"मनावर परिणाम करणारा लेखक - डॉ. अनिल अवचट" - (डॉ. अतुल ठाकुर)

Submitted by मभा दिन संयोजक on 27 February, 2020 - 10:01

"मनावर परिणाम करणारा लेखक - डॉ. अनिल अवचट" - (डॉ. अतुल ठाकुर)

दिवस मुंबई गिरण्यांच्या संपाचे होते. टेक्सटाईलचा कोर्स करीत होतो. आणि बाहेर नोकरी मिळण्याची फारशी आशा नव्हती. निवडलेले क्षेत्र तसेही फारसे आवडलेले नव्हते. पण आयुष्यात सर्व निर्णय चुकण्याचा एक काळ असतो त्या काळातून बहुधा मी जात होतो. त्याच काळात एका मित्राने मला अनिल अवचटांचे पुस्तक वाचण्याचा सल्ला दिला आणि मला वाटतं मी पहिले पुस्तक निवडले "धागे आडवे उभे"

आधीच वस्त्रोद्योगाबद्दलच शिकत होतो. गिरण्यांमध्ये संप सुरु होता. कामगारांचे हाल चालले होते आणि नेमके हे हाल अतिशय परिणामकारकरित्या वर्णन करणारेच पुस्तक हातात आले. त्या पुस्तकाचा मनावर फार फार परिणाम झाला. आपण आपल्याला न झेपणारे क्षेत्र निवडले हे ठळकपणे लक्षात आले. त्यानंतर अभ्यासक्रमाचा भाग म्हणून एकदोन गिरण्यांमध्ये जाऊन आलो. तेथे यंत्रमागाचा भागच असल्यासारखे काम करणारी माणसे पाहिली. पहिल्या दिवशी तर धोट्याच्या त्या सडक फडक सडक फडक आवाजाने कानच गेल्यासारखे झाले. बाहेर आल्यावर मला काहीवेळ काही ऐकूच येईना. टेक्स्टाईलमधे फक्त एक दिवस नोकरी केली. पुन्हा त्या दिशेला वळलो नाही. वस्त्रोद्योगात रमलो नाही. पण अवचटांच्या पुस्तकात मन रमलं. एकामागोमाग एक अशी त्यांची पुस्तके वाचण्यास सुरुवात केली. समाजकारणाशी संबंधित त्यांची बहुतेक पुस्तके नुसती आवडलीच नाहीत तर विचारांवर परिणाम करून गेली. पण त्यातही फार फार आवडलेली दोन पुस्तके म्हणजे "धार्मिक" आणि "संभ्रम"

त्या काळात अध्यात्मिक वाचन सुरु होते. वाचलेले सगळेच पटायचे असे नाही. पण अध्यात्मिक क्षेत्रातल्या कठोरपणाबद्दल एक अनामिक भीती वाटत असे. आपण या सार्‍यात कुठेच नाही आहोत, फारच क्षूद्र आहोत असेही वाटायचे. अशावेळी बाबा, बुवा, माता यांच्यावर तर्कशूद्धपणे टिका करणारी ही अवचटांची ही दोन पुस्तकं वाचनात आली आणि फार आधार वाटला. यात मला खुप आवडली ती त्यांच्या लेखनाची शैली आणि त्यांची मुद्दा मांडण्याची पद्धत. प्रत्येक ठिकाणी जाऊन अवचटांनी नुसते रिपोर्टींग केले नव्हते तर अनेकांना भेटून, त्यांची मते जाणून घेऊन, त्यावर स्वतः विचार करून त्यांनी मांडणी केली होती. बुवाबाजीमुळे ज्यांचे शोषण होते त्यावर्गाबद्दल असलेली तळमळ त्यांच्या लेखनामध्ये स्पष्टपणे दिसून येत होती. अशा बुवाबाजीच्या ठिकाणी जे काही शोषण सुरु असते त्याबद्दल कुठल्याही सांगोवांगीवर न विसंबून राहता ते सर्व ठिकाणी स्वतः जात राहिले.
सारे काही स्वतः पाहिले, अनुभवले आणि त्यांनी लेखन केले. अर्थातच हे लिहिताना त्यांना ही बाजू आणि ती बाजू नुसती मांडायची नव्हती. त्यांना 'कुणाचे शोषण सुरु आहे? नक्की कोण शोषण करीत आहे? त्या शोषणाला माणसे कशी बळी पडतात.' याबद्दल स्पष्टपणे लिहायचे होते. आणि त्यांनी प्रत्येक लेखात आपली मते स्पष्टपणेच मांडली. काहीवेळा त्यामुळे एखाद्या समाजाचा रोषही ओढावून घेतला.
अवचटांचे लेखन वाचताना मला नेहमी दिसला, जाणवला आणि भावला देखिल तो त्यांच्यातला सामाजिक कार्यकर्ता. त्या कार्यकर्त्याच्या भूमिकेतूनच मी अवचटांचे लेखन वाचत असतो. या भूमिकेतून लिहिलेली त्यांची सर्व पुस्तके मला जबरदस्त वाटतात. मला त्यातली खुप आवडती पुस्तके कुठली याची निवड पटकन करता येणार नाही. पण अवचटांची "धार्मिक" आणि "संभ्रम" ही दोन पुस्तके मी केव्हाही आणि कितीही वेळा वाचु शकतो.
या आणि अशासारख्या पुस्तकांमध्ये फार फार आवडली ती डॉ. अवचटांची शैली. अवचट लिहिताना आत्मपरीक्षण करीत लिहितात. एखादे मत मांडताना ते स्वतःच्या त्यावेळच्या भावना प्रांजळपणे लिहितात. त्यामुळे त्यांचे लेखन हे आमच्यासारख्या सर्वसामान्यांना जवळचे वाटले. आपल्यासारख्या लोकांसाठीच ते लिहित आहेत असेच मला नेहमी वाटत आले. त्यांचे वाचन, चिंतन आणि मनन भरपूर असले आणि त्यांच्या लेखनात ते जाणवले तरीही त्यांच्या भाषेत विद्वत्तेचा अभिनिवेश असा कधीही दिसला नाही. शैली नेहेमी प्रांजळच राहिली. साधी भाषा ठेवून ते शोषणकर्त्यांवर घाणाघाती टिका करीत राहिले. आणि त्याबरोबरच होता खास अवचट पद्धतीचा प्रसन्न विनोद. कुठल्याशा कार्यक्रमावर लिहिताना ते म्हणतात "स्वरगंगेच्या काठावरती गाणे स्टेजवर सुरु होते. गाणे म्हणणार्‍यांनी स्वरगंगेचा पार धबधबा करून टाकला होता." हे वाचताना मला आजही हसू आवरत नाही.
वारकरी संमेलनाविषयी लिहिताना तर 'तेथे कुठले प्रश्न चर्चेला घेतले गेले, त्यावेळी कुणाची भाषणे झाली, त्यांनी कुठल्या तर्‍हेची मांडणी केली.' इतकेच नव्हे तर 'या वक्त्यांची देहबोली, पेहराव कसा होता.' याचे अतिशय बारीक वर्णन ते करतात. वाचताना आपण हसता हसता कधी अंतर्मूख होतो तेही कळत नाही. अतिशय तपशीलात जाऊन केलेले वर्णन हे मला अवचटांच्या लेखनाचे एक महत्वाचे वैशिष्ट्य वाटत आले आहे. हे तपशील माणसांबद्दल तर असतातच पण घटना आणि वास्तूबद्दलही असतात. एकाद्या सिनेमॅटीक पद्धतीप्रमाणे त्यांची शैली ती माणसे, प्रसंग, संदर्भ, जागा थेट डोळ्यासमोर उभे करते. त्यामुळे माझ्यासारखा माणूस, ज्याला अशा शैलीचे अतोनात आकर्षण आहे त्याला त्यांची पुस्तके म्हणजे भुकेल्याला भरपेट मेजवानी मिळावी अशा तर्‍हेची वाटतात.

