मुलीसाठी पाळणा गीत

Submitted by विद्या जोग on 26 January, 2020 - 19:45

पाळणा गीत

बाळा जो जो जो , कुलभुषणी , चिन्मय मधुरा नंदिनी ,
बाळा जो जो जो ||धृ ||

अमुच्या घरि आली ,इवलि परी , रांगोळ्या ग दारी ,
सजला पाळणा, सोनेरी , अन चांदीची दोरी,
झुंबर वर हलती, जरतारी , मोदे जमली सारी
बाळा जो जो जो - १

शुभदिन आज असे, योजियला, नामकरण करण्याला
वंदुनी चरणाते , प्रार्थुनिया, आशिश कुलदेवीला
पाचारुन ज्येष्ठा, शुभ वेळा, आशीर्वच देण्याला
बाळा जो जो जो - २

रुणुझुणु नादविसी, लडिवाळे, पायी घुंगुर वाळे
सुमधुर तव बोला, परिसुनिया, सार्थक अवघे झाले
अनुदिनि तुजलागी, यश कीर्ती, सौख्य मिळावे बाळे
बाळा जो जो जो - ३

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults