छापील नियतकालिके : अनुभव आणि आठवणी

Submitted by कुमार१ on 19 February, 2020 - 23:53

पंधराव्या शतकात लागलेला छपाईयंत्राचा शोध हा खरोखर क्रांतिकारक होता. त्यापूर्वी उपलब्ध ज्ञान हे केवळ हस्तलिखित स्वरुपात साठवता येत असे. त्यामुळे त्याच्या समाजप्रसाराला खूप मर्यादा होत्या. छपाईचे तंत्र जसे विकसित झाले, तसे अधिकाधिक माहिती व ज्ञान बहुसंख्यांपर्यंत पोचू लागले. त्यातूनच समाजात लेखनपरंपरा विस्तारली. शिक्षणाच्या प्रसारातून अनेकजण लेखन करू लागले. त्याला छपाईची जोड मिळाल्याने छापील मजकुराची निर्मिती होऊ लागली. अशा प्रकारे ज्ञानप्रसार वेगाने आणि दूरवर होऊ लागला.

निरनिराळ्या प्रकारची माहिती जनसामान्यांपर्यंत पोचवण्यासाठी विविध छापील माध्यमे निर्माण झाली. गरजेनुसार अगदी एक पानी माहितीपत्रकापासून ते हजारो पानांच्या ग्रंथापर्यंत छापील माध्यमांचा विस्तार झाला. सध्या जर आपण उपलब्ध छापील माध्यमांवर नजर टाकली, तर आपल्याला दैनिक, साप्ताहिक, पाक्षिक, मासिक आणि वार्षिक या प्रकारची नियतकालिके आणि विविध पुस्तकांचा समावेश करता येईल. अर्थात पाक्षिक आणि मासिकांची संख्या खूप रोडावली आहे हे खरे.

अशा प्रकारे गेल्या साडेपाचशे वर्षांत छापील माध्यमांचा अवाढव्य विस्तार झालेला आहे. त्यातून एक लेखनपरंपरा स्थिरावली आहे. या परंपरेत लेखक हा हाताने मजकूर लिहितो, मग त्यावर विविध मुद्रणसंस्कार होतात व त्या लिखाणाची छापील प्रत तयार होते. ती प्रकाशक व विक्रेता यांच्या माध्यमातून शेवटी वाचकापर्यंत पोचते.

गेल्या शतकाच्या साधारण मध्यापर्यंत ‘वाचन’ या शब्दाचा अर्थ हा कुठलाही छापील मजकूर हातात घेऊन पाहणे एवढाच मर्यादित होता. किंबहुना, सर्व साक्षर समाज याच प्रकारच्या वाचनाला सरावला होता. लेखक म्हणजे लेखणीने कागदावर काही मजकूर लिहिणारा आणि वाचक म्हणजे तो छापील मजकूर हातात घेऊन वाचणारा अशी समीकरणे दृढ झाली होती. लेखन-वाचनासाठी याव्यतिरिक्त अन्य कुठले माध्यम भविष्यात निर्माण होऊ शकेल हे कोणाच्या गावीही नसावे !

विसाव्या शतकातील सर्वात क्रांतिकारी शोध ज्याला म्हणता येईल तो म्हणजे संगणकाचा उदय. जर छपाई तंत्राने ज्ञानप्रसाराचा पाया घातला असे म्हटले, तर संगणक तंत्रज्ञानाने त्यावर कळस चढवला असेच म्हणावे लागेल. इतिहासाच्या दृष्टीने आधुनिक लेखनाचा विचार करता आधी हस्तलेखन, मग टंकलेखन आणि शेवटी संगणकलेखन असे तीन टप्पे पडले. त्यामुळे लेखन फक्त कागदावरच करता येते, या कल्पनेला सुरुंग लागला. आता लेखनासाठी एक सशक्त असे इ-माध्यम उपलब्ध झाले. त्यानंतर संगणकशास्त्राचा अफाट विकास झाला. कालांतराने त्याला आंतरजालाची जोड मिळाली. हळूहळू सुशिक्षितांची संगणक साक्षरता वाढत गेली आणि मग या नव्या माध्यमातून माहितीचे आदानप्रदान विलक्षण वेगाने सर्वदूर होऊ लागले. नंतर शालेय जीवनापासूनच संगणक व जालाचे शिक्षण घेतलेली नवी पिढी उदयास आली. या पिढीत जे लेखक निर्माण झाले त्यांनी लेखनासाठी पारंपरिक लेखणी ऐवजी संगणकाचा कळफलक वापरणे अधिक पसंत केले.

जगभरात आज लेखन-वाचनासाठी छापील व इलेक्ट्रॉनिक(इ) या दोन्ही माध्यमांचा वापर होतो. विकसित देशांत इ-माध्यमाचा वरचष्मा जाणवतो तर अविकसित देशांत अजूनही छापील माध्यम वरचढ असल्याचे दिसते. जेमतेम अर्धशतकाचा अनुभव असलेले इ-माध्यम साडेपाचशे वर्षे जुने असलेल्या छापील माध्यमाला हद्दपार करेल का, अशी शक्यता अधूनमधून व्यक्त होते. तूर्तास तरी ही दोन्ही माध्यमे एकमेकांशी स्पर्धा करीत आपापले अस्तित्व व्यवस्थित टिकवून आहेत. साहित्यविश्वात या दोन्हींतून लिहिणारे लेखक उपलब्ध आहेत. त्यामुळे वाचकांना दोन माध्यमांचे पर्याय मिळालेले आहेत.

या लेखाचा उद्देश छापील माध्यमाचा एक मर्यादित आढावा घेण्याचा आहे. त्यानिमित्ताने काही स्मृतींना उजाळा देत आहे, तर लेखातील काही मुद्दे आजही लागू आहेत. या माध्यमात नियतकालिके आणि पुस्तके प्रसिद्ध होतात. नियतकालिकांचे दैनिक, साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक हे मुख्य प्रकार आहेत. यापैकी दैनिक हा पूर्णपणे वेगळा प्रांत असून त्याला या लेखाच्या कक्षेत घेतलेले नाही. मासिक आणि वार्षिक हे प्रकार साहित्य प्रकाशनाच्या दृष्टीने महत्वाचे असतात. बऱ्याच साहित्यिक पुस्तकांचा जन्म हा संबंधित लेखनाच्या या दोन नियतकालिकातील पूर्वप्रसिद्धीतून होत असतो. गेल्या काही वर्षांत ‘मासिक’ या प्रकाराला उतरती कळा लागली आहे खरी. पण मराठीत दिवाळी अंकांच्या रूपाने विविध वार्षिके अजून त्यांचा दबदबा टिकवून आहेत. ‘पुस्तक-निर्मिती’ हा देखील एक अवाढव्य प्रांत असून तोही या लेखाच्या कक्षेत नाही. तेव्हा मासिक आणि वार्षिक नियतकालिके हीच या लेखाचा केंद्रबिंदू आहेत. त्यांना नजरेसमोर ठेऊन या माध्यमाची वैशिष्ट्ये लिहीत आहे. त्यासाठी खालील मुद्दे निवडले आहेत.

१. नियतकालिकाचे धोरण
२. त्याचा कारभार

३. लेखकाच्या दृष्टीने माध्यमाचे फायदे/तोटे
४. वाचकाच्या दृष्टीने माध्यमाचे फायदे/तोटे

५. प्रकाशित साहित्याचे जतन आणि
६. माध्यमाचे भवितव्य

नियतकालिकाचे धोरण:
काही नियतकालिके मुक्त साहित्य स्वीकारतात. त्यांना कोणताही विषय वर्ज्य नसतो. याउलट काही फक्त विशिष्ट विषयांना अथवा कल्पनांना वाहिलेली असतात. लेखक-निवडीबाबतसुद्धा यांत भेद असतो. काही फक्त प्रथितयशांनाच अंकात स्थान देतात. त्यांना आपल्या अंकासाठी अनाहूत साहित्य नको असते. त्यांच्या अंकांमध्ये साहित्य पाठविण्यासंबंधीचे आवाहन कधीच केलेले नसते. तेच ते प्रस्थापित लेखक हाताशी धरून त्यांचा साहित्यप्रपंच चालू असतो. एकप्रकारे अशी नियतकालिके त्यांची ‘पाळीव लेखकांची’ फौज पदरी बाळगून असतात.
याउलट काही नियतकालिके मात्र प्रस्थापितांबरोबरच नवोदितांनाही आवर्जून संधी देतात. त्यांच्या अंकांमध्ये साहित्य पाठविण्यासंबंधीचे आवाहन वेळोवेळी केलेले असते. असे धोरण नवे लेखक घडविण्यासाठी अत्यंत गरजेचे असते. ही नियतकालिके नवोदित व हौशी लेखकांना वरदान ठरतात.
नियतकालिकांचा अजून एक प्रकार दिसतो तो म्हणजे विशिष्ट समूहापुरतीच मर्यादित असलेली. त्यांचे वर्गणीदार हेच फक्त त्यांचे वाचक व लेखक असतात. त्यांचा उद्देशच कोषात राहण्याचा असतो आणि साहित्यप्रसार हे त्यांचे ध्येयही नसते.