डॉ. अवचटांचे माझ्यावर अनंत उपकार आहेत कारण त्यांच्या पत्नीची ओळख त्यांच्या लेखनातूनच मला झाली. आज डॉ.अनिता अवचटांना मी व्यसनमुक्तीच्या कामातला आदर्श मानतो. एरवी संतूलित लिहिणारे अवचट पत्नीबद्दल लिहिताना फार हळवे होतात. आणि खरं सांगायचं तर ते त्यामुळेच जास्त जवळचे आणि आपल्यातले वाटतात. अवचटांच्या लेखनात आणखी एक गमतीशीर प्रकार पाहिला आहे. बुवाबाजी, गुरुबाजी आणि शिष्यांचा अति नम्रपणा यांवर थट्टेने काहीवेळा उपहासाने लिहिणारे अवचट स्वतःच्या गुरुंबद्दल लिहितानाही अतिशय भावूक होताना पाहून मजा वाटते. जिज्ञासूंनी त्यासाठी त्यांचे "छंदांविषयी" हे पुस्तक जरूर वाचावे.
बाकी मुक्तांगणबद्दल लिहावे ते अवचटांनीच. आपली पत्नी, तिचे पेशंट्स, तिची काम करण्याची पद्धत्,तिचे पेशंटशी वागणे, पेशंटसचे तिच्याशी वागणे, तिचे समर्पित जिवन या सार्‍यामधून अवचटांनी मुक्तांगण इतके जबरदस्त उभे केले की समाजशास्त्रात पीएचडी करताना मी मुक्तांगण केसस्टडी म्हणून निवडले. तेथे असंख्यवेळा जाऊन आलो. त्या कामात सहभागी झालो. तेथे सर्व त्यांना बाबा म्हणतात. बाबांना पाहायला मिळाले. डॉ. अनिता अवचटांना तर पाहण्याचे भाग्य लाभले नाही. पण त्यांचा ध्यास असलेल्या मुक्तांगणच्या कामाचा भाग झालो हे ही भाग्य मोठेच! डॉ. अनिता अवचटांच्या हाताखाली तयार झालेली माणसे पाहिली. त्या माणसांशी बोलायला मिळाले. अवचटांच्या लेखनातून भेटणार्‍या त्यांच्या मुलींना प्रत्यक्ष भेटता आले. आयुष्याचे सार्थक झाल्यासारखे वाटले. याचे सारे श्रेय अनिल अवचटांनाच जाते.
त्यांच्यातील कार्यकर्त्याचा माझ्यावर इतका प्रचंड प्रभाव आहे की मला त्यापेक्षा वेगळ्या भूमिकेतून त्यांनी केलेले लेखन फारसे भावले नाही हे देखिल येथे नमूद करावे लागेल. हे खरे तर लेखकाला अन्यायकारकच आहे. लेखकाने काय लिहावे हे आम्ही का म्हणून सांगावे आणि ठरवावे? पण असे आहे खरे. त्यामुळे त्यांची नंतरची पुस्तके फारशी वाचली नाहीत. साखरपेरणी करून लोकांना मूर्ख बनवण्याची हातोटी असलेल्या सरकारी अधिकार्‍याबद्दल लिहिताना अवचट म्हणतात " ते अमुक अमुक श्रीखंड आणि साखरभात एकदम खाऊन आल्यासारखे दिसत होते."

मला या अवचटांचे आकर्षण होते. रजनीशांबद्दल लिहिताना ते त्यांच्या ध्यानाची चर्चा मास हिप्नॉटिझम बरोबर करतात. त्यांचे शिष्य पुण्यात कसा हैदोस घालत होते त्यावर कोरडे ओढतात. मला हे अवचट भावले होते. जैन समाजाच्या मोर्च्याबद्दल लिहिताना "मोर्चा संपताना झालेल्या झटापटीत किती जंतू मेले काही गणती नाही" अशासारखा उपरोध त्यांच्या लेखाच्या शेवटी डोकावतो. मी या अवचटांच्या प्रेमात आहे. तो फायर त्यांच्या नंतरच्या लेखनात मला फारसा जाणवला नाही. मला आवडणारे अवचट हे सौम्य किंवा किंचित उपरोधाच्या भाषेत पण घाणाघाती टिका करणारे आहेत. त्यांच्या अशा तर्‍हेच्या लेखनातून मला, मी कधीही न पाहिलेल्या समाजाचे ज्वलंत प्रश्न कळले. आणि आपल्या हातूनही काहीतरी सेवा घडावी ही प्रेरणा मिळाली. अवचटांचे हे माझ्यावरील उपकार कधीही न फिटणारेच आहेत.

© अतुल ठाकुर

-- अतिशय व्यस्त दिनचर्येतून वेळात वेळ काढून डॉ. अतुल ठाकुर ह्यांनी हा लेख लिहून दिला. संयोजक मंडळ त्यांचे अतिशय आभारी आहे __/\__

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

सुंदर लेख! मलाही अनिल अवचटांचं 'संभ्रम' हे पुस्तक प्रचंड आवडलं होतं. नावही किती परफेक्ट आहे. सारे काही स्वतः पाहिले, अनुभवले आणि त्यांनी लेखन केले.अर्थातच हे लिहिताना त्यांना ही बाजू आणि ती बाजू नुसती मांडायची नव्हती. त्यांना 'कुणाचे शोषण सुरु आहे? नक्की कोण शोषण करीत आहे? त्या शोषणाला माणसे कशी बळी पडतात.' याबद्दल स्पष्टपणे लिहायचे होते. >> अगदी!!

अनिल अवचटांच्या लेखनातला अजून एक महत्त्वाचा भाग म्हणजे दरवर्षी साप्ताहिक सकाळच्या दिवाळी अंकात येणारे त्यांचे लेख. घेतलेल्या विषयात पार खोल बुडी मारून ते लिहायचे. तरीही ते समजायला सोपं असायचं.

न आवडण्यासाठी सुद्धा ज्ञानदा देशपांडे यांना अनिल अवचट जवळचे वाटतात. इथे पहा थिंक महाराष्ट्रवर त्यांचा लेख.
अनिल अवचट एक न आवडणे

अनिल अवचटांच्या लेखनातला अजून एक महत्त्वाचा भाग म्हणजे दरवर्षी साप्ताहिक सकाळच्या दिवाळी अंकात येणारे त्यांचे लेख. >>> खरच खूप छान असायचे ते लेख.

वाह सुरेख.

अनिल अवचट अतिशय आवडते लेखक. धागे आडवे उभे, धार्मिक, संभ्रम तिन्ही वाचली नाहीत. वाचायला हवीत.

न आवडण्यासाठी सुद्धा ज्ञानदा देशपांडे यांना अनिल अवचट जवळचे वाटतात. इथे पहा थिंक महाराष्ट्रवर त्यांचा लेख.
अनिल अवचट एक न आवडणे

प्रघा, तुमचे अवचटांवरचे लिखाण वाचायला आवडेल

उबो - तो लेख थोर आहे अगदी.

रघा, तुमचे अवचटांवरचे लिखाण वाचायला आवडेल>>>;त्यांच्यावर लेखन नाही केल. पण त्यांच लेखन आवडत.ओतूर माझ जन्मगांव. वडील तिथे हायस्कूलात शिक्षक होते. पण मी वाढलो आमच्या गांवात, बेल्ह्यात. माझे वडिल अवचटांना हायस्कूलमधे शिकवायला होते असे अवचटांनी मला सांगितले. अवचटांशी गप्पा मारताना एक वेगळा आनंद मिळतो. अंनिस चळवळीशी संपर्क त्यांच्यामुळेच आला. एकदा अंनिस वार्तापत्रात त्यांची मुलाखत आली होती त्याचे शीर्षक होते की अंधश्रद्दाळूंची निर्भत्सना करणे क्रूर आहे लेख खालील लिंकवर वाचा. https://drive.google.com/file/d/1Jr-abIJVkZTClkOesTsvHDiZwbNc13SI/view?u...

सुंदर आणि परखड लेख... कोणाला काय आवडावं अथवा न आवडावं हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो. एखादी गोष्ट मला आवडली नाही म्हणून ती दुस-याला आवडू नये असे थोडेच असते...