माझ्या बाबाचा लटका राग

Submitted by मुक्ता.... on 20 February, 2020 - 02:16

एक बाबा कधी कधी
खूप खूप रागावतो
घरी येऊन बेडरूममध्ये
गाल मोठठे फुगवतो

बागेत चाललो खेळायला
बाय मला म्हणत नाही
राग त्याचा पळवायला
काय करू कळत नाही

झाला एवढा वेळ तरी
बाबा माझ्याशी हसत नाही
झोपाळा सोडून आलो घरी
हा काय माझ्याशी बोलत नाही

गरम गरम वरणभाताचा
घास मला भरवत नाही
मस्त फुगलेल्या पोळीवर
तुपाची धार धरत नाही

हळूच बघतो माझ्याकडे
डोळ्यांच्या कोपऱ्यातून
हसू त्याच लपवतो
मिशीच्या झुपक्यातून

हाताची घडी घालतो
नि मला बघतो दुरून
त्याचा माझा फोटो बघतो
सगळ्यांपासून चोरून

हेडफोन लावून ऐकतो
माझी आवडती गाणी
मधेच माझ्याकडे बघतो
लपवून डोळ्यातलं पाणी

वाट तुझी बघून मी
एकटा एकटा झोपतो
दमलेले पाय माझे
बाबा मग चेपतो

फॉर यू
माय लवली बाबा

रोहिणी बेडेकर

Group content visibility: 
Public - accessible to all site users