आमार कोलकाता - भाग ८ - (शेवट) भाषिक व धार्मिक वैविध्यांचे शहर

Submitted by अनिंद्य on 27 January, 2020 - 01:52

लेखमालेचे यापूर्वीचे सात भाग इथे वाचता येतील : -
https://www.maayboli.com/node/72801
https://www.maayboli.com/node/72846
https://www.maayboli.com/node/72950
https://www.maayboli.com/node/72977
https://www.maayboli.com/node/73013
https://www.maayboli.com/node/73034
https://www.maayboli.com/node/73078

आमार कोलकाता – भाग ८ - भाषिक व धार्मिक वैविध्यांचे शहर

भारतातील सर्वाधिक गर्दीच्या शहरांमध्ये कोलकात्याच्या क्रमांक तिसरा! दीड कोटी लोकसंख्या असलेलं शहर आता विकासाच्या मागे लागलं आहे. पूर्व भारतातील सर्वात मोठे शहर असल्याने शेकडो लोक रोजगार, शिक्षण आणि अन्य कारणांमुळे नव्याने येऊन इथे वसत आहेत, गर्दी वाढतेच आहे. नवीन वस्त्या आकाराला येत आहेत. त्यात झोपडपट्ट्या आहेत तशी बहुमजली गृहसंकुलेही आहेत. वाढत्या लोकसंख्येला प्रचंड गर्दीच्या जुन्या शहराऐवजी शहराबाहेरच्या, थोड्या दूरवरच्या नवीन चकचकीत वस्त्या खुणावत आहेत. त्यांना मुख्य शहराशी जोडण्यासाठी शहरात उड्डाणपुलांचं जाळं विणण्यात येत आहे. नवीन काही घडतांना जुने गळून पडणार हा निसर्गनियमच आहे. तद्नुसार कोलकाता शहराचं रूप बदलत आहे आणि स्वभावही.

thumbnail_Modern Kolkata .jpg

कोलकाता महानगरात अनेक शहरं वसली असल्याचा उल्लेख लेखमालिकेच्या पूर्वभागात आहे. हे वेगळेपण शहराला ऐतिहासिक वारसा म्हणून मिळाले आहे पण वैविध्य हे वैभव मानण्याचा विचार समाजातून हळूहळू हद्दपार होत आहे. अशाच समाजांविषयी या भागात :

शेक्सपिअरचे एक वचन आहे -“Let’s talk of graves, worms and epitaphs.” कोठल्याही समाजाची स्मृतिस्थळे म्हणजे त्या समाजाबद्दलचे त्रिमितीतले चिरंतन भाष्य. कदाचित त्यामुळेच मानववंश आपल्या पूर्वजांची आठवण म्हणून कबरी, प्रार्थनास्थळे, छत्र्या, स्मारके बांधत असावा. कोलकात्यातील विविध समाजांच्या स्मशानामध्ये माणसे तर पुरली आहेतच, अनेक समाजांचा इतिहास, त्यांची ओळखही पुरलेली आहे. इथे चिरनिद्रा घेत असलेल्या लोकांमध्ये ब्रिटिश राज्यकर्ते आहेत, डच संशोधक आहेत, मैसूरच्या टिपू सुलतानची मुले आहेत, बगदादी ज्यू आहेत, अवधचा नवाब वाजिद अली शाह आणि त्याचं गणगोत आहे, अँग्लो-इंडियन मंडळी आहेत, झोराष्ट्रीयन पारशी आहेत, ग्रीक दर्यावर्दी आहेत, फ्रेंच कलाकार, अफगाणी आणि सीरियन सैनिक आहेत.

कोलकात्यात सर्वात जुनी ‘ख्रिश्चन’ कबर एका रझाबीबी नामक ‘अर्मेनियन’ स्त्रीची आहे. कबरीवर कोरलेल्या मजकुरात दफनविधी १६३० साली झाल्याची नोंद आहे !

खुष्कीच्या मार्गाने कोलकात्यापासून अर्मेनिया हा देश साधारण ४५०० किलोमीटर दूर असला तरी अर्मेनियन समाजाचे कोलकात्याशी संबंध फार जुने आहेत. एकेकाळी सुमारे २० हजार श्रीमंत अर्मेनियन कोलकात्याच्या ‘व्हाईट टाऊन’मध्ये राहात. त्यांना ‘द ट्रेडिंग प्रिन्स कम्युनिटी’ असे म्हणत. भारत स्वतंत्र झाला तेव्हा कोलकात्याच्या उच्चभ्रू भागातल्या सुमारे ३५० इमारतींची मालकी एकट्या जोहान सी गॅल्स्टन या अर्मेनियन माणसाकडे होती. आद्य पंचतारांकित हॉटेल ‘द ग्रँड’चा (आजचे ओबेरॉय द ग्रँड) मालक अरातून स्टीफन, एकावेळी अनेक रोल्सरॉयस मोटारी बाळगणारा टिम टॉडस, कोट्यवधी रुपयांचा दानधर्म सहज करणारा पॉल चॅटर असे अनेक धनाढ्य लोक या समाजात होते. आज कोलकात्यात संख्येने जेमतेम १०० उरलेल्या अर्मेनियन समाजाची संपत्ती काही हजार कोटी रु.ची सहज असेल. हा समाज प्रख्यात HSBC बँकेचा सर्वात मोठा भागधारक आहे. रग्बीच्या खेळात विशेष प्राविण्य आणि ऑर्थोडॉक्स चर्चच्या प्रथेप्रमाणे डिसेंबरऐवजी जानेवारीत साजरा होणारा ख्रिसमस ही दोन्ही कोलकात्यातल्या अर्मेनियन समाजाची खास वैशिष्ट्ये!

ज्या मोजक्या अर्मेनियन खाणाखुणा आज राहिल्या आहेत त्या बऱ्या अवस्थेत आहेत. शहराच्या बडा बाजार भागात ‘अर्मेनियन स्ट्रीट’ आहे. व्यापारी जहाजांसाठी बांधलेला अर्मेनियन घाट आजही वापरात आहे. लोकसंख्या आटल्यामुळे अर्मेनियन शाळा आणि प्रार्थनास्थळे मात्र आता ओस पडली आहेत.

48994725131_f407ec702d_b.jpgप्रचंड गर्दीच्या अर्मेनिअन स्ट्रीट भागात ‘चर्च ऑफ होली नाझरेथ’

* * *

कोलकात्यात ब्रिटिशांच्याही आधी व्यापारात अग्रक्रम मिळवणारा समूह म्हणजे मारवाडी. या व्यापारी समुदायाने ब्रिटिशांशी एकाचवेळी व्यापारात तीव्र स्पर्धा आणि स्थानिक पातळीवर सहकार्य असे दुपेडी धोरण ठेवत स्वतःचा उत्कर्ष गाठला. स्थानिक भाषा, प्रथा-परंपरा आत्मसात करून मिळून मिसळून राहत असल्यामुळे त्यांना विरोधही झाला नाही. राजस्थानच्या दुष्काळी भागातून स्थलांतरित झालेले अनेक होतकरू मारवाडी व्यापारी कोलकात्यात ज्यूट, चहा, परंपरागत ‘हुंडी’ आणि सावकारीच्या व्यवसायात जम बसवून प्रचंड श्रीमंत झाले. बडा बाजार भागात त्यांचे अनेक ‘बास’ आहेत. हे पारंपरिक ‘बास’ म्हणजे आजच्या भाषेत ‘बिझनेस इन्क्युबेशन सेंटर’. एक खानावळ आणि त्याला लागून मोठ्या ओसऱ्यांवर गाद्या-तक्क्यांची बैठक. रोजच्या जेवणाची सोय खानावळीत आणि व्यापारासाठी आणि रात्रीच्या झोपेसाठी ओसरी एवढ्या त्रोटक भांडवलावर शेकडो मारवाडी तरुणांनी कोलकात्यात पाय रोवले आणि पुढे डोळे दिपवणारे ऐश्वर्य प्राप्त केले. बिर्ला, गोयनका, मित्तल, बांगड, बाजोरिया, बिनानी, फतेहपुरीया, सिंघानिया, धानुका अशा अनेक मारवाडी व्यावसायिकांनी कोलकात्यात आपला व्यवसाय सुरू केला, वाढवला आणि त्याचा पुढे देशभर-जगभर विस्तार केला. आजही आपले व्यापारकौशल्य, संपत्ती आणि मनमिळावू स्वभावाच्या जोरावर हा समाज कोलकात्याच्या जीवनावर प्रभाव राखून आहे. त्यांच्या भव्य प्रासादतुल्य घरांबद्दल, त्यांच्या संपत्तीबद्दल ईर्षेचा सुप्त भाव अन्य शहरवासियांमध्ये दिसून येतो.

मिळवलेल्या वैभवाचा सदुपयोग अनेक मारवाडी दानशूरांनी केला आहे. ख्रिश्चन चर्च संचालित संस्थांचे अपवाद सोडले तर कोलकात्यातील अनेक प्रतिष्ठित शैक्षणिक संस्था, वसतिगृहे, अनाथालये आणि रुग्णालये मारवाडी समाजानी केलेल्या आर्थिक मदतीतून उभारण्यात आली आहेत. जवळपास सर्वच संस्थांच्या संचालनात आणि व्यवस्थापनात समाजातील प्रतिष्ठित लोक सक्रिय सहभाग नोंदवताना दिसतात.

48994074808_1a12dc2bfa.jpgबिर्ला प्लॅनिटोरियम आणि बिर्ला सायन्स सेंटर

कोलकात्यातील जुन्या मारवाडी धनाढ्यांपैकी प्रसिद्ध नाव म्हणजे बिर्ला कुटुंबियांचे. कोलकात्यात बिर्ला तारांगण, बिर्ला अकादमी ऑफ आर्ट अँड कल्चर, बिर्ला इंडस्ट्रियल अँड टेकनॉलॉजी म्युझियम अशा अनेक सुंदर लोकोपयोगी इमारती या कुटुंबाने जनतेसाठी उभारल्या आहेत. बिर्लांच्या नावाने एखादा चौक किंवा रस्ता मात्र कोलकात्यात सापडणार नाही.

* * *

शहराच्या श्रीमंतीत भर टाकणारे ज्यू व्यापारी कोलकात्यात बरेच उशीरा दाखल झाले, साधारण १८३० ते १८४० च्या काळात. अल्पावधीतच त्यांनी इथे चांगला जम बसवला. या समाजाने अनेक कलाकार, गायक-वादक आणि दानशूर समाजसेवक शहराला दिले आहेत. त्यांची संख्या आता फार नसली तरी देखण्या ज्यू प्रार्थनास्थळांना (सिनेगॉग) शहरात तोटा नाही.

48994080838_bf7a1e3c72_c.jpgमेगन डेव्हिड सिनेगॉग, अंतर्गत रचना

* * *
‘बाबुल मोरा नैहर छूटो ही जात’ …… हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत आवडणाऱ्या बहुतांश लोकांना ही ठुमरी नक्कीच माहीत असेल. अवधचा दहावा आणि शेवटचा नवाब वाजिद अली खानची ही कालजयी रचना. लखनऊच्या ‘माहेरा’तून परागंदा झालेल्या रसिकाग्रणी वाजिद अलीचे ‘सासर’ आहे कोलकात्यातील मटीया बुर्ज भागात. त्याच्यासोबत त्याचा भलामोठा परिवार, दास-दासी, खानसामे, घोडे, पाळीव प्राण्या-पक्षांची फौज, त्याच्या प्राणप्रिय कत्थक नृत्यांगना, ठुमरी गायक-गायिका, संगीत आणि नृत्य-गुरु, नामांकित तवायफ आणि साजिंदे असे सगळेच गणगोत कोलकात्याच्या ‘मिनी लखनऊ’त चिरविश्रांती घेत आहे.

