तोलतो शब्दास मी (ज़ुल्क़ाफिया.ग़ज़ल)

Submitted by निशिकांत on 16 February, 2020 - 23:06

बोलण्या आधीच माझ्या तोलतो शब्दास मी
घाव ना देतो न घेतो पाळतो तत्वास मी

लडखडू द्या अन् पडू द्या का दया मज दावता?
शापितांचा गाव हा पण राहतो फर्मास मी

दार सटवाईस केले बंद ती येता घरी
मीच जिम्मेदार माझा कोरतो भाग्यास मी

दु:ख माझे मी गिळावे दाखवावे का जगा?
तोरणे, सुतकातही पण बांधतो दारास मी

राजकारण भ्रष्ट झाले लाचखोरी माजली
रामशास्त्र्यांच्याच चरणी ठेवतो विश्वास मी

ताज आग्र्याचा कशाला? भेट देता तिज फुले
चेहरा फुलतो असा की पाहतो मधुमास मी

व्यर्थ उडीदातून गोरे सांगता निवडावया
दान करण्याला मताचे शोधतो शुभ्रास मी

धर्म दावा एक मजला अंधश्रध्देविन जगी
पण तरीही श्रेष्ठतेच्या ऐकतो दाव्यास मी

भूक "निशिकांता"स छळते, गाडली तत्वे अता
गोत्र कुठलेही असू द्या, जेवतो श्राध्दास मी

निशिकांत देशपांडे मो.क्र. ९८९०७ ९९०२३

Group content visibility: 
Public - accessible to all site users