गोष्ट

Submitted by अनन्त्_यात्री on 4 April, 2020 - 07:35

सजीव-निर्जीव-सीमारेषेवरच्या
अदृश्य अरिष्टानं
अख्ख्या मानवजातीला
मास्कवलं
तेव्हाची अतर्क्य गोष्ट

महासत्तांचे सूर्योदय
हतबलांच्या झुंडींनी
झाकोळून गेले
तेव्हाची नामुष्कीची गोष्ट

गगनविहारी गरुडांना
पंख बांधून घरकोंबडा
बनावं लागलं
तेव्हाची घुसमटलेली गोष्ट

कानठळी आवाजाची
झिंग चढलेले
दुखर्‍या शांततेने
वेडेपिसे झाले
तेव्हाची नि:शब्द गोष्ट

विरत जाणार्‍या
प्रदूषण धुरक्यातून
परागंदा पक्षी
बचावल्या झाडांवर परतले
तेव्हाची किलबिलती गोष्ट

झोप उडालेल्या डोळ्यांत
भविष्याच्या दु:स्वप्नानं
२४x३६५
ठाण मांडलं
तेव्हाची अंधारी गोष्ट

Group content visibility: 
Use group defaults