तुझी वाट पहाते रे

Submitted by वैशाली अ वर्तक on 11 February, 2020 - 23:09

तुझी वाट पहाते रे

कधी येशील गगनी वाट तुझी पहाते
निशेचा तम सारण्या तुझी वाट पहाते

उमलतील कळ्या आशा रुपी फांदीवर सकाळी
किलबील खगांची भासेल जणु गोड भुपाळी

तुझ्या येण्याने वहातील नव चैतन्य वारे
सडे केशराचे पाहू नभी, विरता चमकते तारे

तुज अर्ध्य देण्या उभे जन सारे कधीचे
तुझ्या आगमनाने जातील नैराश्य मनीचे

फाकलेल्या प्रभा त्या सहस्त्रकिरणांनी
तुला पहाताच मन प्रसन्न होते तव दर्शनानी

स्वर्ण रंगात येता आकाशी मिळे जीवन जनांना
प्रफुल्लित मने जन म्हणती "प्रभात "त्या क्षणांना

वैशाली वर्तक

Group content visibility: 
Use group defaults