सध्या हुगळीच्या काठी ‘गार्डन रीच’ भागात आजही मटीया बुर्जचे काही अवशेष आहेत. वाजिद अलीचा आणि त्याच्या कलासक्त इतिहासाचा वारसा बहुदा कोणालाच नको आहे, त्यामुळे इथे फारसे कोणी जातांना दिसत नाही. बहुतेकांना इथे ऐतिहासिक महत्वाचे काही असेल याची कल्पना नसावी. सध्या हा भाग दोन वेगळ्याच गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे – तयार कपड्यांच्या ब्रॅंड्ससाठी डेनिम कपडे शिवणाऱ्यांच्या मोठ्या वस्तीमुळे आणि दुसरे म्हणजे दक्षिण-पूर्व रेल्वेच्या मुख्यालयामुळे.

परागंदा होऊन कोलकात्याला स्थायिक होणारा एकटा वाजिद अली शाहच नव्हता. मैसूरच्या टीपू सुलतानाचा मुलगा गुलाम मोहम्मद अनेक वर्षे कोलकात्यात वास्तव्याला होता. त्याने टीपू सुलतानाच्या स्मरणार्थ एक अतीव सुंदर वास्तू या शहराला दिली आहे – आजही सुस्थितीत असलेली धरमतल्ला भागातील टीपू सुलतान मस्जिद! आता तिचे ‘नूतनीकरण’ घडून मूळच्या सौंदर्याला गालबोट लागले आहे तरी वास्तूचे सौष्ठव वादातीत आहे. मुघल शैलीतल्या या मशिदीचे वेगळेपण म्हणजे पाठीला जोडलेल्या सयामी जुळ्यांसारखी रचना. १८३०-१८३२ मध्ये बांधल्यामुळे त्यावेळी स्थानिक अभिजनांमध्ये प्रचलित वेगवेगळ्या युरोपियन शैलींचे हलकेसे शिंपण मशिदीच्या कमानी, खिडक्या, गवाक्षांवर दिसते.

48994081908_1f4098a273.jpgटीपू सुलतान मस्जिद, फ्रान्सिस फर्थ यांनी १८७० मध्ये टिपलेले छायाचित्र

गुलाम मोहम्मदला अभिवादन म्हणून टीपू मशिदीचे डिझाईन हुबेहूब वापरून स्थानिक वक्फ बोर्डाने टॉलीगंज भागात ‘प्रिन्स गुलाम मोहम्मद मशीद’ बांधून घेतली आहे. पण तिकडे जाण्यात काही अर्थ नाही, उगाच ‘हुबेहूब’ च्या व्याख्या बदलाव्या लागतील.

* * *

मुंबईप्रमाणेच येथेही पारशी-झोराष्ट्रीयन समाज अनेक शतकांपासून आहे. ब्रिटिश छत्राखाली चीनशी मुक्त व्यापार करण्याची मुभा असलेला शहरातील एकमेव समाज. त्याचसोबत नौकाबांधणी क्षेत्रात मक्तेदारी आणि बांधकामाच्या सरकारी कंत्राटांमुळे प्रचंड वैभव कमावणाऱ्या पारशी समाजाने कोलकात्याच्या शिक्षण, चित्रपट आणि वैद्यकीय क्षेत्रात आपले योगदान पुरेपूर दिले आहे. दानशूरपणात त्यांचा हात कोणी धरू शकणार नाही. कोलकात्याच्या सिनेमा आणि नाट्यचळवळीत पारशी समाजाचे योगदान विशेष उल्लेखण्यासारखे. आता समाजाची संख्या उतरणीला लागली आहे. अतिवृद्ध मंडळी वगळता येथील बहुतेक पारशी अमेरिका, सिंगापूर आणि हाँगकाँगला स्थानांतरित झाले आहेत. पारशी-झोराष्ट्रीयन अग्यारी आणि आतषबागेत सर्वत्र सामसूम असते.

