"जलसाक्षरता काळाची गरज"

Submitted by मुग्धा जोशी on 12 February, 2020 - 03:07

"जलसाक्षरता काळाची गरज"

पाणी वाचवणे आता अतिशय जरूरीचे झाले आहे, कारण देशात सगळीकडे पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. मुंबईसारख्या शहरातही पाणी टंचाई आहे, तर छोट्याछो्ट्या खेड्यातील हाल पहायलाच नकोत. ति्थे तर टॅंकरने पाणी आणलेलेही पुरत नाही. पाण्याने आपले सगळे आयुष्य व्यापून टाकले आहे. अशा या पाण्याचे योग्य जतन, बचत करणे आणि त्याचा योग्य वापर करणे आपल्या प्रत्येकाचे कर्तव्य आहे. आपण पाणी कुठे वाया घालवतो त्याचा अभ्यास करण्याची वेळ आली आहे.

पाण्याचे मूळ आणि ऋषीचे कूळ विचारू नये म्हणतात. पण आता पाण्याचे मूळ शोधण्याची वेळ आली आहे. आपली पृथ्वी ७०% पाण्याने व्यापलेली आहे. त्यात फक्त २.५% गोडं पाणी आहे. पाण्यावरच हे सृष्टीचे चक्र फिरत आहे, आपण पाण्याशिवाय पॄथ्वीची कल्पनाही करू शकत नाही. निसर्गाची नासाडी थांबवणे आता आपल्या हातात आहे. जागतिक तापमान वाढीमुळे जगात चिंतेचे वातावरण पसरले आहे, त्या तापमान वाढीला आपण हातभार न लावणेच बरे. नाही का?

अन्नाशिवाय एखादा माणूस महिनाभर जगू शकतो पण पाण्याशिवाय काही दिवसही जगणे केवळ अशक्य आहे. कारण आपल्या शरीरात ८५% पाणी असते. शरीराच्या विविध अवयवांच्या चलनवलनात पाण्याचे महत्व मोठं आहे. त्यासाठी शुद्ध पाण्याची आवश्यकता आहे. शरीरातील रक्तामध्ये ९२% टक्के पाणी असते. शरीरातील ठिकठिकाणच्या सांधेजोडीत वंगण म्हणून शरीराच्या तापमानाच्या नियंत्रणासाठी पाण्याची गरज असते. त्यासाठी पाण्याचे विशिष्ट प्रमाण आपल्या शरीरात असणे आवश्यक आहे. नाहीतर 'डिहायड्रेशन'चा धोका असतो.

आपले आरोग्य चांगले राखण्यासाठी पाणी उकळून, गाळून, आणि गार करून किंवा फिल्टर करून पिणे गरजेचे असते. पिण्यासाठी अनेकजण बाटलीबंद पाणी वापरतात. जगभरात प्लास्टिक विरोधी वातावरण असताना शुद्ध पाणी दिले जात असल्याचा दावा केला जातो. पण शुद्ध पाणी ज्या प्लास्टिक बाटलीमधून दिले जाते त्याचे प्लास्टिक चांगल्या दर्जाचे नसते. बऱ्याचदा या बाटल्या दुय्यम आणि घटक दर्जाच्या प्लास्टिकपासून तयार केलेल्या असतात. त्यामुळे त्यातील पाणी अशुद्ध होऊन ते पिण्यासाठी अयोग्य ठरते. घराघरात फ्रिजमध्ये पाणी भरून बाटल्या भरून ठेवण्याची पद्धत आहे. पण या बाटल्या आठवड्यातून एकदा तरी धुतल्या जातात का हाही एक संशोधनचा विषय आहे.
आपण आपल्या दैनंदिन जीवनातही थोडा विचार करून, योग्य नियोजन करून, पाण्याचा दुरूपयोग टाळू शकतो. पण त्यासाठी काय केले पाहिजे .

उन्हाळ्याच्या दिवसात २ वेळा 'वॉश' घेणारेही अनेकजण असतात. त्यासाठी ५० ते १५० शुद्ध पाणी वापरले जाते. रोजचे कपडे धुण्यासाठी ४० ते १७० लिटर पाणी वापरले जाते. उच्च मध्यमवर्गीय आणि उच्चभ्रू कुटुंबात पाश्चात्य पद्धतीची स्वच्छतागृहे असतात. त्यासाठी १२ लिटर शुद्ध पाणी फ्लशद्वारे सांडून टाकले जाते. हे पाणी साठवून शौचकुपात 'फ्लश' ऐवजी वापरता येईल. खूपजण दात घासताना बेसिनचा नळा उघडाच ठेवतात. दात घासताना बेसिनचा नळ बंद करण्याची काळजी घ्यावी. तसेच गळणाऱ्या नळाच्या तोट्या बदलता येतील. काहीजणांना शॉवरखाली आंघोळ करण्याची भारी हौस असते, अगदी धबधब्याखाली आंघोळीचा आनंद घेतात, पण त्यांच्या लक्षात येत नाही की आपण किती पाणी वाया घालवतो ते. हॉटेलमध्ये ग्लासातील पाणी अर्धवट प्यायल्यानंतर बाकीचे पाणी फेकून देतात, त्यापेक्षा हॉटेल मध्ये छोट्या ग्लासात पाणी दिल्यास वाया जाणार नाही, पण का्ळजी कोण घेतो. खूप ठिकाणी रस्त्यावर पाणी मारतात, त्याचा काय फायदा ते एक तो दुकानदारच जाणो. त्याला एकदा मी सांगण्याचा प्रयत्न केला तर त्याने सुनावले, आम्ही तुमच्या घरचे पाणी वापरतो काय? हे तर सरकारचे पाणी आहे. मोठमोठया सोसायटीत टाक्या भरून वाहतात पण एक बॉल कॉक बसविल्यास पाणी वाहणार नाही, थोड्याशा विचाराने, एका बॉलकॉकने आपण किती पाण्याची बचत करू शकतो, हे सांगून पटणार नाही. पाण्याखाली घागर किंवा कोणतेही भांडे ठेवले तरी ते वाहून जाणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. स्वयंपाकघरातील, भाज्या, फळे धुण्यासाठी वापरलेले पाणी कुंड्यातील रोपांना घालावे. दरवेळी अर्धवट ठेवलेले पेल्यातील किंवा तांब्यातील पाणी एका बादलीत जमा करून सडा टाकण्यासाठी वापरावे.

