मोकळ्या जागा आणि सामाजिक सौंदर्यदृष्टी

Submitted by मामी on 10 March, 2020 - 09:41

शहरीकरण, आधुनिकीकरण आणि पैशाच्या हव्यासेपायी मोठा बळी पडलेला विभाग म्हणजे मोकळ्या जागा. शहरंच काय निमशहरं आणि मोठी गावं देखिल त्यांच्याकडच्या मैदानी जागा, बागा, वनांचे पुंजके, ओढे, नद्या, टेकड्या, मोकळा परीसर हे झपाट्यानं गमवत आहेत. अश्या ज्या काही (अजून पर्यंत धुगधुगी राखून असलेल्या) जागा आहेत त्यांच्यावर हावरट बिल्डरांची नजर कधी पडेल, सरकारी बाबूंचे हात कधी ओले होतील आणि गरजेच्या नावाखाली एक विटांची चळत कधी उभी राहील काही सांगता येत नाही. मग ती वस्तीची बिल्डिंग असो, ऑफिसची इमारत असो की मॉल असो. या आधुनिकीकरणाच्या अदृश्य वरवंट्याखाली सगळ्या समाजाच्या हक्काच्या पूर्णपणे मोफत, मोकळा अवकाश देणार्‍या आणि समाजाला एकत्र आणणार्‍या जागा भरडल्या जात आहे हे नक्की.

खरं तर अशा कम्युनिटी स्पेसेसची किती गरज असते समाजाला. या ठिकाणीच माणसं एकत्र येतात, एकमेकांशी संवाद होतात, मनं मोकळी होतात, विचारांची देवाणघेवाण होते, सुखदु:ख वाटली जातात, लहानथोर- स्त्रीपुरुष असे सर्व गट, सर्व समुह एकत्र येऊ शकतात. समाज एकसंध राहण्यास मदत होते. मुलांना खेळायला जागा मिळते, ऊर्जेला सकारात्मक आणि रचनात्मक वाट मिळते.

कम्युनिटी स्पेसेस म्हणजे मॉल नव्हे. तिथेही आपण ठरवून भेटतोच म्हणा. काहीजण तर एसीमध्ये आणि स्वच्छ ठिकाणी फिरण्याचे ठिकाण म्हणून मॉलकडे बघतात हे देखिल माहित आहे. पण मॉलतर सगळ्यांना माहित असतातच. त्यामुळे या धाग्यापुरत्या आपण कम्युनिटी स्पेस म्हणजे मोकळ्या जागा, सार्वजनिक वाचनालयं, मोफत अभ्यासिका असं धरून चालू.

या अश्या जागा राखल्या गेल्या पाहिजेत खरंतर. वाढती लोकसंख्या आणि त्यांच्या वाढत्या गरजा पुर्‍या करण्यासाठी जागा लागते हे अगदी कबुल. पण त्यासाठी दुसरे काही पर्याय असतील तर ते आधी शोधावेत. असो. हा विषय फार किचकट आहे. त्यावर अनेकवेळा अनेक मुद्दे मांडले गेले आहेत.

या धाग्यात आपण आपल्या आजूबाजूच्या, आपल्या माहितीतल्या अश्या जागा इथे नोंदवूयात का? म्हणजे इतरांनाही त्याचा फायदा होईल.

वाढत्या गर्दीचा अजून एक परिणाम म्हणजे वाढता बकालपणा. घाण, कचरा, पडझड झालेल्या वास्तू तशाच पडून राहणे, नाहीतर मग दुसरं टोक गाठून सौंदर्यदृष्टी न दाखवता केलेली डागडुजी, पुनर्निर्माण आणि रंगरंगोटी ... थोडक्यात aesthetics धाब्यावर बसवलं जातं. किंबहुना भारतीय समाजाला Community aesthetics कशाशी खातात याची अजिबात कल्पना नसते. कारण माझं घर हाच माझा परिसर अशी विचारसरणी असते. आपलं अंगण झाडून स्वच्छ झाल्याशी कारण. दुसर्‍याच्या दाराशी कचरा लोटला म्हणून काय झालं? पण अशा या गलबल्यातही काही आशेची बेटं अचानक लख्खकन चमकून जातात. कोणीतरी सौंदर्यदृष्टी दाखवून ती जागा सजवलेली असते, त्या जागेची काळजीपूर्वक निगा राखलेली असते. तो छोटा का होईना पण कोपरा हसरा दिसतो आणि मग बघणार्‍याला किती आनंद मिळतो यामुळे.

अशा काही जागा, कोपरे माहित आहेत का तुम्हाला असतील तर इथे नक्की नोंद करा. कितीही छोटी जागा, छोटा कोपरा, छोटा इनिशिएटिव्ह असला तरीही त्यांची दखल घेणं गरजेचं आहे. यानिमित्ताने आपलाही परिसराकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलू शकतो.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

श्चिमेला Jewel of navi mumbai शेजारी सुद्धा अतिशय शिस्तबद्ध वृक्ष लागवड केली आहे >>> इंटरेस्टिंग वाटतंय.

मामीचा अजुन एक वेगळ्या विषयावर छान धागा. छान माहिती जमली.
रायगड पाहिलाय तो. फार आवडला होता. उगाच तिथे कचरा जमला असता नाहीतर.

छान लेख आणि प्रतिसाद. इतक्या छान जागा शहरात तयार केल्या आहेत आणि छान व्यवस्थापन केले जात आहे हे वाचून खूप सकारात्मक वाटलं.

सुरेख आहे ती बाग. तिथे कधी कधी काही प्रोग्रॅम्सही होतात.>>> मामी, जिथे प्रोगाम्स होतात, जसे काला घोडा फेस्टिव्हलचे काही कार्यक्रम होतात हल्ली ते हाॅर्निमन सर्कल नाही. तुम्ही जे उद्यान सुचवत आहात ते चर्चगेट स्टेशनच्या बाजुचे. पूर्वी तिथे सर्कस यायच्या नंतर अगदीच बकाल झाले होते. पण पाच -सहा वर्षापुर्वी महापालिकेने त्याचे सुशोभिकरण केले. बहुतेक त्याचे नाव क्राॅस मैदान असावे.

होय, पूर्वी हर्निमन सर्कल ला ओपन थिएटर होत आणि तिथे सुट्टीत बालरंगभूमीची नाटक होत असत.

हल्ली मामी म्हणतेय तसे प्रोग्रॅम होत असतील पण मला त्या बद्दल exact माहिती नाही।

शहरातल्या मोकळ्या जागा जोपर्यंत कुंपण घालून कोणीतरी 'ताब्यात' घेत नाही तोवर त्या कचराकुंड्या. कटू सत्य हेच.
द अग्ली इंडियन सारख्या अनेकांची खूप गरज आहे.

@ अमा,
... पिज्जा बाय द बे. पासून चालत चालत एन सी पी ए.. समोर मारिन ड्राइव्ह ...
तो दक्षिण मुंबईचा सर्वात आवडता भाग.

हॉर्निमन सर्कलचा उल्लेख आलेलाच आहे. तसेच कुलाब्यातले (प्रेसिडेंट हॉटेलजवळचे) कुलाबा वूड्स आणि बॉम्बे पोर्ट ट्रस्टची बाग. प्रचंड गर्दीच्या दक्षिण मुंबईत सुखाची बेटे. आता कुलाबा वूड्सचा काही भाग तिथून मेट्रो जाणार म्हणून काँक्रीटचा होतोय.

नवी मुंबईत CBD बेलापूरला कोंकण भवन च्या बरोबर विपरीत बाजूला एक मोठी बाग छान राखली आहे. थोडे आतवर ३-४ आणखी छोट्या बागा आहेत, स्वच्छ आणि टापटीप. बागेतील झाडे मात्र देशी नाहीत, ते एक वाईट.

विषय अगदी पटला. बंगलोरला 'द अगली इंडिअन' नावाच्या एक संस्थेने लोकपुढाकारातून खूप स्वागतार्ह असे aesthetic बनवायला सुरुवात केली आहे, ते पण घाणेरड्या जागा सुधारून. सध्या त्यांचा आवाका जरी छोट्या पातळीवर असला, तरी अनेक वर्षे टिकणारे (डिझाईन च असे आहे की लोक सहसा घाण करत नाहीत पुन्हा, हे कसे साधले हे वाचण्यासारखे आहे) सस्टनेबल मॉडेल तयार केले आहे. त्यांचा प्रभाव एवढा वाढला की सध्या बंगलोर महापालिकेला त्यांना सोबत घेणे भाग पडले आहे. अनेक इतर शहरात देखील त्याचे रिपीटीशन लोकांनी करून पाहिले आहे. त्यांचे फेबु पान नक्की बघा.>>> भारी आहेत न त्यांचे उपक्रम!

तुम्ही 'द वाईल्ड अरेना' या नवीन प्रकल्पाविषयी बोलत आहात का? त्या विषयीच छोटंसं लिखाण आणि फोटो टाकते. (माझं या कामात काहीही क्रेडिट नाही.)

भिकारी, बेघर वस्ती;
गांजा नशेडी अड्डा;
जो कोणीही उचलत नाही, असा कचरा फेकण्याची जागा;
भरकटलेल्या किंवा धुमसत असलेल्या तरुणाईची ग्राफिती करायची जागा;
हिजड्यांचा-कॉल गर्ल्सचा गिऱ्हाइकं पटावण्याचा अंधारा आडोसा;
फुकटात मुतायसाठी पिलर्समागच्या खुल्या मुताऱ्या;
नवीन रिलीज झालेल्या जाहिरातींची पोस्टर फुकट उंच ठिकाणी चिकटवायची जागा....

अर्थात 'पुलाखलाच्या जागा' हे चाणाक्ष वाचकांनी ओळखलंच असेल.

शहरं मोठी होताना, मोकळ्या जागा - सार्वजनिक जागा कमी होत जातात. अशात पुलाखालच्या जागा नुसत्या मोकळ्या पडून असल्याने, सर्व प्रकारची घाण व निषिद्ध कामं करण्यासाठी याच जागा लोकं वापरतात.

पण बंगलोरमध्ये मात्र काहीतरी वेगळं घडतंय.

तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की भारतातल्या आकारमानाने दुसऱ्या नंबरवर व लोकसंख्येने तिसऱ्या नंबर वर असणाऱ्या बंगलोर शहरात मात्र 40 पैकी 30 फ्लायओव्हरखालच्या जागा स्वच्छच दिसतात व तिथल्या पिलर्सवर एकही पोस्टर अथवा जाहिरात दिसत नाहीत.

हे कसं घडलं?

बंगलोरच्या 'India Rising Trust' ने अशा जागा स्वच्छ व सुंदर बनविण्याची आणि राखण्याची जबाबदारी स्वयंप्रेरणेने उचलली. 2015 ते 2016 या काळात 25 फ्लायओव्हरखालच्या स्वच्छ केल्या. त्या जागा नेटक्या व रिस्पेक्टेबल वाटाव्यात याकरता पुलांचे खांब व पुलांच्या भिंती एका विशिष्ट पॅटर्नने रंगविल्या. यासाठी
परवानगी - सरकार व आजूबाजूच्या लोकांची.
पैसे - आजूबाजूच्या व्यावसायिक कंपन्यांच्या CSR फंडाच्या डोनेशनचे.
मनुष्यबळ - प्रत्यक्ष शहराचे नागरिक.
अशा पद्धतीने काम केलेल्या या जागा नुसत्या स्वच्छसुंदर टिकल्या नाही, तर सरकारनी पण याची नोंद घेऊन लोकांसाठी विविध सोयी आणि स्वच्छतेच्या कामासाठी लागणारी साधनं व व्यवस्था उपलब्ध करून दिली. लवकरच सार्वजनिक उद्यानांप्रमाणेच हे फ्लाय-ओव्हर 'adopt-a-flyover' अशा योजनेतून स्वच्छता व सौन्दर्यवृद्धीसाठी प्रायव्हेट कंपन्या व सामाजिक संस्थांना देण्याचा उपक्रम बंगलोरच्या महानगरपालिकेने सुरू केला आहे. त्याच्या नियम व आराखड्याविषयी आम्ही सरकारला सल्ला व साहाय्य पुरवत आहोत.

या प्रोजेक्टच्या अधिक माहितीसाठी सोबत लिंक पाठवत आहे.
http://theuglyindian.com/PPS/ProjectUFO/

आता गेल्या 2 वर्षांत India Rising Trust ने या जागा या लोकांना वापरण्यासाठी सोयीस्कर अशा वेगवेगळ्या संकल्पना घेऊन साकार करण्यास सुरुवात केली आहे.
मला सांगण्यास अभिमान वाटतो कि सार्वजनिक जागांमधील स्वच्छता व रखरखाव याविषयीच्या सामाजिक समस्या सोडविण्यासाठी मी या संस्थेत Chief Design Officer म्हणून सुरुवातीपासून काम करतो आहे.

५ फेब्रुवारी २०२० रोजी आम्ही फ्लायओव्हरखाली उभारलेल्या आमच्या पहिल्या ‘थीम पार्क’चं उदघाटन बंगलोर शहराच्या कमिशनरने केलं.

कर्नाटक हा वन्य संपदेच्या बाबतीत जगात अव्वल व एकमेवाद्वितीय आहे ह्या वस्तुस्थितीची कल्पना लोकांना होत राहील, यासाठी कायमस्वरूपी प्रदर्शन होईल असं थीम पार्क, आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जाणाऱ्या मार्गावरील 'वीरणापाल्या' या फ्लाय ओव्हरखाली बनवलं. यात वापरलं गेलेलं लाकूड, काँक्रीट पेवर्स, व लोखंड हे 90% प्रमाणात रिसायकल्डच वापरलं. पाण्याचा अवास्तव वापर टाळण्यासाठी आर्टिफिशल लॉनचा वापर केला आहे.

धन्यवाद!
अनिरुद्ध अभ्यंकर

माटुंग्यालामेहता उड्डाणपुलाखालील जागेत चालायला छान वॉक वे केलाय . ( महेश्वरी सर्कल टू रुईयाचा सिग्नल)
नाहीतर पुलाखालच्या जागा नुसत्या वाया गेलेल्या असतात. >> वर्षा, हो हो. खूपच छान झालीये ही जागा. आणि अनेकजणं ही वापरतात हे बघून आनंद होतो.

इस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर ठाण्याहून मुंबईकडे येताना भांडूप नंतर डाव्या हातालाच मीठागरं लागतात तिथे भांडूप उदंचन केंद्र (Pumping Station) आहे. तिथून आत जाणार्‍या वाटेनं गेलं की खाडी लागते. ही जागा पक्षी निरीक्षणासाठी प्रसिद्ध आहे.
https://goo.gl/maps/96PBwAm7q4rfigHv6

आयरोळीलाही एक Coastal & Marine Biodiversity Centre आहे. तिथे फ्लेमिंगो पक्षी बघता येतात. त्यासाठी होड्यांतून आत जाण्याचीही सोय आहे.
https://goo.gl/maps/u2fxzKS1jDjeR84d9

Pages