सानुला, सुंदर आणि सुटसुटीत

Submitted by साद on 4 February, 2020 - 08:24

स्थळ : एका शहरातील उद्यान
वेळ: असाच एक रविवार, सकाळी ९ वाजता
हवामान : निरभ्र आकाश आणि सुखद वातावरण

या उद्यानात साधारण शांतता आहे. तुरळक लोकांची येजा चालू आहे. एवढ्यात एका बाजूने काही लोक शिस्तीने आत प्रवेश करतात. हे एकूण २४ जण आहेत. या सर्वांचेच पोशाख सामान्य आहेत. त्यांच्या बरोबर ते ६ सतरंज्या घेऊन आलेले आहेत. आता त्या अंथरल्या जातात. मग समूहातले २२ जण त्यावर बसतात. आता फक्त दोघेजण उभे आहेत- त्यातला एक ‘तो’ आणि दुसरी ‘ती’ आहे. आता पुढे काय ? तर आज इथे त्या दोघांच्या लग्नाचा हा छोटासा मेळावा आहे.

या लग्नाची नोंदणी प्रक्रिया २ दिवसांपूर्वीच झालेली आहे. आज इथे फक्त १० नातेवाईक (त्यापैकी ४ पालक) आणि बाकीचे मित्रमैत्रिणी आलेले आहेत. सर्वांनी मिळून हा अनौपचारिक स्नेहपूर्ण विवाहमेळावा आयोजला आहे. आता थोडेफार हास्यविनोद होतात आणि कार्यक्रमाला सुरवात होते.

दोघेही उत्सवमूर्ती सर्वांच्या मधोमध उभे राहतात. दोघांचे कपडे रोजच्या वापरातलेच आहेत. त्या दोघांच्या हातात प्रत्येकी एक घड्याळ आहे. बाकी अंगावर कुठलाही अलंकार नाही. दोघेही समोरासमोर उभे राहून एकमेकांच्या खांद्यावर हात ठेवतात. मग एकसुरात म्हणतात, “आम्ही दोघे एकमेकांचा मनापासून स्वीकार करीत आहोत”. बस्स. आता दोघेही आपापल्या मनगटावरचे घड्याळ काढतात आणि दुसऱ्याच्या हातात बांधतात. आता ही घड्याळांची देवाणघेवाण कशासाठी? तर त्याचे स्पष्टीकरण त्यांनी लगेच दिले. संसारात पतीपत्नीनी एकमेकास द्यायची सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ‘वेळ’. त्याचे प्रतिक म्हणून ही घड्याळे !

आता दोघांचेही पालक वधूवरांचा थोडक्यात परिचय उपस्थितांना करून देतात. मग दोघेही उत्सवमूर्ती आपले मनोगत व्यक्त करतात. या दोघांनीही १ वर्षभर एकत्र राहून एकमेकांचा पुरेसा अंदाज घेतलेला आहे. आपण एकमेकास अनुरूप आहोत याची खात्री झाल्यावरच विवाहनिर्णय घेतला. आता दोघांनाही सध्याचा ‘बॉलीवुडी’ प्रकारचा ठराविक लग्नसोहळा नको होता. म्हणून हा छोटासा मेळावा.

कार्यक्रमाच्या पुढच्या भागात या दोघांच्या प्रत्येकी २ मित्रांनी मनोगत व्यक्त केले. त्यात मुख्यतः आपला त्याच्याशी किंवा तिच्याशी परिचय कसा झाला ते सांगितले. तसेच त्यांना या मैत्रीमुळे या दोघांचे कोणते गुण जाणवले त्याचे कथन केले. आता सर्वांनी मिळून जोरदार टाळ्या वाजवल्या. मग सर्वजण उठले आणि सतरंज्या गुंडाळल्या गेल्या. उद्यानाचे बाहेरच्या बाजूस खाऊ आणि चहाच्या गाड्या उभ्या होत्या. तिथे सर्वांचा हसतखेळत अल्पोपहार झाला आणि या छोटेखानी कार्यक्रमाचे सूप वाजले.

लग्नसमारंभ हे पारंपारिक पद्धतीचे खर्चिक असावेत की साधेसुधे, हा ज्याच्या त्याच्या आवडीचा प्रश्न आहे. या विषयाच्या दोन्ही बाजूंचे समर्थक आपापली बाजू हिरीरीने मांडतात. खर्चिक समारंभातून रोजगार आणि अर्थव्यवस्थेला चालना मिळते, हा एक मुद्दा अलीकडे वारंवार चर्चिला जातो. ते जे काय असेल, ते असो. प्रस्तुत कार्यक्रमाला आलेल्या मंडळींनी हा सर्व काथ्याकूट काही वेळासाठी बासनात बांधून ठेवला होता. छान मोकळ्या हवेत, नैसर्गिक प्रकाशात आणि कुठलाही कर्कश आवाजविरहित झालेला हा कार्यक्रम सर्वांनाच सुखावून गेला. जेमतेम दीड तास चाललेल्या या सुटसुटीत कार्यक्रमाचा आनंद मनात साठवून ते सर्वजण तिथून बाहेर पडले.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

साद छान लेख व माहिती. मला आव्डला असा लग्न प्रकार. मी एक तर सिंगल पेरेंट असल्याने लेकीच्या लग्नात पुजेला कोण बसवायचे, कन्यादान कोण करेल अश्या शंका असतात मनात. दुसरे म्हणजे लग्न समारंभात मॅनेज करायला मॅनपावर नाहीच आहे माझ्याकडे त्याची एक काळजी वाट्ते. आजकाल असे संगीत ते रिसेप्शन लग्न फार खर्चिक पण झाले आहेत. त्यात आहेर वगैरे करायचे हे ते. वेडिंग प्लानर घेतला तरीही मला जमायला अवघड असेच वाट्ते. समारंभापेक्षा फंड्स तिचे उच्च शिक्षण , एकत्रित प्रवास ह्या वर खर्च झाले तर त्याचा योग्य विनियोग असे मला वा टते.
पण असा सुटसुटीत सोहळा व जाताना प्रत्येकास छोटी रिटर्न गिफ्ट हे मला नक्की जमेल.

त्या जोडप्यास हार्दिक शुभेच्छा.

अरे वा! असं काही करताहेत हे हे नसे थोडके. Happy
मलाही बागेत सतरंज्या वैगेरे काहीतरीच वाटलं. आधी वाटलं की योग करायला आले असतील Lol
घड्याळं एक्सचेंजपण. अंगठ्या करायच्या की एक्सचेंज Happy
त्यापेक्षा रेस्टॉरंट मधे स्नॅक्स वैगेरे मला पटलं असतं. असो. ज्यांची त्यांची इच्छा आणि आवड.
आणि वर प्रतिसादात सगळ्यांना चिठ्ठ्या लिहुन कळवण्याचं आलंय ते ही पटलं नाही.
तुमची लेखनशैली अगदीच माहिती दिल्यासारखी झालीये म्हणुन काहींना रोचक वाटलं नसावं.

भाषेबद्दल थोडे अवांतर :

जाताना प्रत्येकास छोटी 'रिटर्न गिफ्ट’
>>>> यावरून संदीप नूलकर यांची मी वाचलेली माहिती अशी:

'रिटर्न गिफ्ट’ हा चुकीचा भारतीय शब्दप्रयोग रूढ झालेला आहे. योग्य इंग्लीशनुसार याला ‘पार्टी फेवर’ म्हणतात. नूलकरांनी म्हटले आहे की हा शब्द इंग्लीश वा अमेरिकी व्यक्तीसमोर कधीही वापरू नका ! नाहीतर त्यांना वाटेल की पाहुणा आपणच यजमानाला दिलेली भेटवस्तू परत मागतोय !!

(भारतात ज्यांना हा शब्दसमूह वापरायचा आहे, त्यांनी खुशाल वापरा, माझी काही तक्रार नाही. मी फक्त त्यांची सूचना इच्छुकांसाठी लिहीत आहे . Bw )

एक वेगळा विचार--
माझ्या मित्राच्या चुलत बहिणींची लग्ने तीन दिवसांच्या फरकाने पार पडली.

मोठ्या बहिणीने केवळ रजिस्टर लग्न करायचे ठरवले होते. त्या प्रमाणे त्यांचे जवळचे १५-२० नातेवाईक मुंबईत बांद्र्याच्या कोर्टात/ रजिस्ट्रार च्या ऑफिसात गेले त्यांचा क्रमांक आला तसा रजिस्ट्रारने त्यांना बोलावले. वधू वरानी एकमेकांना हार घातले. त्यान्चे रजिस्ट्रार आणि नातेवाईकांनी अभिनंदन केले पेढे वाटले आणि कार्यक्रम संपला सगळे लोक घरी आले.

यानंतर दुसऱ्या दिवशी दुसऱ्या बहिणीचा लग्न समारंभ सुरु झाला. त्यात तिने साग्र संगीत सीमंतपूजन, ग्रहमख, मेंदी, हळद, असे कार्यक्रम करून तिसऱ्या दिवशी कार्यालयात वाजत गाजत तिचे लग्न लागले. खर्च जास्त नव्हता किंवा कार्यक्रम भपकेबाजही नव्हता परंतु नातेवाईक आणि मित्रमंडळ यांच्या उपस्थितीमुळे समारंभ आनंदाचा झाला.

या वेळेस तिची मोठी बहीण पार रडकुंडीला आली कारण तीसुद्धा नवी नवरी होती तरीही तिच्या कडे फारसे कुणी लक्ष देत नव्हते.हे सर्व चिडवा चिडवी हास्य कल्लोळ हे सर्व तिच्या वाट्यास जेमतेमच आले.

तिच्या वडिलांनी तिला जवळ घेऊन समजावले कि मी तुला सुरुवातीसच सांगत होतो कि लग्न हा एक समारंभ असतो ज्यात मुलीला आपली हौस मौज करून घेता येते.आणि हा एक दिवस ती सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असते. परंतु तुझाच आग्रह होता कि रजिस्टरच लग्न करायचे. (वडिलांनी दुसऱ्या मुलीच्या लग्नाला झालेला खर्च मोठ्या मुलीला रोख पैशाच्या स्वरूपात दिला होता).

शेवटी स्वतःची हौस मौज करता येत नसेल तर आयुष्यात पैसे कशासाठी मिळवायचे असा पण एक प्रश्न मनात येतो.

लग्न साधेपणाने करावे परंतु ते साजरे करूच नये असे मला वाटत नाही. साधेपणाने लग्न करून तो खर्च सामाजिक संस्थांना द्यावा हा विचार वरवर ठीक आहे परंतु समाजकार्यासाठी आपल्या हौसेला आपण किती मुरड घालावी हे हि ज्याने त्यानेच ठरवले पाहिजे.

घड्याळ देणे हे प्रतीक असले तर सप्तपदी किंवा सात फेरे हे सुद्धा प्रतीक आहे, ज्यात धर्मशास्त्र तुम्ही दोघे सात जन्म एकत्र राहायचे आहे सुखदुःखात साथ द्यायची आहे. बायकोने नवरा जेवढे कमावून आणेल त्यात सुखाने संसार चालवायचा आहे आणि नवऱ्याने बायकोच्या डोळ्यात पाणी येणार नाही याची खबरदारी घ्यायची आहे अशा तर्हेचे मंत्र म्हटले जातात.

असे अर्थासहित मंत्र पठण माझ्या लग्नात झाले होते आणि आमच्या कुलगुरूंनी हा अर्थ समजावून सांगितला होता.

माझे लग्न दुपारी दोन ते रात्री १० एवढ्या कालावधीत सर्व नातेवाईक आणि जवळच्या मित्रांसकट अगदी कमी खर्चात सुफळ संपूर्ण झाले होते

मित्रहो,
लेखातील प्रसंग मला एका उपस्थिताने सांगितल्यावर मी काहीसा भारावून गेलो होतो. त्यानुसार मी हा प्रसंग घाईने खरडला आहे. निव्वळ बातमी सादर करणे एवढाच उद्देश होता.
‘लेखन रोचक नाही’ या टीकेशी मी देखील सहमत आहे ! त्याबद्दल पुन्हा धन्यवाद.
..............
मध्यंतरी काही पदव्युत्तर कॉलेज तरुणांशी चर्चा झाली होती. त्यात त्यांनी पारंपारिक विवाह पद्धतीतील त्यांना खटकणाऱ्या काही गोष्टी सांगितल्या :
१. भव्यदिव्य साखरपुडा समारंभ. त्यांचा खर्च अगदी लग्नाच्या खर्चाशी स्पर्धा करेल असा.

२. लग्नाचे जेवणात चढाओढीत भरमसाठ पदार्थ ठेवणे. ‘माणशी पानामागे अमुक इतका खर्च’ याच्या नंतर मारलेल्या बढाया.
३. बुफेतील अन्न नासाडी. हे तर खूप वेदनादायक .

४. शहरांत ‘भेटवस्तू नकोत’ हे त्रयस्थांपुरते बरेचसे पाळले जाते. पण नातेवाईकांची देणीघेणी आणि रुसवेफुगवे अजूनही विसाव्या शतकासारखेच आहेत !

.... हे सर्व पाहता काही तरुणांना या सगळ्याला फाटा देऊन साधेसुधे प्रतिकात्मक कार्यक्रम करावेसे वाटतात.

फेसबुक पोस्ट सापडली.

> हे एकूण २४ जण आहेत. > २६ जण दिसताहेत.

> या सर्वांचेच पोशाख सामान्य आहेत.
दोघांचे कपडे रोजच्या वापरातलेच आहेत> सर्वांचे पोशाख अगदीच सामान्य नाहीत. बरे आहेत. वधू मधुवंती वैद्य अगदी झकपक नाही पण बऱ्यापैकी तयार झालीय. वर ओंकार रेगे पण ठिकय.

छान आहेत फोटो, प्रसन्न वाटलं. रुक्षपणा अजिबात वाटला नाही. फोटोखालचे सगळे प्रतिसादही सकारात्मक आहेत. तन्मय कानिटकर हा अनुरुपचा हेड आहे हे बघून असं वाटलं की अरे जी संस्था एका विशिष्ट जातीच्या लोकांसाठी काम करते आणि मोठी फि आकारते तोच मुलगा इथे निवेदन करतोय. अर्थात हे त्याचं खाजगी आयुष्य असून तो वर-वधूचा मित्र म्हणून तिथे गेलाय आणि याचा त्याच्या व्यवसायाशी काही संबंध नाही.
वधू-वरांनी जे कपडे घातलेत त्यापेक्षा भारी कपडे आजकाल लग्नाआधीचे फोटो काढण्यासाठी घालतात. हे करायला खूप मोठं धाडस पाहिजे आणि वर कुणीतरी उदाहरण दिलंय त्याप्रमाणे नंतर साधं लग्न केल्याचा पश्चाताप नाही झाला पाहिजे.

ते कपडे रोजच्या वापरातले वाटत नाहीत. (याचा अर्थ त्यांनी रोजच्या वापरातले कपडे घालायला हवे होते, असा नाही. तो त्यांचा प्रश्न._)

चांगला विचार आहे असं लग्न करण्याचा. आधी एकत्र राहून पाहणं (भारतात आणि तेही पुण्यात??? Proud ) या धाडसाचं कौतुक वाटलं. फेसबुक पोस्ट आवडली. फोटोही मस्त आहेत.

> तन्मय कानिटकर हा अनुरुपचा हेड आहे हे बघून असं वाटलं की अरे जी संस्था एका विशिष्ट जातीच्या लोकांसाठी काम करते आणि मोठी फि आकारते तोच मुलगा इथे निवेदन करतोय. > हे काही कळालं नाही. त्या पोस्टमधे सगळे एका विशिष्ट जातीचेच तर दिसताहेत. आणि अनुरूप लग्न जुळवायला फी आकारते तीकाही वेडिंग प्लॅनर नाही.

माझ्या मनात जे आलं ते मी लिहिलं, धागा भरकटावा असा उद्देश नक्कीच नव्हता. तो मित्र म्हणून आला असेल आणि त्याने फोटो टाकलेत म्हणून पटकन त्याचा प्रोफाइल दिसला, बाकी काही नाही.

नोंदणी पद्धतीने विवाह करणाऱ्या वधू-वरांना नियोजित विवाहाची नोटीस देणे तसेच वय व रहिवास याबाबत ऑनलाइन नोटीस देणे बंधनकारक करण्यात आले आहे.

(https://www.loksatta.com/pune-news/love-day-eighty-three-marriage-regist...)

सध्याच्या कोविडमय वातावरणात अत्यल्प उपस्थितीत विवाह होत आहेत. काही तर घरच्या घरीच केले जात आहेत. या निमित्ताने या धाग्याची सहज आठवण झाली.

Pages