करोना, काँग्रेस आणि आमचे अण्णा !

Submitted by Charudutt Ramti... on 8 March, 2020 - 04:20

"करोनाचे विषाणू श्वासावाटे पसरतात आणि करोनाची बाधा झाल्यास त्यावर औषध अथवा लस उपलब्ध नाही, काळजी घ्या, पण “घाबरून जायचे” कारण नाही! - आरोग्य खात्याकडून येणारी अशी सरकारी निवेदनं वाचली, की काळजी, चिंता आणि भीती वाटण्यापेक्षा, सरकारी कर्मचाऱ्यांच्या, विशेतः आरोग्य खात्यातील ह्या अश्या जाहिराती आणि निवेदनं लिहिणाऱ्यांच्या अंगी असलेल्या उपजत विनोद बुद्धीचे कौतूक करावेसे वाटते.

पुण्यातल्या पेठेत टिळक स्मारक मंदिर हुन चालत पाच मिनिटांवर (आणि टु व्हिलर वरून दहा मिनिटांवर ) असणाऱ्या खजिना विहीरच्या लगत डाव्या बाजूच्या गल्लीत एक टपरी वजा दुकानगाळा आहे. त्यावर "दणकट पायजमा अर्जंट शिवून मिळेल : 'बुचडे' टेलर्स", असा बोर्ड आहे. इतर जगाशी अजिबातच संपर्क नसलेल्या शिलाई मशीनच्या मागे बसून आयुष्य काढणाऱ्या त्या बुचडे टेलर ला, अचानक जर एके दिवशी 'पॅरिसच्या फॅशन शो'मध्ये कॅटवॉक करणाऱ्या साडे ६ फूट उंचीच्या मॉडेल्स चेअत्यंत तंग आणि तितकेच तोकडे कपडे शिवायचं समजा जर विदेशी कंत्राट मिळाल, तर तो जसा रिऍक्ट करेल? तशीच काहीशी रिऍक्षन, सध्या सरकारी आरोग्य खातं देत आहे. आयुष्यभर, आपलं कॉलरा, जंत, पटकी, गजकर्ण, वांत्या आणि खरूज वगैरे अत्यंत सुमार आणि एकंदरच अजिबात 'ग्लॅमर' नसलेले देशी आजार आटोक्यात आणण्यात अपयश प्राप्त असं हे आमचं आरोग्य आणि समाज कल्याण खातं. एकदम आता जागतिक "नॉव्हेल करोना व्हायरस" ह्या (फक्त) नावातंच ग्लॅमर असलेल्या साथीच्या आजारावर हल्ला चढवण्याची संधी त्यांना प्राप्त झालेला आहे. त्यामुळे "आतापर्यंत ह्या आजाराने चीन मध्ये आणि इतरत्र जगात साडेतीन हजार लोकांचा बळी घेतला आहे पण “घाबरून जाण्याचं अजिबातच कारण नाही!" वगैरे अशी हास्यविनोद सदरातील विधानं ते सध्या करत सुटले आहेत.

पूर्वी बरं होतं. रोग हे अगदी स्थानिक पातळी वर असायचे. "साथ पसरली आहे" ह्याचा अर्थ शेजारी पाजारी सर्दी पडसे आणि तापाचे रुग्ण आहेत असा होता. आता ‘साथ पसरते ती सरळ एका उपखंडातून दुसऱ्या उपखंडात. देशोदेशीच्या सरकारांनी चीन ला पाठवलेली विमानं काय? जपान आणि चीन ने समुद्रात पंधरा पंधरा दिवस क्वारंटाईन केलेली जहाजं काय ? केवळ विदेशी कंपन्याच नव्हे , तर जग जवळ आले, जग जवळ आले म्हणत म्हणत आता H1N1, SARS आणि आता करोनाचे विषाणूसुद्धा एकविसाव्या शतकात आपणही लवकरात लवकर आपले ग्लोबलाझेशन केले नाही, तर वाढत्या स्पर्धेत आपला टिकाव लागणार नाही असं समजून चक्क जगभर रोगराई प्रसरवत आहेत. पण ह्या गोष्टीला सगळ्यांचाच ना’ईलाज’ आहे.

खरं सांगायचं तर ह्या चिन्यांनी एकंदरच जगासाठी नसती उठाठेव करून ठेवलेली आहे. वटवाघळं ही काय खाण्याची गोष्ट आहे? तिकडे म्हणे 'वुहान' (चीन मधल्या ह्या 'वुहान' गावाचं नाव हल्ली आपल्याकडची अगदी अशिक्षित माणसं सुद्धा 'वडगांव' किंवा 'चिंचणी' ह्या गावाची नावं एखाद्यानं ज्या आत्मविश्वासानं घ्यावी त्याच आत्मविश्वासानं ह्या वुहान गावाचं नाव घेतात, तिथल्या ग्रामपंचायतीचे किंवा पंचायत समितीचे आपण जणू सदस्यच असल्या सारखे ) असो, तर वुहान मध्ये काय म्हणे वागवाघुळ खातात हे चिनी लोक.

म्हणजे मला कधी कधी वाटतं, तिकडे वुहान मधेच काय? एकंदरीतच संबंध चीन मध्ये कोणत्याही गावी गेलात, तरी शेजारी शेजारी राहणाऱ्या दोन गृहिणींमध्ये साधारणपणे असा संवाद घडत असेल…

“काय मग? आज काय नाश्त्याला तुमच्याकडे?” - पहिली गृहिणी.

“अगं काय सांगू तुला, परवाची तीन चार उंदरं तशीच शिल्लक आहेत फ्रीझ मध्ये. त्यांना शेजवान फोडणी घालावी म्हणते. आणि हा आमचा पिटुकला 'ली' त्याला फार आवडतात फोडणीची उंदरं.” - दुसरी गृहिणी.

“अग्गो बाई उंदरांवरून आठवलं, अगं तुला पीठपेरून ती झुरळांची परतून भाजी करतात ती येते कां गं? अगं आमच्या ह्यांनी परवा ऑफिस मध्ये डब्यात कुणी तरी आणलेली खाल्ली. आणि माझ्या मागेच लागले, पीठ पेरून झुरळांची भाजी कर भाजी कर म्हणून...” - पहिली गृहिणी.

" नाही बाई , थांब यु ट्यूब वर पाहू, पण माझ्या माहेरी तव्यावर नुसतं तेल ओतून परतायचं वटवाघळांचं भरीत करतात - ते मला येतं , सांगेन मी तुला रेसिपी, छान लागतात परतलेली वटवाघळं अशी नुसती, थोडी तांबूस होईपर्यंत परतायची आणि चवी साठी वर थोडी कांद्याची पात चिरून घालायची, रुचकर लागतात अगदी. " - दुसरी गृहिणी.

असला काहीतरी संवाद.

किंवा नाहीतर मग त्या चिन्यांच्या कडे घरगुती वाद पराकोटीला गेला तर भरल्या घरात भांडण करून कुणी तरणा ताठा रागारागाने बाहेर पडत असला की त्याला घरातली मोठी माणसं "अरे बाळा फुंग सू असा भरल्या घरातून उपाशी पोटी डोक्यात राग घालून बाहेर पडू नको बाबा, अरे बाहेर जाण्या आधी दोन पाली तरी तोंडात टाक, किंवा डब्यातून हिरव्या बेडकांच्या वड्या केल्यात त्या तरी घेऊन जा दोन चार..." असं म्हणत असतील कदाचित.

आता मला सांगा - जर अश्शी उंदरं आणि वटवाघळं जर कुणी परत्तून खात असेल तर अश्या लोकांना तो काय म्हणतात तो जीवघेणा"नॉवेल करोना व्हायरस" होईल नाहीतर काय, आपल्याकडे अति गोड खाऊन होतो तसा गोड गुलाबी गोंडस मधुमेह होईल ?

एकीकडे ही वटवाघळांची थियरी, तर दुसरी कडे बायोलॉजिकल व्हेपन ची थिअरी. "हे चिन्यांचं बायोलॉजिकल व्हेपन आहे" असं कुणी म्हंटल की मला पूर्वी आमच्याकडे रस्त्याच्या कडेकडेने भरमसाठ काँग्रेस गवत उगवायचं त्याची गोष्ट आठवते.

