पसारा

Submitted by सामो on 12 March, 2020 - 23:14

खोटं कशाला बोला, खरं तर शुद्ध आळसामुळेच घराची अवस्था 'पसाराच पसारा चोहीकडे' अशी होऊन बसली होती. नवरा हा प्राणी पसार्याला ताबडतोब कावणारा मिळालेला आहे. तर मी म्हणजे अगदी शेवटचा पर्याय म्हणून पसारा आवरते. मला किती का पसारा असेना ढिम्म फरक पडत नाही. chores चो-अ-र्स या शब्दालाच कसा कंटाळवाणा नाद आहे. चो-अ नंतरचा र्स येणारच नाही असे वाटते. कधी संपणारच नाही. तसाच पसारा कसा पसरट शब्द आहे, पसरलेलं मध्ये ताबडतोब काहीतरी पसरटलेलं असं डोळ्यासमोर येतं. मला स्वत:ला घर टापटीप ठेवणाऱ्या लोकांबद्दल मला प्रचंड आदर आहे. कशा काय याना प्रत्येक गोष्ट जागच्या जागेवर ठेवण्याची उत्तम सवय असते. खरं तर प्रत्येक वस्तूची जागा ठराविक असावी असा काही अलिखित नियम आहे का? असल्यास कोणी बनवला? त्या व्यक्तीला आयुष्यात कधीही surprise चा आनंद मिळालेला नसावा. ठराविक जागा नसल्यामुळे, वस्तू तासभर शोधावी लागणे व शोधाशोध करताना ती लब्बाड , अचानक सापडणे यात केवढा आनंद आहे. लहान मुलांना बुवा कुक खेळताना मिळतो तितका. या आनंदाला मी मुकू इच्छित नसल्याने माझ्या जागा ठरलेल्या नसतात. नवरा ड्डबल कन्या रास असलेल्या आईच्या तालमीत वाढलेला असल्याने, तो अशा बुवा कुक खेळात at बेस्ट कावराबावरा होतो व at worst त्याचं मस्तकशूळ उठतं.
तर मला गोडीगुलाबीने सांगून झाले, लालूच दाखवून झाली शेवटी धाकदपटशा , भांडणावरती गाडी आली. मलाही ब्राउजिंग करता येईना, कि तंगड्या ताणून शांतपणे टी व्ही पहाता येईना, पुस्तक वाचता येईना की स्तोत्रे म्हणता येईनात अशी आणीबाणीची परिस्थिती घरात निर्माण झाली. तेव्हा ठरवले की सोक्षमोक्ष लावून टाकायचा. होऊ देत समाधान. म्हणता ना सारी दुनिया एक तरफ और जोरु का भाई एक तरफ तसे घरका सारा पसारा एक तरफ और स्वयंपाकघरका पसारा एक तरफ असे असते. मग तिथूनच मोहीम सुरु केली. मसाले, तिखट, हळद बरण्यांत भरता येतात पण त्याकरता आधी अडगळीत टाकलेल्या रिकाम्या बरण्या शोधाव्या लागतात. नंतर तरी जर काही पुडी, मसाले उरले तर ते नीट rubberband लावून ठेऊन द्यावे लागतात. वाळत घातलेली भांडी तर सतत नवीन पडणाऱ्या भांड्यांमुळे सतत सचैल स्नान झालेल्या अवस्थेतच ओली असतात. बरं हवेवर वाळवायची इच्छा असते कारण पर्यावरणाची काळजी उगीच पेपर टॉवेल नासून अजून एक गिल्टी फीलिंग नको. पण म्हटलं एअर ड्राय करण्यापेक्षा पुसून जागेवरच लावून टाकू. ओटा तिन्ही त्रिकाळ पीठ तिखट हळदीची रंगपंचमी खेळात असल्यामुळे कायमस्वरूपी 'रंगीला' बनलेला आहे मग किती का घासा. खरं तर काम करताना मला विविधभारती लागते. म्हणजे अन्न-वस्त्र निवाऱ्याइतकीच tangible मानसिक गरज आहे ती. तेव्हा गाणी ऐकत आज आवरा आवर करत होते. गाण्यावरुन आठवलं "घर असतं दोघांचं एकाने पसरलं तर दुसऱ्याने आवरायचं" वगैरे गाणी त्याला माहीतच नाहीत, मी घातला पसारा तर याला आवरायला काय जातं - अशी तणतणही मनातल्या मनात चाललेली होती. खरं तर टापटीपीकरण हा गंभीर आजार आहे. हे लोक सतत आवरायच्या ध्येयाने झपाटलेले असतात. ना स्वत: जगतात ना दुसर्‍याला जगू देतात. नवर्‍याला डॉक्टरला दाखवायलाच पाहीजे , प्रकरण हाताबाहेर जात आहे, अशी खूणगाठ बांधत, पुढच्या काही आठवड्यांचा कोटा पूर्ण करत आज काम केलं खरं. पण म्हटल हा मानसिक छळ इथे मांडावा Wink

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त लेख सामो. माझ्या घरच्यांना काय त्रास होत असेल माझ्या आवराआवरीचा, ते समजलं :स्मित :

प्रकाटाआ.

मस्त लेख सामो ताई ,मलापण वह्या पुस्तके पसरून बसायची सवय आहे. मग झोपताना गठ्ठा करून ठेवते.पण काही दिवसांनी अचानक उपरती होऊन आवरते सुद्धा. चार दिवसांनी येरे माझ्या मागल्या Happy

विनोदी असेल तर ठीक आहे पण तरी मला काही झेपला नाही लेख. Lol

<<<<मसाले, तिखट, हळद बरण्यांत भरता येतात पण त्याकरता आधी अडगळीत टाकलेल्या रिकाम्या बरण्या शोधाव्या लागतात. नंतर तरी जर काही पुडी, मसाले उरले तर ते नीट rubberband लावून ठेऊन द्यावे लागतात. वाळत घातलेली भांडी तर सतत नवीन पडणाऱ्या भांड्यांमुळे सतत सचैल स्नान झालेल्या अवस्थेतच ओली असतात. ........ ओटा तिन्ही त्रिकाळ पीठ तिखट हळदीची रंगपंचमी खेळात असल्यामुळे कायमस्वरूपी 'रंगीला' बनलेला आहे मग किती का घासा. >>>>>. धन्यवाद Lol

मी घरात पाय ठेवल्या ठेवल्या किती पसारा आहे बडबडत असते ब्याग ठेवुन पहिले पसारा आवरते माझे घरचे खुप कन्टाळलेत मला कधी लग्न करुन जाते हे बघतायत...

मस्त लेख सामो. माझ्या घरच्यांना काय त्रास होत असेल माझ्या आवराआवरीचा, ते समजलं >>+१
माझा नवरा पण मला डॉक्टरला दाखवायला नेईल असं वाटतंय! Lol

घरात थोडा तरी पसारा हवाच. त्याशिवाय घराला घरपण कस येणार? "घराला घरपण देणारी माणस!" Wink Lol

मला एका पाँइंटनंतर घरातला पसारा असह्य होतो. विशेषतः किचनमधे तरी. Happy

Samotai... mazi pan paristhiti.. thodishi tumchyasarkhich ahe.... navra .. kanya raas..mag .. wardrobe dept tychyakade dile.. N kitchen mazyakade..... n navryala sangitaly.... pasara nasel tar mala phar ekte ekte vatate......pasara asel tar ghar bharlyasarkhe vatate....tyne kapalavar haat marun ghetala....

कोण म्हणते की कन्या रशीचे टापटिपीचे असतात म्हणून?कपाटात कोंबायचे आणि दार लावायचे.मग कुठे काही पसारा नाही. परवाच माळा साफ करून घेतला.कन्यावाल्याने,काय काय कोंबले होते ते काढून घेतले.उलट आता परत याला मोकळा माळा मिळाला म्हणून धास्ती वाटतेय.

मी तुमच्या नवर्‍याच्या गटातला आहे! हाती घेतलेली गोष्ट परत जागच्या जागी कशी ठेवता येत नाही? ह्या मताचा आणि आचरणाचा. बाहेर जाताना सगळं आवरुन दारात सगळे चपला चढवून उभे असताना मग किल्ली शोधत बसणे वगैरे प्रकार माझा पारा चढवतात.
त्यामुळे विनोदी ढंगानी लेख लिहिला असलात तरी दुखर्‍या नसेवर बोट ठवलं आहेत त्यामुळे माझ्या सदिच्छा तुमच्या नवर्‍याला Happy

माझी कर्क आहे पण फक्त कर्केचे दुर्गुण आहेत माझ्यात, रडी वृत्ती, क्लिंगी वगैरे. चांगले गुण जसे उत्तम पाककला वगैरे झिरो Sad

>>>>मी तुमच्या नवर्‍याच्या गटातला आहे! हाती घेतलेली गोष्ट परत जागच्या जागी कशी ठेवता येत नाही? ह्या मताचा आणि आचरणाचा. बाहेर जाताना सगळं आवरुन दारात सगळे चपला चढवून उभे असताना मग किल्ली शोधत बसणे वगैरे प्रकार माझा पारा चढवतात.>>>> वर्क फ्रॉम होम मुळे सध्या त्याच्या टापटिपीचा हेडेक झालाय मला Lol

मस्त लेख! पसारा म्हणजे एकदम जिव्हाळ्याचा विषय ! घरात ह्यावरून घडलेल्या अनेक नाटकांचे अंक आठवले...
बाकी स्वयंपाक करताना मला पण विविधभारती लागते, किंबहुना प्रभात वंदनेने माझा दिवस सुरू होतो :))

खुसखुशीत लिहिलंय सामो, किचन कट्टा आणि टेबल आवरायचा मला फाSर फाSर कंटाळा येतो. कुणाकडे गेलं आणि मोकळा किचन कट्टा, टेबल बघितलं की मला त्या गृहिणीचा अगदी हेवा वाटतो . मग पुढचे 2 दिवस माझ्यातही ती गृहिणी संचारते परत पहिले पाढे पंचावन्न.