"माझी अविस्मरणीय गिरनार यात्रा"

Submitted by मुग्धा जोशी on 12 February, 2020 - 02:19

IMG-20191116-WA0000.jpg

"माझी अविस्मरणीय गिरनार यात्रा"

श्री दत्तात्रेयांनी जिथे प्रत्यक्ष निवास केला आहे आणि १२००० वर्षे तप केले आहे असे अक्षय निवास्थान म्हणजे श्रीक्षेत्र श्रीगिरनार. १०००० पायऱ्या चालून जाणे हे शारीरिक आणि मानसिक क्षमतेची कसोटी पाहणार असले तरी दत्तभक्तांनी एकदा तरी जायलाच पाहिजे असे हे स्थान. स्कंद पुराणात रैवत, रेवताचल, कुमुद, उज्जयंत अशी गिरनारची नावे आढळतात. पश्चिम भारतातील गुजरात राज्यामध्ये जुनागढ या शहरापासून गिरनार तळ ५ कि. मी. अंतरावर आहे. गिरनार पर्वताचा परिसर अत्यंत निसर्गरम्य, विलोभनीय, वन्यप्राणी जगताने संपन्न असून विविध औषधी वनस्पतींनी युक्त आहे. अनादीकालापासून कित्येक सिद्धयोगी गिरनारच्या गुफांमध्ये साधना करीत आहेत. याच ठिकाणी साक्षात श्री दत्तात्रेयांनी कित्येक संतांना दर्शन दिले आहे.

गिरनार पर्वताच्या पायथ्याला ( तलेठीला ) भवनाथ मंदिर, भगवान महादेव मंदिर, मृगी कुंड, लंबे हनुमान मंदिर अशी प्राचीन देवळे आहेत. महाशिवरात्रीला येथे ५ दिवसांची जत्रा भरते. मृगी कुंडातील सिद्धांचे स्थान हे प्रमुख आकर्षण असते. येथे अशी आख्यायिका आहे कि स्वयं शिव स्नानासाठी येथे येतात. मृगी कुंडामध्ये नागा साधू स्नानास येतात, तेव्हा डुबकी मारल्यानंतर एक साधू असा असतो कि जो अंतर्धान पावतो तोच स्वयं शिव असतो. लंबे हनुमान समोरील एका पायवाटेने सुमारे अडीच ते तीन कि.मी. आत जंगलाच्या दिशेने १०५ वर्षे वय असणाऱ्या संत काश्मिरीबापूंचा आश्रम आहे.

पायऱ्या चढायच्या आधी एक कमान लागते तेथून सर्व भाविक गिरनार चढण्यास सुरुवात करतात. ज्या भाविकांना शारीरिकदृष्ट्या पायऱ्या चढणे अशक्य असते त्यांच्यासाठी डोलीची सोय असते. डोलीवाले एका व्यक्तीसाठी वजनानुसार ५००० ते ११००० रुपये घेतात. सुमारे २०० पायऱ्यांवर डावीकडे श्री भैरवाच्या मूर्तीचे दर्शन होते. २२५० पायऱ्यांवर श्री नवनाथ भक्तिसार ग्रंथामध्ये उल्लेख असलेल्या राजा भर्तृहरी आणि गोपीचंद ह्यांची गुंफा आहे. येथून पुढे गेल्यावर दत्त गुंफा, संतोषी माता, काली माता, अशी छोटी छोटी देवळे आहेत. बाजूला जैन तीर्थंकर नेमिनाथांचे जैन मंदिर आहे. थोडे पुढे गेल्यावर गौ मुखी गंगा जिथे गाईच्या मुखातून गंगेचे पाणी येते ते स्थान आहे. पुढे ४८०० पायऱ्यांवर अंबाजी टूंक येते. देवी पार्वतीने अंबामातेच्या रूपात गिरनार पर्वतावर वास केला आहे. ५१ शक्तिपीठांपैकी हे एक शक्तीपीठ आहे. मातेच्या दर्शनानंतर पुढील प्रवास सुसह्य होतो असा प्रत्यय प्रत्येकाला येतोच येतो. ५५०० पायऱ्यांवर श्री गोरक्षनाथ टूंक आहे. "आपले चरण दर्शन मला सतत व्हावे " हि गोरक्षनाथांनी केलेली प्रार्थना दत्त महाराजांनी मान्य केली. म्हणून हे स्थान उंच पर्वतावर आहे. आजही गुप्तरुपानी गोरक्षनाथांचा वावर आहे अशी भक्तांची धारणा आहे. बाजूलाच पाप पुण्याची खिडकी आहे. एका बाजूने आत शिरून सरपटत बाहेर पडायचे. यातून मोक्षाचा मार्ग मिळतो असा समाज आहे. पुढच्या गुरुशिखरावर जाण्यासाठी १५०० पायऱ्या उतराव्या लागतात.

थोडे अंतर चालून गेल्यावर २ कमानी लागतात. उजव्या बाजूच्या कमानीतून ३०० पायऱ्या उतरून गेल्यावर श्री कमंडलू स्थान आहे. डाव्या बाजूच्या कमानीतून पुढे १००० पायऱ्या चढल्यावर उभ्या सुळक्यासारखे असणारे श्री गुरुशिखर आहे. याच स्थानावर गुरु दत्तात्रेयांनी १२००० वर्षे तपश्चर्या केली. १० X १२ चौ. फूट जागेमध्ये भगवान श्री दत्तात्रेयांच्या उमटलेल्या चरण पादुका, एक श्री दत्ताची सुबक मूर्ती आहे. एक पुजारी बसू शकेल एवढीच जागा आहे. इथून पुढे जायचा रस्ता नसल्यामुळे ज्या वाटेने आपण आलो तेथून खाली उतरून कमंडलू स्थानापाशी जाता येते.

अश्या या पवित्र स्थानी जाण्याचा योग मला आणि माझे मिस्टर (विनोद जोशी) ह्यांना पल्लवी आणि नितीन आचार्य (माझे आत्येदिर) यांच्यामुळे नोव्हेंबर २०१९ मध्ये आला. अनिल जोशी आणि वृषाली तारे ह्यांच्या डोंबिवली गिरनार ग्रुप मध्ये आम्ही सामील झालो. रेल्वे तिकिट्स बुक झाली. पण जानेवारी मध्ये माझ्या मिस्टरांची अँजिओग्राफी झाली होती आणि त्यांना लो बी पी चा त्रास सुरु झाला होता आणि मे महिन्यामध्ये मलाही हाय बी पी चा त्रास सुरु झाला होता. त्यामुळे दोघांनाही एकमेकांची खूप काळजी वाटत होती. WhatApp च्या माध्यमातून गिरनारचे अनुभव मी वाचत होते. कोणी लिहिले होते कि हा संपूर्ण जंगल रस्ता आहे तिथे वाघ, सिंह, विंचू, नाग असे प्राणी वाटेत दिसतात. पण आपल्याला ते काही करत नाहीत. देवाचे नामस्मरण करून पायऱ्या चढत राहायच्या. ते वाचून थोडा धीर आला.

आमच्या ८० जणांच्या ग्रुप ने सोमनाथ, भालका तीर्थ ह्यांचे सकाळी दर्शन घेऊन रात्री ११ वाजता पहिल्या पायरीची यथोसंग पूजा करून गिरनार चढण्यास सुरुवात केली. मीही पहिल्या पायरीला नतमस्तक होऊन "देवा आम्हा सगळ्यांना निर्विघनपणे तुमचे दर्शन द्या आणि सुखरूप खाली घेऊन या " अशी प्रार्थना करून पायऱ्या चढण्यास प्रारंभ केला. मनात नकळत "दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा" हा जप चालू होता. दत्त दर्शनाची खुप ओढ लागली होती. गिरनार पर्वत चढत असताना काही जण पुढे गेले काही मागे राहिले. जेमतेम अर्धे अंतर पार झाले होते. माझ्या मिस्टरांच्या पायात गोळे आले होते. थोडे थांबून स्प्रे मारून व Knee कॅप घालून पुढचा प्रवास सुरु झाला. पहाटेचे २.३०-३ वाजले असतील तेवढ्यात एक मोठा मुंगूस २ पायऱ्या पुढे धावत आला आणि झाडीत गेला. पण माझ्या मिस्टरांना आणि माझी मैत्रीण शिल्पा हिला दाखविले तर त्यांना काहीच दिसले नाही. मग थोडी भीती वाटायला लागली कि मघाशी प्राणी दिसले नाहीत आणि आता पुढे दिसतायत का? गोरक्षनाथ शिखर उतरून गुरुशिखर चढू लागलो. गार वारे वाहत होते. काकड आरती चालू झाली होती. मन विचलित झाले कि आधी धुनी चे दर्शन घेऊ या कि गुरुशिखर चढू या? पण पहाटेचे ५ वाजले होते. धुनीला अजून वेळ होता आणि पाय आपोआप गुरुशिखराकडे वळले.

दत्त दर्शनाचे भाग्य लाभले. माझी अवस्था "माझे पुण्य फळा आले, आज मी दत्तगुरु पहिले" अशी झाली होती. नकळत आनंदाश्रू डोळ्यात दाटून आले. प्रसाद अर्पण करून नंतर धुनी चे हि दर्शन घेतले. आम्ही परत खाली उतरत असताना मी सांगितले कि "मघाशी मला मुंगूस दिसला पण या दोघांना नाही दिसला ". तेव्हा पल्लवी म्हणाली "अग दत्त महाराजांनी तुला शुभ दृष्टांत दिला. मुंगूस हे श्री विष्णू चे वाहन आहे." मग एक एक पायरी उतरत आम्ही सुखरूप खाली आलो. पहिल्या पायरीला नमस्कार करुन "देवा परत योग येईल तेव्हा नक्की बोलावं मी येईन."अशी प्रार्थना केली. असे अनुभव दत्त भक्तांना गिरनार येथे येतच असतात. एक अदभूत शक्ती तेथे आहे याची वारंवार प्रचिती येते.

"जय गिरनारी " "जय गुरु देव दत्त "

IMG-20191116-WA0000.jpgIMG-20191117-WA0025.jpgIMG-20191117-WA0026.jpgGirnar Parvat.jpgShree Gurudev Datta 1.jpg

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

चांगले वर्णन आहे.
अमा, आम्ही गिरनार उतरलो होतो तेव्हा अक्षरशः पायांना असा काही वेग मिळत गेला की वाटत होतं ते आपल्या नियंत्रणात नाहीयेत. :स्मित : आणि चढताना पाण्याचा थेंबही न घेतल्याने उतरताना उट्टे काढले. लिंबू सरबताची सरबत्ती केली होती. तेव्हाही पाय थांबवणं कठीण गेलं होतं.

धावता मजेदार वृतान्त. फोटो जबरी आहेत.

ठाणे, डोंबिवली, कल्याण परिसरांतील लोकांनी गिरनार जाण्या अगोदर दर आठवड्याला एक अशी मुंब्रा फेरी करावी. पाचसहा तरी कराव्यात. पुढे काहीच त्रास होत नाही, पायांना, शरीराला सवय होते.
बोरिवली,मालाड, अंधेरीकरांनी विरारची जीवदानी गाठावी ( रोप वेने नाही!)
नवी मुंबईतील उरणचा बस स्टँडजवळचा द्रोणागिरी, सिबिडीचा डोंगर, किंवा खारघरचा पांडवकडा, नोसिल कंपनीमागचा गवळीदेव डोंगर सरावासाठी आहे.

शहरात सुखी जीवनामुळे आपले शरीर नबळे/फोफसे झालेले असते. त्यास हळहळू ताळ्यावर आणावे लागते.

आम्ही एप्रिल मध्ये दुसर्या आठवड्यात जाणार आहोत. जाण्यायेण्याचं आरक्षण केलं आहे. साधारणतः शनिवारी दुपारी निघुन रविवार सकाळ सोमनाथ दर्शन घेऊन संध्याकाळी तळेठी ला मुक्काम करायचा आणि सोमवारी दत्तगुरु चं दर्शन करण्याचा विचार केला आहे.

हो उतरताना पायात गोळे आले होते. पण गुरु दत्तात्रयांचे दर्शन घेतल्याचा जो आनंद होता त्यापुढे ते काहीच नाही.