गावाकडे आजोळी गेलं की गल्लीतले एक्यांशी पार केलेले जुने आजोबा, दुटांगी नेसलेल्या धोतरात नीटस पणे अडकवलेली तंबाखूची चंची उघडत आणि त्यात अर्धाइंची डबीतला ओला चांगला भिजवलेला चुना उजव्या अंगठ्याच्या नखानं उकरत, तो तळहातावरच्या तंबाखूच्या छोट्याश्या टेकडीवर मळत मळत मस्त पूर्वीच्या काही औत्सुक्यपूर्ण अश्या गोष्टी आणि हकीकती सांगायचे. आम्ही उन्हाळ्याच्या सुट्टीत गावी आजोळी आलेली चार पांच शाळकरी पोरं आणि आजोबांच्या शेतावर कामास असलेली दोन तीन अशिक्षित पण पदरी उत्सुकता बाळगणारे शेतमजूर, सोबतीला शेपूट हलवत अण्णांच्या पायाशी लगट करणारा 'राणा' - शेतातला अण्णांचा अत्यंत पाईक असा पाळलेला गावठी कुत्रा.

" एक्कात्तर ला मोट्टा दुष्काळ पडला, त्यावेळी काँग्रेसनं अमेरिकेतून 'घौ' आयात केला 'घौ' ! " - जी. पी. सिप्पीनं किंवा रमेश सिप्पीनं, अमिताभ बच्चन ला आणि धर्मेंद्रला सिनेमाचं शूटिंग सुरु करण्यापूर्वी शोलेची कथा सांगण्यास सुरुवात करावी त्या पद्धतीनं आजोबा आजोबा चक्क फिल्मी पॉज-बीज घेत कथेची नांदी घालत.

" अण्णा 'घौ' का ओ 'घौ'? , जोंधळं खायचं नं गांवाकडली लोकं समदी तवा!" एक बिचारा अशिक्षित शेतमजूर आपली शंका व्यक्त करतो न करतो तोच दुसरा त्यातला त्यात इयत्ता दोन पर्यंत बुकं शिकलेला दुसरा मजूर त्याच्या डोक्यात टपली मारी.

" आरं , म्हाsssद्याssssss , अमरिगंत काय जोंधलं पिक्त्यात व्हयं गाडवा? उद्या विचार्चील अमरिगंत हुर्डा पार्टी बी करत्यात का? म्हून "

मग शिरपाच्या ह्या ग्राम्य विनोदावर एक जोरदार हश्या पिके.

“ ए म्हाद्या, उगा मदी मदी दिष्टर्भ करू नको , अन्ना तुमि सांगा वं म्होरली गोष्ट. ” अण्णांच्या गोष्टींचा अजूनेक फ्यान असलेला गावकरी.

मग अण्णा त्यांची गोष्ट कंटिन्यू करायचे. गोष्ट साधारण अर्धा पौण तास चालायची.

" शास्नानं सरकारी स्वस्त धान्य दुकानात म्हणजेच रेशनच्या दुकानांमध्ये दुष्काळ ग्रस्तांना अत्यंत "रास्त" भावात हा "घौ" उपलब्ध करून दिला. "

" अन्ना , रेशन च्या दुकानात तंबाखू का वो न्हाई मिळत? आयला लै म्हाग झाली राव गाय छाप " - पुन्हा म्हादबा , पुन्हा हशा आणि पुन्हा शिरपाची म्हादबाच्या टाळक्यावर एक जोरदार टपली वजा फटका.

ब्रेक के बाद अण्णांचं कथाकथन पुन्हा सुरु...

" पण त्या घव्हात , कचराच लै!! घरच्या समद्या बाया त्यो घौ निवडून निवडून पाक थकल्या. अंगणात निस्ता कचरा पडायचा बाया त्यो आयात केलेला घौ निवडाय बसल्या की. पण येड्यानो तो काय घव्हातला कचरा सादा नव्हता, त्या हलकट अमेरिकनं त्या गव्हामध्ये एक "तण" टाकलं व्हुतं मुद्दाम ठरवून. झालं, व्हायचं त्येच झालं. सगळा कचरा आणि त्या तणाचं "बी" समद्या देशभर पसरलं आणि पावसाळ्यात आलं ना उगवून, समदीकडं त्ये गवत राव. वावरात, रस्त्याकडंला, परसाकडंला, मळ्यात, शेतात कुठं बी जावा त्येच गवत. अन एकदा का ते गवत शेतात आलं की मंग काय खरं न्हाई , शेतात काय बी नीट पिकना झालं ना राव...! ”

