खातं

Submitted by रावसाहेब_बी on 28 January, 2020 - 03:24

खातं नेमकं कधी सुरू झालं हे नेमकं सांगता येणार नाही. पण जेव्हा एखाद्या नगराचा, राजाच्या राज्याचा कायदा ( घटना) अस्तित्वात आली आणि या खात्याकडे कायदे अंमलबजावणी करणे आणि गुन्हेगारांना शिक्षा करणे हे काम दिलं गेलं. प्रधान- कोतवाल-शिपाई अशी उतरंड रचली गेली.
जसा राज्याचा विस्तार होत गेला तसतशी या उतरंडीत वेगवेगळ्या पदांवर माणसं नेमली गेली.
तर या खात्याचं एक वैशिष्ट्य पहिल्या पासून आहे ते म्हणजे राजा बदलला की निष्ठा नवीन राज्याच्या पायी ठेवायची. का तर राजा पोटाला घालतो. जो दानापाणी देतो त्याची तळी उचलून धरायची.
भारत देशात अनेक राजे आणि त्यांची अनेक राज्ये. राजाशी बिनसलं तर दुसऱ्या राज्यात पोटापाण्यासाठी चाकरी करायची.
पण चित्र सगळं बदललं जेव्हा इंग्रजांनी देश ताब्यात घेतला. इंग्रजी राज्याप्रमाणे शासन व्यवस्था उभी केली. पोलिस खाते तयार केले. आता पोलिस इंग्रज होते का? नाही. फक्त उच्च अधिकारी इंग्रज होते. भारतीय असलेले काळे लोक ( इंग्रजी संबोधन) पोटासाठी इंग्रजांचे हुकुम मानून भारतीय जनतेवर अत्याचार करु लागले. केवळ पैशासाठी थोडक्यात पोटापाण्यासाठी आपल्याच बांधवांवर गोळीबार करणं, त्यांना फासावर देणं हे खात्याचे लोक आनंदाने करीत होते. कुणी बंड केले तर त्याच्या घरादाराची वाताहत करुन सोडत होते. असे केल्यावर इंग्रज खूष होऊन यांना मेडल देत. हे आणखीन हुरुपानं काम करीत.
पण हाय रे दुर्दैव! इंग्रज चालले गेले. आता इंग्रजांचे शत्रू एतद्देशीय लोक सत्तेवर आले. लगेच खातं त्यांना सलाम करून त्यांचे हुकूम मानू लागलं.
इंग्रज गेल्यावर छोटी राज्ये ( संस्थानं) एकत्र करून भारत देश बनला. स्वतंत्र भारताचे कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी खात्याकडं दिली. सरकारनं जनतेला कायदे समजावून सांगितले नाही पण खात्यातल्या लोकांना विशेष प्रशिक्षण देऊन कायदे आणि कायदा मोडला तर करायच्या शिक्षा, विविध जाती धर्म यांचे कायदे, कलमं हे शिकवलं. खातं देशसेवेसाठी तत्पर झाले. खलनिग्रहणाय सद् रक्षणाय ब्रीद वाक्य घेऊन दिवस रात्र काम करु लागले. खात्याला मदत म्हणून गुप्तचर यंत्रणा, राखीव दल व भरपूर सामुग्री उपलब्ध करून दिली. बुलेट सारखी वाहनं, चिलखती गाड्या , हत्यारं अशी अनंत सामुग्री दिली.
अलिकडे संगणक देऊन खातं आणखीन बळकट केले.
आता मुद्द्याकडं वळू. भारतात लोकशाही आहे. ज्याला जास्त मतं तो विजेता. अशा विजेत्यांची पार्टी सत्तेत येणार. आता हे विजेते सगळेच काही धुतलेल्या तांदळाचे असतात का? तर मुळीच नाही. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले, तुरुंगातून जामीनावर बाहेर आलेले सत्तेवर येतात आणि खातं त्यांना देखील सॅल्युट मारतं, त्यांना संरक्षण देतं, प्रोटोकॉल प्रमाणे त्यांची सोय करतं.
या खात्यात इमानदार लोक पुढे येऊन अशा गुन्हेगार सत्ताधीशांचा हुकूम का धुडकावत नाहीत.? त्यांची अंडीपिल्ली सर्व रेकॉर्ड वर असताना त्यांना चाप का लावत नाहीत. आर्थिक घोटाळा करणारे, आदर्श सारखा घोटाळा करणारे लोक सत्तेत परत येतात. ज्या लोकांचे खायचे वांदे होते, वार लावून जेवत होते त्यांनी करोडोंची माया कुठून आणली याची खबरबात खात्याला नक्कीच असते कारण खात्याची यंत्रणा खूप मोठी आहे. केवळ बदली होईल किंवा शिक्षा होईल म्हणून चुकीचे काम करणारांची साथ देणे सोडले पाहिजे. जनता जी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पणे कर भरतात त्या कराच्या पैशातून खातं पोट भरतं ही जाणीव खात्यातील लोकांनी ठेवली पाहिजे. एखादा कायदा बुळगा असेल व गुन्हेगार त्याचा फायदा पळवाटीसाठी घेत असेल तर खात्याच्या लोकांनी सरकारला सांगून तसा कडक कायदा बनवायला प्रेशर आणलं पाहिजे. तुम्हाला साधी संघटना बनवता येत नाही, हक्काची सुट्टी घेता येत नाही.
पगार कमी आहे, घरांची सोय नाही अशी कारणं सांगत जर खात्यातील काही लोक गुन्हेगारांशी हात मिळवणी करत असतील, अवैध धंदे करणारांबरोबर मांडवली करत असतील, हप्ते वसूल करत असतील तर ती स्वत: बरोबर आपल्या मुलाबाळांची पण ती फसवणूक आहे. मुलीबाळी खात्यातल्या लोकांना पण आहेत.
तेव्हा गरज आहे प्रामाणिक खात्याची. नितीमान, कर्तव्यकठोर लोक खात्यात असतील तर काय बिशाद वरिष्ठांची चुकीचे काम करण्यासाठी दबाव आणण्याची? खातं. होय हे एकच खातं सगळं काही आलबेल करु शकतं. स्वच्छ, कार्यक्षम आणि सत्यवादी जनसेवकांपाठी जनता नेहमीच पाठीशी राहते. धन्यवाद!

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

वाचलं. छान लिहिलंय. पोटतिडकीने लिहिलंय. लिहित रहा. लोकं वाचतील हळूहळू.