आनंदछंद ऐसा- mrsbarve

Submitted by mrsbarve on 29 February, 2020 - 02:26

"आदरणीय परीक्षक आणि रसिक श्रोतेहो "
या वाक्यावरून तुम्ही कदाचित ओळखले असेल माझा आवडता छंद कोणता ते -वक्तृत्व ! अर्थातच वक्तृत्व ही एक खूप छान कला आहे आणि ती मी एक आवडता छंद म्हणून जोपासली.तर ऐका मायबोलीकरांनो माझ्या या छंदाची कहाणी!

तर, इयत्ता पाहिलीत 'कुंडल' मध्ये (हो तेच ते-खरेतर कृष्णाकाठी नसलेले,आता उरले नाही वाले) एका शाळेत वक्तृत्व स्पर्धा होती. तेंव्हा "आई रागावते तेंव्हा" या विषयावर छानसे भाषण केले, साधारण शंभर सव्वाशेचा जमाव होता ,त्यात ६० ते ६५ मुले स्पर्धक म्हणून होती,मला अगदी अजुनी आठवते. कोणी आकाशाकडे बघून भाषण म्हणत होते, तर कोणी आवंढे गिळत होते, कोणी मिनिटा मिनिटाला थांबत आठवून बोलत होते तर कुणी धावत्या आग गाडी सारखे सुसाट बोलत होते! मीही आईने लिहून दिलेल्या भाषणाचे जोरदार 'पाठांतर' केलेले! हाव भाव,आवाजातले चढ उतार यांची भरपूर तयारी केली होती. माझे नाव पुकारले गेले ,व्यासपीठाकडे जाताना घसा कोरडा पडला होता, प्रचन्ड धडधडत होते आणि मी सुरुवात केली," धाड धाड धाड ! डब्यातले लाडू घरंगळून जमिनीवर पसरले .... आई दुपारच्या झोपेतून जागी झाली आणि तिने एक मस्त पैकी रट्टा दिला ,कार्टे ...... " मी बोलत राहिले,लोक खूप छान प्रतिसाद देऊ लागले आणि मी माझे आयुष्यातले पहिले भाषण न अडखळता, न थांबता,न आवंढे गिळता आणि आढ्याकडे न बघता सुस्पष्ट रित्या पूर्ण केले! आता पहिलीच्या मुलीचे आणि तेही पहिल्यांदाच केलेले भाषण म्हणजे फार काही ग्रेट नसणार पण खूप छान वाटत होते भाषण सादर करताना.आणि चक्क स्पर्धेत पहिला नंबर आला !आणि बक्षीस म्हणून "मेषपात्रे" हे चिं.वि जोशींचे पुस्तक मिळाले!(त्या नंतर यावरून बरेच दिवस घरात मोठी भावंडे चिडवत होती!:))

विनोदाचा भाग सोडून देता ,सहज प्रयत्न करून पाहिलेली गोष्ट आपल्याला खूप आवडते आहे हे जेंव्हा लक्षात आले.तेंव्हा वक्तृत्व कलेची ओढ वाढू लागली आणि विविध वक्तृत्व स्पर्धांमध्ये भाग घ्यायचा,तयारी करायचा छंदच जडला.सुरुवातीला आईने लिहायचं आणि 'दिग्दर्शन' करायचं आणि मी पाठांतर करत,तिच्या मार्गदर्शनाखाली भाषण तयार करायचं या गोष्टीला हळू हळू सरावले.सुरुवातीला व्यासपीठावर गेल्यावर थोडीशी भीती वाटायची पण मग हळू हळू सरावाने हि भीती जाऊन आत्मविश्वास आला. विविध जिल्हा स्तरीय,राज्य स्तरीय स्पर्धांमध्ये भाग घेऊ लागले. मग नंतर स्वत:ची भाषणे स्वतः: लिहू लागले,मुद्दे लिहून काढू लागले ,संबंधित विषयाची पुस्तके ,लेख,इत्यादी वाचून "मसुदा" तयार करू लागले.आरशात पाहून स्वतः:च हाव भाव ठरवू लागले,थोडक्यात या छंदाची वाढ होऊ लागली .आणि बऱ्यापैकी बक्षिसेही मिळवू लागले.

एव्हाना माध्यमिक विद्यालयात येऊन पोचले होते आणि स्पर्धेच्या बऱ्याच संधी येत होत्या. मग कथा कथन हि करून पाहिले. गोष्ट होती शिवरायांची! " प्रेताला लाथ मारण्यात कसला आलाय पराक्रम? शत्रूशी असलेले वैर त्याच्या मरणा बरोबरच संपवावं ! चल जिवा, एका स्वामी निष्ठ लढवैय्याच्या प्रेताला, माझ्या बरोबर तू ही वंदन कर! " हे म्हणताना अंगात शिवाजी महाराज संचारायचे ! अफजल खानाच्या प्रेताला लाथ मारू पाहणाऱ्या जिवा महालेची तलवारबाजी दिसू लागायची,जीव कसा हल्लक होऊन जायचा!

"वृक्षवल्ली आम्हा सोयरी ","मिले सूर मेरा तुम्हारा", " दूरचत्रवाणी शाप कि वरदान " असलं काही काही असायचं स्पर्धेला! जाम मजा यायची. विविध प्रकारचे स्पर्धक ,त्यांच्यातलं कौशल्य,कधी कुणाच्यात जाणवणारी उणींव -बोलण्याची पद्धत असो किंवा मग लिहिलेला मसुदा असो,त्यातून हि खूप शिकायला मिळायचे. घरात दर स्पर्धेच्या वेळी त्या विषयावर सगळ्यांच्यात चर्चा व्हायची. विविध पुस्तके वाचायची आवड तर होतीच त्याचा हि फायदा व्हायचा.

सुरुवातीला व्यासपीठावर गेल्यावर थोडीशी भीती वाटायची पण मग हळू हळू सरावाने ही भीती जाऊन आत्मविश्वास आला. तरीही तयारीची भाषणे हीच सरावाची होती. मग काही स्पर्धात उस्फुर्त भाषणेही असायची,त्यात प्रयत्न करून पाहिले . बऱ्यापैकी जमत होते.मग एक दोन वाद विवाद स्पर्धा सुद्धा यश देऊन गेल्या. पण तरीही एक नक्की कि यश येवो ना येवो प्रत्येक स्पर्धा,प्रत्येक भाषण,त्याची तयारी,माझे जोरदार प्रयत्न यात मी व्यस्त असायचे . एक वेगळीच धुंदी असायची.एक खूप आनंद मिळायचा मला त्या सर्वातून.

छोट्या गावात राहत असलयाने शहरात ऐकायला मिळणारी विविध,मोठ्या वक्त्यांची भाषणे ऐकायला मिळायची नाहीत .तरी सिंधुताई संकपाळ, सुधीर मोघे , शांताबाई शेळके अशा काही निवडक मोठ्या लोकांना ऐकण्याचे भाग्य लाभले होते! त्यांच्या सारखं आपल्यालाही बोलता आलं तर किती बहार येईल असे वाटे त्या लहान वयात!

स्पर्धेतल्या यशाने खूप कौतुक व्हायचं ,शाळेत,विद्यालयात,महा विद्यालयात नाव मिळायचं ! पण एकदा दोनदा मात्र अचानक भाषण करताना एकदम ब्लॉकच व्हायला झालेलं ,काय बोलावं सुचेचना,अगदी फजितीही झाली!

या छंदाने मला खूप काही दिले,जीवा भावाचे मित्र मैत्रिणी भेटल्या,कौतुकाची थाप मारणारे परीक्षक भेटले,मार्ग दर्शन करणारे गुरुही भेटले! मुख्य म्हणजे व्यासपीठावर चार दोन शब्द बोलण्याची भीती गेली. खूप वाचन ,मनन ,चिंतन केले गेलं.

आजही मी माझा छन्द जपते,इथे मंडळाच्या अनेक कार्यक्रमामध्ये निवेदन करणे, सादरीकरण करणे, कथा कथन इत्यादीं मधून! मी यात काही प्रचंड प्राविण्य मिळवले असे मला बिल्कुल वाटत नाही पण छंद जोपासण्यातला आनंद आणि समाधान नक्कीच मिळालेले आहे.

एव्हढेच बोलून मी आपला निरोप घेते ,धन्यवाद!:)

(मी मेघ मराठीत लिहून इथे पेस्ट करते ,वक्तृत्व हा शब्द तिथे बरोबर टाईप होतोय पण माबो मध्ये वेगळाच दिसतोय!)

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पण हा छंद जोपासायचाकाही संधी तर यायला हव्यात ना? त्या आता कुठे मिळतात? सध्या भाषणांचे विषय काय असतात? ते आयोजकांनी दिलेले का आपले वेगळे आहेत?
-----------
हे गंमतीदार प्रश्न बाजूला ठेवून एकूण वाचायला मजा आली.
---------

छान Happy

छान लिखाण

हा छंद परिचयाचा आहे . शाळेतले वक्तृत्व स्पर्धेचे दिवस आठवले .