“ व्हंय व्हंय अन्ना , पिंडरीला निस्तं ह्या काँग्रेस गवताचं पान जरी लागलं वैच, तरी तीन दिवस निस्ती खाज सुटती बगा !” - शिरपा

आमच्या त्या अजाणत्या वयात ते गवत जे पुढं काँग्रेस गवत ह्या नावानं फेमस झालं ते गवत म्हणजे अमेरिकेनं भारतात पाठवलेलं "बायोलॉजिकल व्हेपन” (जैविकास्त्र) वगैरे होतं हे त्या वेळी समजायचं आमचंच कुणाचं वय नव्हतं. अर्थात ही काँग्रेस गवताची कथा सुद्धा एक भाकड कथा असू शकेल. कारण whatsapp वरंच खोट्या कथा पसरवाव्यात असा काही सृष्टीचा नियम नाही.

ते काहीही असो , पण चीनच्या वुहान प्रोव्हिन्स मधला बायोलॉजिकल व्हेपनचा फसलेला एक प्रयोग म्हणजेच "नॉव्हेल करोना व्हायरस" चा जगभर झालेला प्रादुर्भाव. - ह्या थियरी मुळे कित्येक वर्षांनी परत आमच्या अण्णांच्या हकिकतेवर (किंवा दंतकथे) वर आधारित अमेरिकेने त्या काळी भारतावर उगारलेल्या ह्या काँग्रेस गवत रुपी बायोलॉजिकल व्हेपन थेअरी ची गोष्ट आज बरेच वर्षांनंतर आठवली.

असो. विषयांतर पुरे. करोना म्हणजे वटवाघळांच्या पंचपक्वान्नांनी बनवलेलं आणि ह्या चिन्यांनी जगासमोर वाढून ठेवलेलं नैवेद्याचं ताट आहे? की सोशल मीडिया वर पसरलेल्या बातमी प्रमाणे चिन्यांचा हा एक फसलेला ‘बायोलॉजिकल व्हेपन’ चा प्रयोग आहे? हे कदाचित कधीच प्रकाशात येणार नाही. कारण चिनी किंवा मंडारीन भाषेत प्रकाशित होणाऱ्या डिक्श्नर्यांमध्ये 'सत्य' आणि ‘अहिंसा’ हे दोन शब्दच नसतात म्हणे! पण आता एक नक्की. नुसते चिनीच काय तैवानी, व्हिएतनामी किंवा सिंगापुरी असे पूर्वेकडचे हे अतिरेकी पद्धतीचा 'सामिष' आहार करणारे कुणीही पाहुणे भेटले तरी त्यांच्याशी आता चुकूनही हस्तांदोलन करायचे नाही, पण भारतीय पद्धतीने हात जोडून नमस्कार मात्र नक्की करायचा आणि तो ही अगदी कोपरा पासून !

चारुदत्त रामतीर्थकर.
८ मार्च २०२०, पुणे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चिनी लोक गेली अनेक शतके असे चित्रविचित्र प्राणी पक्षी खात आहेत. पण करोना आताच का उद्भवला?
काही लोक असे म्हणत आहेत की वुहान शहरात चिनी सरकारने एक जैव प्रयोगशाळा उभारली आहे. तिथे सूक्ष्म जीवाणूंचा अभ्यास केला जातो. कदाचित त्यांना शस्त्र म्हणून विकसित करता येते का तेही अभ्यासले जात असेल. तर अशा कुठल्यातरी प्रयोगात निष्काळजीपणा झाला आणि प्रयोगशाळेतील सूक्ष्मजीव बाहेर पसरले आणि प्रवासी वगैरे माध्यमातून तो जगभर पसरला.
वटवाघळे खाण्यामुळे रोग वगैरे ह्या अफवा चीन सरकारने जाणूनबुजून पसरवल्या आहेत. खरे कारण उघडकीस येऊ नये म्हणून असाही एक विचारप्रवाह आहे.
कम्युनिस्ट चिनी सरकार हव्या तशा बातम्या देऊ शकते. त्यामुळे खरी गोष्ट कळायला वेळ लागेल.

