सहचरी नावाची केअर गिव्हर - डॉ. शैलेश उमाटे

Submitted by अतुल ठाकुर on 6 February, 2020 - 00:36

ठाणे पाठपुरावा वर्धापनदिन म्हणजे एक मेजवानी असते. माधव कोल्हटकरांच्या कल्पक आयोजनामुळे यादिवशी तासदीड तासाच्या कर्यक्रमात अतिशय मौलिक माहिती हा कार्यक्रमाला येणार्‍यांच्या पदरी पडते. स्वतः माधवसरांचे खुसखुशीत निवेदन, विनोदाची पखरण असतेच. त्यातून डॉ. शैलेश उमाटेंसारखे विनोदाचे वावडे नसलेले, आपले व्याख्यान अतिशय सहज, सोप्या भाषेत, घरगुती उदाहरणाने समजावून देणारे आणि त्याजोडीला अभिनयाचे अंग असलेले, तरुण व्यक्तीमत्व जर कार्यक्रमाला लाभले तर कार्यक्रमाची रंगत वाढतच जाणार यात नवल नाही. कालचा कार्यक्रमही तसाच रंगला. आणि तो डॉक्टरसाहेबांचे व्याख्यान संपल्यावरदेखील प्रश्नोत्तरांच्या कार्यक्रमाने आणखी बहरत गेला. गंभीर विषय आपल्या विशिष्ट शैलीने सोपा करुन सांगण्याची आणि त्यात खट्याळ चिमटे काढत हशा, पिकवत आपले भाषण परिणामकारक करण्याची कला डॉक्टरांना साधाली आहे. कालचा विषय होता केयर गिव्हर म्हणजेच मुक्तांगणच्या भाषेत सहचरी.

सरांनी सुरुवातीपासूनच नवरा किंवा मुलगा व्यसनी असल्यास सहचरींवर जे प्रसंग येतात त्याचे सोदाहरण विवेचन बारीकसारीक बारकाव्यांसहित केले. त्यासाठी त्यांनी प्रश्नोत्तरांच्या पद्धातीने आपल्या व्याख्यानाची मांडणी केली होती. एका सहचरीलाच त्यांनी प्रेक्षकांमधून आपल्या व्याख्यानात सहभागी होण्याची विनंती केली. तिला समोर बोलावून तिलाच निरनिराळ्या प्रसंगी तुमची भावना काय होती हे विचारत तिच्याकडून उत्तरे घेत त्यावर स्वतः टिप्पणी करीत सर बोलत असल्याने सर्व भगिनींना जणु काही हे आपल्या घरातील घडलेल्या गोष्टींबद्दलच बोलत आहेत असेच वाटले असणार. त्यांच्या उत्स्फुर्त प्रतिसादावरुन जे जाणत होतेच. पहिल्याप्रथम आपला नवरा व्यसनी आहे किंवा मुलगा व्यसनी आहे हे कळल्यावर सहचरींचा विश्वासच बसत नाही. व्यसन काय आहे याची कल्पना असते. मात्र ते इतर कुणी करतील आपला नवरा, मुलगा "त्यातला" नाही असेच सहचरींना वाटते. त्यांना ते स्विकारताना अतिशय अवघड जाते. सुरुवातीला त्या स्वतःच "डिनायल" मध्ये जातात.
त्यानंतर व्यसनाबद्दल शास्त्रीय अशी काहीही माहिती नसल्याने त्या स्वतःच, कुणाचीही मदत न घेता आपल्या माणसाला व्यसनातून बाहेर काढण्यासाठी धडपडू लागतात. काही सहचरी तर नवर्‍याची घरातच पिण्याची सोय करुन देतात. त्यांची अशी समजूत असते की जे काही करतील घरात करतील. बाहेर शोभा होणार नाही. शिवाय घरात पिणे होईल तर ते मर्यादेत होईल. व्यसनाच्या भीषणतेची कल्पना नसलेल्या या भगिनी नवर्‍याचे व्यसन कमी होईल या समजुतीने व्यसनाला घरातच आमंत्रण देतात. आणि मग नवरा घरात राजरोस बाटली घेऊन बसतो. आणि व्यसन कमी होण्याची आशा असलेल्या भगिनी त्याला दारुबरोबर काहीतरी खायला करुन देतात. मात्र आपली चूक झाली आहे हे त्यांना लवकरच कळून चुकते. व्यसन कमी होतच नाही. काही महिने, वर्षांत व्यसनाच्या परिणामांची भयनकता अनुभवाला येऊ लागते. भांडणे, मारहाण, शरीर मनावर वाईट परिणाम, गृहकलह सुरु होतात. सहचरींसाठी हा फार मोठा धक्का असतो.

मग सेल्फ ब्लेमिंग सुरु होतं. आपणच कुठे कमी पडलो असे त्यांना वाटू लागते. आपल्यातच काहीतरी दोष आहे असे वाटू लागते. एरवी चांगला वागणारा हा माणूस दारु प्यायल्यावर इतका वेगळा कसा वागतो हे त्यांच्या लक्षातच येत नाही. त्यामुळे स्वतःतच दोष शोधण्याची प्रवृत्ती निर्माण होते. घरातल्या या तणावपूर्ण वातावरणाचा परिणाम सहचरींच्या शरीर मनावर होतो आणि त्यांना चिंता, नैराश्य यासारख्या समस्या भेडसावू लागतात. सरांनी साध्यासुध्या चिंतेपासून ते अगदी नैराश्याच्या आजारापर्यंत जाणार्‍या सहचरींचे प्रमाण फार मोठे आहे हे वारंवार आवर्जून सांगीतले. नवरा व्यसनाने आजारी असतो तर बायको चिंतारोग किंवा डिप्रेशन सारख्या आजाराचा बळी पडते. ही चिंता नवर्‍याची असते, स्वतःची असते आणि महत्त्वाचे म्हणजे आपल्या मुलाबाळांचीदेखील असते. आता कसे होणार हा प्रश्न समोर असतो. यानंतर मग डॉक्टर आणि मुक्तांगणसारख्या रिहॅबिलीटेशनचा पर्याय समोर येतो.

अर्थात हे सर्व सुखासुखी होत नाही. अनेक अडचणी, मनस्ताप आणि दु:खामधून गेल्यावर सहचरींना हे लक्षात येतं की यावर उपचार आहेत. सहचरींच्या आयुष्यात आशेचा प्रवेश या क्षणापासून होतो. मुळात व्यसन हा एक इतर आजारांसारखाच आजार आहे हे कळल्यावरच ताण नाहीसा होतो. कारण इतर अनेक आजारांना माणुस तोंड देतो परंतु व्यसनाला मात्र आजही आजार म्हणून सामाजिक मान्यता नाही. त्यामुळे लाज, शरम, अपमान, तिरस्कार, थट्टा, कुत्सित बोलणी, टोमणे यांना तोंड द्यावे लागत असते. याचा परिणाम सततच्या नैराश्यात होतो. हे सारं नैराश्य जेव्हा व्यसन हा एक आजार आहे, त्यावर उपचार करावे लागतात, हा कधीही बरा होणारा जरी नसला तरी या उपचारांनी माणुस व्यसनमुक्त होऊन सर्वमामान्य आयुष्य घालवु शकतो ही बाबच मुळात फार दिलासा देणारी असते. त्यमुळे सेल्फ ब्लेमिंगची सवय सुटते आणि आपल्या माणसाला दोष देणे थांबते. व्यसनाकडे पाहण्याचा दृष्टीकोण बदलतो. आता व्यसन हे अनाकलनिय कोडे राहिलेले नसते. तो एक मात करण्याजोगा आजार आहे अशी त्याची नवीन ओळख झालेली असते. आणि हे चित्र अर्थातच आशादायक असते.

आपल्यामाणसावर उपचार सुरु झाल्यावर स्वतःवरदेखील उपचार करणे आवश्यक आहे हे उमाटेसरांनी मुद्दाम नमुद केले. बायका स्वत:कडे दुर्लक्ष करतात. खरं तर व्यसनात बुडालेल्या माणसाची व्यसनातून सुटका करुन घ्यायची असेल तर आधी स्वतः फिट असणे महत्त्वाचे आहे. हे सहचरीने नीट लक्षात घेतले पाहिजे. एकदा स्वतःचे शरीर मन सुधारु लागले म्हणजे त्याचा इतरांशी असलेल्या संबंधांवरसुद्धा सकारत्मक परिणाम होतो असे चर्चेत सहभागी झालेल्या सहचरीनेसुद्धा मान्य केले. एकदा मुक्तांगणमधून उपचार घेऊन माणुस बाहेर पडला की पुढचा प्रवास सुरु होतो. या नाजुक काळात स्लिप, रिलॅप्स असे वेदनादायक टप्पे येऊ शकतात. त्यवेळी सहचरींनी कशी काळजी घ्यावी यावद्दल सरांनी सविस्तर मार्गदर्शन केले. सरांचा एकुण रोख हा संतुलित वागण्यावर दिसला. कुठलिही टोकाची भूमिका अशावेळी घेऊ नये हे त्यांनी कळकळीने सांगितले. व्यसन सुटल्यानंतर कितीही वर्षे झाली तरी स्लिप होण्याची शक्यता या आजारात असते हे सत्य मान्य करुनच आपल्याला पुढे जावे लागणार आहे हे देखील त्यांनी स्पष्ट केले.

समजा आपला नवरा उपचारानंतरदेखील पिऊन आला हे पत्नीच्या लक्षात आले तर त्यावेळी दातओठ खाऊन, अकांडतांडव करुन भांडण्यात अर्थ नसतो. आधी तर प्यायलेल्या माणसाला काय चालले आहे हे समजण्याची शुद्ध नसण्याचीच शक्यता जास्त असते. आणि मागचे पुढचे संदर्भ देत जर भांडण वाढवले तर माणुस आणखि व्यसनात बुडण्याचा धोका असतो. त्यामुळे "जेवुन घ्या, झोपा, उद्या बोलू" इतकेच बोलावे असे सर म्हणाले. यापुढे जास्त संभाषण वाढवु नये. दुसर्‍या दिवशी तुमचं कालचं वर्तन मला आवडलं नाही असं सांगुन आपली नापसंती व्यक्त करावी. माणुस वाईट नाहीच आहे. जर माणुस वाईट असता तर आपली त्याच्याशी पंधरावीस वर्ष सोबत टिकलीच नसती. माणुस चांगला आहे. व्यसन वाईट आहे. त्यामुळे जसं व्यसनमुक्ती टिकवल्यावर आपण त्याचं वर्तन आपल्याला आवडलं असं सांगुन त्याला अ‍ॅप्रिशिएट करतो. त्याचप्रमाणे स्लिप झाल्यावर आपली नापसंती कळवावी. मात्र हे करताना आपला व्यवहार संतुलित असावा. नापसंती व्यक्त करताना आदळाअपट करु नये आणि पसंती व्यक्त करताना गरजेपेक्षा जास्त स्तूतीदेखील करु नये हा कानमंत्र उमाटे सरांनी दिला.

हे रंगतदार झालेले व्याखान संपू नये असेच वाटत होते. मात्र समारोपाची वेळ येणारच होती. शेवटी सरांनी व्यसनमुक्तीच्या प्रवासावर राहण्यासाठी पाठपुराव्याला येणे किती महत्त्वाचे आहे आहे त्याबद्दल सांगितले. एकमेकांच्या भेटीगाठी, समान दु:ख असलेली माणसे भेटणे, स्लिप आणि रिलॅप्स फक्त आपल्याकडेच होतात असे नसून इतरांकडेदेखील या घटना घडत असतात. लोकं यातून मार्ग काढत असतात. त्यामुळे आपण एकटे नाही. हे दु:ख फक्त आपल्याच वाट्याला आलेले नाही. यातून यशस्वीपणे बाहेर पडलेली माणसे आहेत अशी भावना पाठपुराव्याला आल्यावर वाढीस लागते. पाठपुराव्याचं महत्त्व अशा तर्‍हेने विशद करीत सरांनी आपल्या व्याख्यानाचा समारोप केला. त्यानंतर प्रश्नोत्तरांमध्येही अनेक गोष्टींची सरांनी सविस्तर चर्चा केली. माधवसरांनी तर सरांची त्यांची मुलाखतच घेतली. प्रेक्षकांकडूनदेखील अनेक प्रश्न आले आणि सरांनी सर्वांचेच समाधान केले. माझ्यासारख्याला तर असे व्याख्यान म्हणजे एक पर्वणीच असते कारण आम्हा तथाकथित निर्व्यसनी लोकांमध्ये इतर सर्व दुर्गुण पुरेशा प्रमाणात असतात असे मला वाटते. आणि अशी व्याख्याने हे त्यावर चांगले औषध असते. सरांनी सांगितलेला संतुलित वागण्याचा कानमंत्र मी लक्षात ठेवला. आणि असे व्याख्यान ठेवल्याबद्दल मनोमन माधवसरांचे आभार मानले.

अतुल ठाकुर

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

> माणुस वाईट नाहीच आहे. जर माणुस वाईट असता तर आपली त्याच्याशी पंधरावीस वर्ष सोबत टिकलीच नसती. माणुस चांगला आहे. व्यसन वाईट आहे. >
कालच ही फेसबुक पोस्ट वाचली.
हा वरचा 'माणूस वाईट नाही, माणूस चांगलाच आहे' अप्रोच लेटेस्ट आहे का? म्हणजे व्यसनाबद्दल जे लेटेस्ट संशोधन आहे त्यानुसार आहे का? परदेशातपण याच मार्गाने जातात का?
स्त्रिया आणि मुलांना असल्या रिस्की वातावरणात ठेवण्यात, काहीही करून कुटुंब टिकवण्यात काय अर्थय?

काहीही करून कुटुंब टिकवण्यात काय अर्थय?>> अनुमोदन. व्यस नी नवरा आहे ह्या मुद्द्यावर डिवोर्स घ्यावा त्या सहचरींनी आणि मुले निरोगी पद्धतीने वाढवावीत. आपल्याकडे सावित्री यमराज, साताजन्माची साथ, वगैरे सोशल कंडिशनिन्ग पण फार असते बाय कांना त्या ओ झ्या खाली दबून राहतात. अत्याचार सहन करत राहतात. आपल्याकडॅ पुरुष चाळीशीपार गेला पार सत्तरी पार गेला तरी मॅन चाइल्ड राह्तो. आई सासवा बायका त्याला सपोर्ट करत बबड्या गिरी करत राहतात. काय होणार अश्याने.

व्यस नी नवरा आहे ह्या मुद्द्यावर डिवोर्स घ्यावा त्या सहचरींनी आणि मुले निरोगी पद्धतीने वाढवावीत.>> ' पुन्हा दारू पिऊन त्रास देणार नाही' यावर सुरवातीची काही वर्षे विश्वास ठेवला जातो. तोपर्यंत बाईची चाळीशी येते. तिला 2 ते 3 आजार मागे लागतात. मुलांचं शिक्षण , औषधपाणी यासाठी पैसा लागतो. महिना फक्त 7 ते 8000 मिळवायची जर त्या बाईची कुवत असेल, माहेरून भावनिक, आर्थिक सपोर्ट नसेल , रुमाल सुद्धा विकता येत नसेल म्हणजे व्यवसाय करायला असमर्थ असेल, धुणीभांडी करण्याची ताकद नसेल तर तिनं काय करायचं. कसं वेगळं राहायचं. खरच कुणी सांगेल का? आपण आर्थिक दृष्ट्या अवलंबून आहोत ही गोष्ट खूप खच्चीकरण करते.

त्यामुळे "जेवुन घ्या, झोपा, उद्या बोलू" इतकेच बोलावे असे सर म्हणाले. यापुढे जास्त संभाषण वाढवु नये. दुसर्‍या दिवशी तुमचं कालचं वर्तन मला आवडलं नाही असं सांगुन आपली नापसंती व्यक्त करावी.>> हे बोलणं सोपं आहे . कालच वाचलं पण सोडून दिलं . आज लिहिते. जर माणूस दारु पिऊन रात्री साडे अकरा ला आला . 1 वाजेपर्यंत बडबड केली ( मग त्यात शिव्याच ) आणि घोरत पडला. आपण टक्क जागे रात्रभर. दुसऱ्या दिवशी शांतपणे सांगायचं की वर्तन आवडले नाही( आधी शांतपणे म्हणायला बाई म्हणजे संत नसते) . तो म्हणतो की 'तुझ्या बापाच्या पैशाची नाही पीत तुम्हाला काही कमी पडत नाही ना मग दमडी मिळवायची अक्कल नाही आणि मला शिकवायचं नाही' म्हणून जातो ऑफिसला . पुन्हा 4 दिवसांनी ये रे माझ्या मागल्या.
मला त्या डॉक्टरांचं चूक आहे म्हणायचं नाहीये पण हे सोल्युशन नाहीये एवढंच समजतं.

ननि,
यासाठीच मी प्रश्न विचारला होता की 'रिहॅबमधे येणारे लोक कोणत्या आर्थिक वर्गातले असतात?'
> तोपर्यंत बाईची चाळीशी येते.> जर निम्नवर्गातले असतील तर तिचं लग्न १५-१६ ची असताना झालं असेल. जर तिने पंधरावीस वर्ष संसार टिकवला असेल तर ती ३०-३५ चीच असते.

