कथाकथी - बालकथा - स्पृहतारका ( ऑडीयो कथा )

Submitted by सावली on 30 March, 2020 - 05:20

एक नविन प्रयोग!
खालील कथा गंमतगोष्टी ब्लॉगवर इथे ऑडीयो किंवा कथाकथन स्वरुपात ऐकता येईल.

सध्या कोरोना विषाणुच्या साथीमुळे सगळेच घरात आहेत, किंवा घरून काम करत आहेत. घरात राहीलं की मुलांनाही काहीतरी वेगळं हवं असतं, त्यांचा वेळ जात नाही पण त्याचवेळी पालकांना सतत मुलांबरोबर खेळणंही शक्य नाही त्यामुळे हा एक नविन प्रयोग !

काही बालकथा रेकॉर्ड करून पाहू असा विचार माझ्या डोक्यात आला आणि लगोलग ही कल्पना संजय नाईक यांच्या कानावर घातली, कारण ऑडियो रेकॉर्डिंगची माहिती तेच देऊ शकले असते. रेकॉर्डींग कोणी करायचं हाही प्रश्नच होता कारण सुस्पष्ट, सुरेख आवाज हवा, आणि अर्थात छान चढउतार , भावना आवाजातून पोचायला हव्यात! पण चक्क अ‍ॅड. माधवी नाईक स्वत:च या नव्या प्रयोगात सहभागी व्हायला तयार झाल्या, आणि ही कल्पना वर्कआऊट होणार असं मला वाटायला लागलं. सगळे बंद असल्याने आपापल्या घरीच काम करायचं होतं. संजय आणि माधवीताई यांनी लगेच मोबाईलवर दोन कथा रेकॉर्ड करुन पाठवल्यादेखील. स्टूडियो नसल्याने बारीकसरिक काही एडिटिंग लागलं तर घरी स्पृहा करू शकणार होती , ते तिने केलं देखील. पण तिला वाटलं की याला पार्श्वसंगीत आणि ऑडियो इफेक्टही द्यायला हवेत!! त्यामुळे तिने त्यावर अजुन काम केलं आणि पहिली ऑडियो फाइल तयार झाली. ती ब्लॉगवर शेअर करत आहे.
पहिलाच प्रयोग असल्याने चुका असतील, काही कमतरताही असतील तर त्या नक्की आमच्यापर्यंत पोचवा. म्हणजे पुढच्या वेळेस दुरुस्त करता येतील.
विशेष आभार - अ‍ॅड. माधवी नाईक आणि संजय नाईक

===================================

कथा - स्वप्नाली मठकर
कथाकथन - अ‍ॅड. माधवी नाईक
पार्श्वसंगित आणि संकलन - स्पृहा साहू

निसर्गकथा : स्पृहतारका

एक होतं घनदाट जंगल. गर्द हिरव्या दाट झाडांचं. जंगलातून जायला रस्ते सुद्धा नव्हते. सगळीकडे खूप झाडं, झुडपं आणि दाट गवत होतं.

अशा जंगलात एक छोटुकलं घर होतं. या घरात राहायची एक छोटी मुलगी 'किन्ना' आणि तिचे आईबाबा.  बाबा जंगलातल्या एका छोट्या माळावर शेती करत. बाबा शेतीवर गेले आणि आई घरकामात असली की ही छोटी किन्ना आसपास हुंदडत राही. तिला मित्रमैत्रिणी नव्हतेच. मग ती आपली जंगलातले असे हरीण, पक्षी यांच्याशी गप्पा मारी. त्यांच्या बरोबरीने धावाधाव करी. 
एकदा किन्नाच्या आईने किन्नाला सांगितलं "किन्ना, जंगलात जाऊन करवंद आणि बोरं मिळतात का बघून ये बरं जरा. "
जंगलात फिरायचं म्हणजे किन्नाचं आवडीचे काम. आई पुढे म्हणाली सुद्धा की "अगं नीट बघून जा. आणि उशीर करू नकोस बरं का."
पण हे ऐकायला किन्ना जाग्यावर असली तर ना! ती केव्हाच परडी घेऊन धावत निघाली होती. 
पुढे जाताजाता किन्नाला करवंदाच्या जाळया दिसल्या. पण तिथली करवंद आधीच संपली होती. म्हणून मग करवंदाच्या शोधात किन्ना पुढे पुढे चालत राहिली.  
असे चालता चालता संध्याकाळ झाली पण ते किन्नाच्या लक्षातच आले नाही.   अगदी अंधार पडून दिसेनासे व्हायला लागले तेव्हा मात्र ती भानावर आली. पण आता पहावे तिथे मिट्ट अंधार. काही म्हणता काही दिसेना. किन्ना खरतर थोडी  घाबरलीच. आता घरी कसं जाणार, आई किती वाट बघेल याची काळजी वाटायला लागली. 
तेवढ्यात कुणाच्या तरी पावलांचा आवाज ऐकायला येऊ लागला. किन्ना घाबरून झाडामागे दडून पहायला लागली. हळूहळू पावलांचा आवाज किन्नाच्या अगदी जवळ यायला लागला. बघते तर काय! एक काळा चांदण्याच्या टिकल्या टिकल्यांचा फ्रॉक  घातलेली मुलगी झपाझप चालत येत होती. तिच्या खांद्यावर एक छोटे, फुलपाखरे पकडण्याचे जाळे  होते. 
मुलीला पाहून किन्नाला धीर आला आणि तिने धावत जाऊन मुलीला गाठलं. असं अचानक कुणीतरी समोर आलेलं पाहून ती काळा फ्रॉकवाली खूपच दचकली. 
"कोण गं तू?, आणि इतक्या रात्री काय करतेयस इथे?" दचकून काळा फ्रॉकवालीने विचारलं. 
तसे किन्नाने लगेच आपण कसे चुकून जंगलात राहिलो ते सांगितलं.  आणि काळा फ्रॉकवालीला उलट प्रश्न केला "पण तू कोण आहेस? आणि इतक्या रात्री जाळं घेऊन कुठे जातेयस?"
तशी काळा फ्रॉकवाली गोड हसली "मी एक परी. तिथे पुढे डोंगराजवळ एक मोठ्ठा तलाव आहे ना, तिथे जातेय. "
किन्नाला गंमतच वाटली. 
"परी!! आणि चक्क मला भेटतेय? वा! पण तू इतक्या रात्री कशाला जातेयस त्या तलावाजवळ? मलातर आईने सांगितलंय कि तिथे अज्जिबात जायचं नाही. " 
किन्नाचा धीट पणा पाहून परी म्हणाली "चल माझ्याबरोबर. मी गम्मत दाखवते तुला. पण पटापट चल हां. आधीच तुझ्याशी बोलण्यात उशीर झालाय मला " 

तशी किन्ना परीबरोबर पटापटा चालायला लागली. होता होता त्या तळ्याजवळ पोचल्या. तिथल्या एका दगडावर परी बसली. आणि आकाशाकडे बघत राहिली. 
किन्नाला खरेतर कळेचना की परी करतेय काय! ती परीला काही विचारणार तोच आकाशातून एक चांदणी झुम्मकन आली आणि चक्क तळ्यातच पडली.  त्याबरोबर परीने घाईने आपलं जाळं टाकल आणि चांदणीला बाहेर काढलं. ती इवल्या इवल्या पंखांची भिजलेली चांदणी परीचे आभार मानत एका झाडावर जाऊन बसली. 
किन्नाला खूपच आश्चर्य वाटलं. पण पुन्हा एकदा ती काहीतरी विचारायला गेली आणि आधीसारखेच झाले. झालं! अजून एक चांदणी झाडावर बसली. थोड्याच वेळात झाडावर बऱ्याच चांदण्या गोळा झाल्या आणि झाड प्रकाशाने चमचमायला लागलं.

मध्ये थोडासा वेळ मिळाल्यावर परी म्हणाली 'अगं, या स्पृहतारका म्हणजे इच्छा चांदण्या!  या  इच्छा चांदण्या आकाशातून पडतात ना तेव्हा मागितलेल्या इच्छा नक्की पूर्ण होतात.  म्हणुन या चांदण्या पडताना दिसल्या की जगातली मुलं मनातल्या मनात आपली इच्छा मागतात.  या चांदण्या विझण्याआधी  मुलांची इच्छा पूर्ण करतात.  पण कधी कधी मात्र या स्पृहतारका  अशा चुकून पाण्यात पडतात.  त्यांना लगेच बाहेर काढावे लागते.  म्हणुन  माझ्या सारख्या पऱ्या  रोज रात्री इथे बसून पडणाऱ्या स्पृहतारकांना बाहेर काढतात.  आता त्या थोड्यावेळ स्पृहतारका वृक्षावर आराम करतील आणि त्यांच्याकडे मागितलेल्या इच्छा पूर्ण करून मग विझून जातील.  आता पुढच्या वेळी स्पृहतारका पडली ना, की तू तुला काय हवं ते माग बरं का! '

आपण काय बरं मागावं असा किन्ना विचार करत असतानाच आकाशातून एक स्पृहतारका खाली आली ती थेट पाण्यातच! तिच्याकडे बघता बघता किन्नाने मनोमन प्रार्थना केली की 'मला आत्ताच्या आत्ता घरी जाऊन आईच्या कुशीत झोपायचेय'. आणि दुसऱ्या दिवशी पहाटे किन्नाला जाग आली ती थेट आईच्या कुशीतच! 

#बालकथा
#गंमतगोष्टी
#कथाकथन
#कथाकथी
#ऐका
#कथाऐका
#ऑडियोकथा
#ऑडियोबुक
#ऑडियोब्लॉग
#marathiaudiobook
#marathikadha
#marathichildrenbook
#audioblog
#audiobook
#listenstories
#kathaaAika

Group content visibility: 
Use group defaults