हो नं, मागच्याच्या मागच्या शतकात मोबाईल भरलेला कंटेनर बुक करायला एक भारतीय व्यापारी विमानप्रवास करून बिजिंगला गेला होता. आता असाच जातोय तर शेजारच्या एका पोराला तिथे स्वस्तातले मेडिकल कॉलेज गाठून द्यायचे असे गल्लीतल्या ठरावत पास झालेले काम होतेच. तेव्हाच चीनमध्ये एक अणुभट्टी फुटली असल्याने बऱ्यापैकी केओस होताच. तिथं गेल्यावर थोडे खायचे हाल झाल्याने अर्धवट शिजविलेला कोब्रा, वटवाघूळ खाण्याचे नशिबी आले. भुके पुढे सब झुट असे म्हणत त्याने ते मांस गट्टम् केले. त्या मांसाच्या सेवनाने कोरोणा ताप त्या व्यापाऱ्याच्या अंगी गेला. व्यापाऱ्याला चिनी इस्पितळात दाखल केले आणि त्याच रात्री ते इस्पितळ भूकंपाने कोसळले. पुढे दोनशे वर्षांनी या सगळ्याचा उलगडा झाला आणि बीजिंग शहरात चिनी सरकारने एक जैव प्रयोगशाळा उभारायचे ठरविले. पण त्या व्यापाऱ्याच्या सांगाड्याची महती वुहान पर्यंत पोहोचली आणि त्या व्यापाऱ्याने ज्या पोराला डॉक्टर व्हायला आणले होते त्याच्या वंशजांनी आपली लॉबी पॉवर वापरून प्रकल्प वूहानला खेचून आणला. पुढची गम्मत सगळ्यांना ठाऊक आहेच.

काँग्रेस गवताची माहिती खरीच असावी.
कारण अमेरिकेने जे अन्न पाठवले होते ते गहू नसून मिलो होते(आता मीलो म्हणजे काय ते माहीत नाही पण त्या काळातील लोकं हेच नाव घेतात)
त्या नंतर ते काँग्रेस गवत भारतात आले .
त्या पूर्वी नव्हतं.
ते गवत एवढं खतरनाक आहे की १ झाड १००/२०० झाडे तर नक्की तयार करत.त्याच्या वर हवामानाचा काही परिणाम होत नाही ते जोमात वाढतेच.
उपटून ठेवले तरी लवकर मरत नाही.
त्या गवताला जनावर तोंड सुद्धा लावत नाही म्हणजे ते काहीच उपयोगाचे नाही.
अमेरिकेने हे जाणूनबुजून केले असावे.

https://www.bbc.com/news/world-asia-china-51403795
आपणास सगळा विनोद वाटत असेल तर आनंद आहे.
चिनी लोकांनी चित्रविचित्र प्राणी पक्षी खाणे हे आताच सुरू केले अशी आपली माहिती आहे का?

उंदीर खाणारे,कुत्री खाणारे,रेशमाचे किडे खाणारे,भारतात सुद्धा आहेत
पूर्वेच्या राज्यात उंदीर खाल्ले जातात.
अगदी बिहार मध्ये उंदीर खाणारी लोक आहेत आणि झारखंड मध्ये रेशमाचे किडे खाल्ले जातात.

महाराष्ट्र चा विचार केला तर
डुक्कर(दोन्ही),मेंढी,बोकड,कोंबडी,म्हैस( बीफ), ससा,पाणकोंबडी,salandar, कबुतर
हे प्राणी आणि पक्षी खाल्ले जातात.
ह्यांना मारण्याला मान्यता आहे.
मान्यता नसलेले आणि कायदेशीर गुन्हा असलेले

मोर,हरीण, इत्यादी सुधा खाल्ले जाते

जिंदा दिलं
तुमचे बरोबर आहे न शिजवता किंवा न भाजता भारतात प्राणी किंवा पक्षी खाल्ले जात नाहीत.
फक्त मध माश्यांच्या आळ्या खाल्ल्या जातात.