Submitted by निशिकांत on 19 February, 2020 - 01:37
जिंकणे हा धर्म अपुला हार आम्हा ठाव नाही
हार जेथे वास करते आमुचा तो गाव नाही
मर्द शिवराया विराजे सर्वदा ह्रदयी जनाच्या
शौर्य नांदे त्या प्रदेशी, भेकडांना वाव नाही
विठ्ठलाचे भक्त आम्ही रंगतो भजनी अभंगी
भाकरी पिठले भुकेला जास्त मोठी हाव नाही
घेतली हाती पताका ऊंच धरण्या संस्कृतीची
दूर रस्ता एकमार्गी, जीवनी घुमजाव नाही
श्रीभवानी दैवताचा ठेवतो आदर्श आम्ही
आज महिषासूर येथे शांत त्याला भाव नाही
शेत कसण्या घाम अमुचा पण इथे परकेच चरती
टोळधाडीला जरास का इथे मज्जाव नाही?
लावुनी खांद्यास खांदा जिंकली शिखरे हजारो
धेय मार्गी चालताना रंक कोणी राव नाही
कष्ट करणे पोट भरणे तत्व हे जोपासताना
मी कधी काळ्या धनावर मारलेला ताव नाही
या महाष्ट्रात जन्मुन धन्य "निशिकांता"स वाटे
रांगडा झालो मराठी वेगळे मज नाव नाही
निशिकांत देशपांडे मो.क्र. ९८९०७ ९९०२३
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा