतं . मग तो कोणत्याही भाषेत असो ! ती आवडीने बघते. चित्रपट बघताना तिचं ते निखळ हसणं मला खूप जाणवतं .
शोभाताई आणि माझ्यात एक साम्य आहे . माझ्यासारखीच तिलाही झोप खूप प्रिय आहे . मला तर जेवण नसलं तरी चालेल पण झोप ही माझी जीवश्च कंठश्च मैत्रीण ... तशीच शोभाताईंचीसुद्धा ! घराला आग लागली तरीही झोप पूर्ण झाल्याशिवाय ती काय उठणार नाही. बहुधा परिकथेतल्या परीसारखी ती गगनमार्गे आपल्या स्वप्ननगरीत भटकत असावी. तसंच तिला गाणी ऐकायलाही खूप आवडतात. गाण्याच्या लयीतच ती काम करत असते. मधूनच हवेत हात झुलवत ती गाण्यावर नाच करण्याचा प्रयत्न करते. या वेळी तिचे डोळे मिटलेले असतात. कधीकधी तर चक्क ती मीराबाई , चैतन्य महाप्रभु यांची नक्कल करते कि काय असंच वाटतं .
तसं शोभाताईबद्दल सांगायला गेलं तर शब्द कमी पडतील. म्हणून तिच्याबद्दल वाचण्यापेक्षा तिला अनुभवायलाच तुम्ही का येत नाही ?? शोभाताई ही वल्ली वहीमधील बंदिस्त शब्दांमध्ये अडकून राहारी नव्हे , तर सुंदर आयुष्यात पावलोपावली अनुभवण्यासारखीच आहे . थोडीशी चिडणारी ,थोडीशी चिथवणारी तरीही सर्वांच्या मनात राज्य करणारी !
Traditional Look with shobha Tai.jpg

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहिलं आहेस मृणालिनी. Happy
काहीतरी दीर्घलेखन करण्याचं मनावर घे. तुझ्या लिखाणातून तू केलेलं वाचन जाणवतं. पुढील लेखनासाठी शुभेच्छा!