48994629831_d8fd6301bb_k.jpgपारसी अंजुमन आतिष अदरान

साधारण ३२ लाख मुस्लिम इथे आहेत. हिंदू – मुस्लिम संमिश्र वस्त्या जवळपास संपुष्टात आल्या आहेत. पार्क सर्कस आणि काशीया बागान सारख्या भागात १०० टक्के मुस्लिम वस्त्या आहेत. त्यांच्यातही मूळचे बंगाली, बांगलादेशी विस्थापित मुस्लिम, पठाणी, उर्दूभाषक मुस्लिम, बोहरी, शिया, बिहारी, तोपसिया भागात राहणारे सुमारे १० हजार इराकी बिरादरीचे मुस्लिम, खाटीककाम आणि लोहारकाम करणारे मुस्लिम अशी विभागणी आहे. १ लाख अँग्लो-इंडियन, २५ हजार तिबेटी, काही लाख नेपाळी असा लवाजमा शहरात आहे. बांगलादेश युद्धात अक्षरशः लाखोंच्या संख्येने शरणार्थी लोकांनी कोलकात्यात कायमचा आश्रय घेतला आहे. आज रोजगाराच्या आशेने ग्रामीण बंगालमधून, शेजारच्या बिहार आणि झारखंड राज्यातून कोलकात्यात आदळणाऱ्या लोंढ्यांबद्दल शहरवासियांमध्ये नाराजी आहे, तसेच नाईलाज असल्याची हतबलता आहे. शहर कुणालाच पुरे पडेनासे झाले आहे.

48994638846_70f80e74d7_b.jpg

* * *

शहराच्या व्यक्तिमत्वाचा खरा आरसा म्हणजे तेथील खाद्यजीवन. कोलकात्याच्या बहुरंगी-बहुढंगी खाद्यसंस्कृतीबद्दल शेवटच्या भागात आधीच लिहून झाले आहे. :-

बंगभोज - खाद्ययात्रा कोलकात्याची
https://www.maayboli.com/node/72459

(समाप्त)

(अन्यत्र पूर्वप्रकाशित. लेखातील कोणताही भाग लेखकाच्या परवानगीशिवाय अन्यत्र वापरू नये. काही चित्रे जालावरून साभार.)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुरेख लिहिलय अगदी. फोटोंनी लेखांची मजा वाढवली.
कोलकाताविषयी आकर्षन आहे आणि आता वाढलेल्या बकालपणाची भितीही आहे.

छान लेखमाला झाली आहे! मात्र या शेवटच्या भागाचे दोन भाग करुन दुसऱ्या भागात हिंदू बंगाली व इतर समाज, त्यांच्यातल्या चालीरीती याविषयी (नेहमीच्या गोष्टी - दुर्गापुजा वगळता) वाचायला आवडलं असतं. या भागात अल्पसंख्याक समाजांविषयी लिहिले आहे तसेच काही तरी हटके.

@ हर्पेन,
@ rockstar1981
@ हरिहर.
@ सस्मित

आपण सर्वांनी इथवर न कंटाळता वाचले, वेळोवेळी अभिप्राय दिला त्याबद्दल आभार.

लेखमालिका कंटाळवाणी झाली असावी. प्रतिसादांची संख्या आधी ९८ आणि मग पुढील भागांसाठी ८-१० अशी कमी होत गेलेली दिसते, त्यावरून अंदाज येतो. Happy

@ जिज्ञासा,

...... हिंदू बंगाली व इतर समाज, त्यांच्यातल्या चालीरीती याविषयी......

सूचनेबद्दल आभार. इथे असलेल्या अन्य लेखनात त्याचे उल्लेख आले आहेत. बंगाली समाजजीवनावर पुढे विस्तृत लिहिण्याचा विचार आहे.

पसारा वाढू नये म्हणून स्वतःला 'कोलकाता शहर' असे कुंपण घातले होते. तरी ९ भाग झाले. Happy

आत्ताच तुमचा हा भाग वाचला आणि तुमच्या अभ्यासु आणि सुंदर भाषाशौलीमुळे आवडल्याने सेव्ह केला आहे. आता परत मागे जाऊन बाकीचे सर्व भाग वाचणार आहे. खात्री आहे की सर्वच भाग उत्तम वठले असतील (शितावरून भाताची परिक्शा). आपण लिहीत रहावे. धन्यवाद.

तुमच्या अभ्यासपूर्ण आणी सुंदर भाषाशैलीमुळे ही लेखमाला खूप सुंदर वठ्ली आहे. प्रतिसाद काही कारणाने प्रत्येकवेळी दिला गेला नाहीये. परंतु सर्व लेख सुरेख आहेत.

@ लंपन
@ निशदीप
@ anjut

आभार, उत्साह वाढवल्याबद्दल.

@ आऊटडोअर्स,

आभारी आहे. मालिकेतले सर्व भाग वाचावेत असा आग्रह.

संपुर्ण लेखमाला एक सलग वाचायची म्हणून राखून ठेवली होती. आज मुहूर्त लागला.

छान झाली आहे . आवडली. लिहीत रहा.

अनिंद्य, माहितीपूर्ण आणि रंजक लेखमालिकेसाठी धन्यवाद! प्रतिसादांच्या संख्येवरून एखाद्या लेखाचे / मालिकेचे मूल्यमापन होऊ नये हेमावैम. पण मालिका अचानक संपल्यासारखी/ संपवल्यासारखी वाटली. प्रस्तुत लेखातली अर्मेनियन समाजाविषयीची माहिती रोचक आहे.
बंगाली लेखकांचे ख्यातनाम साहित्य आणि तत्कालीन समाजजीवन यांच्या परस्परसंबंधावर अधिक वाचायला आवडेल.

@ अतरंगी,

लेखमाला आवडल्याचे आवर्जून सांगितलेत, आभार !

@ चंद्रा,

प्रतिसादाबद्दल अनेक आभार.

.... मालिका अचानक संपल्यासारखी/ संपवल्यासारखी वाटली. ....

या विषयावर एकूण ५२ भाग लिहिण्याचे माझे नियोजन आहे, पैकी काही भाग इथे सॅम्पलर म्हणून / प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी प्रकाशित केले.

... बंगाली लेखकांचे ख्यातनाम साहित्य आणि तत्कालीन समाजजीवन यांच्या परस्परसंबंधावर अधिक वाचायला आवडेल....

उत्तम सुचवणी. मी भाग ५ आणि ६ मध्ये थोडा प्रयत्न केला आहे. Happy

अनेक सोयीसुविधांबाबत पाहिलेपणाचा मान कोलकात्याला आहे, ह्यात 'पोस्ट/ डाक' सुविधा आलीच. लेखमालेत उल्लेख झाला नाही.

कोलकात्यात इस्ट इंडिया कंपनीने डाक सुविधा पार १७७४ साली सुरु केली होती !!! आजचे GPO भवन म्हणजे जनरल पोस्ट ऑफिसची राजेशाही इमारत १८६४ साली - सुमारे ९० वर्षांनी बांधली गेली. आता तिथे उत्तम संग्रहालय केले आहे. पत्ता :- GPO, नेताजी सुभाष रोड, कोलकाता.

इमारतीच्या बाह्यभागात सुप्रसिद्ध व्हाइटचॅपल बेल फाउंड्री कंपनीने बनवलेले भव्य घड्याळ लावले आहे. ह्याच कंपनीने नंतर बनवलेले दुसरे मोठे घड्याळ म्हणजे लंडनचे 'बिग बेन', ते जास्त प्रसिद्धी पावले आहे.

सिटी ऑफ जॉय ! फ़्रेंच लेखक Dominique Lapierre यांनी कोलकत्याला बहाल केलेलं नामानिधान Happy

पुढे सिनेमाही आला सेम नावाचा.

सिटी ऑफ जॉय ! फ़्रेंच लेखक Dominique Lapierre ......... याच नावाची कादंबरी आहे.त्याचा अनुवाद वाचला आहे.मिशनऱ्यांनी कुष्ठरोग्यांची केलेली सेवा आणि पुनर्वसन या विषयावर आहे.

बरोबर देवकी ! Joy कमी आणि हालअपेष्टा जास्त.

कोलकात्यातल्या sisters of charity / मदर तेरेसा / चर्च आणि मिशनरीजवरचा भाग इथे प्रकाशित केलेला नाही.

सुंदर लेख....
आधीचे भाग वाचतो..

अनिंद्य, मिशनरीज वरचा भाग ही टाका ना इकडे मग.
आफ्टर ऑल, मिशनरीज हा कोलकत्याचा एक महत्वाचा भाग आणि दुर्लक्ष न करता येण्याजोगे अंतरंग आहे !!