कारभार :
काही नियतकालिके संस्था वा समूहाच्या मालकीची असतात. त्यांनी जो संपादक नेमलेला असतो तो कामकाजाच्या बाबतीत पूर्णतः स्वतंत्र नसतो. अंकाच्या साहित्य निवडीबाबत त्याच्यावर मालकाचा अंकुश असतो. ज्याप्रमाणे एखाद्या चित्रपटाचा नेता हा खरेतर त्याचा दिग्दर्शक असतो पण, त्याच्या डोक्यावर बसलेल्या निर्मात्याच्या इच्छेप्रमाणे त्याला वागावे लागते. तसाच काहीसा प्रकार इथे असतो. त्यामुळे मुक्त साहित्य व लेखक-निवड ही काहीशी बंधनात असते.
काही नियतकालिके मात्र एकखांबी तंबू असतात. इथे मालक, प्रकाशक व संपादक सबकुछ एकच व्यक्ती असते. असा संपादक स्वयंभू असतो आणि तो खऱ्या अर्थाने दिग्दर्शकाची भूमिका वठवतो. त्याचबरोबर इथल्या साहित्यनिवडीबाबत मनमानीही होऊ शकते.

जी नियतकालिके अनाहूत साहित्य स्वीकारतात त्यांचा लेखकांशी व्यवहार वेगवेगळा असतो. जबाबदार संपादक लेखकाला पसंती अथवा नापसंतीचा निर्णय योग्य वेळेत कळवतात. त्यापैकी काही जण नापसंतीची कारणेही देतात. तर काही संपादक फक्त पसंतीचाच निर्णय कळवतात व नापसंत लेखनाची बोळवण करतात. अशाने नवोदित लेखक नाउमेद होतो. काही मोजकेच संपादक लेखकाशी चर्चा करण्यास उत्सुक असतात जेणेकरून त्याच्या लेखनाचा दर्जा उंचावू शकतो.

नियतकालिकांकडून लेखकांना दिले जाणारे मानधन हा एक संवेदनशील विषय आहे. याबाबतीत बऱ्याच तऱ्हा आढळतात. लेखकाला मानधनाची आगाऊ कल्पना देणे आणि त्याप्रमाणे नंतर खरोखर देणे, पूर्वकल्पना न देता एकदम अंकाबरोबर मानधन देणे, अथवा ते अजिबात न देणे असे सर्व प्रकार दिसतात.
थोडक्यात काय, तर छापील माध्यमांत साहित्यव्यवहार हा ‘संपादककेंद्री’ असतो. त्यामुळे काही अपवाद वगळता लेखक हा काहीसा याचकाच्या भूमिकेत असतो. संपादकाने एखादे लेखन नाकारण्यामागे लेखनाच्या दर्जाबरोबरच संपादकाच्या नावडीचा भाग मोठा असतो.

लेखकाच्या दृष्टीने माध्यमाचे फायदे/तोटे
:
या माध्यमातील एक महत्वाचा मुद्दा म्हणजे लेखन प्रकाशनापूर्वीचे त्यावरील संपादकाचे नियंत्रण. त्यामुळे लेखकाला जे काही व ज्या काही तीव्रतेने लिहायचे असते त्यावर काहीसे बंधन येते. अर्थात, ज्या नियतकालिकांतून सवंग व भडक लिखाण जाणीवपूर्वक प्रसिद्ध केले जाते तिथे मात्र संपादक लेखकाला त्यासाठी उद्युक्तही करू शकतो !
या माध्यमाची एक महत्वाची मर्यादा म्हणजे त्याच्या वितरणाला येणाऱ्या भौगोलिक मर्यादा. त्यामुळे लेखनप्रसार हा एका परिघातच होतो. भारतात हिंदी व इंग्लीशमधील साहित्य वगळता अन्य भाषांतील साहित्य हे साधारणतः ज्या त्या राज्यापुरते मर्यादित राहते. अर्थात गेल्या अर्धशतकात अनेक साहित्यप्रेमी भारतीय परदेशात स्थायिक झालेले असल्याने काही नियतकालिके अल्प प्रमाणात का होईना परदेशी पोचतात. परंतु असे अंक हे सामान्य टपालाने जात असल्याने त्यात पोचण्याची अनियमितता असते. इ-माध्यमाच्या प्रसारानंतर आता असे वितरण झपाट्याने कमी होत आहे.

लेखकासाठी अजून एक मुद्दा म्हणजे त्याच्या प्रकाशित लेखनावर येणाऱ्या वाचक-प्रतिक्रिया. लेखक हा त्यासाठी आसुसलेला असतो. यासाठी लेखाबरोबर लेखकाची संपर्क माहिती (फोन, इ.) प्रसिद्ध करावी लागते. याबाबत नियतकालिकांची वेगवेगळी धोरणे असतात. काही संपादक लेखकाची कोणतीही संपर्क माहिती देत नाहीत. काही जण फक्त त्याच्या गावाचे नाव देतात, तर मोजकेच जण पूर्ण संपर्क माहिती देतात. या धोरणांमागे संपादकांचे अंतस्थ हेतू असतात.
तसेच संपादकास वाचकांकडून आलेल्या प्रतिक्रिया किती प्रमाणात प्रसिद्ध करायच्या हेही संपादकाच्या मनावर आणि उपलब्ध जागेवर ठरते. (अर्थात हा मुद्दा मासिकास लागू असून वार्षिकाचे बाबतीत त्याचा प्रश्नच येत नाही). त्यामुळे, एखाद्या लेखावर आलेल्या एकूण प्रतिक्रिया आणि त्यातल्या लेखकापर्यंत पोचणाऱ्या प्रतिक्रियांत बराच फरक पडतो. लेखकाला आनंद देणाऱ्या या गोष्टीवरही संपादकाचे नियंत्रण राहते. म्हणजेच, इथे लेखक व वाचकांदरम्यान संपादकीय चाळणीचा मोठा अडसर असतो. एका बाबतीत मात्र या चाळणीचा लेखकाला फायदा होतो. जर का एखाद्या वाचकाची प्रतिक्रिया जहाल किंवा विनाकारण लेखकाला नाउमेद करणारी असल्यास संपादक तिला सरळ केराची टोपली दाखवू शकतो. यातून लेखक व वाचकादरम्यान वैयक्तिक शत्रुत्व होत नाही. हा या माध्यमाचा फार मोठा फायदा आहे.

वाचकाच्या दृष्टीने माध्यमाचे फायदे/तोटे:
सध्याचे मध्यमवयीन व ज्येष्ठ वाचक वर्षानुवर्षे छापील वाचनाला सरावले आहेत. आज जरी इ-माध्यमाचा प्रसार वाढता असला, तरी या पिढीतील वाचकांचे छापील माध्यमावर अतोनात प्रेम आहे. या वाचनाचे बरेच फायदेही असतात. मुख्य म्हणजे ते डोळ्यांना सुखद असते. त्याच्या दीर्घ वाचनातूनसुद्धा डोळे, मान इ.च्या व्याधी सहसा जडत नाहीत. ते दिवसा वाचताना त्यासाठी वेगळी उर्जा (वीज) लागत नाही. तसेच एखादा छापील अंक प्रत्यक्ष हाताळण्याचा व त्याच्या मुखपृष्ठाकडे मनसोक्त बघण्याचा आनंद काही औरच असतो. तसेच वाचताना आपल्याला आवडलेल्या परिणामकारक मजकुराची स्मृती दीर्घकाळ राहते. हे वाचन खऱ्या अर्थाने नैसर्गिक असते. मात्र एक गोष्ट वाचकाच्या दृष्टीने रसभंग करणारी असते. ती म्हणजे वाचताना मध्येमध्ये येणाऱ्या रंगीबेरंगी जाहिरातीच्या पानांचा व्यत्यय. आर्थिकदृष्ट्या समृद्ध नियतकालिकांत त्याचे प्रमाण कधीकधी (उदा. दिवाळी अंक) साहित्य मजकूराच्या बरोबरीचे असते !
फक्त छापील वाचनावर विसंबून असलेल्या वाचकांचे बाबतीत संबंधित अंकांचे सुलभ व नियमित वितरण ही महत्वाची बाब आहे. त्यातील त्रुटीमुळे वाचकांचा विरस होतो.

साहित्याचे जतन :
चोखंदळ वाचकांना आवडीच्या वाचनाचे जतन करण्याची सवय असते. यामध्ये एखाद्या मजकुराचे कात्रण काढून ठेवण्यापासून ते पूर्ण अंक जतन करण्यापर्यंत प्रकार असतात. वैयक्तिक पातळीवरचे जतन एका मर्यादेपर्यंतच शक्य असते. घरामध्ये जुन्या अंकांचा साठा करणे आणि त्यांची निगा राखणे हा कटकटीचा विषय असतो. बऱ्याच कुटुंबियांच्या मते तो जागेचा अपव्यय असतो. त्यामुळे हे ‘अतिक्रमण’ हटवण्यास ते उत्सुक असतात ! तेव्हा आयुष्याच्या नियमित टप्प्यांवर अशा जुन्या साहित्याला कठोरपणे रद्दीत घालावे लागते.
सार्वजनिक पातळीवरचे जतन हे ग्रंथालयांचे काम. जागेच्या उपलब्धतेनुसार ते कमी अधिक प्रमाणात होते. परंतु त्यालाही कधीतरी मर्यादा पडतातच. जतन केलेल्या अतिजुन्या पुस्तकांची अवस्था बऱ्याचदा दयनीय असते. वाचकाने एखाद्या भल्या मोठ्या ग्रंथालयातून जर ५० वर्षांपूर्वीचे पुस्तक बाहेर काढले, तर ते वाचण्यापूर्वीच त्यात साठलेल्या धुळीमुळे फटाफट शिंका येऊन तो बेजार होतो ! हे सर्व त्रास बघता आता जुन्या छापील साहित्याचे इ-स्वरुपात जतन करण्याची गरज निर्माण झाली आहे. तसेच गेल्या २५ वर्षांत पारंपरिक ग्रंथालयांची संख्यादेखील ओसरत चालली आहे. हे कालसुसंगत आहे.

माध्यमाचे भवितव्य :
साधारणपणे समाजात कुठलेही नवे तंत्रज्ञान आले व रुजले की ते जुन्याला मोडीत काढते. जसे की, वाहतुकीसाठी रिक्षा आल्या अन त्यामुळे टांगे नामशेष झाले; प्रत्येकाच्या हाती चलभाष आला आणि त्यामुळे स्थिरभाष-बूथ्स कालबाह्य झाले. तेव्हा साडेपाचशे वर्षे जुन्या छापील माध्यमाला जेमतेम पन्नाशीतले इ-माध्यम भविष्यात हद्दपार करणार का, असा प्रश्न मनात येतो.

जरी ‘इ’ चे वर्चस्व वाढत गेले तरी छापील पूर्णपणे संपणार नाही असे वाटते. आज विकसित देशांत ‘इ’ चा वरचष्मा दिसतो. पण, विकसनशील देशांत तरी छापील वरचढ आहे. इ-माध्यम तळागाळात पोचण्यासाठी साक्षरता, संगणक-साक्षरता, पुरेशी वीज, जालाची व्यापक उपलब्धता व त्याचा पुरेसा वेग असे अनेक अडथळे आपल्याला अजून पार करायचे आहेत. त्यामुळे आपल्याकडे अजून काही काळ तरी छापीलचे वर्चस्व राहील असे दिसते.

यासंदर्भात आकाशवाणी व दूरचित्रवाणी या माध्यमांचे उदाहरण देतो. दूरचित्रवाणीच्या व्यापक प्रसारानंतर असे वाटले होते की आता आकाशवाणी संपली. पण, वस्तुस्थिती तशी नाही. आकाशवाणीने कात टाकल्याने आजही ती ऐकणारे चोखंदळ श्रोते आहेत. त्यांना हे श्राव्य माध्यम दूरचित्रवाणीपेक्षा अधिक प्रिय व विश्वासार्ह वाटते. याच धर्तीवर लेखनात जरी ‘इ’ चे वर्चस्व वाढत गेले, तरी छापील त्याच्या काही खास वैशिष्ट्यांमुळे नक्कीच टिकून राहील.

अलीकडेच जागतिक पातळीवर पुस्तकांसंबंधी सर्वेक्षण झाले. त्याचा निष्कर्ष दखलपात्र आहे. अन्य क्षेत्रांवर डिजिटल तंत्रज्ञानाचा मोठा परिणाम झाला असला, तरी पुस्तकांच्या बाबतीत जागतिक बहुसंख्य वाचक अजूनही छापील प्रतीच्याच प्रेमात आहेत ! याची काही कारणे अशी आढळली :
छापील पुस्तकाचे आकर्षक मुखपृष्ठ वाचकांना मोहविते.
या पुस्तकावर वाचकाला हव्या तशा नोंदी करता येतात.
असे पुस्तक कायम संग्रही ठेवल्यास ते खऱ्या अर्थाने आपल्या ‘मालकीचे’ वाटते.
* * *

( पूर्वप्रसिद्धी : ‘अंतर्नाद’ मासिक . संक्षिप्त स्वरुपात येथे प्रकाशित).

