ये कौन आया रौशन हो गयी महफिल किसके नाम से

Submitted by अतुल ठाकुर on 30 March, 2020 - 11:56

75077930_2457611247827964_6802329002510909440_n.jpg

हिन्दी चित्रपटात “अमीर बापकी बेटीचे” लक्ष आपल्या कडे वेधून घेणारा “गरीब घर का नायक” आपल्याला सर्वांच्याच अतिपरिचयाचा आहे. पार्टी असेल मग तर पाहायलाच नको. आपला नायक गाणे म्हणणार आणि त्या गाण्यात नायिका आपल्याला कसे उपेक्षेने मारून राहिली आहे असा दुखडा गाण्याच्या मुखड्यात सुनावणार. त्या अमिराच्या घरी पियानो असणार आणि आपल्या गरीब नायकाला बाकी काही आले नाही तरी पियानो नक्की वाजवता येत असणार. असो. पण १९६८ साली आलेल्या साथी चित्रपटात हे सारे चित्र उलटे फिरलेले आहे. “ये कौन आया रौशन हो गयी महफिल किसके नाम से” म्हणणारी सौंदर्यवती आहे सिमी गरेवाल आणि तिला उपेक्षेने मारून राहिला आहे तो आपला ज्युबिली स्टार राजेन्द्र कुमार. अर्थात पार्टी अमिर लोकांचीच दिसते आहे.

पियानोवर सिमीची बोटं फिरतात आणि हँडसम राजेंद्रकुमार प्रवेशतात. यात हा ज्युबिली स्टार सुटमध्ये इतका देखणा दिसला आहे की “बा अदब बा मुलाहिजाच” म्हणावे. तो आला आणि त्याने जिंकले अशा चालीने साहेब येतात आणि लताची मधाळ स्वरातली आलापी ऐकू येते. त्या काही क्षणाच्या आ हा हा मध्येच लता संपूर्ण गाणे घेऊन गेली आहे. पार्टी आहे. आजुबाजुला मैत्रिणी आहेत. आपल्याला आवडणारे माणूस येथे येणार आहे. नव्हे आले आहे. आपल्या प्रेमाचे माणुस येणार असेल तर झालेल्या आनंदाने स्त्री असते त्यापेक्षा जास्तच सुरेख दिसते. अगदी तशीच नारिंगी आणि मोतिया रंगाची साडी नेसलेली सिमी आहे त्यापेक्षाही जास्त देखणी दिसते आहे. प्रियकर आल्याचा तिच्या चेहर्‍यावर आनंद तर आहेच पण एक लाजरे स्मितही सतत झळकते आहे. संपूर्ण गाणे सिमीच्या चेहर्‍यावर ते लाजरे हसू आहे.

अशावेळी लताचे “आ हा हा” सुरु होते आणि एकदम कारंजे उसळताना दाखवले आहे. जणू सिमीच्या हृदयात उसळलेले प्रेमाचे कारंजेच दिग्दर्शकाला पडद्यावर दाखवायचे आहे. या उसळलेल्या आनंदाला जर आवाज लाभला तर तो कसा असेल? अगदी लताने या गाण्यासाठी दिलेल्या आवाजासारखाच. आपलं प्रेमाचं माणुस आल्यावर आनंदलेल्या आवाजात जो प्रकाश असतो तो या गाण्यात लताच्या आवाजात आपल्याला ऐकू येतो. बाकी आपल्या नायकाचे या देखण्या आणि त्याचीच मनधरणी करणार्‍या नायिकेकडे लक्षच नाहीये. तो तिच्यासमोर थांबतो, तिच्याकडे कौतूकाने पाहतो. पण तिला त्याच्या चेहर्‍यावर खास तिच्यासाठी जे दिसायला हवे ते मात्र दिसत नाही. साहेब पार्टीतल्या इतर लोकांची वास्तपुस्त करीत राहतात. कदाचित म्हणूनच मजरूह सुलतानपुरी या गीतात लिहून गेले आहेत.

क्या कहीये इस आने को, आया है तरसाने को
देखा उस ने हँस हँस के, हर अपने बेगाने को
लेकिन कितना बेपरवाह है, मेरे ही सलाम से

नौशादचे या चित्रपटातले संगीत अतिशय श्रवणीय आहेच पण त्याच्या नेहेमीच्या स्टाईलपेक्षा वेगळेच वाटते. या चित्रपटातील मुकेशचे मास्टरपीस “हुस्ने जाना इधर आ, आईना हूं मै तेरा” मध्ये जुना नौशाद आपल्याला परत भेटतो. गाण्याच्या चाली गोड आहेत पण बरीच आधुनिक वाद्ये वापरलेली दिसताहेत. पण जे काही रसायन जमले आहे ते कर्णमधूरच आहे. फक्त वेगळे वाटते इतकेच. सिमीबद्दल काय सांगणार? कधी कधी वाटतं तिचं टिपिकल भारतीय न दिसणं तर तिच्या कारकीर्दीला मारक झालं नसावं? या अतिशय गुणी अभिनेत्रीला म्हणावा तसा वाव मिळालाच नाही. भुमिकांना पुरेसा न्याय देऊनही तिला मुख्यप्रवाहातही स्विकारले गेले नाही आणि समांतर चित्रपटही तिच्यापासून दूरच राहिले.

काहीही न बोलता आपल्या देखणेपणाने आणि नुसत्या सहज वावराने राजेंद्रकुमार सीन घेऊन जातो. त्याचे चालणे, हसणे, कोटाच्या खिशात हात घालून उभे राहणे सारेच देखणे. तो आल्यावर पार्टी जणु उजळून निघते. आणि सिमी म्हणते…मेरे घर में जैसे सूरज निकला है शाम से

अतुल ठाकुर

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अतुलजी नेहेमीप्रमाणे खूप सुंदर लिहिलंय. लहान असताना चित्रहार, छायागीत, रंगोली या कार्यक्रमात असंख्य वेळा हे गाणं ऐकलं, पण तुमचा लेख वाचून नव्याने गाणं समजलं. घर आवरताना अचानक लहानपणीच आपलं आवडतं पुस्तक हाती लागावं आणि पुन्हा ते आपण वाचून काढावं असं वाटलं हा लेख वाचुन.

सध्या घरीच असल्याने लेख वाचता वाचता गाणं पण ऐकून घेतलं Happy

धन्यवाद..

Mast lekh

सिम्मीला बघताच हे आधी कुठेतरी पाहिले व वाचले असल्यासारखे वाटले. म्हणून मुद्दाम शोधाशोध केल्यावर याच चित्रपटातील 'मेरे जीवनसाथी' गाण्यावरील लेख सापडला Happy Happy

लताबद्दल काय बोलणार? तिच्या सुरस्पर्शाने सामान्य गाणीही झगमगून उठत, इथे तर मुळातच सुंदर चाल व गीत असलेले गाणे..

हा लेख वाचायच्या आधी 'मेरे जीवनसाथी' लेख परत एकदा वाचला व नंतर हा वाचला. दोन्ही लेख जबरदस्त आवडले.

बिचारी सिम्मी. ह्या गाण्यातुनही तिला कळले नाही त्याच्या आयुष्यात तिला किती जागा आहे हे. पुढे जाऊन लग्नही केले. तिच्या बाजूने पूर्ण समर्पण, तर त्याच्या बाजूने पूर्ण अंधःकार. मेरे जीवनसाथी वाचून मी चित्रपट पाहिला होता. सगळी गाणी सुंदर आहेत.