प्रवासी मी उजेडाचा

Submitted by निशिकांत on 19 March, 2020 - 00:31

तुझ्या रागातही असतो कवडसा एक प्रेमाचा
असोनी वाट काळोखी, प्रवासी मी उजेडाचा

सुखाने पेलतो ओझे, ऋणी मी माय, बापाचा
न उतराई कधी होते, न हा मुद्दा हिशोबाचा

म्हणे राहू नि केतू त्रास देती सूर्य, चंद्राला
तयांना छंद जडला माणसांना का छळायाचा?

उशाशी घेतली स्वप्ने, कधी सत्त्यात आणाया
अधूरी राहिली पण नाद ना सुटला जगायाचा

खुला स्वच्छंद द्या माहोल कलिकेला फुलायाला
लढू द्या दुष्ट भ्रमरांशी, नको सल्ला लपायाचा

बसाया कुंपणावर; जो कुणी तरबेज असतो तो
सुखाने नांदतो अन् वाटतो याचा कधी त्याचा

"जगाला प्रेम अर्पावे" असे मी वाचले होते
जयाला आपुले केले, निघाला बेभरवशाचा

अहिल्या खितपतावी का, चरण स्पर्शास रामाच्या?
दिला ना जानकीला मान स्त्रीला उध्दरायाचा

अशी "निशिकांत" का दिसते तुला ग्रिष्मातही हिरवळ?
कलंदर बेफिकिर जगतो, नसे लवलेश दु:खाचा

निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३

Group content visibility: 
Public - accessible to all site users