> तिला 2 ते 3 आजार मागे लागतात. मुलांचं शिक्षण , औषधपाणी यासाठी पैसा लागतो. > आजार, शिक्षण मोफत असतं. मुलं १०-१२ शिकली तर शिकतात नाहीतर नापास होऊन कामाला लागतात.

> महिना फक्त 7 ते 8000 मिळवायची जर त्या बाईची कुवत असेल, माहेरून भावनिक, आर्थिक सपोर्ट नसेल , रुमाल सुद्धा विकता येत नसेल म्हणजे व्यवसाय करायला असमर्थ असेल, धुणीभांडी करण्याची ताकद नसेल तर तिनं काय करायचं. > नवऱ्याचं व्यसन बायको काय वयाची असताना लक्षात येईल हे महत्वाच ठरेल यात. नवरा किती कमवतोय, त्यातले किती दारुवर उडवतोय, व्यसन चालूच राहिले तर तो किती काळ कमवत राहू शकणारे...
परदेशात "भांडणे, मारहाण, शरीर मनावर वाईट परिणाम, गृहकलह सुरु होतात." या स्टेजलाच बाई शेल्टर होममधे जाऊ शकते.

> Submitted by ननि on 7 February, 2020 - 17:12 > पटतंय. परत इथे व्हिक्टीमलाच सबुरीचा सल्ला दिला जातोय. गुन्हेगारतर 'आजारी' आहे....

माझे प्रश्न -
१. सहचर - केअरगिव्हर असा काही उपक्रमही चालवला जातो का? हळूहळू अल्कोहोल व्यसनाधीन स्त्रीयांचे प्रमाणही वाढत आहे त्या अनुशंगाने हा प्रश्न.
त्याचाच पुढला भाग म्हणजे दोघेही व्यसनाधीन असे काही झाल्यास काय? अशा केसेस बघण्यात आल्या आहेत का? हे विचारण्याचे कारण म्हणजे इथे त्याचे भयानक परीणाम बघितले आहेत.
२. एकंदरीतच व्यसन या संबंधी तरुणाईसाठी काही प्रिवेंटिव्/अर्ली इंटरवेनशन(माफ करा मला मराठी पर्याय नाही सुचला) अशा प्रकारचे उपक्रम केले जातात का?

लग्न चोविसची असताना झालं. तेव्हा फक्त गुटख्याच व्यसन . ते सांगून सुटत नाही तेव्हा सोडून दिलं. मग दारूचं व्यसन नवरा 35 चा असताना लागलं . तेव्हा बाई 29 ची होती. सुटेल म्हणून आणि मूल लहान, एक आजार त्या मुलाच्या मागे म्हणून 39 ची होईपर्यंत वाट पाहिली.

रिहाबची मला गरजच नाही. माझ्या मनावर आहे सगळं.

आर्थिक वर्ग -- सुबत्ता असलेला . स्वतः कष्ट करून शून्यातून , गरिबीतून वर आलेला माणूस. उच्च जातीतील. जिथे आशा घटना शक्यतो शेजारी पाजारी कळत नाहीत.

नवरा पुरेसे पैसे कमावतो. भविष्याची व्यवस्थित तरतूद करतो मगच दारूवर उधळतो. प्रश्न त्याने दारू प्यावी की नाही हा नाही. ती बडबड आणि त्रास नको.
.

>> Submitted by ॲमी on 7 February, 2020 - 06:48>>
अ‍ॅमी,
यात दोघेही विक्टिमच नाही का? व्यसनी माणूस ही आजारी व्यक्ती. व्यसनापायी गुन्हेगारी वर्तन केले तर त्या भागापुरती ती व्यक्ती गुन्हेगार.
मात्र व्यसनी माणूस जे विक्टिम असणे 'प्ले' करतो , तसे करुन जे मॅनिपुलेशन चालते त्याला माझा आक्षेप आहे.
>>
परदेशात "भांडणे, मारहाण, शरीर मनावर वाईट परिणाम, गृहकलह सुरु होतात." या स्टेजलाच बाई शेल्टर होममधे जाऊ शकते.
>>
नाही हो इथेही हे असे होत नाही. शेल्टर होम मधे जाऊ शकते हे म्हणणे फक्त कागदावर सोपे आहे प्रत्यक्षात तसे अजिबातच नाही.

आणि इथे ' दारू कशी प्यावी ' यावर धागा निघतो. त्यावर साडेचारशेवर प्रतिसाद येतात . कसकाय वर 90 टक्के विनोद दारूवर असतात. या धाग्याचे प्रतिसाद किती होतात बघा.

व्यसनी माणूस ही आजारी व्यक्ती. >> ती व्यक्ती आजारी कशी काय होऊ शकते? हॅ हॅ हु हु करत मित्रांबरोबर पीत मजा करताना व्यक्ती आजारी? कोणत्या अँगलने? घरी यायला उशीर झालाय, आता किती वाजणार करत घड्याळ एकटक बघनारी व्यक्ती , घरी आल्यावर आता काय होणार या विचाराने हातपाय थरथरत असलेली, छातीची धडधड वाढलेली , कळ येऊन शौच होणारी व्यक्ती कोण मग?

ननि,
दारु पिणे आणि दारुचे व्यसन हे दोन वेगळे प्रकार आहेत.
व्यसन असलेली व्यक्ती ही भले पिताना मित्रांबरोबर मजा म्हणून पित असेल पण तरी तो एक आजारच आहे.
ज्या व्यक्तीला दारुचे व्यसन नाही ती व्यक्ती विचार करुन ठरवून दारु पिते आणि तसेच विचार करुन ठरवून नाकारतेही. काय प्यायचे, किती प्यायचे, त्या सोबत काय खायचे, कुणाबरोबर प्यायचे-कुणासोबत नाही हे व्यवस्थित ठरलेले असते. आग्रह वगैरेचा काही परीणाम होत नाही.

ननि,
व्यसनी व्यक्तीचे जिवलग हे रोज 'आज काय' या भितीला सामोरे जातात आणि त्या भितीपोटी अनेक शारीरिक लक्षणांचा सामना करतात. कसलाही अपराथ केलेला नसताना रोज शिक्षा भोगतात. मात्र असे असले तरी व्यसन हा आजार आहे हे मान्य करुनच त्यावर उपचार होणार आहेत ना?

ननि,
तुम्ही सांगताय किंवा त्या फेसबुक पोस्टमधे लिहलीय तशा भाषिक हिंसा, शारीरिक हिंसा, बायको-मुलींना मारणे वगैरे केसेस अगदी जवळून पाहिलेल्या आहेत. जबरी वाईट अवस्था असते सगळ्यांची Sad Sad
पण जर ती बाई आर्थिक स्वतंत्र नसेल तर तिला, मुलांना तिथेच नवऱ्यापाशी खितपत रहावे लागते. सगळ्या गोष्टी फिरून पैशापाशीच येतात:( Sad

> अॅमी,
यात दोघेही विक्टिमच नाही का? व्यसनी माणूस ही आजारी व्यक्ती. व्यसनापायी गुन्हेगारी वर्तन केले तर त्या भागापुरती ती व्यक्ती गुन्हेगार. > ननिने लिहलेल्या भाषिक हिंसेबद्दलच्या प्रतिसादासंदर्भातच बोलत होते.

> नाही हो इथेही हे असे होत नाही. शेल्टर होम मधे जाऊ शकते हे म्हणणे फक्त कागदावर सोपे आहे प्रत्यक्षात तसे अजिबातच नाही. > पण तिकडे तर ६०-६५% बायका आर्थिक स्वतंत्र आहेत ना? आणि शेल्टर होम ही सिस्टम अस्तित्वात तरी आहे... इथे भारतात सगळीच बोंब Sad

काही मुद्यांवर उत्तर देण्याचा प्रयत्न करतो आहे.
१) निम्न वर्गात जेथे झोपडीत किंवा तकलादू घरात राहणाऱ्या बायकांना कुंकवाचा आधार म्हणून नवऱ्याची गरज पडते
अन्यथा (विभक्त झाली तर) शेजारी पाजारी असलेले कोणतेही पुरुष "चोच मारण्यासाठी * कधीही दार ठोठावतात. अशा स्थिती नवरा अगदी दारू मुळे गलितगात्र असला तरीही दारूच्या नशेत चाकू बिकू मारेल या भीतीने असले शेजारी दूर राहतात.

२) या समाजात बाप, भाऊ असेच दारू पिणारे असू शकतात. शिवाय गरिबीमुळे मुलीची/ बहिणीची अजून एक जबाबदारी घेण्याची बाप आणि भाऊच काय तर आईचीही तयारी नसते. मग असा कोणताही आधार नसताना एकटी स्त्री अगदी स्वतःपुरतं कमावणारी स्त्रीसुद्धा सहजासहजी अशा नवऱ्याला सोडण्याची तयारी दाखवत नाही हि वस्तुस्थिती.

३) "आमचे पप्पा हरवले" अशी तक्रार करत असणारी खाजगी रुग्णालयातील आमची स्वागत सहायिका डोळ्यापुढे आली. ती घाबऱ्याघुबऱ्या गेल्यावर माझ्या बरोबरीच्या दुसऱ्या डॉक्टरांनी सांगितले कि सर काही चिंता करू नका तिचा बाप "पडला असेल दारू पिऊन कुठल्यातरी गटारात".
तसेच झाले. बारा वाजता ती परत आली आणि म्हणाली आमचे "पप्पा सापडले". हे पप्पा आता एका राजकीय पक्षाच्या कामगार युनियनचे सन्मान्य अधिकारी म्हणून फलकावर झळकताना दिसतात. अशा मुलीच्या नवऱ्याने उद्या दारू पिऊन तिला मार झोड केली तर ती कुणाकडे पाहणार आहे?

४) नवऱ्याला सोडणे शक्य नाही तर निदान त्या स्त्रीला त्रास कमी होईल हे तर पाहणे व्यसनमुक्ती केंद्राच्या कर्मचारी वर्गाला ( डॉक्टर सुद्धा) आवश्यक ठरते. म्हणून मग जर तिला दारू पिऊन आलेल्या नवऱ्याशी वाद घातला तर तो मुळात शुद्धीत नसतो तर सांगितलेले डोक्यात शिरेल का? मग आपले तेवढ्यापुरते बंद ठेवा हे कसे सांगायचे

५) आरामखुर्चीतील विचारवंत ( armchair philosopher) अशा बायका पुष्कळ पाहिल्या आहेत ज्या प्रश्नाला उत्तर देण्याचं प्रयत्न करताना नवऱ्याला सोडून दे सांगतात. परंतु त्या स्त्रीने विचारले कि ताई नवऱ्याला सोडून जाऊ कुठे? तुमच्या घरी घ्याल का? तर ते झेपणारे नसते.
अजूनही आपल्याकडे स्थावर मालमत्तेमध्ये स्त्रीचे नाव पहिले अभावानेच आढळेल.( यात ७० % मायबोलीकर येतील हे मी छातीठोकपणे सांगू शकतो).

६) रहायला घर नाही, नावाला का होईना पण नवऱ्याचे संरक्षण नाही, आणि त्यातून एखादी स्त्री विभक्त झालीच तर तिच्यावर डोळा ठेवणाऱ्या माणसाची बायको सुद्धा माझ्या नवऱ्यावर डोळा ठेवते म्हणून या स्त्रीलाच दोष देणार. बाईच्या जातीला या पालुपदापासून हिचंच काही तरी लफडं आहे असे समजणाऱ्या समाजापासून तिला काहीही मिळणार नाही हे अनुभवातून तिला शहाणपण आलेलं असतं.
अशा स्थितीत कितीही नालायक असला तरी नवऱ्याबरोबर निभावून नेणे एवढाच एक उपाय गरीब स्त्रीकडे उपलब्ध असतो.

अशा स्त्रीला उपदेश पाजण्यापेक्षा तिला त्रास कमी होईल यासाठी असे उपाय करावे लागतात.

प्रत्यक्ष व्यसनमुक्ती केंद्रात काम करून आलेल्या अनुभवावरून लिहिले आहे.

हे १०० % बरोबर आहे असा माझा मुळीच दावा नाही

हे प्रातिनिधिक असू शकतील किंवा चुकीचेही असू शकतील

अ‍ॅमी,
६०-६५% बायका नोकरी करतात. मात्र याचा अर्थ त्या आर्थिक दृष्ट्या स्वतंत्र असतातच असे नाही. शेल्टर होम आहेत पण ती एकतर पुरेशी नाहीत. म्हणजे जागा उपलब्ध असेलच असे नाही, त्यात तुमची नोकरी आहे / तुम्ही रहाता त्या गावातच शेल्टर असेल असेही नाही. शेल्टरमधे रहायला काही काळाची मुदत असते. ती संपली की काय हा प्रश्न असतो. सेफ अ‍ॅफोर्डेबल हाउसिंगचा प्रश्न असतो. आमच्या राज्यात घटस्फोट नो-फॉल्ट आहे, कपल लिव-इन मधे असण्याचे प्रमाणही बरेच आहे. मात्र असे असले तरी जोडीदार व्यसनी आहे म्हणून झटपट सोडणे होते का ? तर नाही. कारणे आर्थिक असतात तशीच ती मानसिकही असतात. नवरा/बायको//जोडीदार व्यसनी आहे पण मुलांना शारीरिक धोका नाही असे असेल तर बरेचदा सोडत नाही. कारण मन गुंतलेले असते. अशा वेळी आर्थिक दृष्ट्या स्वतंत्र आहे म्हणून हात सोडला असे नाही होत. बरेचजण क्लोजेट व्यसनी असतात. अशावेळी व्यसनाला गंभीर वळण लागते तेव्हा नातं , कुटुंब वाचवण्याचे, जोडीदाराला बाहेर काढण्याचे प्रयत्न होतात. लगेच साथ सोडून दिली असे होत नाही. यातून बाहेर पडू अशी आशा असते, फेथ असते.
नात्यात अ‍ॅब्युझ असला तरी बाहेर पडण्याचा प्रयत्न करणे आणि ऐनवेळी माघार घेणे असे बराच काळ चालते. तो अ‍ॅब्युझ व्यसनामुळे असेल तर मग सगळे अजूनच गुंतागुंतीचे होते.

सुबोध खरे,
वास्तव सांगणारी पोस्ट आवडली.

> Submitted by स्वाती२ on 7 February, 2020 - 19:28 > आर्थिक व्यवहार वेगवेगळे न ठेवल्याने त्या स्त्रिया आर्थिक स्वतंत्र नसतील. पण नोकरी करत असल्याने 'घराबाहेर पडलो आणि रस्त्याकडेला बसून भीक मागावी लागली' इतकी वाईट अवस्था तरी होत नसणार (जी ननिने लिहलेल्या 'महिना फक्त 7 ते 8000 मिळवायची जर त्या बाईची कुवत असेल, माहेरून भावनिक, आर्थिक सपोर्ट नसेल , रुमाल सुद्धा विकता येत नसेल म्हणजे व्यवसाय करायला असमर्थ असेल, धुणीभांडी करण्याची ताकद नसेल' या बाईची होत असणारए). सुरवातीचा काही काळ जरी निवाऱ्याची सोय झाली तरी निभावून नेता येणं भारतापेक्षा सोपं असावं. शेल्टर होमची संख्या आणि जागा वाढवणे हे यात समाजा-सरकारकडूनचे सोल्युशन. सरसकटीकरणाचा दोष पत्करून असं म्हणता येईल का-
परदेशात सामाजिक, आर्थिक कारणापेक्षा मानसिक कारणाने या बायका सेपरेट होत नाहीत.

पण तेच भारतात नेमकी उलटी परिस्थिती आहे. आर्थिक परावलंबित्व, सामजिक-शारीरिक सुरक्षितता (? दारू पिणारा पुरुष दारू न पिणार्या स्त्रीला इतर पुरुषांपासून वाचवू शकतो!!) ही इथे लग्न टिकवण्याची कारणं आहेत. मानसिकदृष्ट्या ती स्त्री आधीच त्या दारुड्यापासून दूर झालेली असते.

> ४) नवऱ्याला सोडणे शक्य नाही तर निदान त्या स्त्रीला त्रास कमी होईल हे तर पाहणे व्यसनमुक्ती केंद्राच्या कर्मचारी वर्गाला ( डॉक्टर सुद्धा) आवश्यक ठरते. म्हणून मग जर तिला दारू पिऊन आलेल्या नवऱ्याशी वाद घातला तर तो मुळात शुद्धीत नसतो तर सांगितलेले डोक्यात शिरेल का? मग आपले तेवढ्यापुरते बंद ठेवा हे कसे सांगायचे > हा उपाय ननिने सांगितलेल्या केस मधे काम करू शकेल कदाचित ,जिथे सध्यातरी केवळ(!! Sad )भाषिक हिंसा आणि त्यामुळे जोडीदाराला होणार मानसिक-शारीरिक त्रास आहे.

पण त्या फेसबुक पोस्टमधे लिहलेलं 'Sometimes, while we were sleeping, he’d pour oil over our beds and burn the sheets. We’d leap out of bed to the smell of gas and the sight of him bashing my mother.' जिथे स्त्रीबालकांना शारिरीक धोका आहे ती केस कशी हँडल करता तुम्ही?

Pages