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लेख चांगला आहे.
• मराठी भाषेतले पहिले वार्षिक(किंवा मासिक किंवा साप्ताहिक) कोणते होते
• त्यानंतर पुढे दरवर्षी किती नवीन वार्षिकांची भर पडत गेली
• किती बंद पडले
• ती कोणत्या साहित्य प्रकाराला वाहिलेली होती
• त्या प्रकारात काळानुसार कसा बदल होत गेला
वगैरे सगळी माहिती जमा केली तर थिसिस करण्याइतके मटेरिअल होईल बहुतेक!

> एका बाबतीत मात्र या चाळणीचा लेखकाला फायदा होतो. जर का एखाद्या वाचकाची प्रतिक्रिया जहाल किंवा विनाकारण लेखकाला नाउमेद करणारी असल्यास संपादक तिला सरळ केराची टोपली दाखवू शकतो. यातून लेखक व वाचकादरम्यान वैयक्तिक शत्रुत्व होत नाही. हा या माध्यमाचा फार मोठा फायदा आहे. > फायदा की तोटा नक्की सांगता येणार नाही...

> हे सर्व त्रास बघता आता जुन्या छापील साहित्याचे इ-स्वरुपात जतन करण्याची गरज निर्माण झाली आहे. > मी पूर्वी कुठेतरी प्रश्न विचारला होता - मराठीतील कॉपीराईट बाहेर आलेल्या पुस्तकांसाठी गटेनबर्ग सारखी कुठली साईट आहे का?

एमी,
चांगला प्रतिसाद.

मराठी भाषेतले पहिले वार्षिक कोणते होते ?
>>
बहुतेक 'मनोरंजन'.

<मराठीतील कॉपीराईट बाहेर आलेल्या पुस्तकांसाठी गटेनबर्ग सारखी कुठली साईट आहे का?>

ॲमी, पुस्तकालय ही साईट बघा!

छान मुद्देसूद लेख.

< इ-माध्यम तळागाळात पोचण्यासाठी साक्षरता, संगणक-साक्षरता, पुरेशी वीज, जालाची व्यापक उपलब्धता व त्याचा पुरेसा वेग असे अनेक अडथळे >
+ ११ .
पेपर व पुस्तके अजूनही छापीलच अंगवळणी पडलीत. ऐसपैस वाचता येते. Bw

ॲमी,

मराठीतलं पाहिलं साप्ताहिक 'दर्पण' आणि पाहिलं मासिक 'दिग्दर्शन'.

तुम्ही सुचवलेल्या विषयावर मराठीत विपुल लेखन व संशोधन झालं आहे.

'मनोरंजन' हे फक्त वार्षिक कधीच नव्हतं.

> तुम्ही सुचवलेल्या विषयावर मराठीत विपुल लेखन व संशोधन झालं आहे. > छान.
मराठी भाषा दिन उपक्रमाअंतर्गत ते लेखन-संशोधन इथे माबोवर प्रसिद्ध करता येईल का? किंवा आधीच केले असेल तर लिंक मिळेल का?

सध्या डझनभर दिवाळी अंकच वाचनीय असतात. मासिके लुप्त होत आहेत. साप्ताहिके ही त्यांची भावंडे असलेल्या दैनिकांचीच री ओढतात. त्यामुळे ती 'प्रवासातील टाइमपास' म्हणून ठीक.

टवणे सर,

माबोच्या दिवाळी अंकात. तो फक्त दिवाळी अंकांचा आढावा होता.

ॲमी,
नाही. गं. दे. खानोलकर यांच्यासारख्या संशोधकाचं प्रचंड मोठं काम इथे आणणे शक्य नाही. इतर अनेकांनीही खूप काम केलं आहे. कॉपीराईटच्या बाहेर असलेले काही ग्रंथ ऑनलाईन उपलब्ध आहेत, ते तुम्ही वाचू शकता.

इ- माध्यमाचा तोटा म्हणजे डोळे खराब व्हायचे चान्सेस जास्त आहेत.
चांदोबा, श्री, मायापुरी, जत्रा, चित्रलेखा आवर्जून विकत घेत असायचो मी.