शुद्ध पाण्याची अशी नासाडी आपण सहजपणे करतो आणि सार्वजनिक नळावर ते मिळविण्यासाठी किती भांडतो? घरातल्या नळाला पाणी आले नाही म्हणून महापालिका यंत्रणेला शिव्या घालतो पण पाणी आले कि कसा त्याचा आपण गैरवापर करून पाणी वाया घालवतो याचा प्रत्येकाने विचार करायला पाहिजे. त्यातही फक्त ‘आपल्यापुरता’ ही संकुचित मनोवृत्ती सोडून परिसरातील नागरिकांचा गट करून सर्वांसाठी पाणी साठवण करणे गरजेचे आहे.

नदी आणि पाणी ह्यांचे अनन्यसाधारण महत्व मान्य करून आपल्या पूर्वजांनी नद्यांना माता आणि देवत्व बहाल करून पापनाश, पुण्यवर्धक संकल्पना रुजवल्या आहेत. त्यामुळे निर्माल्य, देहदहनसंस्कारविधी असे कितीतरी त्याज्य पदार्थ नदीस अर्पण होऊ लागले आहेत. नदीकाठी जत्रा भरविणे, यात्रा, मेळावे, कुंभमेळा ह्यांचे आयोजन केले जाते. त्यामध्ये हजारो लाखोंच्या संख्येने लोक जमतात. त्यांची दिनचर्या भांडी, कपडे, स्नान, सगळे नदीकाठीच चालते. त्याद्वारे नदीचे पाणी दूषित होण्यास सुरुवात होते. पावसाचे आकाशातून पडणारे पाणी शुद्ध स्वरूपातच असते. पण जसे ते जमिनीवर पडून वाहू लागते त्यात माती, कचरा, वातावरणातील वायू मिसळतात.

आपल्याला पाणी मिळविण्याचा खात्रीशीर स्रोत म्हणजे पाऊस. त्याच्या लहरीपणावर आपले जीवन अवलंबून आहे. तो वेळेवर आला तर आपण आनंदी होतो. पण ओढ दिली तर संचित होतो. जमिनीवर पडणाऱ्या पावसाचा प्रत्येक थेंब अडविणे आणि जिरविणे गरजेचे आहे. त्यासाठी जलपुनर्भरण आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी त्यांच्या जमिनीत पडणाऱ्या आणि शहरी भागात राहणाऱ्या प्रत्येकाने आपल्या परिसरात पडणाऱ्या पावसाच्या पाण्याला थांबवून अडविणे आवश्यक आहे. शेतात शेततळी ,बांध बांधून आणि शहरी भागात 'रेन वॉटर हार्वेस्टिंग' म्हणजे छतावर पडणारे पाणी साठविता येईल. आपल्या घराच्या अंगणात मोठा हौद बांधून त्यात छतावर पडणारे पाणी साठवता येते. वृक्षतोड थांबवून मोठ्या प्रमाणात झाडे लावली पाहिजेत. झाडे पाणी वाहण्याच्या वेगावर मर्यादा घालतात.

खरे तर पाणी वाचविण्याची मानसिक तयारी जरूरी आहे, प्रबोधन जरूरी आहे. सांडपाण्याचाही पुनःवापर करता आला पाहिजे. यासाठी कायदा करून काही उपयोग होणार नाही. थोडक्यात सांगायचे तर, पाण्याचा काटकसरीने वापर करणे, जलपुनर्भरण करणे, पाण्याचा पुनर्वापर करणे, जलप्रदूषण टाळणे आणि शुद्ध पाणी प्राशन करणे म्हणजे जलसाक्षर होणे. आपल्या प्रत्येकाच्या घरातील सगळ्या व्यक्तींनी ‘जलसाक्षर’ होणे ही काळाची गरज आहे. तेव्हाच निसर्गाचे आशीर्वाद आपणांस भरभरून लाभतील.

"शुभं भवतु"

rain 2.jpgrain 5.jpg

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults