माझं सुंदर घर

Submitted by डी मृणालिनी on 5 February, 2020 - 05:10

माझं घर आणि मी

. हा सुंदर चिरेबंदी वाडा डेरेदार पिंपळाच्या झाडाखाली गेले ८८ वर्ष अगदी ऐटीत उभा आहे. हे महाकाय सुंदर पिंपळाचं झाड माझ्या घराकडे थोडंसं झुकलंय . त्यामुळे असं वाटतं जणू ते माझ्या घराचं रक्षणच करतय . हो. आणि तसंच आहे ते ! पूर्वजांनी हे घर फक्त चिरा आणि चुन्याने नव्हे तर अपार प्रेम आणि आपुलकीने बनवलय आणि त्यामुळे या घरात जाणवणाऱ्या सदभावना आम्हा सर्वाना नेहमीच ऊर्जादायी असतात. मला माझं घर खूप आवडतं. माझं घर दुमजली आणि कौलारू आहे. माझं घर रस्त्याच्या खाली असल्यामुळे रस्त्यावरून दिसणारं दृश्य खूपच मनमोहक असतं . घराच्या मागच्या बाजूस दूर दूरपर्यंत पसरलेला हिरवागार मळा आणि सदैव बहरलेल्या झाडांनी गच्च असलेले भलेमोठे डोंगर . बऱ्याचदा बघणाऱ्याला असा भास होतो कि जणू माझ्या घरामागे वॉलपेपरच लावलाय. हे दृश्य नेहमीच असं नसतं . ते ऋतूंप्रमाणे बदलत असतं . पावसाळ्यात हिरव्यागार मळ्याची जागा निळ्याशार तुडुंब पाण्याने घेतलेली असते. त्यावर गावातल्यांच्या होड्याही फिरताना दिसतात. दूर डोंगरांवरून पळत येणारा पाऊस पाहिला, कि मी शेतातून धूम ठोकते . हा आनंद , ही मज्जा शहरांमध्ये सर्व सुखसुविधांयुक्त असलेल्या high class society मध्ये राहणाऱ्या माणसाला लाभणे केवळ अशक्यच .
घराचा वरचा मजला हा सागाच्या लाकडाने बनवला आहे . ज्याला आज मॉडर्न युगात हार्ड वूड फ्लोरिंग असं म्हणतात आणि या नावाखाली भरमसाठ पैसे उकळतात. घराच्या या वरच्या मजल्यावर पूर्वेला एक ,पश्चिमेला एक , उत्तरेला चार आणि दक्षिणेला चार अशा एकूण १० सुरेख खिडक्या आहेत. या सर्व खिडक्यांमधून दिसणारं दृश्य हे एका निष्णात कलाकाराने रेखाटलेल्या निसर्ग चित्रासारखं दिसतं . १२ खोल्या , समोर मोठ्ठ अंगण , अथांग पसरत गेलेली काजी ( काजूची बाग ) ,दिवस रात्र नजरेत भरणारं पिंपळाचं डेरेदार झाड त्यावर चिवचिवाट करणारे असंख्य निरनिराळे पक्षी आणि कोकलणारे हॉर्नबिल्स आणि विहंगम दृश्य दाखवणाऱ्या चहू दिशा . बस्स ! मला सांगा माणसाला अजून काय हवं ?
हे सगळं वाचून तुम्हाला माझा हेवा वाटत असेल . हो ना ? खरंच मी खूप भाग्यवान आहे. थँक्स टू माय अँसिस्टर्स..
WhatsApp Image 2019-12-15 at 9.21.33 PM.jpegWhatsApp Image 2019-12-15 at 9.21.34 PM(1).jpeg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हेवा करावा असं घर , आणि त्याचे व्यक्तिमत्व इतक्या मोजक्या शब्दात पकडणारे तुमचे गूज, दोन्हीही सुंदर.

खूप सुंदर आहे तूझं घर!
<<हा आनंद , ही मज्जा शहरांमध्ये सर्व सुखसुविधांयुक्त असलेल्या high class society मध्ये राहणाऱ्या माणसाला लाभणे केवळ अशक्यच .>> पण तो चॉईस त्या माणसाचा आहे. कदाचित तूला आवडते तसं त्यालाही त्याचं घर आवडत असेल.

छानच.
"कोकलणारे हॉर्नबिल्स " म्हणजे कुडाळ परिसर.

खूप खूप धन्यवाद !! हो, मी कोकणातली आहे , धामापूरची . हे एक पावसातील दृश्य आहे . आता जर तुम्ही याल तर दृश्य बदललेलं असेल ..

होय गे माजे बाय ! माका लय हेवा वाटलो तुजा. Happy शब्द अपुरे पडावेत इतका जिव्हाळा भरलाय त्या फोटोत सुद्धा. फोटो पाहुनच मन तृप्त व शांत झालं. मग प्रत्यक्षात काय होईल?