उगीचच

Submitted by Athavanitle kahi on 26 February, 2020 - 05:27

उगीचच अबला काहीवेळा वाचनात आलेले लेखन बहुतांश घरगुती स्वरूपाचे काही लेख अगदी भरपूर लाईक मिळवून जातात. अगदी वाचताना असं वाटेल की हो या लेखनातली स्त्री मीच आहे आणि ते शेअर होतात. पण खरोखरच तेवढे दुःख त्या स्त्रीला असते का उगाचच दहा जणींना घरांमध्ये खूप त्रास होतो म्हणून मग मीही तशीच मलाही बऱ्याच गोष्टीत कॉम्प्रमाईज करावंच लागतं असा काही देखावा निर्माण केला जातो. किंवा त्या लेखनाचा प्रभाव म्हणून तसं वाटायला लागतं .खरोखरच विचार करायला लावण्यासारखं गोष्ट आहे. दोन व्यक्ती म्हटल्या की काही ना काही त्यात मतभेद हे असणारच.पण ते मतभेद सासरचे वेगळे आणि माहेरचे वेगळे असतात. मग छोट्या छोट्या गोष्टींचे भांडवल केलं जातं पण ती गोष्ट अगदी जशीच्या तशी आपल्या आईच्या बाबतीतही घडलेली असते तेव्हा मात्र ती प्रेमाची ठरते. अगदी उदाहरणच द्यायचं झालं तर अमुक अमुक ड्रेस वर टिकली का नाही लावली किंवा हे असे छोटे कपडे घालू नकोस, घरामध्ये काही ना काही काम कर या सगळ्याच गोष्टी एका ठराविक वयामध्ये आल्यानंतर आपल्याच आई मावशी यांच्याकडूनही बोलल्या जातात. एक पूर्वी वळण लावणे असा एक शब्द प्रचलित होता तर मुलीला वळण लावण्यासाठी तिच्याकडून मी काही छोटी काम करून घेते असं आई ही खूपदा म्हणायची. त्यावेळेसही या गोष्टी आवडत नसत.खेळायला जायचे या वेळामध्ये घरात केर काढायला सांगितला, भांडी लावायला सांगितले तर चिडचिड होत असे. पण म्हणून आईवरच प्रेम कधीही अटत नव्हतं. नसतच. किंबहुना लग्नानंतर जास्तच वाढतं कारण छोट्या छोट्या गोष्टी करत असताना या आई कशा करत असेल कितीवेळ स्वतःच्या इच्छांना मुरड घालत होती आणि आपल्या आवडीचे पदार्थ करत होती या सगळ्याची जाणीव होते आणि मग तिने केलेल्या कॉम्प्रमाईज प्रकर्षाने जाणवू लागतं आणि तिच्यावर प्रेम वाढतं. कारण आपल्यापेक्षा काकणभर जास्तच सराईतपणे ती हे सर्व काम करत होती याची जाणीव होते. सुरुवातीला मुलीला वळण लागावं म्हणून काम सांगणारी आई मुलीचं लग्न झाल्यावर मात्र तिला खूप काम पडतं हो म्हणून हळवी होते. आणि नकळतच त्याच्या संसारामध्ये तिला सल्ला देऊ लागते. आता या सगळ्याचा मेळ आपण आपल्या पद्धतीने आपण आपल्या आयुष्यामध्ये कसा ठेवायचा हे सगळ आपल्यावर असतं. म्हणूनच दोन गोष्टी आपल्या संसारासाठी करताना आपण मागे पुढे बघू नये. आपल्याप्रमाणेच घरातील इतर व्यक्तीही आपल्या दोन-चार आकांक्षा इच्छा बाजूला ठेवतात, मुरड घालतात किंवा त्यांनीही आपल्याला प्रायोरिटी दिलेली असते हा विचार प्रत्येकीने करायला हवा. कॉम्प्रमाईज एकाच बाजूने असेल तर ते निश्चित योग्य नाही परंतु दोन्ही बाजूने असेल तर त्याचं भांडवल केलं जाऊ नये कारण आयुष्य हे जगण्यात जास्त गंमत आहे. ज्या गोष्टी नाही जमल्या त्या बाजूला सोडून ज्या आपल्याकडे आहेत, ज्या जमू शकतात या गोष्टींनी आपल्या आयुष्यात आनंद आणणे हे आपल्या आणि आपल्याच हातात आहे.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आजच्या मेसेज फॉरवर्डच्या काळात नक्कीच विचार करण्यासारखी गोष्ट आहे. प्रत्येक घरात तडजोडीचे अनेक प्रसंग येतात आणि त्यामुळे असे मेसेज वाचून बऱ्याच स्त्रिया स्वतःला त्यात फिट करून घेतात. मग आपल्यावर अन्याय होतो, ही भावना मनात वाढायला लागते. आणि त्यातून चिडचिड, ताणतणाव, भांडणं सुरु होतात. मुळात कोणत्याही दोन व्यक्ती तंतोतंत एकसारखे विचार, शिक्षण, संस्कार आणि कौटुंबिक पार्श्वभूमी समान असणाऱ्या नसतात.

त्यामुळे दुसऱ्या व्यक्तीकडून आपल्यासारखं वागण्याची किंवा आपल्याप्रमाणे विचार करण्याची अपेक्षा ठेवणे, हेच चुकीचे ठरते. तसंच, दुसऱ्या घरी निर्माण झालेल्या समस्येवर असणारा उपाय किंवा त्यामुळे निर्माण झालेले वादविवाद, पेचप्रसंग , हे आपल्या घरासारखे नसणारच, हे समजून घेता आलं पाहिजे. कारण प्रत्येक घरातील संबंधित व्यक्ती या वेगवेगळ्या आहेत. त्यामुळे दरवेळी वेगळे प्रसंग घडणार. महत्त्वाचा मुद्दा हा आहे की, स्वतःपेक्षा नातं जास्त जपलं गेलं, तर त्याचा फायदा दोन्ही बाजूंना होतो. फक्त ही तडजोड नेहमी एकाच व्यक्तीकडून अपेक्षित असेल, तर मात्र कधीतरी छोट्या गोष्टीवरुनही स्फोट होऊ शकतो.

एक गोष्ट मात्र नाही पटली की माहेरी वेगळी अपेक्षा असते. माहेरी जरी काम सांगितले गेले तरी इच्छा नसेल, वेळेअभावी शक्य नसेल, तर ते तेवढ्याच स्पष्टपणे आणि हक्काने सांगता येतं. ते बऱ्याचदा समजूनही घेतलं जातं. पण सासरी मात्र सुनेने सगळं सांभाळून निमूटपणे ऐकावं, अशी मुख्य अपेक्षा असते. तिथे मुळातच असा स्पष्ट नकार देण्याची बऱ्याचदा हिंमत होत नाही. आणि जेव्हा दिला जातो, तेव्हा उघडपणे किंवा पाठीमागे काहीतरी टोमणे अथवा शाब्दिक बाण झेलावे लागतात. त्यामुळे सासरी आणि माहेरी मुलींचं वागणं वेगळं वाटतंच. शेवटी माहेरचा निर्धास्तपणा वेगळाच.