तुमचा कधी वर्तमानपत्रात फोटो आला आहे का?

Submitted by ऋन्मेऽऽष on 28 January, 2020 - 05:35

नव्वदीच्या दशकातील घटना आहे. तेव्हा शैक्षणिक कारकिर्दीत चौथी आणि सातवीच्या स्कॉलरशिप परीक्षांना फार महत्व दिले जायचे. हल्ली त्या असतात की नाही याचीही कल्पना नाही. माझ्या वर्तनावरून मी वाटत नसलो तरी गणित आणि बुद्धीमत्ता चाचणी या विषयातील हुशार प्राणी होतो. स्कॉलरशिप परीक्षातील भाषा हा तिसरा विषयही कसाबसा जमवून न्यायचो. त्यामुळे चौथीमध्ये स्कॉलरशिपच्या परीक्षेत मी मेरीटमध्ये आलो होतो. ते देखील काठावर नाही तर मुंबईत चक्क चौथा आलो होतो.

निकाल घोषित झाला. दुसर्‍या दिवशी वर्तमानपत्रांची माणसे शाळेत आली. आम्हा गुणवान विद्यार्थ्यांचा शिक्षक आणि मुख्याध्यापकांसोबत फोटो काढून गेली. तिसर्‍या दिवशी तो फोटो पेपरात नावासह छापूनही आला. पण माझ्या घरात मात्र आपल्या पोराने असा काही तीर मारला आहे याची साधी कल्पनाही नव्हती. बहुधा तेव्हा आमच्याकडे रोज वर्तमानपत्र यायचे नाही. तर शेजारच्या घरातून कोणीतरी धावत आले. अहो तुमच्या ऋन्मेषचा फोटो आलाय बघा पेपरात, त्याला स्कॉलरशिप मिळालीय. तेव्हा घरच्यांना माझे हे प्रताप समजले. संध्याकाळी शाळेतून घरी आल्यावर त्यांनी मला आनंदाने झोडपलेच.

पुढे सातवीतही स्कॉलरशिप मिळाली. पुन्हा ते फोटो सोपस्कार झाले. विशेष कौतुक वाटले नाही. कारण आधी हे आयुष्यात एकदा घडून झालेले.

पण गेल्या आठवड्यात मात्र ईनकमटॅक्स संदर्भात जुनी कागदपत्रे शोधत असताना बरेच दिवसांनी त्या वर्तमानपत्राच्या कात्रणावर नजर पडली. सोबत पोरगी माझ्या कागदपत्रांच्या पसार्‍याशी खेळत होती. तिलाही मोठ्या हौशेने ते कात्रण दाखवले. तिनेही मोठ्या हौसेने ते बघितले. मात्र पेपरात फोटो येणे हे तेव्हा काय भारी फिल देणारे होते हे तिला शब्दात काय कुठल्याही प्रकारे समजावून सांगता येण्यासारखे नव्हते. किंबहुना आज फेसबूक इन्स्टाच्या जमान्यात जो तो आपली स्वत:ची हवी तशी मार्केटींग करतो तिथे असे पेपरात फोटो येण्याचे कोणाला किती कौतुक असेल हा प्रश्नच आहे. पण आजही आमच्या घरातील नातेवाईकांमधील सारेच आठवण काढतात, की हुशारीसाठी म्हणून पेपरात फोटो येणारा ऋन्मेष आपल्या घरातील पहिलाच पोरगा. आणि आताही आमच्या घरात या पिढीतले कित्येक जण शिक्षणासाठी परदेशी गेलेत, तिथेच स्थायिक झालेत, पण पेपरात फोटो येणारा अजूनही मी एकटाच आहे Happy

माबोवर तर कैक मोठ्या हस्ती आहेत. काहीजण असेही असतील ज्यांच्यासाठी पेपरात फोटो येणे ही नित्याची बाब असेल. पण त्यातही पहिल्या फोटोची आठवण स्पेशल असेल. अनुभव वाचायला आवडतील Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी जिथे वाढलो त्या शहराच्या मूळ जुन्या गावात आषाढी एकादशीला विठोबाचा ग्रामरथ निघतो. तो रथ जाडजूड दोरांनी ओढतात. मी माझी दहावीची शिकवणी बुडवून रथाला गेलो, दिवसभर शिकवणी होती आणि मी दप्तर घेऊन रथ ओढत होतो. काहीवेळाने मुख्य चौकात रथ आल्यावर आमच्या आबासाहेबांनी (तीर्थरूप) एका मुलाकरवी बोलावणे धाडले, आणि भर चौकात अशी काही कानाखाली वाजवली कि आजूबाजूच्या ५० मीटर परिघातील लोक आमच्याकडे पाहू लागले. घरी जाऊन अजून मार खाल्ला. सकाळी बऱ्यापैकी अंग ठणकत होतं, तरी क्लासला निघालो होतो. नेमकं दारात असताना शेजारचे काका हातात पेपर घेऊन माझा रथ ओढतानाचा गर्दीतला फोटो दाखवत होते, मी आबांकडे बघत होतो आणि आमचं घर हसत होतं!

बोहनी?
मला नाट वाटून रायला वं.

अभिनंदन पाटील जी, ऋन्मेष आणि वावे.
मध्यंतरी एका मुलाखतीच्या वेळी सकाळ मध्ये, तर व्याख्यानाचे वेळी लोकमत व पुढारी मध्ये फोटोत झळकण्याची संधी मला लाभली.

माझ्या आधीच्या कम्पनी ने, जाहिराती साठी एम्प्लॉईज चे फोटो घेऊन फ्लेक्स बोर्डस, पेपर मधे छापले होते. आणि वेब साईट वर सुद्धा टाकले होते. I was part of it!

>>मी दहावीच्या परीक्षेत तालुक्यात पहिली आले होते Proud तेव्हा पेपरमध्ये फोटो आला होता Happy

Submitted by वावे on 28 January, 2020 - 19:55

Same here Happy

अरे वाह बरेच हुशार लोक आहेत माबोवर!!

मी काहीच खास केलं नसताना केवळ प्रेक्षकांत उभी होती म्हणून माझा TOI मधे फोटो आला होता

तसा मी शाळेत हुशार म्हणूनच गणला जायचो.
दहावीच्या निकाल लागला तेव्हा वर्तमानपत्रात फोटो छापून आला होता.
.
.
कोणाचा म्हणुनी काय पुसता दाताड वेंगाडुनी?
अहो
बोर्डात आलेल्या शाळेतल्या मुलाचा !!

*अरे वाह बरेच हुशार लोक आहेत माबोवर!!* - आहेतच कीं, आमच्या सारखे 'फोटूवाले ' पण ! -

अहो, पण पुन्हा भटकायला गेलात, तर परत तोच फोटो द्यावा लागेल ना पेपरात, ' हरवलेत ' म्हणून !! 20190731_085518.jpg

मी लहानपणी हरवलो असताना घरचे हरवला आहे म्हणुन वर्तमानपत्रात फोटो देण्याचा विचार करत होते म्हणे. आणि मला जर हे माहीत असते तर मी लौकर सापडलोच नसतो आणि माझा आला असता फोटो.

चौथी आणि सातवीच्या स्कॉलरशिप परीक्षेत अनुक्रमे जिल्ह्यात दुसरा आणि चौथा क्रमांक आला होता माझा. त्या दोन्ही वेळी वर्तमानपत्रात माझा फोटो छापून आला होता. भारी वाटलं होतं तेव्हा एकदम.

अभिनंदन सर्वांचे... गुणवान लोकं एका धाग्यावर जमलेत..
मला वाटते माबोबर किमान ५० जण असावेत पेपरफोटोवाले...

थोडेसे विषयांतर:

व्यक्तिश: मला कधीच शाळेच्या परीक्षेत "पहिल्या नंबरांत येणाऱ्यांचा" जो गवगवा केला जात होता तो कधीच फारसा आवडला नाही (मी स्वत: "पहिल्या नंबरांत येणाऱ्यांच्या" कम्युनिटीमधलाच एक असूनही). "पहिल्या नंबरात येणाऱ्या मुलांना प्रोत्साहन देणे" असे त्याचे समर्थन कधी पटले सुद्धा नाही. कारण नंबरात न येणारी मुले आणि नापास झालेली कित्येक मुले त्यांच्या ठायी केवळ परीक्षेत मार्क मिळवण्याकरीता लागणारे कौशल्य नसल्याने पुढील आयुष्यात नाउमेद होऊन बसलेली पाहिली आहेत. अर्थात, त्यातले काही (फार कमी) जिगरबाज पण असतात जे याला न जुमानता पुढील आयुष्यात त्यांच्या आवडीच्या क्षेत्रातील कौशल्य वापरून (जे शिक्षण पद्धतीत/परीक्षेत केल्या जाणाऱ्या मूल्यांकनात कधीच विचारात घेतले जात नाही) चांगलीच मुसंडी मारतात, अशीही उदाहरणे पाहिली आहेत. त्यामुळे "पहिले येणे" हे फार कधी ग्रेट वगैरे वाटले नाही. असो. विषयांतर समाप्त.

अतुलजी +७८६
आपली पोस्ट वाचून यावर माझेही स्वानुभव मांडावेसे वाटताहेत. खरे तर हे ईथे अवांतरच. जमल्यास विकाण्ताला ते लिहेन एका स्वतंत्र धाग्यात...

माझा मुलाचा लेगोचा विजेता म्हणून फोटो आला होता...
आणि मुलीचा असाच फोटो एका छायाचित्रकारने विनंती करून एपीएम्सी मॉर्केट्मध्य काढ्ला होता... नाताळ मॉकेट म्हणून.. आणि तो छापूनपण आला होता... Happy

अनेक पेपरवाले मला विनंती करतात की तुमचा फोटो वर्तमानपत्रात छापू द्या, वाटल्यास हवा तो मोबदला घ्या. पण मी बोलतो नको राहू दे. मला प्रसिध्द नका देऊ. मी एक साधा सरळ गरीब माणूसच बरा आहे.

माझा फोटो नाही, पण रितसर मुलाखात घेतली होती.
बोकलत असेच नाव होते मुलाखातकाराचे. पण मुलाखात घेतल्यावर ते जे समोरील पिंपळाच्या झाडावर लटकले ते गटकले.
हे वरील गृहस्थ नामसाधर्म्यामुळे कदाचित ओळखीचे वाटतात.
भेटूया अमानवीय वर.

मी दहावीला जिल्ह्यात अन् शाळेत पहिली होते तेव्हा फोटो आला होता. आणि एकदा गीतमंच विभागात असताना काहितरी सांस्कृतिक कार्यक्रम होता त्याचा ही गृप फोटो पेपरला आला होता.

Pages